'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 21 November 2013

सीमोल्लंघन, नोव्हेंबर २०१३


जळो अविवेक | जळो अविचार || सारा अंधकार | दूर व्हावा ||

सौजन्य : निखिल जोशी, josnikhil@gmail.com

या अंकात

खासगी वैद्यकीय व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे? त्यामागचं अर्थकारण काय? या आणि अशा प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या डॉ. सोपान कदम यांच्या ऑक्टोबर सीमोल्लंघन मधील लेखाचा उत्तरार्ध...

ताज्या घडामोडी
प्रेरणास्रोत

नवी क्षितिजे

शोधक पाऊले
ü ‘Reliving Gandhi’ - आजकाल पॉप्युलर असलेल्या गांधीजींची चेष्टा करण्याच्या शिरस्त्याला बाजूला ठेवून गांधीजींबद्दल वाचन व चिंतन करताना श्रेणिकला जाणवलेले मुद्दे, आणि त्याचे झालेले शिक्षण याबद्दल त्याच्याच शब्दात...

ü ‘तारांगण’ – महाराष्ट्रात आणि देशात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करून गेलेल्या, स्वतःच्या कर्तुत्वाने स्वयंप्रकाशित, झालेल्या व्यक्तींच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक. परिचय करून देतोय निर्माण ५ चा निखिल मुळ्ये

ü फर्क पडता है – विष्णू नागर (हिंदी भाषेतील प्रसिद्ध कवी व विडंबनकार विष्णू नागर यांची एक सुरेख कविता)  

‘नोबल’ प्रोफेशनचा ‘कट’ (उत्तरार्ध)

आपण जेव्हा एका डॉक्टरकडून दुसऱ्या स्पेशालिस्टकडे, लॅबवाल्याकडे व फार्मसीमध्ये जातो, डॉक्टरांनी सांगितलेल्या साऱ्या तपासण्या करून घेतो, सारी औषधे विकत घेतो, तेंव्हा ‘आपल्याला लुटत तर नाही आहेत ना?’ असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. नुकतेच निर्माण ५.२ब (वैद्यकीय) शिबिरात एक वादळी सत्र झालं डॉ. सोपान कदम यांचं. याच अनुषंगाने सोपानने सीमोल्लंघनच्या ऑक्टोबर आवृत्तीत एक लेख लिहिला. हॉस्पीटल कटचे पैसे कसे वसुल करतात ते आपण त्या पहिल्या लेखात पहिले. वाचूया त्या लेखाचा उत्तरार्ध...

हॉस्पीटल कटचे पैसे कसे वसुल करतात ते आपण सीमोल्लंघनच्या ऑक्टोबर अंकात पहिले.
त्याच प्रमाणे जशी स्पर्धी वाढली तसे हॉस्पीटलने जास्त पैसे कमवण्यासाठी नवीन मार्ग शोधले जसे की ‘आमचेच हॉस्पीटल ,आमचीच लॅब, आमचेच मेडीकल’... मेडीकल व लॅब मधुन मिळणारा नफा बघुन ही पध्दत सुरु केली गेली. रुग्णाला दावाखान्याच्याच मेडीकल मधून औषधे घेणे बधंनकारक केले जाते व तसेच दावाखान्याच्याच लॅब मधुन तपासण्या कराव्या लागतात. एखाद्या रूग्णाने जर बाहेरच्या मेडीकल मधून औषधे घेण्याचा किंवा तपासण्या करण्याचा प्रयत्न केला तर त्याला रागवले जाते व सांगितले जाते की आपला रुग्ण घरी घेउन जा. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून देण्यासाठी हॉस्पीटलमध्ये फलक लावलेले असतात की  आपण जर औषधे बाहेरुन आणत असाल तर आपण आपल्या जबाबदारीवर आणावीत.
मेडीकल मधुन हॉस्पीटलला खुप फायदा होतो .काही औषध कंपन्या एकुण विक्रीच्या ५०% कमिशन देतात. हॉस्पीटलला गिफ्ट देतात, जसे की, फोर व्हीलर, फर्नीचर ,टिव्ही, कुलर, वॉटर फिल्टर, ईत्यादी. त्याचप्रमाणे जर हॉस्पीटल जी.पी. (जनरल प्रॅक्टिशनर) ना पार्टी देत असेल तर त्याचा सर्व खर्च ह्या औषध कंपन्या करतात. या पार्टीमधे मग जी.पी ना दारु ,नाच ,गाणे ,बायका पुरवणे ईत्यादी भानगडी होतात. लॅब मधुनही एकूण तपासण्याच्या रकमेतून ६०%  ते ६५ % नफा मिळतो.
त्याच प्रमाणे काही डॉक्टर्सकडे वॉर्डबॉय ट्रेन होतात. त्यांना हे डॉक्टर १५ ते २० हजारात डिग्री विकत घेउन देतात आणि छोट्या- मोठ्या खेड्यामधे प्रॅक्टिस टाकून देतात, कॅम्प घेउन सेटल करुन देतात. दवाखान्याचा सर्व खर्च मोठ्या हॉस्पीटलवाले डॉक्टर्स करतात व त्या वॉर्डबॉयला सेकंड हॅण्ड फोर व्हिलर घेउन देतात .मग हेच डॉक्टर ह्या हॉस्पीटलला रुग्ण पाठवतात व रात्री जर रुग्ण त्यांच्याकडे आला तर त्याला स्वतः आपल्या गाडीने आपल्या डॉकटरंच्या हॉस्पीटल मधे घेऊन जातात.
काही खेळातील नावांसारखे हॉस्पीटचे प्रकार असतात. उदाहरणार्थ,

# खो-खो हॉस्पीटल – ह्या हॉस्पीटलमधे नवीन रुग्ण  आल्याशिवाय जुन्या रुग्णाला डिस्चार्ज देत नाहीत. नेहमी हॉस्पीटल भरलेले पाहिजे व बेड चार्जेस मिळत राहिले पाहिजेत .असे सहसा – आय.सी.यू., बालरोग तज्ञ ,न्युरो हॉस्पिटल्स मधे घडते.

# कबड्डी हॉस्पीटल – यामधे रुगणाला वारंवार फ़ॉलोअप साठी बोलावणे व हॉस्पीटलमधे भरती करुन घेणे असा प्रकार चालतो. सहसा न्युरो, नेफ्रो,आर्थो, आय.सी.यु हॉस्पिटल्समधे असे घडते.

#  आट्या पाट्या हॉस्पीटल – हा प्रकार सहसा जी हॉस्पिटल्स तीन ते चार लोक़ांनी मिळून सुरू केलेली  असतात (ग्रुप हॉस्पीटल) तिथे पाहायला मिळतो. सहसा हे सर्व डॉक्टर एकाच विषायाचे तज्ञ असतात पण प्रत्येक जण वेगवेगळा राउंड घेतात (पाट्या टाकतात) नवीन तपासण्या सांगतात व पैसे वसुल करतात.

या धंदयात फक्त डॉक्टरच पैसे कमवतात असे नाही. आणखीनही बरेच लोक पैसे कमवतात. माझ्या ओळखीचा एक लॅब टेक्नीशियन होता त्याने एका मोठ्या खेड्यात लॅब सुरु केली होती. मी २-३ वर्षानंतर सहज त्या गावातून जाताना त्याची व माझी भेट झाली, त्याने मला त्याचे मोठे घर दाखवले व नवीन चारचाकी गाडी घेतली आहे व बँकेत काही रककम जमा आहे असे तो मला म्हणाला. मी एकदम आश्चर्यचकित झालो कारण चार वर्षापूर्वी याच मुलाकडे लॅब टाकण्यासाठी पैसे नव्हते, मी त्याला विचारले हे कसे? तो म्हणाला ही सर्व डेंग्यूची कमाई आहे. मी विचारले कसे काय? त्याने जे उत्तर दिले ते ऐकून मी परेशान झालो, तो म्हणाला की मी येथील ५ ते ६ जी.पी. शी टायअप केले आहे. ते माझ्याकडे जो रुग्ण [c.b.c] सी.बी.सी. पाठवतात मी त्या रुग्णाचा [platelet count] नॉर्मल जरी असेल तरी कमी दाखवतो. मग जी.पी. त्या रुग्णाला दोन ते तीन दिवस आपल्या दवाखान्यात भरती करुन घेतात व मग परत तपासणी करण्यासाठी सांगतात. दुस-या वेळस तपासणी न करताच नॉर्मल रिपोर्ट देतो, जी. पी. त्या रुग्णाकडून बिल घेउन त्याला डिसचार्ज करतात. मग त्या बिलामधुन सुद्धा मला काही पैसे मिळतात.
आता मी आपल्याला कॉर्पोरेट हॉस्पीटल बददल माहिती देणार आहे. ह्या हॉस्पीटलचे मालक सहसा एका तज्ञ विभागासाठी दोन तज्ञ डॉक्टर्स नोकरीला ठेवतात. या तज्ञ डॉकटरना फिक्स पगार असतो. वरून त्यांच्याकडून येणाऱ्या रुग्णांच्या एकूण बिलामधुनही त्यांना काही टक्के (कमिशन) देतात. जर त्यांनी काही प्रोसीजर केली तर त्याचे वेगळे पैसे मिळतात आणि त्यांचे प्रोमोशन होते, पगारात वाढ होते, हॉस्पीटलमधे मान वाढतो. त्यामुळे नेहमीच या दोन तज्ञ डॉक्टरांमध्ये स्पर्धा असते. हे डॉक्टर त्यांचा व्यक्तिगत पी.आर.ओ. कामला ठेवतात. जो तज्ञ डॉक्टर जास्त नफा देणार नाही त्याला कधीही हॉस्पीटलमधून कमी केले जाऊ शकते. या सर्व कारणांमुळे या तज्ञ डॉक्टरांचे लक्ष हे नवीन रुग्ण ओढून आणणे व जास्तीत जास्त प्रोसीजर करुन व रुग्णाला जास्त बिल लावून हॉस्पीटलला नफा मिळवून देणे यावर असते.
मी याचा विचार केला की असे का होत असावे? मी काही तज्ञ डॉक्टरांसोबत या विषयी चर्ची केली, काही अनुभव घेतले, त्यावरुन काही गोष्टी माझ्या लक्ष्यात आल्या. त्या अश्या -
जर एखद्या तज्ञ डॉक्टरला स्वतःचे हॉस्पीटल सुरु करयाचे असेल तर त्याला खूप खर्च येतो. 
कोणत्याही डॉकटरला जर हॉस्पीटल चांगले चालवायचे असेल तर ते मोक्याच्या ठिकाणी असावे लागते. जागा स्वतःची की भाड्याची हाही प्रश्न महत्वाचा ठरतो. जागा भाड्याने घेऊन हॉस्पीटल बांधायचे असेल तरी खर्चे १० लाख ते ५० लाख असा येतो. जागा विकत घेऊन बाधंकामासाठी खूपच पैसे लागतात. हॉस्पीटल मधील वस्तू घेण्यासाठी वेगळे पैसे लागतात, फर्नीचर खर्च, हॉस्पीटल उदघाटन खर्च, (हॉस्पीटलचे उदघाटन हे हॉस्पीटल लोकांना माहिती होवे म्हणून मोठे करावे लागते. त्यामधे सुधा २ ते ३ लाख रुपये खर्चे होतो) असे ईतर खर्चही चुकत नाहीतच.
# हॉस्पीटल सुरु केल्यावर कमीतकमी १० जणांचा स्टाफ तरी कामाला ठेवावा लागतो व सुरुवातीला हॉस्पीटलमध्ये रुग्ण येवो न येवो स्टाफला पगार द्यावाच लागतो. (क़ॉल सेंटर्स, मॉल्सची संख्या वाढल्यामुळे स्टाफ मिळणे अवघड झाले आहे)
-          डॉक्टर कोणत्या विषयात तज्ञ आहे यावरही नफा किती लवकर चालू होणार हे अवलंबून असते. 
      # बँक एकूण रकमेच्या फक्त ६० ते ७० टकके पैसे देते. बाकीचे पैसे डॉक्टरांना जमा करावे लागतात. बँकेचे लोन जर घ्यायचे असेल तर घराच्या मालमत्तेची कागदपत्रे बॅकेकडे तारण म्हणून ठेवावी लागतात. बँकेचा ह्प्ता ५० हजार / महिना पर्य्ंत येतो.

या सर्व गोष्टींमुळे डॉक्टरही या चक्रात गुंतुन जातात. 

हे सर्व बंद कसे करावे हे मला समजले नाही. आणि समजले तरी मी त्यावर काही उपाय करू शकेन की नाही यात मला शंका वाटत होती म्हणून मी मधला पर्याय धरला तो असा की आपणच ह्या प्रकारातून बाहेर पडावे. जर ह्या क्षेत्रातील प्रत्येकाने असा प्रयत्न केला तर मला वाटते ही समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मधील काही जुन्या डॉक्टर्सनी कट देणे व घेणे प्रकारापासुन स्वतःला दुर ठेवण्याची सुरुवात केली आहे. आपण अशी करुया की नवीन डॉक्टर्सही या प्रकारापासून स्वतःला दूर ठेवतील.
डॉ. सोपान कदम, drkadamsopan@gmail.com

सीमोल्लंघकांचा ऑक्टोबर मेळावा !

निर्माणची शिक्षण प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या शिबिरार्थींच्या पुढील क्षमता विकासासाठी आणि त्यांच्या कामाला वेग येण्यासाठी आयोजित केली जाणारी प्रशिक्षण कार्यशाळा (ऑक्टोबर वर्कशॉप) दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ११ ते १६ ऑक्टोबर दरम्यान सर्च, शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. सामाजिक समस्यांचे आव्हान घेऊन आपल्या व्यक्तिगत जीवनात सीमोल्लंघन करणाऱ्या युवा सीमोल्लंघकांचाच  जणू हा मेळावा..
यावर्षीच्या कार्यशाळेत डॉ. आनंद करंदीकर, शेखर साठे, कुमार केतकर, प्रदीप लोखंडे, मकरंद करकरे, सुनिल चव्हाण या सामाजिक, राजकीय आणि व्यवसाय क्षेत्रातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी निर्माणच्या युवांना मार्गदर्शन केले. 

विकासाच्या विविध कसोट्या, फ्रेमवर्क्स काय व आपापले काम त्याच्याशी कसे संलग्न होऊ शकते यावर डॉ. आनंद करंदीकर, अमर्त्य सेन जगदीश भगवती या प्रसिद्ध वादाबद्दल शेखर साठे व कुमार केतकर यांनी आपले विचार मांडले. रुरल रिलेशन्स व ग्यान की लायब्ररीज या आपल्या इनोव्हेटिव्ह प्रयोगाची माहिती उद्योजक प्रदीप लोखंडे यांनी दिली. सुनिल चव्हाण काकांनी आर्थिक व्यवस्थापनाबद्दल तर मकरंद करकारेंनी ‘7 Habits of Highly Effective People’ या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित सेशन घेतले.
           
या सोबतच शासकीय व्यवस्था, स्वयंसेवी संस्था, सोशल एंत्रप्रुनरशिप, फेलोशिप्स, इ. च्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या निर्माणच्या युवांनी आपापल्या कामाचे व त्यातून होत असलेल्या शिक्षणाचे देखील शेअरिंग केले. अम्मा, नायना, अशोक भार्गव चाचा, योगेश दादा यांनीदेखील शिबिरार्थ्यांशी संवाद साधला.

विचार, भावना व कृती यांची पुरेशी रसद घेऊन आणि नवी क्षितिजे पार करण्यासाठीचा उत्साह घेऊन या युवांचा दसरा साजरा झाला....

तारुण्यभान औरंगाबादमध्ये . .

कळीचं फुल व्हावं इतक्या सहजपणे येत खरतर तरुणपण! पण प्रसारमाध्यमे आणि इंटरनेटच्या विळख्यामुळे हा प्रवास दिवसेंदिवस अधिक खडतर अन काटेरी होत चालला आहे हे आपण सर्वजण अस्वस्थपणे पाहतो आहोत. या विषयावर नुसतीच चर्चा करण्याऐवजी एक कृतीशील पाऊल उचलावं म्हणून सुरु झालेला आमचा "स्त्री जागरण मंच"  गेल्या सहा सात वर्षांपासून किशोरवयीन मुलामुलींसाठी काम करत आहे. वस्तीवरील मुलं, तसेच पालिकेच्या शाळांपासून उच्चभ्रू विद्यालयापर्यंत समाजाच्या विविध स्तरातील मुलामुलींसाठी कार्यशाळा घेऊन या वयोगटाच्या मनापर्यंत पोचण्याचा, आणि त्यांच्या मनातली काजळी थोडीतरी पुसून त्यांनी स्वच्छ नजरेने पुढील आयुष्याचं आशादायक चित्र रेखाटाव यासाठी प्रयत्न करत आहे.
त्यातूनच  महाविद्यालयीन वयोगटासाठी कार्यशाळा घेण्याची कल्पना पुढे आली. आणि त्यासाठी एकच नाव डोळ्यापुढे आले ते म्हणजे "डॉ. राणी बंग ". त्यांचे या विषयातले ज्ञान आणि अनुभव बघता त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची कल्पना सर्वानुमते संमत झाली. आणि मग प्रत्यक्ष कार्यशाळा आणि त्याचबरोबर live  training असा हा शुभयोग धडवून आणण्याचा आम्ही निर्धार केला. सलग तीन दिवसांच्या कार्यशाळेसाठी कॉलेजच्या मुलांना गोळा करणे हे एक आव्हान होते. यासाठी आमच्या मदतीला उभा राहिला त्रिशूल कुलकर्णी. एम आय टी या इंजिनीअरिंग कॉलेजचा प्राध्यापक आणि निर्माणचा सदस्य. यासाठी त्याचे कॉलेज  सहप्रायोजक झाले आणि विद्यार्थ्यांची टीम स्वयंसेवक !


दि. २३,२४ व २५ ऑक्टोबर २०१३ या काळात ही कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. ३६४ जणांची उपस्थिती होती. आपल्या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयावर इतक्या संवेदनशीलतेने आणि कमालीच्या सहजतेने संवाद साधता येतो ही गोष्ट मुलांना अद्भुत वाटत होती. त्यामुळे त्यांचा उत्साही प्रतिसाद कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि अन्य प्राध्यापकानाही आश्चर्यचकित करून गेला.
तरुणाईला विचारांची एक नवी दिशा देणाऱ्या "तारुण्यभान" या कार्यशाळेचे संयोजक होण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याने उमलत्या वयाशी मैत्री करण्याच्या आमच्या प्रयत्नात एक मोठी चढण पार केल्यासारखे वाटत आहे. तरुणाईला  सहजपणे आपलसं  करण्याची कला, अवघड विषय हळुवारपणे समजावण्याची हातोटी, आणि तब्येतीच्या त्रासावर मात करून passion ने काम करण्याची वृत्ती या सर्व गोष्टी राणीताईच्या सहवासात आम्ही अनुभवल्या. त्यांच्या बरोबर आलेल्या सुनंदाताई, राजेंद्रभाऊ आणि ज्ञानेश्वरभाऊ यांनीही प्रचंड energy ने साथ दिली. आणि एकूणच आमच्या औ'बाद शहरातील मुलांसाठी एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम घेतल्याचे समाधान ह्या कार्यशाळेने स्त्री जागरण मंचाला दिले.

स्त्रोत : डॉ. सुनिता डोइबळे, drsunitadoibale@gmail.com

धुळे निर्माण टीमची (धुव्वादार) मिटिंग

धुळ्यात संदीप देवरे, ज्ञानेश मगर आणि त्यांचे मित्र ‘संवाद लर्निंग सेंटर’ चालवतात. या सेंटरमध्ये १० ऑक्टोबर २०१३ ला  नाशिक, धुळे आणि जळगाव मधील निर्माण शिबिरार्थीं व त्यांचे मित्र अशी १८ जणांची मिटिंग झाली.
याप्रसंगी धुळ्यातील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सुरेश थोरात याचं सुंदर सेशन झालं. १९८८ पासून अंनिसचं काम, जादूटोणा विरोधी विधेयकाचा संपूर्ण इतिहास, त्या त्या वेळच्या सामाजिक, राजकीय घटना यावर ते बोलले. या विधेयकातील विविध बाबी, विधेयकाला विरोध होण्याची कारणं इ. गोष्टी त्यांनी सांगितल्या. येत्या अधिवेशनात या कायद्याचे भवितव्य ठरेल. जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मंजूर व्हावे यासाठी आपणही काही प्रयत्न करू असं वाटून - मुख्यमंत्र्यांना इ मेल पाठवणे, सह्या गोळा करून त्या पाठविणे, शाळा - कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये या विधेयाकाविषयी माहिती देऊन पोस्ट कार्ड लिहायला सांगणे असा कृती आराखडा आखला गेला.
त्यानंतर सर्वांनी शेअरिंग केले. ज्यात, मी सध्या करत असलेल्या कामाचे स्वरूप व त्यातील अडचणी, मला माझ्या कामात काय मदत हवी आहे, जी या ग्रुपमधून मिळू शकते, माझ्यात काय स्किल्स आहेत ज्यांची ग्रुपमधील इतरांना मदत होईल यावर सगळे बोलले. या मिटिंगचे मुख्य फलित म्हणजे -  धुळे, नाशिक, जळगाव भागातील आम्हा सर्व निर्माणींची भेट झाली, एकमेकांच्या कामाबद्दल, आणि कामात येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती मिळाली, या पुढे करावयाच्या Group Activities ठरवता आल्या.
पुढची मिटिंग १८-१९ जानेवारीला जळगावला होईल. एकूणच ही मिटिंग सर्वांसाठीच आनंददायी व उत्साहवर्धक ठरली!
स्रोत : मुक्ता नावरेकर, muktasn1@gmail.com
आणि मयूर सरोदे, mayursarode17@gmail.com

सागर आबनेच्या प्रयत्नातून साकारले, कुर्ली येथे रचनावादी शिक्षणावर प्रदर्शन

सागर आबने हा निर्माण ५ चा आपला मित्र, कुर्ली ह्या  बेळगाव जिल्ह्यातील छोट्याश्या गावी रचनावादी शिक्षणाचा एक प्रयोग त्याच्या 'रचनावादी बालक पालक शिक्षणसंस्था, कुर्ली' ह्या संस्थे मार्फत राबवत आहे.  ह्या प्रयोगांतर्गत, रचनावादी शिक्षणाच्या तत्वांवर चालणारी शिशुवाडी व बालवाडी त्याने सुरु केली आहे.
मात्र कुर्ली भागात रचनावादी शिक्षणाबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे, सागरने एक शैक्षणिक प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे दिनांक १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान हे प्रदर्शन संपन्न झाले. फक्त शैक्षणिक प्रदर्शनाबद्दल लोकांना फारशी उत्सुकता नसल्यामुळे त्यात सेंद्रिय शेती, रासायनिक शेती, शेतीची औजारे, tractors ह्याबद्दल देखील माहितीपर stalls मांडले गेले होते. 
सागरच्या बालवाडीतील विविध साहित्य, मुलांनी केलेले काम तसेच रचनावादी शिक्षणाची तत्वे सांगणारे २०० बोर्ड ह्या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचा सगळा खर्च लोकवर्गणीतून करण्यात आला होता हि विशेष उल्लेखनीय बाब आहे. प्रदर्शनाला अंदाजे ४५००० लोकांनी भेट दिली.
शिशुवाडी व बालवाडी व्यतिरिक्त पहिली व दुसरीच्या मुलांसाठी जवळपासच्या ५ गावांमध्ये विद्याभवने (support classes) देखील सुरु करण्याचा सागरचा मानस आहे. त्याची पूर्वतयारी झाली असून हळू हळू लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सागरला त्याच्या ह्या नवीन प्रयत्नासाठी खूप खूप शुभेच्छा !


स्त्रोत : सागर आबने, sagar_abane@gmail.com

कचरा व्यवस्थापनाच्या तुघलकी कारभाराला स्थानिक उत्तर

घराघरांतून सर्व कचरा एकत्र करून डेपोमध्ये न्यायचा आणि तिकडे पुन्हा ओला-सुका कचरा वेगळा करून त्याचे योग्य व्यवस्थापन करायचे असा तुघलकी कारभार महापालिकेला करावा लागतो. हे व्यवस्थापन स्थानिक पातळीवर काही प्रमाणात तुम्हा-आम्हाला करता येईल का? गेल्या एप्रिलपासून यावर उत्तर शोधायचा प्रयत्न करतेय मधुरा समुद्र (निर्माण ५).
मधुरा आणि तिची मैत्रीण सोनाली त्यांच्या गल्लीतल्या १८ कुटुंबांना सोबत घेऊन ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्याचा खटाटोप करत आहेत. या दोघींनी १८ कुटुंबातून वर्गणी गोळा करून प्रत्येक कुटुंबाला ओला कचरा (मुख्यतः स्वयंपाकघरातील व बागेतील) वेगळा काढण्यासाठी कचरापेटी दिली आहे. हा कचरा वर्गणीतूनच घेतलेल्या २०० लिटरच्या प्लास्टिक टाकीत जमा केला जातो. बागेत ठेवलेल्या या टाकीत ही कुटुंबे आपापला कचरा जमा करतात. त्यांच्याकडून राहून गेल्यास हे काम मधुरा व सोनाली करतात. दिवसाखेर या दोघी टाकीतील ओला कचरा झाकण्यासाठी त्यावर सुकी पाने टाकतात. साधारण १२ दिवसांत ही टाकी भरते. पुढचे १० दिवस खत बनेपर्यंत कचरा टाकीत न टाकता महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाकडे दिला जातो. खत बनल्यावर ते रोपवाटिकेला दिले जाते.
या कामात मधुराला कोणकोणत्या अडचणी आल्या? महापालिका सर्व कचरा गोळा करत असताना ओला कचरा आपण वेगळा काढून ठेवण्याची गरज लोकांना पटवून द्यावी लागली. लोकांशी हा संवाद साधणे हे खूप आव्हानात्मक काम होते. गरज पटल्यावर वर्गणी गोळा करण्यासाठी संवादाची आणखी एक फेरी करणे त्याहूनही कठीण होते. सुरुवातीला लाकडाच्या टाकीत कचरा जमा केला जात असे. मात्र पावसाळ्यात या पेट्या कुजून जावू लागल्या. त्यामुळे प्लास्टिक टाकी वापरणे भाग पडले. गल्लीतल्या एक आजी आजारी पडल्यावर त्यांनी कचऱ्याच्या वासामुळे आजारी पडल्याचा निष्कर्ष काढला, त्यामुळे गेला एक महिना कचरा गोळा करणे बंद आहे. मात्र टाकीसाठी वेगळी जागा शोधून हा प्रयोग सुरू ठेवण्याचे मधुराने ठरवले आहे.


या प्रयोगातून खत तर मिळतेच, पण लोकांच्या मानसिकतेत काही फरक पडला का? या १८ कुटुंबांनी फटाकेविरहीत दिवाळी साजरी केली. तसेच ही कुटुंबे अन्य गल्ल्यांमध्ये हा प्रयोग करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करत असल्याचे मधुरा सांगते. मधुराला या प्रयोगासाठी शुभेच्छा!

स्त्रोत : मधुरा समुद्र, madhura.samudra@gmail.com

लडाख मधील मुलांना जोडतोय ज्ञानसेतू, निर्माणचा अश्विन पावडे सहभागी

भारातातील दुर्गम व मागासलेल्या राज्यांतील मुलांच्या साक्षामिकरणासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा ज्ञानसेतू उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून राबविला जात असून अरुणाचल प्रदेश, आसाम, जम्मू काश्मीर व छत्तीसगढ ह्या राज्यांमध्ये विज्ञान शिकविण्याच्या माध्यमातून तेथील लोकांशी संवाद होणे, वैचारिक देवाणघेवाण होणे हे देखील ह्या उपक्रमाचे उद्देश्य आहे. कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या batches ठराविक काळानंतर ह्या राज्यांमध्ये जाउन हे शिक्षणाचे कार्य करतात.
ज्ञानसेतूच्या कार्यपद्धतीनुसार, दुर्गम भागात एखादी कार्यशाळा घेण्याआधी जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे अत्यंत काटेकोर ट्रेनिंग होते. वैज्ञानिक संकल्पनांसह तो भाग, तेथील संस्कृती, सध्याची शैक्षणिक परिस्थिती, लोकांचा दृष्टीकोन ह्या सगळ्याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. 
नुकतेच कार्यकर्त्यांची एक फळी जम्मू काश्मीर मधील लडाख जिल्ह्यात १० दिवसांचा शैक्षणिक कार्यक्रम राबवून परतली. त्यात निर्माण ४ च्या अश्विन पावडेचा देखील सहभाग होता. १० दिवसांमध्ये ह्या चमूने लेहच्या आजूबाजूच्या ९ शासकीय शाळांमध्ये विज्ञानातील काही संकल्पना, नियम सोप्प्या रोजच्या आयुष्यातील उदाहरणांच्या माध्यमातून , खेळाच्या आणि प्रयोगांच्या माध्यमातून स्पष्ट केल्या. तसेच तेथील स्थानिक पातळीवर येणाऱ्या शिक्षणातील अडचणी, तेथील शाळांमधील कार्यपद्धती, नियोजन ह्याबद्दल शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी देखील ह्या उपक्रमाबद्दल आत्मीयता व confidence दर्शवला.
आपला वेळ काढून अशा दुर्गम भागात शिक्षणाचे कार्य पोहोचविण्यासाठी गेलेल्या अश्विनचे अभिनंदन.  ह्या मोहिमेबद्दल अधिक माहिती  -http://www.youtube.com/watch?v=EuNBGkzQdtk येथे बघता येईल.
ज्ञानसेतूसाठी कार्य करू इच्छीणाऱ्या सर्व युवांनी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी -


स्रोत : अश्विन पावडे, seasonsadm1987akp@gmail.com

भारतचा त्रिपुरा राज्यातील माता व शिशुंसाठी आरोग्य सुविधांचा अभ्यास

भारत ठाकरे (निर्माण ३) बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुर तालुकयातला. अकोला येथून BAMS पूर्ण केल्यानंतर 2012 मधे त्याने टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई येथे masters of public health in health policy, economics & finance करीता प्रवेश घेतला. त्याचाच भाग म्हणुन 3rd semester मध्ये त्याला field practicum (internship) साठी त्रिपुरा येथे जाण्याची संधी मिळाली.
ह्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत त्याने national rural health mission, Tripura सोबत maternal and newborn health वर काम केले. यामध्ये  माता व शिशुंसाठी असलेल्या आरोग्य सुविधांची quality याचा अभ्यास केला व सध्य: स्थितिवरुन उपाय सुचविण्याचा प्रयत्न केला.
            या अभ्यासादरम्यान भारतला प्रकार्षाणे हे जाणवले की कागदोपत्री आकडेवारींमध्ये उत्तम दिसणारे त्रिपुरा आणि प्रत्यक्षात असणारे त्रिपुरा हयात फार मोठी तफावत आहे. तसेच भ्रष्ट आणि बेजबाबदार आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना तेथील प्रमाणिक लोकांची होणारी गोचिही त्याला जवळून अनुभवायास मिळाली.
या अनुभवांचा ठेवा घेउन मला भविष्यात दुर्गम भागात कार्यरत असलेल्या NGO बरोबर काम करण्याची भारतची ईच्छा आहे.


स्रोत : भारत ठाकरे, bharat.thakare9206@gmail.com

प्रीती बंगाळचे दक्षिण भारत व उत्तराखंड येथील जंगलात संशोधन सुरु

प्रीती बंगाळ (निर्माण ४) हिने तिचे पदव्युत्तर शिक्षण M.Sc. in Biodiversity, पुणे विद्यापीठ येथून पूर्ण केले. शिक्षण घेत असताना प्रीती पक्ष्यांमधील विविधतेवर अभ्यास करत होती. याच क्षेत्रात पुढे अभ्यास करण्यात प्रीतीला रस होता. अशातच शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रीतीला बंगलोर येथील Indian Institute of Sciences  या संस्थेसोबत संशोधन करण्याची संधी चालून आली. मुळातच निसर्गाची आवड आणि या क्षेत्रात अभ्यास करण्याची इच्छा असल्याने प्रीतीने ही संधी लगेचच स्वीकारली.
या अभ्यासात प्रीती आणि तिचे सहकारी मुख्यतः जंगलांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या विविध पद्धतींचा अभ्यास करत आहेत. या अभ्यासासाठी दक्षिण भारत आणि उत्तराखंड येथील पानझडीच्या जंगलांची निवड करण्यात आली आहे. या अभ्यासात झाडांची वैशिष्ट्ये, नेमके कोणकोणते प्राणी-पक्षी बीजप्रसारण करतात, बीजप्रसारण हे कोणकोणत्या माध्यमांद्वारे होते(वारा,पाणी,प्राणी-पक्षी), जंगलांचे भवितव्य कसे असेल आणि निसर्गातील या सर्व घटकांचा परस्परांसोबत कसा संबंध आहे यावर भर दिला जाणार आहे.
नुकताच प्रीतीने दक्षिण भारतातील अभ्यास पूर्ण केला आहे आणि यापुढील दोन ते तीन महिने प्रीती व तिचे सहकारी उत्तराखंडमधील जंगलांमध्ये अभ्यास करणार आहेत. वीज,पाणी अशा कोणत्याही सुविधा नसलेल्या भागात राहून प्रीती हे काम करत आहे. प्रीतीला पुढील प्रवासासाठी निर्माण परिवारातर्फे खूप शुभेच्छा!!

स्त्रोत : प्रीती बंगाळ, pritibangal@gmail.com

अमोल चेपेचे अझीम प्रेमजी फौन्डेशन सोबत शिक्षण क्षेत्रात काम सुरु

अमोल (निर्माण ५) मुळचा यवतमाळचा. २००९ साली M Sc Geoinformatics मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात एका कंपनीत करणाऱ्या अमोलने २०१० साली आपल्या नोकरीला रामराम ठोकला आणि आपल्या मित्रसोबत खेडेगावातील मुलांपर्यंत संगणक प्रशिक्षण पोहचवण्यासाठी विद्यादीपही NGO सुरु केली. सध्या विद्यादीपचे काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोमाने सुरु आहे.
            हे काम करत असताना अमोलला शिक्षण क्षेत्राची अधिक माहिती घेण्याची, सरकारी शिक्षण प्रक्रिया जवळून अनुभवण्याची  गरज जाणवली. याच दरम्यान त्याला अझीम प्रेमजी फौंडेशनच्या शिक्षण क्षेत्रातील कामाबद्दल समजले. बदल प्रक्रिया उपक्रमनिहाय न ठेवता कार्यप्रणालीत (व सरकारी यंत्रणेतच) सुधारणा करून शाश्वत व सर्वव्यापी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न अझीम प्रेमजी फौन्डेशन करते आहे.
या प्रक्रियेंतर्गत फौन्डेशन तरुणांना शिक्षणाच्या विविध बारकाव्यांचा अभ्यास करता यावा तसेच ग्रामीण शासकीय शाळांच्या कामाचा / परिस्थितीचा अनुभव घेता यावा म्हणून एक वर्षाची फेलोशिप देते. या उपक्रमांतार्गात काम करण्याची संधी अमोलला मिळाली. यासाठी तो राजस्थान मधील टोंक जिल्ह्यात एक वर्षासाठी कामावर रुजू झाला.
या अनुभवाचा विद्यादीपच्या पुढील वाटचालीत नक्कीच उपयोग होईल अशी अमोलला खात्री वाटते. अमोलला या नवीन कामासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. .
अझीम प्रेमजी फौन्डेशनच्या कामाबद्दल अधिक माहितीसाठी : www.azimpremjifoundation.org


स्रोत : अमोल चेपे, amolchepe@gmail.com