'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 5 September 2017

सीमोल्लंघन जुलै ऑगस्ट २०१७


या अंकात...

            Get Well Soon, Nayana!
            निर्माण ७.२ ब शिबीर संपन्न
            निर्माण ८ निवड प्रक्रियेला सुरूवात
            NIRMAN Alumni वार्षिक ऑक्टोबर कार्यशाळा २०१७
नवी क्षितिजे
            IAS निर्माणी

नमस्कार मित्रमैत्रिणींनो…


मागच्या दोन महिन्यांत आपल्या आजूबाजूला जगात खूप काही घडलं. आसामला भयंकर पूर आला, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सुप्रीम कोर्टाने उचलबांगडी केल्यामुळे पाकिस्तानच्या लोकशाहीने पुन्हा गटांगळ्या खाल्ल्या, सरदार सरोवराचं आंदोलन पुन्हा एकदा पेटलं आणि मेधाताईंनी सरकारच्या उदासीनतेविरुद्ध सलग १७ दिवस उपोषण केलं, हरियाणामध्ये गुरमीत राम रहीम या स्वयंघोषित बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवल्यामुळे समर्थकांनी भयंकर हिंसा केली, इ. त्यातही एका बातमीने सगळा देश हळहळला - ते म्हणजे  बाबा राघव दास मेडिकल कॉलेज, गोरखपूरमध्ये घडलेले नवजात आणि लहानग्यांचे मृत्युकांड.
            या सर्व नकारात्मक आणि सात्विक संताप आणणाऱ्या बातम्यांच्या कल्लोळातून आम्ही काही सकारात्मक आणि आशादायक बातम्या घेऊन आलोय सीमोल्लंघनच्या ह्या अंकात…
           
Get Well Soon, Nayana!
सर्वात पहिली आनंदाची बातमी म्हणजे, चार दिवसांपूर्वीच मुंबईला लीलावती हॉस्पिटलमध्ये हृदयरोगाचा धोका लक्षात घेता नायनांची angiography आणि त्यापाठोपाठ angioplasty करण्यात आली. नायनांची ही दुसरी angioplasty होती आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. मॅथ्यू यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. लवकरच नायना शोधग्रामला परततील.


निर्माण ७.२ ब शिबीर संपन्न
सध्या सुरु असलेल्या निर्माण ७ (वैद्यकीय गट) या बॅचचे दुसरे शिबीर ऑगस्ट महिन्यात शोधग्राम येथे पार पडले. ०२ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत वैद्यकीय शाखेतील ५० युवक-युवतींनी ह्या शिबीरात उपस्थिती दर्शवली. आरोग्य क्षेत्रातील समस्यांबद्दल, त्यांच्या जटीलतेबद्दल कुतूहल आणि बौद्धिक समज निर्माण करणे; आरोग्य क्षेत्रात सामाजिक योगदान देण्यासाठीचे वेगवेगळे मार्ग समजून घेणे; वेगवेगळ्या रोल मॉडल्सच्या प्रवासातून सामाजिक कृती करण्याचे धाडस निर्माण करणे आणि आरोग्य क्षेत्राच्या परिघाबाहेरील सामाजिक-आर्थिक-राजकीय वास्तवाची ओळख व्हावी अशी ह्या शिबिराची ढोबळमानाने उद्दिष्टे होती.
निर्माण ७.१ ब शिबिराच्या शेवटी स्वतःसाठी, स्वतः बनवलेला कृती शिक्षण कार्यक्रम तसेच गेल्या ६ महिन्यांत घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी, त्यातून झालेले शिक्षण, पडलेले प्रश्न , वाचन, इ. च्या शेअरिंगने शिबिराची सुरूवात झाली. Public Health Foundation of India चे अध्यक्ष आणि भारतातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ पद्मभूषण डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी स्काईपद्वारे त्यांचा Cardiologist to Public Health Promoter या परिवर्तनाचा प्रवास उलगडून सांगितला. बि.आर. हिल्स ह्या आदिवासी भागात (जि. चामराजनगर, कर्नाटक) करुणा ट्रस्ट आणि विवेकानंद गिरीजन कल्याण केंद्र या संस्थेतून आरोग्य आणि आदिवासी हक्कांसाठी काम करत असलेले पद्मश्री डॉ. एच. सुदर्शन यांनी आपल्या कामाची थोडक्यात झलक दिली. त्यानंतर शिबिरार्थ्यांनी डॉ. सुदर्शन सरांसोबत भरपूर वेळ गप्पा मारल्या. मानसिक आरोग्य क्षेत्रात विकेंद्रीकरणाचा प्रयोग करणाऱ्या गोव्यातील ‘संगथ’ ह्या संस्थेच्या डॉ. विक्रम पटेलांनी स्काईपवरून देशातील तरुणांच्या मानसिक आरोग्यापुढील समस्या या विषयावर थोडक्यात मांडणी केली.
आरोग्य क्षेत्रात काम करत असताना ‘वैद्यकीय कुशलतेची धार कशी आणावी?’ या पेक्षा ‘का आणावी?’ या प्रश्नाच्या उत्तराचा शोध शिबिरार्थ्यांनी योगेश दादासोबत घेतला. डॉ. उपेंद्र वेदपाठक यांनी पांढरकवडा (जि. यवतमाळ) या तालुक्याच्या ठिकाणी गेली ३५ वर्ष ethical private practice करण्याचा त्यांचा अनुभव वर्णन केला. गुजरातमध्ये काम करत असलेल्या SEWA Rural या संस्थेचे डॉ. श्रेय देसाई यांनी शिबिरार्थ्यांसोबत स्काईपद्वारे संवाद साधला. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना नायनांची झालेली निर्णायक भेट आणि त्यानंतर अम्मा-नायनांचा आदर्श घेऊन भारतात परत येऊन संशोधन करण्याचा निर्णय, आयुष्यात ‘आदर्श’ (विचार किंवा व्यक्ती) असण्याचे महत्त्व यावर खेळीमेळीत भरपूर गप्पा झाल्या. जगात व्यापार कसा आला आणि त्याचा आरोग्य क्षेत्रात चोर पावलांनी होणारा शिरकाव हा विषय योगेश दादाने अत्यंत सोपा करून आणि वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून सांगितला. जगात व्यापार सुरु झाल्यानंतर झपाट्याने उदयाला आलेली जागतिक अर्थव्यवस्था कशी आहे, जागतिक मंदी कशी व का आली, भांडवलशाही कशी चालते, भांडवलशाहीचा माझ्या आयुष्याशी काय संबंध असे अनेक अर्थशास्त्रीय प्रश्न घेऊन सुनील काकांनी मांडणी केली. त्यानंतर योगेश दादाने अमेरिकेतून भारतात परत आल्यानंतर गडचिरोलीचा आरोग्याची प्राथमिक समस्या कशी शोधली, ती कशी मोजली आणि त्यानंतर काय उपाय योजले याचा प्रवास उलघडून सांगितला.
नवजात मृत्यू कमी करण्यासाठी जगातील सर्वात कमी खर्चिक आणि परिणामकारक पद्धत म्हणजे एचबीएनसी’. सगळ्या जगाने दखल घेतलेला हा प्रयोग आनंद दादाने सोप्या भाषेत शिबिरार्थ्यांना समजावून सांगितला. शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बंधपत्रित वैद्यकीय सेवा देण्याचा विषय डॉ. विठ्ठल साळवे (निर्माण ४) आणि अमृतने माहितीचा अधिकार वापरून कसा हाताळला याची छोटीशी गोष्ट अमृतने सर्वांना सांगितली. गडचिरोलीच्या १२ लाख लोकसंख्येमागे उपलब्ध असलेली एकमेव मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आरती बंग (निर्माण ४) हिने तिचा ग्रामीण भागातील मानसिक आरोग्याचा तिचा अनुभव सर्वांना सांगितला. अमृतने सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे काय काय वेगवेगळे पर्याय असू शकतात, असा मोठा कॅनवास सर्वांना दाखवला.
गावपातळीवर आरोग्यदूत करू शकतील अशी जंतूरोग निदानाची अचूक पद्धत नायनांनी शोधून काढली आणि जगभरात ते संशोधन गाजले. ह्या संशोधनामागची कथा आणि त्याचे प्रात्यक्षिक नायनांनी शिबिरार्थ्यांसोबत केले. प्रात्यक्षिकाअंती शिबिरार्थ्यांनी केलेल्या चुकांना उत्तर देताना “उच्चविद्याविभूषित तुम्हा डॉक्टरांपेक्षा माझ्या अडाणी आरोग्य सेविका बऱ्या!” असे खिजवत सर्वांना कोपरखळी मारली. गडचिरोली जिल्ह्याचा दारू आणि तंबाखूचा प्रश्न लक्षात घेता सर्च, महाराष्ट्र सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त भागीदारीतून सुरु झालेल्या ‘मुक्तीपथ’ या उपक्रमाविषयी नायनांनी माहिती दिली आणि दारू-तंबाखू हा प्रश्न देखील आरोग्याशी संबधित असल्याचे शिबिरार्थ्यांना दाखवून दिले. “I am a doctor and I don’t drink.” अशी पाटी सर्व डॉक्टरांनी क्लिनिकबाहेर लावावी या नायनांच्या सूचनेचेही सर्वांनी स्वागत केले. शिबिरात नायनांशी तीनदा प्रश्नोत्तरीदेखील झाली. दरशिबिराप्रमाणे याही शिबिरात काही निवडक पुस्तकांची समीक्षा शिबिरार्थ्यांनी मांडली. शिबिरातील सेशन्स अधिक चांगल्यापद्धतीने समजावे म्हणून वेगवेगळ्या exercises घेतल्या गेल्या. सेशन्सव्यतिरिक्त शिबिरार्थ्यांनी ‘आदर्श आरोग्यव्यवस्था कशी असावी’ या विषयावर चर्चासत्र रंगवलं.
आरोग्य क्षेत्रातील समस्या, माझी भूमिका, समस्या सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, आणि काही स्वप्न घेऊन शिबिरार्थी परतले. शिबिरार्थ्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!निर्माण ८ निवड प्रक्रियेला सुरूवात
            मागच्या एक महिनाभरापासून सुरु असलेले निर्माण ८ च्या प्रसिद्धी आणि अॅप्लिकेशन फॉर्म स्वीकारण्याचे काम नुकतेच संपत आले आहे. प्रत्येक ठिकाणी निर्माण टीमला पोहोचणे शक्य होत नाही, तरीपण ‘निर्माण’च्या समुदायासोबत, दृष्टीसोबत आणि स्वप्नासोबत असलेल्या बांधिलकीसाठी आपल्यापैकी प्रत्येकाने खूप खूप मेहनत घेतली. आपल्या सामुहिक प्रयत्नातून निर्माण ८ साठी महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राबाहेरूनही भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. आताच्या घडीला निर्माण ८ साठी एकूण ६५८ अर्ज आलेले आहेत.
अर्जांची छाननी झाल्यानंतर महाराष्ट्रभर मुलाखतींचे सत्र सुरु होईल. सामाजिक समस्यांशी दोन हात करणारी पिढी उभी करायची असे अम्मा-नायनांसोबतच आपल्या सर्व निर्माणींचे स्वप्न. म्हणून पुढचे शिलेदार निवडण्याची जबाबदारी पण आपलीच. त्यामुळे निर्माणच्या निवड प्रक्रियेत तुम्हा सर्वांचे सहकार्य निर्माण टीमला लागेल.
पुढच्या काही दिवसात निर्माण टीम मुलखतींना सुरूवात करेल. तेव्हा आपल्या सर्वांची भेट होईलच.


NIRMAN Alumni वार्षिक ऑक्टोबर कार्यशाळा २०१७

निर्माणच्या शिबिरातून गेलेले जे निर्माणी पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्यासाठी २०११ पासून दरवर्षी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते. सहसा ही कार्यशाळा ऑक्टोबर महिन्यात असते. या वर्षी मात्र दिवाळीच्या तारखांमुळे आणि सर्चमधील काही इतर पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे २०१७ ची कार्यशाळा ही २५ नोव्हेंबर दुपारपासून ते २७ नोव्हेंबर रात्रीपर्यंत (शनिवार ते सोमवार, एकूण अडीच दिवस) आयोजित करण्यात येत आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठीचे निमंत्रण लवकरच ईमेलद्वारे पाठवण्यात येईल पण वैयक्तिक कामाच्या व प्रवासाच्या नियोजनासाठी सोईचे जावे म्हणून तारखा आधीच कळवू इच्छितो.

सोलापूरची पूजा कुंभार (निर्माण ७), इंजिनिअरींग झाल्यानंतर दीड वर्ष Infosys ह्या कंपनीत काम करत होती. ती ने ती नोकरी सोडून पुण्यातील ‘खेळघर’ या संस्थेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागचा प्रवास ती स्वतः सांगतेय...

मी गेली दीड वर्ष डोळे, कान, मन, सगळं बंद ठेऊन Infosys मध्ये काम करत होते. अजूनही कॉलेजचे मित्रमैत्रिणी, त्यांची मैत्री एवढंच माझं आत्मकेंद्रित विश्व होतं. मला प्रश्न पडायचे - तिथल्या स्पर्धेत असणं खरंच एवढं महत्त्वाचं आहे का? शाळा कॉलेजमध्ये असताना वेगवेगळी पुस्तके वाचली होती. त्या पुस्तकांनी आणि त्यातल्या माणसांनी मनात घरच केलं होतं. तेव्हा वाटत राहायचं की मी सुद्धा असंच काहीतरी काम करणार, जे फक्त माझ्यापुरतं नसेल. एका ठरवून दिलेल्या चाकोरीत जगणं मला पटत नव्हतं. मग वाटलं की जे आवडत नाही असं काम करत बसण्यापेक्षा नवीन काहीतरी करू. हे जाणवलं की जर खरंच आयुष्य वेगळ्या प्रकारे जगायचं असेल तर रस्ता बदलला पाहिजे आणि तोही आत्ताच.
घरी जेव्हा आईबाबांना सांगितलं की नोकरी सोडून मी सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हा आईबाबांकडून विरोध होणं स्वाभाविक होतं. नोकरी सोडताना सगळ्यात मोठा प्रश्न होता आर्थिक सुरक्षिततेचा. कंपनीत मिळणाऱ्या पगारापेक्षा सामाजिक क्षेत्रात खूप कमी पगार मिळेल याची जाणीव होती. पहिला प्रश्न होता, बचतचं काय करायचं आणि दुसरं, आपात्कालीन परिस्थितीमध्ये मी काय करेन. पहिल्या प्रश्नाला मी स्वतःला उत्तर दिलं की बचत कमी होईल चालेल, गरजा कमी कशा करता येतील ते पाहू. दुसऱ्या प्रश्नाचं अजून समाधानकारक उत्तर नाही मिळालं. आणि मला जोडीदार मिळेल की नाही, याच्याबद्दल माझ्यापेक्षा आईबाबांनाच जास्त असुरक्षितता वाटते; त्यांची ही काळजी पण साहजिक आहे.
समान संधी उपलब्ध न झाल्याने कोणी उपेक्षिताचे आयुष्य जगावे हे काही मला पटत नाही. ‘खेळघर’ ही संस्था कोथरूडमधील ‘लक्ष्मीनगर’ वस्तीतल्या अशाच उपेक्षित मुलांसोबत काम करते. साधारणपणे पहिली ते दहावी पर्यंतची मुले खेळघरात येतात. त्यांच्या बुद्धीला, विचाराला चालना देईल असं काहीच त्यांच्या आसपास नसतं. या सगळ्या गोष्टी त्यांना काही प्रमाणात अनुभवता याव्यात, यासाठीच खेळघराकडून मुख्य काम केलं जातं.
माझा रोल इथे मुलांची ‘ताई’ असा आहे. माझ्याकडे चौथी-पाचवीचा गट आहे. आम्ही भाषा, गणित आणि life skills हे घटक मुलांसोबत घेतो. त्यासाठी वर्षभराचा आराखडा सुरुवातीलाच बनवला जातो. मला खेळघरात येऊन दोनच महिने झालेत. आता मुलांनी मला ‘ताई’ म्हणून स्वीकारलंय. त्यांच्यासोबत असताना नेहमीच असं जाणवतं की मुलं कधीच हताश, निराश होत नाहीत. प्रचंड ऊर्जा आणि उत्साह असते. मला प्रश्न पडतो की ते ज्या वातावरणात असतात तिथे इतका उत्साह येतो कुठून?
पूजाला तिच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा!

                                                                                                     पूजा कुंभार, निर्माण ७
                                                                                                                                pjkumbhar26@gmail.com

अमित ढगे ‘जन स्वास्थ्य सहयोग’ला रुजू


सोलापूर बार्शीच्या डॉ. अमितने नुकतीच आपली सरकारी बंधपत्रित वैद्यकीय सेवा गडचिरोली येथे पूर्ण केली. त्यानंतर त्याने छत्तीसगडमध्ये ‘जन स्वास्थ्य सहयोग’ या संस्थेसोबत काम करण्याचे ठरवले. ऐकुया त्याची कहाणी, त्याच्याच शब्दात...

मी डॉ. अमित. मागचा एक वर्ष देचलीपेठा आणि जिमलगट्टा (ता. अहेरी, जि. गडचिरोली) या दोन गावांत प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होतो. एप्रिल महिन्यात सरकारी बंधपत्रित सेवेचे एक वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी ‘आता पुढे काय?’ हा मोठाच प्रश्न समोर होता. शेवटच्या काही महिन्यांमध्ये यावर बरीच वैचारिक घुसळण केली, तरी नेमके उत्तर काही मिळाले नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये National Health Programmes चे स्थानिक पातळीवरचे काम करायला मिळाले. त्यामुळे Public Health कडे अधिक आकर्षिला गेलो. मात्र जेव्हा ओ.पी.डी.मध्ये एखादी emergency केस व्यवस्थित manage करायला नाही जमली तेव्हा स्वतःच्याच clinical knowledge च्या मर्यादांचा खूप संतापही यायचा. त्यामुळे आपण आधी आपले पुढचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायला हवे, असेही वाटायचे. ह्या संभ्रमात असे ठरवले की, आधी काम करायचे आणि त्यासोबतच NEET Entrance Exam चा अभ्यास करायचा. मग Post graduation की Public Health ते नंतर बघू.
अशावेळी छत्तीसगडमधील जन स्वास्थ्य सहयोग (JSS) ही संस्था मला माझ्यासाठी खूप उपयुक्त वाटली. १ जून २०१७ ला मी येथे रुजू झालो. इथे मी सध्या Gynaecology and Obstetrics च्या ओ.पी.डी.मध्ये काम करतोय. ह्या सोबतच प्रसूती कक्ष (labour room) आणि  प्रसुतीपश्यात कक्ष  (Prenatal Care ward) मध्येही काम करतो. दर शनिवारी JSS च्या शिवतराई येथील उपकेंद्रामध्ये क्लिनिकसाठी जातो. दिवसभराचा पूर्ण वेळ हा हॉस्पिटलमध्ये आणि इतर कामामध्ये जातो, आणि रात्री काही वेळ अभ्यास करतो.
इथे यायच्या आधीपासूनच खूप दडपण होते कारण JSS सारख्या ठिकाणी academics ला खूप जास्त महत्व दिले जाते. तिथे मी सहजपणे काम करू शकेन का? कामासोबतच अभ्यास करू शकेन का? असे प्रश्न पडायचे. JSS मध्ये खूप लहानलहान गोष्टीदेखील काटेकोरपणे पाळल्या जातात. जसे की प्रत्येक औषधाची मात्रा रुग्णाच्या वजनानुसार ठरवणे (अगदी Paracetamol सुद्धा), कोणतीही तपासणी विनाकारण न करणे, इत्यादी. आणि याच्या अगदी उलट, वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक केसमध्ये investigation profile आधी करून घ्यायची सवय झालेला ‘मी’ इथे त्याच आजारांकडे वेगळ्या प्रकारे पहायला, विचार करायला शिकतोय.

अमित ढगे, निर्माण ६