'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

निर्माण ६ येत आहे...
गेले दोन-तीन महिने सुरू असणारी निर्माण ६ ची निवडप्रक्रिया अखेर पूर्ण झाली. Concern (सामाजिक समस्यांविषयी तळमळ), Drive (त्या समस्यांवर काम करण्यासाठी धडपड करण्याची तयारी) आणि Talent (त्या समस्या सोडवण्याची क्षमता) हे निवडीचे मार्गदर्शक निकष होते. निर्माण ६ करिता महाराष्ट्राच्या २९ जिल्ह्यांतून ४२६, तर महाराष्ट्राबाहेरून १० अर्ज आले होते. यांपैकी ३०७ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातील १६४ जणांची (मुले-९४, मुली ७०) निवड निर्माणच्या शिबिरांसाठी झाली आहे. या बॅचमध्ये नुकतेच बारावी झालेला मुलगाही आहे. त्याचप्रमाणे BAMS, MA, LLB इ. शिकून पोलीस खात्यात असणारा व दोन पुस्तकांचा लेखक असणारा मुलगाही आहे. या बॅचचे सरासरी वय २२ वर्षे असल्याने सरासरी ३५ वय असणाऱ्या आमच्या निर्माण कार्यकारी टीमला खूप उत्साहाचे भरते आले आहे.
मुलाखतींदरम्यान तुमच्यापैकी अनेक जणांना खूप महिन्यांनी भेटता आले. अनेकांनी मुलाखतींच्या आयोजनाची किचकट  जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. अनेक जण सुट्टी घेऊन मुलाखती घ्यायला आले. मुलाखतींसाठी आपली घरे-दारे उघडी करून दिली. पावसाची पर्वा न करता ऐन वेळी करावी लागणारी पळापळ केली. आमच्या टीमला जेवू घातले. तुम्ही नसताना तुमच्या आई-बाबांनीही खूप मदत केली. सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद!

सीमोल्लंघनला तीन वर्षे पूर्ण...
निर्माण शिबीरे झाल्यानंतर सीमोल्लंघन आपल्याला जोडून ठेवते. २०११ दसऱ्याच्या निमित्ताने निर्माणच्या युवांचे धाडस इतरांपर्यंत पोचवण्यासाठी सीमोल्लंघनचा उपद्व्याप सुरू झाला. त्याला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. हे धाडस करत राहून बातम्या निर्माण करणाऱ्या तुम्हा सर्वांचं, या बातम्या सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आपला मौल्यवान वेळ काढणाऱ्या पत्रकारांचं, प्रामाणिकपणे आपले चढ-उतार शेअर करणाऱ्यांचं, सर्वांचे शिक्षण व्हावे म्हणून स्वानुभव - पुस्तक परिचय – वैचारिक लेख – वैचारिक कविता पाठवणाऱ्या मित्रांचं - मार्गदर्शकांचं, तणावपूर्ण वातावरणात हसवणाऱ्या व्यंगचित्रकार व छायाचित्रकारांचं मनापासून अभिनंदन !

चौथा ऑक्टोबर वर्कशॉप, वर्ष २०१४
   
         सालाबाद प्रमाणे निर्माणची ऑक्टोबर कार्यशाळा ९ ते १२ ऑक्टोबर २०१४ दरम्यान सर्च, शोधग्राम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. निर्माणची शिक्षण प्रक्रिया पूर्ण करून सामाजिक प्रश्नावर काम करणाऱ्या मित्र-मैत्रिणींसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेचे हे चौथे वर्ष! तीन दिवसांच्या या हृद्य अनुभवाबद्दल शिबिरार्थीनी दिलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया –

            “निर्माणच्या शिबिरांमधून मिळणारी उर्जा आणि उत्साह शब्दात पकडण अवघड आहे. या वेळच्या ऑक्टोबर कार्यशाळेतले बहुतांश चेहरे मला नवीन होते.पण प्रत्येकाचा प्रवास ऐकल्यावर अस वाटलं की मी या सगळ्यांना खूप पूर्वीपासून ओळखते.प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, वाट वेगळी, अडचणी वेगळ्या, आणि तरी सगळे एकमेकांचे सोबती...
            ‘विकास’ म्हणजे काय? आणि विकास कोणासाठी? याचा विचार न करता विकासाची स्वप्न बघणाऱ्यांच्या गर्दीत वास्तवच भान असलेला हा कोपरा मला तरी खूप सुरक्षित वाटला.”
अमृता प्रधान, निर्माण २
         
            “ही माझी पहिलीच ऑक्टोबर कार्यशाळा होती. कॅम्पला येण्याआधी नुकताच जॉब सोडला होता. त्यामुळं ‘फिअर ऑफ फ्रीडम’ अशा काहीशा मनस्थितीत होतो. इथे निर्माण प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे मित्र एकाच वेळी भेटले. त्यांचं काम, त्यांच्या अडचणी, त्यातून काढलेले मार्ग, त्यांच्या प्रेरणा, निराशा, काहींच फोकस्ड असणं, तर काहींच भरकटणं, यातून बरच काही शिकता आल. निर्माणवाल्यांचा प्रवास साधारणपणे कसा असतो याच एक चित्र तयार झालं. कॅम्प संपताना अस वाटत होतं की ‘देवाच्या दयेने भरपूर स्वातंत्र्य मिळत आहे तर ते नाकारण्याचा नाकर्तेपणा करू नये, ते नीट वापरावं.’ ”
निरंजन तोरडमल, निर्माण ५

                “हा माझा पहिला ऑक्टोबर वर्कशॉप. ग्रामीण भागात काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव असल्याने शिबिरात झालेलं ‘सामाजिक क्षेत्रात कामाचे मूल्यमापन का आणि कसे करावे?’ हे सेशन (माझ्यासाठी) फार उपयोगी होतं. मी (सध्या) जे काम करत आहे तसच काम निर्माणचे बरेच मित्र-मैत्रिणी करत आहेत. शिबिराच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि त्याचं काम, कामाची पद्धत समजून घेता आली. त्यांच्या अनुभव कथनातून आणि केलेल्या प्रयोगांमधून मला माझ्या कामाकडे विविध अंगांनी बघण्याची दृष्टी मिळाली.
कामाच्या धावपळीत सर्चची ही भेट आणि शेअरिंग ‘एनर्जी बूस्टर’ होती. अम्मा, नायना, आणि सर्व निर्माणींना भेटून अजून जोमाने काम करण्याची उर्जा मिळाली.”

कल्याणी राऊत, निर्माण ५

No comments:

Post a comment