'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

सीमोल्लंघन: सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१४


मुखपृष्ठ सौजन्य : शिवानी, अमृता ढगे (निर्माण ५) आणि निखील जोशी


या अंकात . .


      
निर्माण ६, ऑक्टोबर कार्यशाळा आणि सीमोल्लंघनच्या ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हितगुज

GM बियाण्यांच्या चाचण्यांवरून राहुरीला मोठे आंदोलन आकार घेत आहे. पण GM बियाण्यांचा प्रश्न नेमका आहे तरी काय? सोप्या भाषेत गणेश बिराजदार समजून देतोय...

११ सप्टेंबर हा विनोबांचा जन्मदिन तर २ ऑक्टोबर गांधींचा. यादरम्यान विनोबांचे एक पुस्तक वाचून त्याचे आपल्या मनात उमटलेले तरंग शोधग्रामच्या ३० कार्यकर्त्यांनी लिहिले. निखिल जोशीने ही एकादश सेवावीया पुस्तकाचा करून दिलेला परिचय...

अतिशय दुर्गम भागांतील चार निर्माणींची चार ठिकाणी धडपड

आपल्या struggle च्या काळात झालेल्या शिक्षणाबद्दल अतिशय प्रामाणिकपणे सांगतेय अमृता ढगे

निर्माणमध्ये येण्यापूर्वीच गडचिरोली तंबाखूमुक्ती अभियानात सहभागी झालेल्या प्रतीकच्या मनातील तरंग...अद्वैत दंडवतेचा क्रमशः लेखनमस्कार मित्र-मैत्रिणींनो

निर्माण ६ येत आहे...
गेले दोन-तीन महिने सुरू असणारी निर्माण ६ ची निवडप्रक्रिया अखेर पूर्ण झाली. Concern (सामाजिक समस्यांविषयी तळमळ), Drive (त्या समस्यांवर काम करण्यासाठी धडपड करण्याची तयारी) आणि Talent (त्या समस्या सोडवण्याची क्षमता) हे निवडीचे मार्गदर्शक निकष होते. निर्माण ६ करिता महाराष्ट्राच्या २९ जिल्ह्यांतून ४२६, तर महाराष्ट्राबाहेरून १० अर्ज आले होते. यांपैकी ३०७ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील १६४ जणांची (मुले-९४, मुली ७०) निवड निर्माणच्या शिबिरांसाठी झाली आहे. या बॅचमध्ये नुकतेच बारावी झालेला मुलगाही आहे. त्याचप्रमाणे BAMS, MA, LLB इ. शिकून पोलीस खात्यात असणारा व दोन पुस्तकांचा लेखक असणारा मुलगाही आहे. या बॅचचे सरासरी वय २२ वर्षे असल्याने सरासरी ३५ वय असणाऱ्या आमच्या निर्माण कार्यकारी टीमला खूप उत्साहाचे भरते आले आहे.
मुलाखतींदरम्यान तुमच्यापैकी अनेक जणांना खूप महिन्यांनी भेटता आले. अनेकांनी मुलाखतींच्या आयोजनाची किचकट  जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. अनेक जण सुट्टी घेऊन मुलाखती घ्यायला आले. मुलाखतींसाठी आपली घरे-दारे उघडी करून दिली. पावसाची पर्वा न करता ऐन वेळी करावी लागणारी पळापळ केली. आमच्या टीमला जेवू घातले. तुम्ही नसताना तुमच्या आई-बाबांनीही खूप मदत केली. सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद!

सीमोल्लंघनला तीन वर्षे पूर्ण...
निर्माण शिबीरे झाल्यानंतर सीमोल्लंघन आपल्याला जोडून ठेवते. २०११ दसऱ्याच्या निमित्ताने निर्माणच्या युवांचे धाडस इतरांपर्यंत पोचवण्यासाठी सीमोल्लंघनचा उपद्व्याप सुरू झाला. त्याला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे धाडस करत राहून बातम्या निर्माण करणाऱ्या तुम्हा सर्वांचं, या बातम्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढणाऱ्या पत्रकारांचं, प्रामाणिकपणे आपले चढ-उतार शेअर करणाऱ्यांचं, सर्वांचे शिक्षण व्हावे म्हणून स्वानुभव - पुस्तक परिचय – वैचारिक लेख – वैचारिक कविता पाठवणाऱ्या मित्रांचं - मार्गदर्शकांचं, तणावपूर्ण वातावरणात हसवणाऱ्या व्यंगचित्रकार व छायाचित्रकारांचं मनापासून अभिनंदन !

चौथा ऑक्टोबर वर्कशॉप, वर्ष २०१४
   
         सालाबाद प्रमाणे निर्माणची ऑक्टोबर कार्यशाळा ९ ते १२ ऑक्टोबर २०१४ दरम्यान सर्च, शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. निर्माणची शिक्षण प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेचे हे चौथे वर्ष! तीन दिवसांच्या या हृद्य अनुभवाबद्दल शिबिरार्थीनी दिलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया –

            “निर्माणच्या शिबिरांमधून मिळणारी उर्जा आणि उत्साह शब्दात पकडण अवघड आहे. या वेळच्या ऑक्टोबर कार्यशाळेतले बहुतांश चेहरे मला नवीन होते.पण प्रत्येकाचा प्रवास ऐकल्यावर अस वाटलं की मी या सगळ्यांना खूप पूर्वीपासून ओळखते.प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, वाट वेगळी, अडचणी वेगळ्या, आणि तरी सगळे एकमेकांचे सोबती...
            ‘विकास’ म्हणजे काय? आणि विकास कोणासाठी? याचा विचार न करता विकासाची स्वप्न बघणाऱ्यांच्या गर्दीत वास्तवच भान असलेला हा कोपरा मला तरी खूप सुरक्षित वाटला.”
अमृता प्रधान, निर्माण २
         
            “ही माझी पहिलीच ऑक्टोबर कार्यशाळा होती. कॅम्पला येण्याआधी नुकताच जॉब सोडला होता. त्यामुळं ‘फिअर ऑफ फ्रीडम’ अशा काहीशा मनस्थितीत होतो. इथे निर्माण प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे मित्र एकाच वेळी भेटले. त्यांचं काम, त्यांच्या अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, त्यांच्या प्रेरणा, निराशा, काहींच फोकस्ड असणं, तर काहींच भरकटणं, यातून बरच काही शिकता आल. निर्माणवाल्यांचा प्रवास साधारणपणे कसा असतो याच एक चित्र तयार झालं. कॅम्प संपताना अस वाटत होतं की ‘देवाच्या दयेने भरपूर स्वातंत्र्य मिळत आहे तर ते नाकारण्याचा नाकर्तेपणा करू नये, ते नीट वापरावं.’ ”
निरंजन तोरडमल, निर्माण ५

                “हा माझा पहिला ऑक्टोबर वर्कशॉप. ग्रामीण भागात काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव असल्याने शिबिरात झालेलं ‘सामाजिक क्षेत्रात कामाचे मूल्यमापन का आणि कसे करावे?’ हे सेशन (माझ्यासाठी) फार उपयोगी होतं. मी (सध्या) जे काम करत आहे तसच काम निर्माणचे बरेच मित्र-मैत्रिणी करत आहेत. शिबिराच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि त्याचं काम, कामाची पद्धत समजून घेता आली. त्यांच्या अनुभव कथनातून आणि केलेल्या प्रयोगांमधून मला माझ्या कामाकडे विविध अंगांनी बघण्याची दृष्टी मिळाली.
कामाच्या धावपळीत सर्चची ही भेट आणि शेअरिंग ‘एनर्जी बूस्टर’ होती. अम्मा, नायना, आणि सर्व निर्माणींना भेटून अजून जोमाने काम करण्याची उर्जा मिळाली.”

कल्याणी राऊत, निर्माण ५

जनुक-परिवर्तीत (Genetically Modified, G.M.) अन्न सुरक्षित का नाही?

बॅसिलस थरिंजिएंसिस (Bacillus thuringiensis, Bt) नावाच्या बॅक्टेरिया मध्ये -endotoxin (किंवा cry-protein) नावाचे प्रथिन तयार होते, जे पोटात गेल्यास काही जातीचे कीटक मृत्यू पावतात. नेमकं होतं काय, तर हे प्रथिन या किडींच्या शरीरात गेल्यानंतर ते त्यांच्या आतड्यातील पेशींमध्ये पोहोचते. तिथे या प्रथिनामुळे घडून आलेल्या जनुकीय आणि रासायनिक प्रक्रियांचा परिणाम म्हणून त्या कीटकांच्या आतड्यातील या पेशी मृत्यू पावतात आणि त्यामुळे आतडे दुर्बल पडणे व आतड्याला छिद्र पडणे असे परिणाम घडून येतात. परिणामतः किडीचे अन्न खाणे थांबते व उपासमारीने मृत्यू होतो.
बी.टी. मधील विषामुळे मृत्यू पावणार्‍या या कीटकांच्या काही जाती विशिष्ट पिकांच्या शत्रू आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे हा बी.टी. जीवाणू आपल्या शरीरात cry-protein करू शकतो, तसेच प्रथिन या पिकांना त्यांच्या स्वतःच्या शरीरात तयार करता आले तर? विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील महत्वाची घटना म्हणजे, जनुकशास्त्रीय संशोधनातून हे लक्षात आले की, असे काही शक्य आहे. अर्थात बी.टी. मधील, कीटकांसाठी विषारी असलेले ते प्रथिन तयार करणारे जनुक काढून हव्या असलेल्या पिकामध्ये सोडल्यास त्या पिकातही ते विषारी प्रथिन तयार होवू शकते. हे ‘जनुकीय परिवर्तना(Genetic modification) चे तंत्रज्ञान. त्यामुळे आता या पिकावर किडीने हल्ला केलाच तर त्या पिकामध्ये नव्याने तयार होत असलेल्या प्रथिनामुळे मृत्यू पावतील आणि परिणामतः पिक किडीच्या प्रादुर्भावापासून वाचेल. एका दृष्टीने हे प्रचंड क्रांतिकारी व सोईचे आहे; एखाद्या जिवातून हवा तो गुणधर्म असलेला जनुक घ्यायचा, दुसऱ्या हव्या त्या जीवामध्ये टाकायचा, आणि अपेक्षित गुणधर्म असलेला जीव तयार करायचा. पण दुर्दैवाने हे गणित इतके सरळसोपे नाही.
बी.टी.चेच उदाहरण घ्यायचे तर,आपण वर पाहिले की, बी.टी. मुळे किडीचा मृत्यू हा बी.टी. च्या शरीरातील एका विशिष्ठ प्रथिनाची कीटकाच्या शरीरातील रसायनांशी झालेल्या अंतरक्रियेचा परिणाम होता. त्यामुळे एखाद्या पिकामध्ये असा गुणधर्म आल्यास, केवळ याच एका किडीवर परिणाम होईल असे नाही, तर ज्या-ज्या जीवामध्ये (non-target organisms) संबंधित प्रथिनाशी आंतरक्रिया घडू शकतील असे रासायनिक-जीवशास्त्रीय वातावरण आहे, तिथे असे परिणाम घडून येवू शकतात. वेगवेगळी जीवशास्त्रीय आणि रासायनिक घडण यामुळे एखाद्या जिवाच्या शरीरात अशा अंतरक्रीयेमुळे अनपेक्षितपणे चांगला बदल घडून येवू शकेल, काहींमध्ये वाईट, तर काहींमध्ये त्याचे विघटन होऊन काहीच परिणाम घडणार नाही. मात्र नेमके कुठल्या जीवावर काय परिणाम होईल, हे मात्र परिणाम घडून आल्याशिवाय ठामपणे सांगता येणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या पद्धतीने वनस्पतींमध्ये फलन होते (परपरागीकरण), त्यामुळे एखादे असे घातक रसायन अन्नसाखळीत सोडले गेले तर ते परत काढून घेणे केवळ अशक्यप्राय आहे. तीन, जैवसंस्था ही प्रचंड गुंतागुंतीची प्रणाली (system) आहे. बहुतेक जीव अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून, आणि वनस्पती परागीकरणासाठी जवळपास पूर्णपणे (अंदाजे ७५%) मधमाश्या, फुलपाखरे, वटवाघूळ अशा जीवांवर अवलंबून असतात. त्यामुळे, उदाहरणार्थ, अशा प्रकारच्या विषामुळे परागीकरणास मदत करणाऱ्या जीवांचा नाश झाला तर वनस्पतींचे परागीकरण होणार नाही, आणि पर्यायाने इतर जीवांना अन्न मिळणार नाही.
जनुकीय तंत्रामुळे कशाप्रकारचे घातक परिणाम होवू शकतात याचे हे झाले एक उदाहरण. पण अन्नसाखळी, जीवशास्त्रीय आणि रासायनिक पातळीवरील प्रचंड परस्परावलंबित्व आणि गुंतागुंत यामुळे असेच अनेक दुष्परिणाम घडून येवू शकतात ज्याची आपण आत्तापर्यंत अपेक्षा केलेली नाही. आणि त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे, यापूर्वीच नमूद केल्याप्रमाणे काही वेळा असे परिणाम घडून येवू शकतात, ज्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आणणे शक्य होणार नाही.
त्यामुळे अत्यंत खात्रीपूर्वक शहानिशा झाल्याशिवाय असे तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या बाहेर आणले जावू नये, ही एक अत्यंत रास्त अपेक्षा आहे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान प्रयोगाशाळेबाहेर आणण्यातील ही झाली रासायनिक-जीवाशास्त्रीय अडचण, पण दुसरी, अत्यंत धोकादायक अडचण म्हणजे तांत्रिक अडचण. अर्थात अशा स्वरूपाच्या तंत्रज्ञानामुळे अनपेक्षित, घातक परिणाम घडून येवू नयेत यासाठी प्रत्येक पातळीवर पुरेशी सक्षम यंत्रणा उभारलेली आहे का? भारतामध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या काही पिकांच्या प्रत्यक्ष जमिनीवर चाचण्यांसाठी शासन परवानगी देवू पाहत आहे. विशेषतः महाराष्ट्रात अशा चाचण्यांना राहुरी (अहमदनगर) आणि परभणी कृषी विद्यापीठात सुरुवात झालेली आहे. अर्थात शासनाचा असा दावा आहे की, यामुळे काहीही अघटीत परिणाम घडून येवू नये यासाठी पुरेशी तांत्रिक आणि नियामक तयारी आपल्याकडे आहे. नेमकी काय तयारी आपण केलेली आहे?
१.      अशा चाचण्यांमध्ये असलेल्या संभावित धोक्यांची जाणीव झाल्यानंतर या चाचण्यांना पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी देण्यास नकार देणाऱ्या जयंती नटराजन यांची आठ दिवसात मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
२.      महाराष्ट्रात अशा पिकांशी संबंधित जीवशास्त्रीय, जनुकशास्त्रीय, आणि  विषचिकित्साशास्त्रीय धोक्यांची शहानिशा करून परवानगी देण्यासाठी, यांत्रिक अभियांत्रिकी (mechanical engineering) या विषयातील पदवी असलेल्या अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली, संबंधित विषयांमधील पुरेसे ज्ञान नसलेल्या तज्ञांची समिती नेमली आहे.
३.      संबंधित विषयातील तज्ञांच्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने अशा चाचण्या करण्यासाठी पुरेशी यंत्रणा आपल्याकडे नाही असे ठामपणे सांगितले असताना, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता अशा चाचण्यांना परवानगी दिली जात आहे.
४.      या चाचण्या आणि त्यातून तयार झालेल्या पिकांचे घातक दुष्परिणाम झाल्यास त्याविषयी संबंधित कंपन्यांवर काय जबाबदारी असावी याबाबत कुठलेही नियमन केलेले नाही.
५.      अशा तंत्रज्ञानाच्या गरजेचा अभ्यास झालेला नाही.
पुरेशी तयारी असल्याची ग्वाही दिली गेलेल्या आपल्या व्यवस्थेचे प्रत्यक्ष वास्तव मात्र हे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ञांच्या समितीने, इतकेच नव्हे तर शेतीवरील संसदीय स्थायी समितीने अशा चाचण्या भारतात होवू नयेत अशी स्पष्ट सुचना दिली आहे. असे असताना, संबंधित बियाणे उत्पादक कंपन्या आपल्या आर्थिक आणि राजकीय बळाचा वापर करून अशा चाचण्यांना परवानगी मिळवत आहेत. अशा चाचण्यांच्या बरेवाईट निकालावर केवळ संबंधित कंपन्यांचे भवितव्य आणि आर्थिक गणित अवलंबून नसून, तो आपल्या सुरक्षित अन्नाचा, आरोग्याचा, आणि जीवन-मरणाचा त्यामुळे सर्व स्तरातून याला विरोध करण्याची गरज आहे. हा घातक प्रकार थांबविण्यासाठी भारतातील शेतकरी व इतर जागरूक नागरिक आंदोलन छेडण्याच्या व सत्याग्रह पुकारण्याच्या विचारात आहेत. आपण सर्वांनी त्याला जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी खालील व्यक्तींसोबत संपर्क करावा.
                                                            गणेश बिराजदार, gsbirajdar516@gmail.com
अधिक माहिती व कृतीसाठी संपर्क (कोरडवाहू गटातर्फे) :
तन्मय जोशी, tanmay_sj@yahoo.com 
तेजश्री कांबळे, tejashri2211@gmail.com    

आम्हाला कळलेले विनोबा विचार...

११ सप्टेंबर हा विनोबांचा जन्मदिन तर २ ऑक्टोबर गांधींचा. गांधींचा विचार पुढे नेण्यात कदाचित विनोबांचे सर्वात मोठे योगदान. या ११ सप्टेंबरला नायानांनी शोधग्रामच्या कार्यकर्त्यांना एक सुंदर कल्पना सुचवली. विनोबांचे कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचे आपल्या मनात उमटलेले तरंग सर्वांनी लिहायचे. या हस्तलिखिताचे  प्रकाशन २ ऑक्टोबरला. तब्बल ३० जणांनी छोटे-मोठे लेख दिले. यातील निखिल जोशीने ‘ही एकादश सेवावी’ या पुस्तकाचा करून दिलेला परिचय...पुस्तक परिचय: ही एकादश सेवावी – विनोबा


सामाजिक क्षेत्रात काम करताना problem solving attitude अधिक महत्त्वाचा की आत्मशुद्धीची प्रक्रिया?
हा प्रश्न कोणाला का बरे पडावा?
मी सर्चमध्ये आलो त्यादरम्यान problem solving attitude पेक्षा आत्मशुद्धीच्या प्रक्रियेकडे माझा अधिक कल होता. निसर्गाबद्दल  खूप जीवापाड तळमळ वाटत असल्याने आपली जीवनशैली अधिकाधिक नैसर्गिक कशी करता येईल यासाठी खूप प्रयत्न करायचो. मग इमारत कितीही उंच असली तरी वीज वाचवण्यासाठी lift ऐवजी जिने वापरणे, कितीही गर्मी असली तरी कूलर न वापरणे, घरातील बाईक न वापरता public transport / सायकल वापरणे, प्लास्टिक टाळण्यासाठी बिस्कीटे / चिप्स / चॉकलेट्स खायचे सोडून देणे, हॉटेलला जाणे बंद करणे, सकाळी उठल्यावर चहा पिल्याशिवाय चैन पडत नाही म्हणून चहावरचे अवलंबन टाळण्यासाठी चहा बंद करणे, स्वावलंबनाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतः स्वयंपाक करणे - शेतीचे प्रयोग करणे, खादी वापरणे, कचरा जाळला जाऊ नये म्हणून रोज जास्तीचे श्रमदान करणे, पाईपलाईन दुरुस्तीचे काम मजुरांकडून करून न घेता स्वतः मित्रांसोबत करणे असे अनेक प्रयोग अतुल-अश्विन-सिंधू-केदार-वैभव-वेंकी यांच्यासोबत वेगवेगळया वेळी केले. मात्र हा मार्ग कठीण होता. आत्मशुद्धी हे ध्येय असले तरी output कडे लक्ष जायचे. आपल्या संकल्पांचे significant output दिसायचेच नाही. आपल्याला पाहून खूप जणांचे वर्तन बदलले – लोकांच्या गरजा कमी होऊन माणसाचा निसर्गावरचा भार कमी झाला असे मुळीच दिसले नाही. आपल्याच निश्चयापासून घसरण्याची सतत भीती होती. तशातच माझ्या सर्चमधील मुख्य कामाचे output देखील विशेष येत नव्हते. आपल्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून भलताच हट्ट आपण धरून बसतो आहोत असे वाटू लागले. यथावकाश नैसर्गिक जीवनशैलीबद्दल विशेष आस्था असणारी सर्चमधील मित्रमंडळी हळुहळू सर्च सोडून गेली. याच वेळी अमृत, सुजय, विक्रम यांची जीवनशैलीचा प्रमाणाबाहेर बाऊ न करता problem सोडवण्याची जबरदस्त वृत्ती खूप आकर्षित करू लागली. ‘आपण काय करतो’ (input) पेक्षा ‘काय फलित निघाले’ (output) हे महत्त्वाचे असल्याचे पटू लागले.
‘आत्मशुद्धी’वरील श्रद्धा हळुहळू कमी होऊन ‘problem solving’वरील श्रद्धा वाढू लागली. विचारांतील एक खूप मोठा अडसर दूर झाला. चक्रे फिरू लागली, कामे होऊ लागली, output येऊ लागलं. पूर्वी छटाकभर कामाला खूप वेळ लावणाऱ्या मला इतकी कामे येऊ लागली (त्यातली अनेक मी स्वतःहून ओढवून घेऊ लागलो.) की दिवसभर काम केले तरी वेळ कमी पडायचा. Weekdays weekends यांच्यातील फरक जाणवेनासा झाला. कामे घेण्याची व पूर्ण करण्याची नशा चढू लागली. हा मार्ग आपल्याला उपयुक्त ठरत आहे हे समजल्यावर हळुहळू ‘आत्मशुद्धी’च्या मार्गाकडे दुर्लक्ष व प्रसंगी हेटाळणी होऊ लागली. शरीरश्रम बंद झाले. कचरा जळताना दिसला तर अस्वस्थ वाटेनासे झाले (‘छोट्या छोट्या किती गोष्टींची काळजी करत बसणार?’). दिवसा दिवे चालू दिसले तरी ते बंद करण्याचे कष्टच घेईनासा झालो. हळुहळू चहा व बिस्कीटाने मागील दाराने माझ्या आयुष्यात पुन्हा प्रवेश केला. एखाद्या व्यसनमुक्त माणासाच्या आयुष्यात दारूची सवय relapse व्हावी त्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांताला चहा व बिस्किटांचा अनुशेष मी व्याजासकट भरून काढला. रोज एका ठराविक वेळी canteen ला जाण्याची ओढ वाटू लागली. सामूहिक प्याज कचोरी, रसगुल्ले, चिवडा, चहा यांची ओढ वाटू लागली. एखादा दिवस सामूहिक खाण्याचा कार्यक्रम झाला नाही तर कसेसे वाटू लागले. कामावर याचा विपरीत परिणाम होऊ लागला. वर गेलेला कामाचा आलेख पुन्हा खाली येऊ लागला. खाण्या-पिण्यात, फिरण्यात-फोटो काढण्यात मजा यायची. पण घरी तणावात असणाऱ्या आईला फोन करायला वेळच मिळायचा नाही. काहीतरी चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले.
अशातच ‘गांधी’ चित्रपट पाहण्यात आला. ‘आत्मकथा’ही वाचू लागलो. गांधींचा मार्ग आत्मशुद्धीचा होता. मात्र केवळ संन्यासी बनून न राहता त्यांनी इतरांच्या आयुष्यातल्या समस्या सोडवल्या. ‘आत्मशुद्धी’विना ‘problem solving’ चा मार्ग स्वीकारला तर गाडी भरकटते आणि Problem solving विना आत्मशुद्धीचा मार्ग अवलंबणे फारच कठीण, खडतर असा माझा अनुभव आहे. येथे आत्मशुद्धी problem solving च्या विरोधात नसून दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. (वरवर द्वैत वाटणाऱ्या दोन गोष्टींमध्ये अद्वैत शोधणे ही विनोबांचीच देणगी!). एक निर्गुण तर तर दुसरे सगुण. आत्मशुद्धीची भरकटलेली गाडी पुन्हा मार्गावर आणण्यासाठी विनोबांचे ‘ही एकादश सेवावी’ वाचायला घेतले.
आम्ही सध्या जी प्रार्थना म्हणतो –
अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह
शरीरश्रम आस्वाद सर्वत्र भयवर्जन
सर्वधर्मीं समानत्व स्वदेशी स्पर्शभावना
ही एकादश सेवावी नम्रत्वे व्रत-निश्चये
या अकरा व्रतांमध्ये अनिंदा हे व्रत जोडून प्रत्येक व्रताबद्द्ल विस्ताराने विनोबांनी लिहिले आहे. गांधींच्या ‘मंगल प्रभात’चा हा विस्तार. ही व्रते काही गांधी / विनोबांनी पहिल्यांदा सुरू केली नाहीत. यातली अनेक व्रते जैन, बौद्ध इ. धर्मांत खूप पूर्वीपासून आहेत. ही व्रते साधू-संन्याशांसाठी आहेत असे मानले जाई. मात्र व्यावहारिक, सांसारिक काम करणाऱ्यांसाठीदेखील या व्रतांची आवश्यकता असल्याचे गांधींनी सांगितले. ही गांधींची सर्वात मोठी देणगी असल्याचे विनोबा म्हणतात.
अहिंसा-सत्य इ. शब्द ऐकायला छान वाटतात. अगदी मुन्नाभाई सुद्धा ‘बापूजीके पास अंग्रेजो के खिलाफ अहिंसा और सत्य ये हत्यार थे’ असं बोलून जातो. पण त्यांचा अर्थ काय? शारीरिक हिंसा न करणे व खरे बोलणे म्हणजेच अहिंसा आणि सत्य का? प्रत्येक व्रताचे सूक्ष्म व सखोल चिंतन विनोबांनी या पुस्तकात केले आहे. उदा. अहिंसेबद्दल त्यांची अनेक वाक्ये हळुहळू आपले डोळे लख्ख उघडत जातात...
·       बचावाची हिंसा आणि उठावाची हिंसा या दोन्ही प्रकारच्या हिंसेपासून निवृत्त होणे हा या व्रताचा अर्थ आहे.
·       हिंसा देहाची शक्ती आहे. अहिंसा आत्म्याची शक्ती आहे, आणि आत्मा मरत नाही.
·       आपली अहिंसेची शक्ती वाढवायची असेल तर ‘कोणाला भ्यायचे नाही आणि कोणाला भिववायचे नाही’ असे व्रत घ्यावेच लागेल.
·       दंडशक्तीच्या आधारे मी एखादी गोष्ट लादेन तर ते चुकीचे ठरेल. ज्ञानशक्तीच्या आधारे एखादी गोष्ट लादणेही चुकीचे ठरेल. उपवास वगैरे तपस्येच्या शक्तीने ती लादणेही गैर ठरेल. उपवास करावेत ते चित्तशुद्धीसाठी, आत्मपरीक्षणासाठी, आत्मचिंतनासाठी किंवा संकल्प बळ वाढवण्यासाठी.
·       अहिंसेचा एक अंश आहे प्रेम, आणि दुसरा अंश आहे करुणा. प्रेमाचा अर्थ आहे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे आणि करूणेचा अर्थ आहे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणे.
·       आपल्यावर जे प्रेम करतात, त्यांच्यावर आपण प्रेम करतो. हे तर जनावरेही करतात. कोणी आपला द्वेष करत असला तरी त्याच्यावरही प्रेम करावे. तेंव्हा शक्ती वाढते.
·       शत्रूवर प्रेम करणे ही सहजसाध्य गोष्ट नाही. द्वेष तेथे सहज आहे, म्हणून तेथे प्रेमाचा प्रकाश जास्तच हवा.
·       रागाने दुसऱ्याला मारणे म्हणजे हिंसा, आणि रागाने उपोषण करणे म्हणजे अहिंसा, असे नाही. अहिंसा केवळ बाह्य क्रिया नाही. ती हृदयाची निष्ठा आहे.
·       अहिंसा म्हणजे विनाशाच्या कामात भाग न घेणे, एवढेच नव्हे. रचनात्मक कामांमध्ये तन्मय होणे हे अहिंसेचे मुख्य रूप आहे.
·       अनिंदा व्रत तसे अहिंसेचे अंगच आहे. परंतु त्याची एवढी आवश्यकता आहे की ते स्वतंत्र व्रतच असले पाहिजे. वाणीत निंदा नसणे एवढाच मर्यादित या व्रताचा अर्थ नाही. हृदयशुद्धी तेव्हाच साधेल, जेव्हा गुणग्रहण होईल. इतरांचे दोष पाहूच नयेत, गुणच पाहावेत.
यातल्या अनेक विचारांशी गीता प्रवचनांच्या रोजच्या वाचनाच्या वेळी ओळख झाली होती. कठीण परीक्षेच्या काळात शांत आणि खंबीर राहण्यासाठी या विचारांनी मला खूप साथ दिली. ‘गुणग्रहणाच्या’ विचाराने तर माझ्या दृष्टीकोनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत. सर्चमधील चार वर्षाच्या काळात माझी खूप वाढ झाली. मात्र अनेकदा न पटणाऱ्याही गोष्टी घडल्या. मात्र हळुहळू सर्वांवर प्रेम करायला शिकलो, सर्वांच्यातले गुण पहायला शिकलो. न पटणाऱ्या गोष्टींवर प्रेमाने तोडगा काढायचा प्रयत्न केला. त्यामुळे माझा समतोल टिकून राहायला अनेकदा मदत झाली.
आत्मशुद्धी म्हणजे केवळ बाह्य वर्तनबदल नव्हे, तर हृदयशुद्धीसाठी आपली वृत्तीदेखील बदलत नेणे असे मला पुस्तक वाचताना जाणवले. उंच डोंगराच्या अंधाऱ्या घाटात वळणावळणाने जात असताना अचानक एखाद्या वळणावर लख्ख सूर्य दिसावा अशी अनेक वाक्ये या पुस्तकात आपल्याला येऊन धडकतात. आपल्याला विचार करायला भाग पाडतात. एकाच व्रताबद्दल अनेक वेळा वाचले तर नवा अर्थ लागत जातो.
फोटोग्राफीमध्ये frame composition बद्दल एक तत्त्व वाचले होते. ‘सामान्यपणे फोटोच्या फ्रेममध्ये अधिकाधिक गोष्टी याव्यात म्हणून आपण प्रयत्न करत असतो. मात्र मुख्य गोष्ट सोडून जेव्हा अधिकाधिक गोष्टी आपण फ्रेममधून काढून टाकतो तेव्हाच फोटो सुंदर बनतो.’ हे फोटोग्राफीचे तत्त्व आपल्या आयुष्यालाही अगदी चपखल बसते. आपल्या ध्येयाच्या आड आपल्या इच्छा, आकांक्षा, वासना, लहरी इ. गोष्टी येऊ नयेत यासाठी – आपल्या आयुष्याचा फोटो अधिक सुंदर करण्यासाठी – हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.
निखिल जोशी, josnikhil@gmail.com

डॉ. आशिष चांगोले कलाहांडीत


दुर्गम भागात आरोग्यसेवा देणारी एक प्रेरणादायी साखळीच निर्माणच्या तरुण डॉक्टरांनी बनवली आहे. गडचिरोली, मेळघाट, छत्तीसगढ येथे काम करणाऱ्या डॉक्टरांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आशिष चांगोले (निर्माण २) चक्क ओडिशाच्या कलाहांडी या दुर्गम जिल्ह्यातील ‘स्वास्थ्य स्वराज’ या संस्थेत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाला आहे.


मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असणाऱ्या या भागात टाळता येण्यासारखे मृत्यू टाळायचे हे ‘स्वास्थ्य स्वराज’चे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लोकांना संस्थेवर अवलंबून न ठेवता गावागावातील स्वास्थ्य साथींना (आरोग्यदूत) प्रशिक्षणामार्फत सक्षम करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे. २ क्लस्टर मधील ७३ स्वास्थ्य साथींना मलेरिया, टीबी, खरूज, हागवण यांच्याबद्दल माहिती व या आजारांच्या रुग्णांना ओळखून गावातच कशी काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा मुख्यालयापासून ५० किमी अंतरावरील subcenter मध्ये आठवड्यातून २ दिवस ओपीडी सेवाही दिली जाते. प्रशिक्षण आणि आरोग्य तपासणी सेवा व उपचार हे आशिषचे मुख्य काम आहे.
छत्तीसगढ येथील ‘जन स्वास्थ्य सहयोग’ मध्ये आशिष कार्यरत असताना तिथल्याच डॉ. अॅक्विनस यांनी ओडीशातल्या अतिदुर्गम व वैद्यकीय सुविधा नसणाऱ्या भागात आरोग्यसेवा देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. केवळ डॉ. अॅक्विनस यांना सोबत म्हणून कलाहांडीला गेलेला आशिष आता तेथे रमून गेला आहे. गेल्या ४ महिन्यांत झालेल्या शिक्षणाबद्दल बोलताना आशिष म्हणाला, “जंगलातल्या पहाडातून, नद्या-नाल्यांमधून आपले बाळ व सामन घेऊन प्रशिक्षणासाठी २५-३० किमी अंतर चालत येणाऱ्या स्वास्थ्य साथींच्या चेहऱ्यांवर तक्रारीचा कोणताच भाव नसतो. त्यांच्यासोबत काम करताना खूप समाधान मिळते. त्यांच्यावर भडीमार न करता त्यांना समजून घेऊन प्रशिक्षण देण्याचा जीवापाड प्रयत्न करतो. त्यासाठी कोणत्याही मेडिकलच्या पुस्तकापेक्षा Where there is no doctor आणि Helping health workers learn ही पुस्तके वाचत आणि जगत आहे. तसेच निर्माण health camp मध्ये शिकलेला मलेरिया वास्तवात अनुभवत आहे. यादरम्यान गरज पडेल ती कामे करावी लागतात. वेळ पडली तर गावांत जाण्यासाठी जीपदेखील चालवतो आणि स्वास्थ्य साथींच्या प्रशिक्षणात वापरण्यात येणाऱ्या चित्रकथातली चित्रेदेखील काढतो. कंदा आदिवासींची कुई भाषादेखील शिकत आहे. कमी resources असताना creativity खूप वाढल्याचा अनुभव येत आहे.”
स्त्रोत- आशिष चांगोले, ashishdc3@gmail.com

प्रियदर्श तुरे व सहकाऱ्यांनी वाचवले सर्पदंश झालेल्या मुलीचे प्राण

मेळघाटातील काटकुंभ ह्या भागातील बहुतांश लोक आदिवासी आहेत. सर्पदंश झाल्यावर त्यावर मांत्रिकाचे उपचार घेण्याची पद्धत येथे प्रसिद्ध आहे. मात्र अशा मांत्रिकाच्या उपचारामुळे अनेकवेळा लोकांच्या प्राणावर बेतण्याची शक्याता निर्माण होते. असाच एक प्रसंग नुकताच काटकुंभ येथे घडला.
काटकुंभ  येथील एका १५ वर्षीय मुलीस रात्री ९ वाजता सर्पदंश झाला. मात्र घरच्यांनी तिला दवाखान्यात न नेता मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने पूजा-अर्चा केली व तिला सतत कापुराचा धूर दिला. १० तास उपचार केल्यानंतर त्याने महिलेला मृत घोषित केले. शेवटचा पर्याय म्हणून तिला काटकुंभ येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉ. प्रियदर्श तुरे व त्याचे सहकारी जीवन भारती ह्यांनी Antisnake Venom ची एकवीस इंजेक्शने दिली. तसेच ४९ तासांपर्यंत तिला कृत्रिम श्वासोश्वास देण्यात आला.
अखेर ह्या प्रदीर्घ उपचारांती तिचे प्राण वाचले.
स्त्रोत: प्रियदर्श तुरे –  gracilis4@gmail.com


काटकुंभ येथील त्या मुलीच्या गावापासून मांत्रिकाचे गाव ३ किमी, तर आरोग्य केंद्र १२ किलोमिटर लांब होते. ह्या व अशा मुद्यांचा तेथील लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असेल का ? ग्रामीण व दुर्गम अशा भागातील लोकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी तरुण डॉक्टरांची किती गरज आहे हे ह्या निमित्ताने पुन्हा जाणवते. निर्माणमध्ये सहभागी असणाऱ्या युवा डॉक्टरांसाठी हे महत्वाचे कार्य ठरू शकेल.


मेळघाटच्या आदिवासींच्या आरोग्यासाठी...

डॉ. भारत ठाकरेने (निर्माण ३) TISS मधून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ केलं. इंटर्नशिपसाठी तो त्रिपुरातील आदिवासी भागात काम करत होता. तिथल्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक समस्या आणि सरकारी यंत्रणा, कामातील अडचणी पाहून त्याने पुढे आदिवासी भागातच काम करायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने एप्रिल २०१४ मध्ये भारतने मेळघाटातील महान ट्रस्ट सोबत काम सुरु केलं. महान (Meditation Addiction Health Aids Nutrition) डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव यांनी सुरु केली आहे. भारत तिथे सध्या ब्लाईंडनेस कंट्रोल प्रोग्राम, कौन्सेलिंग, आणि उमंग या प्रोजेक्ट्सवर काम करतो.
            उमंगविषयी सांगताना भारत म्हणतो, " हा एक विशेष कार्यक्रम आहे. सरकारी कार्यक्रम, योजना यांची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून गाव पातळीवर काही व्यक्ती, अधिकार्यांची नेमणूक केलेली असते. त्याचं काम योग्य रीतीने व्हावं यासाठी आम्ही अप्रत्यक्षपणे संनियंत्रण (monitoring) करतो. यासाठी स्थानिक लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांनीच या अधिकाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवावं असा प्रयत्न करतो. उदा. रेशनिंगसाठी रेशन दक्षता समिती, अंगणवाडीसाठी माता पालक संघ इ. या लोकांच्याच समित्यांद्वारे आम्ही सरकारी यंत्रणा योग्य रीतीने चालावी असा प्रयत्न करतो. उमंगच्या कामाचा एक परिणाम म्हणजे एका गावातील भ्रष्ट पुरवठा अधिकाऱ्याविरुद्ध लोकांनी तक्रार केली आणि तो अधिकारी निलंबित झाला. हळूहळू लोक आपले प्रश्न स्वतःच सोडवू लागलेत. माहितीच्या अधिकाराचा वापर करू लागलेत. कौन्सेलिंगचा अनुभवही खूप वेगळा आहे. मेनिन्जायटिस झालेली एक मुलगी पेशंट म्हणून दवाखान्यात आली होती. तिच्या पालकांना तिला घरी नेऊन भूमक्याचे (मांत्रिक) उपचार करायचे होते. दोन दिवस समुपदेशन करूनही त्यांनी तिला घरी नेलंच. मग मी पुन्हा तिच्या घरी गेलो, खूप समजावलं. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवल्या आणि त्यांनी तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं." 
भारतला त्याच्या पुढील कामासाठी शुभेच्छा !
स्रोत: भारत ठाकरे, bharat.thakare9206@gmail.com