'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 9 March 2013

सीमोल्लंघन, फेब्रुवारी २०१३


निर्माण 5 च्या शिबीरमालिकेत वैद्यकीय मित्र सामील

निर्माण 5 शिबीरमालिकेतील दुसर्‍या गटाचे पहिले शिबीर 2 ते 10 फेब्रुवारी, 2013 या दरम्यान यशस्वीरित्या पार पडले. या गटात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आरोग्य क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍या 56 तरुण-तरुणींचा सहभाग होता.
निर्माणच्या प्रत्येक पहिल्या शिबिराप्रमाणे ‘तारुण्यभान ते समाजभान’ व ‘स्वत:ची ओळख’ या शिबिराच्या मध्यवर्ती संकल्पना होत्या. याशिवाय आरोग्ययंत्रणेत हितसंबंध असणाऱ्या विविध घटकांच्या दृष्टीने ‘सर्वांत चांगला डॉक्टर कोण?’ या छोट्या स्वाध्यायाची आखणी करण्यात आली होती. विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलांनी सादरीकरण केले व संपूर्ण आरोग्ययंत्रणेचं चित्र उभे राहिले. यादरम्यान डॉ.अभय बंग (नायना), डॉ. योगेश काळकोंडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
Nero’s Guest या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आधारित लघुपटाने शिबिरार्थ्यांना हलवून सोडले. त्याचा परिणाम होऊन शेतकर्‍यांच्या संवेदना जाणण्यासाठी सर्वांनी एक वेळेचा उपवास केला. या वेळेचा सदुपयोग करून स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्याचे संकल्प अनेकांनी केले, तसेच या प्रश्नाचा अभ्यास करून त्यावर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.  
निर्माणच्या शिबिरांतून समाजाप्रती जबाबदारी व त्या साठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. याची सुरुवात कशी करावी याचे उदहारण काही जणांच्या प्रवासातून समोर आले. त्यामध्ये डॉ. अभय बंग (नायना) यांच्या ‘सेवाग्राम ते शोधग्राम’ बरोबरच आनंद बंग, सुजय काकरमठ यांनी देखील आपला प्रवास सर्वांसमोर मांडला.
पुढील ६ महिन्यांत आपण प्रत्यक्ष काय करु शकतो- याचे सर्वांनी व्यक्तिगत व सामजिक पातळीवर नियोजन केले. शेवटी ‘हम होंगे कामयाब...’ गुणगुणत या शिबीराची समाप्ती व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली.

अॅड. जयश्री गवळे (कलंत्री) राज्यस्तरीय युवराज पुरस्काराने सन्मानित
उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल युवराज प्रतिष्ठान, बदलापूर, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय युवराज २०१३ पुरस्कार यावर्षी अॅड. जयश्री गवळे (कलंत्री) हिला हिंदी सिनेमा सृष्टीतील नट शर्मन जोशी यांच्या हस्ते दि. ३ फ्रेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला.
      स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने युवा दिनाचे औचित्य साधून युवराज प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच तरुणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पैकी सामाजिक कार्याबद्दल उमरखेड येथील अॅड. जयश्री गवळे (कलंत्री) हिला सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसाद ओक, सारेगमप मधिल गायिका उर्मिला धनकर, दत्ता बाळसराफ, विद्या सानप युवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, झी२४ तास न्यूज चॅनचे सूत्रसंचालक भूषण करंदीकर उपस्थित होते. दहा हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.    
           जयश्रीने उमरखेड तालुक्यातील दुर्गम अशा मन्याळी गावात विविध उपक्रम राबवून गावातील अनेक समस्या सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तिच्या कामाला पुरस्काराच्या रूपात पावती मिळाल्याबद्दल तिचे निर्माण परिवाराकडून मनापासून अभिनंदन!  

संतोष गवळे फॉर ‘युथ फॉर चेंज’: युवकांसमोर उलगडला मन्याळी पॅटर्न


डॉ. सतीश राजमाचीकर यांनी युवकांसाठी सुरु केलेल्या “परित्राणाय”-युथ फॉर चेंज, चला उठा आणि सज्ज व्हा!! या युवा चळवळीचा शुभारंभ माननीय श्री. अण्णा हजारे यांच्या हस्ते नुकताच पुणे येथे पार पडला. कार्यक्रमात तरुणांची उपस्थिती मोठ्या संख्येत होती. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तरुणांना मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमातील मान्यवरांपैकी एक निर्माण १ चा संतोष गवळे यानेही तरुणांना मार्गदर्शन केले. संतोषने यवतमाळ जिल्ह्यातील मन्याळी गावात लोकसहभागातून केलेले काम आणि त्यामुळे झालेला गावाचा कायापालट हा प्रवास युवकांसमोर छायाचित्रांच्या माध्यमातून मांडला.
            माननीय श्री. अण्णा हजारे यांनी कार्यक्रमात तरुणांशी संवाद साधताना जास्तीत जास्त तरुणांनी समाजाची सेवा करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ग्रामविकास साधायचा असेल तर तरुणांची विरोध पत्करण्याची तयारी असली पाहिजे त्याचबरोबर तरुणांसमोर सध्या असलेली दोन आव्हाने म्हणजे विकास आणि विकासाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड. विकास साधताना आपण शाश्वत विकास आणि त्याचबरोबर निसर्गाचाही विचार केला पाहिजे असे ते म्हणाले. या तरुण देशासमोर अनेक आव्हाने आहेत आणि या आव्हानांना सामोरे जाताना शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडासा त्याग आणि अपमान पचवण्याची शक्ती या पाच नियमांचे जो तरुण पालन करेन तो या देशात चांगले काम करू शकेल असे मत त्यांनी मांडले.
            “परित्राणाय” संघटनेच्या युवकांना संतोषने केलेले मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल.

गोपाल महाजन व अजय होले करताहेत रोजगार हमीच्या परिणामकारकतेचा अभ्यास


भारतात २००५ मध्ये रोजगार हमीचा कायदा झाला. तेव्हापासून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व त्याबरोबर नैसर्गिक संसाधनांची निर्मिती, संवर्धन व व्यवस्थापन या प्रमुख उद्देशांनी रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे सुरु आहेत. 'रोहयो द्वारा होणाऱ्या कामांची गुणवत्ता व उपयोग' असा अभ्यास नाशिकमधील ‘प्रगती अभियान’ या संस्थेच्या वतीने करण्यात आला. गोपाल महाजन आणि अजय होले यांनी हा अभ्यास केला. नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ तालुक्यातील एकूण ९ आदिवासी गावातील ४० कामांचे त्यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण केले. यात रोहयोच्या कामांद्वारे तेथील लोकांच्या जीवनात झालेले बदल, उत्पन्न, स्थलांतराचे प्रमाण तसेच कामाची तांत्रिक गुणवत्ता, शेतीवरील परिणाम इ. चा समावेश होता. तसेच रोहयोचे गाव पातळीवरील नियोजन व अंमलबजावणी या दोन्ही प्रक्रियांचाही त्यांनी सखोल अभ्यास केला. हा अभ्यास व त्याच्या विश्लेषणातून मिळालेले निष्कर्ष खूपच महत्वपूर्ण आणि पुढील कामासाठी उपयोगी आहेत असा त्या दोघांचा अनुभव आहे.
‘प्रगती अभियान’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pragatiabhiyan.org/index.html

अटकेची पर्वा न करता, अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्यासाठी धुळे गटाचा मोर्चा


२९ जानेवारीला नाशिकमधील एका १४ वर्षीय मुलीला धुळ्यातील कुंटणखान्यात डांबून ठेवल्याची घटना समोर आली. त्या अल्पवयीन मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा व आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी, धुळ्यातील निर्माणच्या गटाने प्रतिभा शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली २ फेब्रुवारी २०१३ रोजी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी व एस.पीं.ना निवेदन सादर केले. ह्या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना त्वरित अटक केली, मात्र गुन्ह्यातील मुख्य आरोपी विजय ताटीया याचे वरपर्यंत लागेबांधे असल्यामुळे त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते.
ह्यावर पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असता ती नाकारण्यात आली. मात्र विरोधाला न जुमानता निर्माण गटाने ४ फेब्रुवारीला धरणे आंदोलन केले. ह्यावर प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी १४ लोकांना अटक केली. ह्यात निर्माणचे संदीप देवरे, पूजा वारुळे, माधुरी मगर, जागृती बोरसे ह्यांचा समावेश होता. ह्या सर्वांवर कलम १६८, १६९ खाली गुन्हा नोंदवून त्यांना दीड तासाने सोडण्यात आले.
अटकेने घाबरून न जाता या गटाने प्रतिभा शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानभवनात नीलम गोऱ्हेंची भेट घेतली व श्री. आर. आर. पाटील ह्यांना निवेदन सादर केले. यानंतर काही दिवसांतच धुळे पोलिसांनी २ आरोपींना अटक केली व फरारी विजय ताटीयावर १०,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. तसेच धुळ्यातील महिला सुरक्षेबद्दल एक समिती स्थापन करून त्यात निर्माण सदस्यांचाही समावेश करण्याचे आश्वासन धुळे पोलिसांनी दिले. बलात्कार झालेल्या मुलीचा जबाब पोलिसांनी कलम १६४ अंतर्गत न्यायाधीशांसमोर लिहून घेतला.
त्या अल्पवयीन मुलीच्या पुनर्वसनाचे काम सध्या निर्माण गट पुढे नेत असून त्यासाठी जिल्हाधिकारी व  महिला बालकल्याण विभागाशी चर्चा सुरु आहे. 

झारखंडच्या बालमृत्यूदरावर नजर ठेवण्यासाठी अतुल-अश्विनचे सॉफ्टवेअर


Home Based Newborn Care (HBNC)’ या सर्चच्या कार्यक्रमामार्फत बालमृत्यूदरातील नवजात बाळाचा टक्का व एकूणच बालमृत्यूदर वेगाने कमी झाला आहे. या कार्यक्रमाला मान्यता मिळाली असून वेगवेगळ्या ठिकाणी बालमृत्यू कमी करण्यासाठी त्याची अंमलबजावणी सुरू आहे. झारखंडमध्ये या सराईकेला भागातील १७४ गावांत हा कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी झारखंड सरकार, Tata Steel Rural Development SocietyAmerica India Foundation यांनी घेतली आहे. झारखंडमधील गावागावांत आरोग्यदूतांनी जमा केलेली बाळांविषयी माहिती कॉम्प्युटरमध्ये फीड करणे (data entry) व या माहितीच्या आधारे आवश्यक ते मासिक अहवाल तयार करणे यासाठी सर्चचे इंजिनियर्स निर्माण ३ चे अश्विन भोंडवे व अतुल गायकवाड यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून झारखंडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एका क्लिकवर ठराविक भागात व ठराविक काळात जन्मलेल्या बाळांपैकी किती बाळे मरण पावली, किती अपुऱ्या महिन्याची/कुपोषित आहेत व किती बाळांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे वेळच्यावेळी कळू शकणार आहे. तसेच त्यांना गावपातळीवरील सर्व आरोग्यदूत व त्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणारे पर्यवेक्षक यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे व कार्यक्रम सुरळीत चालू आहे का यावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
या सॉफ्टवेअरचा user interface विकसित करण्यासाठी अतुल व अश्विनने गडचिरोलीच्या स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले होते. या सॉफ्टवेअरसाठी अतुल-अश्विनला सर्चच्या संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. महेश देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

शिवजयंती साजरी करण्यासाठी प्रदीप देवकाते आणि मित्रमंडळी रयतेकडे


मी निर्माण ४चा प्रदीप देवकाते. यंदा इंजिनियरिंगचे शेवटचं वर्ष असल्यामुळे शिवजयंती दरवर्षीप्रमाणे साजरी करण्यापेक्षा काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. शिवजयंतीच्या निमित्ताने जी वर्गणी गोळा करणार होतो, ती सत्कारणी लागावी एवढी इच्छा होती व ती माझ्या मित्रांमध्ये बोलून दाखवली. मिरवणूक, डॉल्बी या पद्धतीपेक्षा जी काही रक्कम गोळा झाली, ती मुळेगाव (तांडा) येथील परमेश्वर काळेंच्या पारधी वसतीगृहाला मदत म्हणून द्यायचे ठरवलं. त्यासाठी आम्ही मित्रांनी त्यांची भेट घेतली. त्यादरम्यान आम्हाला कळलं की तिथे मुलांना स्टेशनरीची गरज आहे. त्यासाठी आम्ही कॉलेजमध्ये funding box ठेवला. माझ्या इच्छुक मित्रांनी मदत केली व आम्ही स्टेशनरीची गरज पूर्ण करू शकलो. वसतीगृहाबद्दल सांगायचं तर तिथे सगळी मुलं पालावरून गोळा करून आणली आहेत, कारण त्यांची घरीची परस्थिती खूप बिकट आहे. कुठेही गुन्हा घडला तर पोलीस पहिले पारध्यांच्या पालावर धाडी टाकतात. गरीब घरचा कर्ता पुरुष गेला की महिलांची खूप वाताहत होते. काहीजणी दुसरे लग्नदेखील करतात. सततच्या बदलत्या जागांमुळे मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होते. हेच ओळखून परमेश्वर काळे व त्यांची पत्नी हे त्या मुलांसाठी वसतीगृह चालवतात.

लोकसहभागातून कामाविषयी डॉ. सुजय काकरमठचे ज्युनिअर्सना मार्गदर्शन


निर्माण ४ चा सुजय काकरमठ गेले ९ महिने सर्च येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गडचिरोलीच्या ४४ आदिवासी गावांना आरोग्यसेवा देत आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून त्याने MBBSची पदवी घेतली असून त्याच्या महाविद्यालयाने नुकतेच आयोजित केलेल्या ‘TRINITY’ परिषदेत त्याने एका परिसंवादात भाग घेतला. ‘वैद्यकीय शिक्षणाचा प्रत्यक्षात काम करताना किती उपयोग होतो?’ याविषयी मांडणी करण्यासाठी वेगवेगळया भूमिकांमध्ये कार्यरत व्यक्तींना परिसंवादात निमंत्रित केले गेले होते. त्यात नुकतेच वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर वैद्यकीय काम करणाऱ्या डॉक्टरची भूमिका सुजयने मांडली. याच परिषदेत डॉ. अभय बंग (नायना) यांना ‘Research with the people’ याविषयी बोलण्यासाठी निमंत्रित केले गेले होते. नायनांनी युवा डॉक्टरांना ‘Go where the problems are and not where you are a problem’ असा मंत्र दिला. सामाजिक योगदान देण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘निर्माण’ची तोंडओळख करून दिली व याच महाविद्यालयाचा सध्या आदिवासींना आरोग्यसेवा देत असलेला निर्माणी म्हणून सुजयला आपले अनुभव मांडण्याची संधी दिली. सुजयने वैद्यकीय शिक्षण व internship दरम्यान त्याला पडलेले प्रश्न, त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्याची धडपड व आदिवासींना आरोग्यसेवा देताना आलेले अनुभव आपल्या भाषणातून मांडले. याच परिषदेच्या निमित्ताने नायना व सुजयने मुंबईतल्या निर्माणींसोबत संवाद साधला.
महाविद्यालयात बरेचदा प्रवाहाची दिशा आपली स्वप्ने ठरवत असतो. मात्र आव्हानात्मक, तरीही समाधान देणाऱ्या मार्गाचा प्रत्येकाला शोध असतो. महाविद्यालयात होणाऱ्या परिषदा, संमेलने ही अस्वस्थ तरुणाईसोबत संपर्क साधण्यासाठी उत्तम माध्यमे असल्याचे सुजयच्या अनुभवातून समजते.

मयूर सरोदेचा ‘watershed’ विषयावरील कार्यशाळेत सहभाग


मी निर्माण ४चा मयूर सरोदे. मी संगमनेर जवळील दरेवाडी गावात Watershed Organization Trust (WOTR)ने नुकतेच आयोजित केलेल्या “Climate Adoptive Livelihoods - Generating Local Wealth” या कार्यशाळेत सहभागी झालो होतो. पाणीप्रश्नावर काम करण्यासाठी सुरु झालेल्या या संस्थेने आज पर्यावरणावर आघात करणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास करायला सुरुवात केली आहे. Watershed Management चे यशस्वी प्रयोग त्यांनी काही गावांमध्ये केले आहेत. गावांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण, त्यानंतर पर्यावरणीय सुरक्षेसाठी योजण्यात येणाऱ्या काही पध्दती व त्यांचे पृथःकरण येथे केले जाते. शेवटी योग्य असे उपक्रम गावामध्ये राबवण्यात येतात. पर्यावरणाला सुसंगत अशा अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्याचं कामदेखील त्यांनी हाती घेतलं आहे. या संस्थेच्या विविध विषयांवर २ ते ३ दिवसांच्या कार्यशाळा दर महिन्यात होत असतात.
Watershed Organization Trust बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.wotr.org/

ज्ञानेश मगरची जागृती यात्रा संपन्न


जागृती सेवा संस्थानही संस्था मुख्यत्वे सामाजिक उद्योजिकता वाढीसाठी व त्यातून होणाऱ्या सामाजिक बदलांसाठी प्रयत्नशील असते. जागृती यात्रा हा त्याअंतर्गतच सुरु असलेला एक प्रकल्प. भारतातील विविध राज्यांतून निवडलेल्या ४०० युवांना तसेच विविध देशांतून निवडलेल्या ५० मुला/मुलींना, देशातील विविध भागात काम करणाऱ्या सामाजिक औद्योजकांची, त्यांच्या कार्याची ओळख व्हावी व त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी ह्या हेतूने ही यात्रा दर वर्षी आयोजित करण्यात येते.
१५ दिवसांच्या या यात्रेत ८००० किलोमीटरचा प्रवास करून १३ राज्यांतील विविध संस्था व व्यक्तीभेटींचे आयोजन केले होते. नेहमीप्रमाणे ही यात्रा ट्रेनने संपन्न झाली. बिहार मधील देवरिया येथील निदान संस्था, राजस्थानातील अरुणा रॉय ह्यांचे बेअर फूट कॉलेज, ओडीशातील जो मदिथा, दिल्लीतील अंशू गुप्तांचे गुंज तसेच तामिळनाडूमधील अरविंद आय केअर इ. संस्थांना ह्यानिमित्त्याने तरुणांनी भेट दिली व त्यांच्या कार्याबद्दल माहिती घेतली.
निर्माण ४ च्या ज्ञानेश मागरने ह्यावर्षी जागृती यात्रेत सहभाग नोंदवला. ज्ञानेशने काही काळ धुळ्यातील कासवानी मेमोरियल ट्रस्ट संस्थेसोबत रिसर्च असिस्टन्ट म्हणून किशोरवयीन मुलांच्या नेत्र तपासणी प्रकल्पावर काम केलेले असल्यामुळे, मदुराई येथील अरविंद आय केअर ह्या संस्थेची भेट ही त्याच्यासाठी विशेष माहितीपूर्ण ठरली. अरविंद आय केअरच्या ६०हून अधिक शाखांमध्ये २० रुपायांमध्ये प्राथमिक नेत्र तपासणी केली जाते.     
जागृती यात्रेबद्दल अधिक माहितीसाठी:  http://www.jagritiyatra.com
‘अरविंद आय केअर’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.aravind.org

तन्मय जोशी व कल्याणी कटारियाचा शोधयात्रेत सहभाग


सृष्टी (Society for Research and Initiatives for Sustainable Technologies and Institutions) तर्फे भारतातील विविध राज्यांमध्ये शोधयात्रेचं आयोजन केलं जातं. दुर्गमग्रामीण भागातील पारंपरिक ज्ञान, innovations, शेतीशी संबंधित तंत्र, देशी बियाणी, औषधे इ. अभ्यास या शोधयात्रेत केला जातो. जानेवारी महिन्यात तन्मय जोशी, कल्याणी कटारिया आणि इतर काही मित्रमंडळी मणिपूरमधील चुराचंदपूर तालुक्यात शोधयात्रेसाठी जाऊन आले. या शोधयात्रेतील अनुभव सांगताना तन्मय म्हणाला, "आम्ही पाच दिवस पायी फिरत होतो. तिथली संस्कृती, जीवनशैली खूप वेगळी आहे. मुख्यतः भातशेती, परसबागेतील उत्पादने, पशुपालनरोजगार हमी योजना आणि सैन्यदल हीच त्यांची उपजीविकेची साधने आहेत. व्यापार कमी आहे. तिथे पैशांची सुबत्ता नाही, पण अन्नसुरक्षा आहे.  दुर्गम भागातही वीज पोहचतिये. शाळा मात्र अजून सर्वत्र झालेल्या दिसत नाहीत. गावांमध्ये सामाजिक आरोग्यस्वच्छता आणि अन्नधान्याची उपलब्धी आहे. कुपोषणदेखील कमी आहे (मणिपूरमधील दरडोई उत्पन्न व कुपोषणाचे प्रमाण १९९८ मध्ये ८,११४ रुपये व २८% होते, तर गुजरातमध्ये हे आकडे १६,२५१ रुपये व ४५ % होते! Women’s Feature Service च्या आकडेवारीनुसार). यावरून, पैसे जास्त म्हणजेच सुबत्ता का ? हे आपणही तपासून पाहायला हवं असं मला वाटतं. "
पुढची  म्हणजेच या उन्हाळ्यातली शोधयात्रा विदर्भात ठेवण्याचा SRISTI चा विचार आहे. तरी इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संकेतस्थळावरून त्यांचा संपर्क मिळवून त्यांच्याशी जोडून घ्यावे.
शोध्यात्रेच्या अधिक माहितीसाठी: http://www.sristi.org/cms/shodh_yatra1

अखिल भारतीय शेतकरी अभ्यास परिषदेत तन्मय जोशीचा सहभाग


कर्नाटकमधील Amrut Bhoomi International Center for Sustainable Development या संस्थेतर्फे १३ ते १६ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या अखिल भारतीय शेतकरी अभ्यास परिषदेत कोरडवाहू गटातील तन्मय जोशी व शुभदा पांढरे हे सहभागी झाले. उत्तर आणि दक्षिण भारतातील शेतकरी संघटना यात एकत्रितपणे सहभागी झाल्या होत्या. फक्त शेतीच नव्हे, तर जलसंधारण, पर्यावरण, शाश्वत विकास इ. विषयातील अभ्यासक, समीक्षक, अर्थतज्ज्ञ, कार्यकर्ते यांचा परिषदेत सहभाग होता. याविषयी बोलताना तन्मय म्हणाला, "हा अनुभव खूपच ऊर्जादायक आणि दिलासा देणारा होता. शेतीविषयीचे integrated काम कसे चालते, शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक मागण्या कशा असाव्या, त्याला संशोधन आणि रचनात्मक कामाची जोड कशी द्यावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे तेथील संघटनांचे काम! "  

गणेश बिराजदारचे छत्तीसगढमधील "बचपन बनाओ" सोबत काम


बचपन बनाओहा प्रनित सिम्हा यांनी विज्ञान आश्रमआणि दंतेवाडा जिल्हा प्रशासनयांच्या सहकार्याने सुरू केलेला उपक्रम. बचपन बनाओचे छत्तीसगढ मधील दंतेवाडा भागात शिक्षण क्षेत्रात काम चालते. १२ वी शिकलेली आदिवासी मुलेच शाळांमध्ये शिकवितात. या संस्थेच्या कुवाकोंडा पोटा केबिन्स या शाळेत गणेश बिराजदार हा ८ दिवस स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी गेला होता. तेथील मुलांना गणित आणि विज्ञान शिकविणे आणि शाळेच्या इतर कामांमध्ये मदत असे त्याच्या कामाचे स्वरूप होते. त्यानंतर गणेश प्रदानसंस्थेच्या कार्यकर्त्यांना भेटला, त्यांच्यासोबत प्रदान आणि दंतेवाडा जिल्हा प्रशासन करू पाहत असलेल्या संयुक्त कामाविषयी चर्चा केली. त्यांचे आदिवासींमधील रोजगार निर्मितीचे काम समजून घेतले. तसेच दंतेवाड्यात काम करणाऱ्या PMRDF फेलोजचेही काम समजून घेतले.
बचपन बनाओ च्या अधिक माहितीसाठी: http://bachpanbanao.wordpress.com/

बचतगटांना ‘शक्ती’: कल्याण टांकसाळेच्या स्वयंसेवी संस्थेची स्थापना


मी कल्याण टांकसाळे, ‘Shakti SHG Foundation’ या स्वयंसेवी संस्थेच्याच्या संस्थापकांपैकी एक. आमची संस्था बचतगटांना जमाखर्चाचे व्यवस्थापन, कामाचे मूल्यमापन व उपजीविकेचे नियोजन यासाठी माहिती-संपर्क (information communication technology) तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना सुचवेल. स्त्री-पुरुष प्रमाणात कमालीचा असमतोल असणाऱ्या बीड जिल्ह्यातील स्त्रियांचे सक्षमीकरण करण्यासाठी कार्यपद्धती विकसित करणे हेदेखील आमचे उद्दिष्ट असेल. ही कार्यपद्धती विकासित करण्यासोबतच त्यासाठी आवश्यक microfinance च्या धोरणांचा अभ्यास करण्यामध्ये माझा सहभाग असेल. सध्या आम्ही १७० बचतगटांसोबत काम करत असून त्यापैकी ४५  गटांवर आमच्या धोरणांचा झालेला परिणाम मोजत आहोत. या ४५ गटांच्या माध्यमातून आम्ही ४५ खेड्यांमध्ये सक्षमीकरणाचा प्रयोग करीत आहोत. 

संसाधने व गरज यांचा मेळ घालण्यासाठी प्रियदर्श तुरे व मित्रमंडळींचे Investment In Humans


बऱ्याच लोकांना समाजासाठी " काहीतरी " करायचे असते. पण "नेमके" काय हे समजत नाही. तसेच समाजात अनेकजण खूप चांगले काम करतात. त्यासाठी अनेकवेळा मनुष्यबळ, कौशल्ये, मार्गदर्शन व पैसा यांच्या स्वरूपात मदत लागते. ती नेमकी मिळवायची कुठून हा प्रश्न असतो. दोघांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी Investment In  Humans (i2h) हा मंच सुरु केला आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामजिक गटाच्या युवकांनी सेवालय, लातूर येथे  झालेल्या एका बैठकीत i2h ही संस्था सुरु करायचे ठरविले. बैठकीमध्ये आलेल्या ४२ लोकांपैकी काहीजण विश्वस्त झाले, तर काहीजण अभ्यासगटात सहभागी झाले. संस्थेची नोंदणी डिसेंबरमध्ये झाली, तर उद्घाटन २६ जानेवारी रोजी पार पडले.
महाराष्ट्रातील ८ सामाजिक उपक्रमांना काही प्रमाणात मदत व एक सामजिक उपक्रम म्हणून मेळघाटात आदिवासी बाधवांसाठी शाळा, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि दवाखाना टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचे ठरले आहे. याकरिता लागणारा खर्च लोकवर्गणीतून जमा करण्यात येणार आहे. यासाठी मदतीची इच्छा असणाऱ्यांकडून प्रतीकुटुंब प्रतीवर्ष १००० रुपयांपासून देणगी स्वीकारण्यात येणार आहे.
i2hचे मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती इथले गट सक्रियपणे काम करत असून गटातील सर्वांनी स्वतःच्या कुटुंबियांपासून देणग्या घेणे सुरु केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची वेळ आणि कौशल्ये यांसाठी नोंदणी सुरु आहे. मेळघाटात शाळा आणि इतर प्रोजेक्ट साठी जागा मिळाली आहे.
अधिक माहितीसाठी: www.i2h.weebly.com , www.i2hworld.com  

बाबासाहेब देशमुख, धीरज देशमुख व सागर काबरा जन स्वास्थ्य सहयोग बिलासपूर येथे रुजू


जन स्वास्थ्य सहयोग (JSS) ही संस्था १९९८ साली, All India Institute of Medical Sciences (AIIMS) येथील काही पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर्सनी त्याकाळी बिलासपूर ह्या मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व प्रामुख्याने आदिवासी लोकं असलेल्या भागात सुरु केली. ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्यांवर कमीतकमी पैश्यांत, उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यावर त्यांचा भर आहे. निर्माणचे तरुण डॉक्टर्स अश्विनी महाजन व सचिन बारब्दे सध्या JSS मध्येच वैद्यकीय सेवा देत आहेत.
निर्माण ४ च्या बाबासाहेब देशमुख ह्याने एम.बी.बी.एस. चा आभ्यासक्रम पूर्ण केला असून गेले वर्षभर तो परिते, जिल्हा सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. १० फेब्रुवारी २०१३ पासून तो JSS, बिलासपूर येथे रुजू झाला आहे. त्याच्या वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग गरजू लोकांसाठी व्हावा ह्या हेतूने त्याने हा निर्णय घेतला आहे.
निर्माण ३ चे सागर काबरा व धीरज देशमुख ह्यांनी यवतमाळ मेडिकल कॉलेज मधून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून मागच्याच महिन्यात JSS ला भेट दिली होती. त्यांनी एप्रिल महिन्यापासून ह्याच संस्थेत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
            ह्या तिघांना त्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा.
JSS बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.jssbilaspur.org/about/

स्मिता तोडकर व केदार आडकर ‘सर्च’मध्ये रुजू


निर्माण ४ची स्मिता तोडकर व निर्माण ५चा केदार आडकर ‘सर्च’मध्ये रुजू झाले आहेत. स्मिता ही शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर असून सर्चमध्ये ती बाह्यरुग्ण विभागातील रुग्णतपासणीसोबतच आंतररुग्ण विभागाचे व शस्त्रक्रिया शिबिरांचे व्यवस्थापन व परिचारिकांचे प्रशिक्षण इ. जबाबदाऱ्या सांभाळणार आहे. यापूर्वी तिने आंध्र प्रदेशमधील भैसा येथे आयुर्वेदाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याचा अनुभव घेतला होता.
केदारने Hospital management मध्ये पदविका घेतली असून त्यानंतर Human Resources या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्चच्या प्रशासकीय विभागाला तो अतिथीगृहे, मेस व विविध प्रशिक्षणांच्या व्यवस्थापनात मदत करेल. पहिल्या महिन्यात त्याने श्रमदानाच्या माध्यमातून सर्चमधील प्रक्रियांचे निरीक्षण करण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय सर्चमधील प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावता येईल यासाठी तो प्रयत्नशील आहे. 

वृंदन बावनकरचे ‘प्रथम’ बरोबर काम सुरु


निर्माण ४ ची वृंदन बावनकर ‘भंडारा’ जिल्ह्यातील पवनी या तालुक्यात स्वत:च्या माध्यमिक शाळेत शिकवणे इतर व्यवस्थापकीय कामे मागील तीन वर्षापासून सांभाळत आहे. शाळेच्या कामानिमित्ताने तिचा ‘प्रथम’ या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेशी गेल्या एका वर्षापासून संपर्क येत होता. जानेवारी २०१३ पासून ‘प्रथम’ बरोबर काही उपक्रमांमध्ये औपचारिकरीत्या काम करण्याचे वृंदनने ठरवले आहे. ती प्रथमच्या प्रामुख्याने तीन उपक्रमांमध्ये सहभागी असेल. प्रथम पवनी तालुक्यात सायन्स सेंटर सुरु करत आहे. या सायन्स सेंटरची पहिली उभारणी वृंदनच्या संस्थेच्या परिसरात सुरु होईल. या केंद्रांचे सर्व व्यवस्थापन वृंदन बघेल.
हेमेंद्र कोठारी फाउंडेशन आणि प्रथम यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून भारतातील सर्व व्याघ्र अभयारण्यांच्या संरक्षित पट्ट्यामधील मुलांच्या शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या प्रश्नावर काम करण्याचा एक उपक्रम सुरु होत आहे. महाराष्टातील मेळघाट, पेंच आणि ताडोबा या अभयारण्यात सुरु होणाऱ्या या उपक्रमाची जबाबदारी वृंदनवर सोपवण्यात आली आहे.
प्रथम ओपन स्कूल अंतर्गत पवनी तालुक्यातील १०० गावांसाठी १० clusters मध्ये इयत्ता १०वीच्या परीक्षेला न बसलेल्या मुलींना १७ नंबरचा फॉर्म भरून, ३ महिन्यांचा बेसिक कोर्स व ८ महिन्यांमध्ये संपूर्ण कोर्स पूर्ण करून परीक्षेला बसवण्याचे वृंदनचे काम राहील. यातील विज्ञान विषयाची सामग्री बनविण्याची जवाबदारी वृंदनची असेल
वृंदनचा ‘प्रथम’शी फक्त प्रशिक्षणापुरता येणारा संबंध आता विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे  वाढेल. आणि याचा फायदा वृंदनच्या शाळेला आणि प्रथमला दोघांनाही होईल यात शंका नाही.
‘प्रथम’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pratham.org/

प्राजक्ता ठुबेचे भारतीय जैन संघटनेच्या रिसर्च इन्स्टिट्यूट सोबत काम सुरु


निर्माण १ च्या प्राजक्ता ठुबेने पोलिटिकल सायन्सेस मध्ये एम.ए. केले असून गेला काही काळ ती पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज व आय.एल.एस. विधी महाविद्यालयात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत होती. नुकतेच तिने भारतीय जैन संघटनेच्या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये पॉलिसी अॅनालिसीस चे काम सुरु केले आहे.
            भारतीय जैन संघटनेची स्थापना जैन समाजाच्या विकासासाठी झाली असली तरी आता तिचे कार्यक्षेत्र सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने विस्तारले आहे. त्यांनी किल्लारी, भूज तसेच काश्मीरमध्ये झालेल्या भूकंपानंतर तसेच आसामच्या पूरादरम्यान बचावकार्य केले आहे. कुमारवयात मूल्यशिक्षण दिल्यास पुढे जाऊन मुलांना आपल्या सामाजिक जवाबदारीचे भान निर्माण होऊ शकेल ह्या हेतूने बीडमधील पाटोदा, केज व अष्टी ह्या तालुक्यांमध्ये गेले ४ वर्ष एक पथदर्शी प्रयोग सुरु असून त्याची संपूर्ण आखणी, प्रशिक्षण व अंमलबजावणीचे काम ही संघटना करीत आहे.
            ह्याच संघटनेअंतर्गत सुरु झालेल्या रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये सध्या प्राजक्ता शिक्षणाविषयीच्या धोरणांचा अभ्यास करीत आहे. तिचे मुख्य काम हे अशा धोरणांमध्ये असणारे विरोधाभास शोधणे व त्यांचे सखोल विश्लेषण करणे असे आहे. तिच्या ह्या नवीन कामासाठी तिला खूप खूप शुभेच्छा.
जैन रिसर्च इन्स्टिट्यूट बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.bjsindia.org/

शोधक पाउले


निर्माण शिक्षण प्रक्रियेचा एक भाग म्हणून विविध सामाजिक प्रश्न समजून घेणे व प्रश्न सोडविण्याच्या विविध पद्धतींचा, तत्त्वज्ञानांचा अभ्यास करणे हे ओघाने आलेच. असेच काही प्रयत्न आपल्या काही मित्र मैत्रिणींनी गेला एक महिनाभर केलेत. त्याची ही थोडक्यात माहिती.

·     ·     निर्माण ५ च्या मेनका रामचंदानीची अक्षरनंदन शाळेला भेट
 

पुण्यातील अक्षरनंदन ही शिक्षणक्षेत्रातील एक प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मेनकाने तेथील कार्यपद्धती व शैक्षणिक पद्धती समजून घेण्यासाठी नुकतेच अक्षरनंदनला भेट दिली
‘अक्षरनंदन’बद्दल अधिक माहितीसाठी: http://aksharnandanschool.org/


  
·     ·     निर्माण ५चा प्रफुल्ल वडमारे व निर्माण ४चा मयूर सरोदे यांची पाबळ विज्ञानआश्रमाला भेट
    
    कामातून शिक्षण व जीवनोपयोगी शिक्षण हे ध्येय मानून पाबळ येथील विज्ञान आश्रम हे खरंतर गांधीजींच्याच नयी तालीम शिक्षण पद्धतीचे एक प्रत्यक्ष उदाहरण. अर्ध्यातून शाळा सोडलेल्या मुला-मुलींसाठी ही संस्था उद्योजक बनण्याचा मार्ग उपलब्ध करून देते. Agriculture, Food Technology, Mechanical Workshop आणि Electrical Workshop इ. विषयांमध्ये या मुलामुलींना प्रशिक्षण दिले जाते. विज्ञान आश्रमाला नुकतेच निर्माण ५चा प्रफुल्ल वडमारे व निर्माण ४चा मयूर सरोदे यांनी भेट दिली. प्रफुल्ल हा मुळचा कॉम्प्युटर इंजिनिअर असून मयूर सध्या सौरउर्जेवर काम करत आहे.
    ‘विज्ञानआश्रमा’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.vigyanashram.com/

·     ·     निर्माण ५चे प्रफुल्ल वडमारे व कल्याणी वानखेडेची व सोनदरा गुरुकुलम् ला भेट


प्रफुल्ल व आर्किटेक्ट असलेल्या कल्याणी वानखेडे ह्यांनी बीड मधील डोमरी येथील सोनदरा गुरुकुलम् ला भेट दिली. आनंदी शिक्षण ह्या ध्येयाने सुरु केलेली ही एक निवासी शाळा आहे.
‘सोनदरा गुरुकुलम्’बद्दल अधिक माहितीसाठी: http://sondaragurukulam.org/


·     ·     निर्माण ५च्या युवांची श्री. आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक ह्यांच्या शाश्वत संस्थेला भेट 


श्रद्धा चोरगी, श्रीजित कुलकर्णी, वेदवती लेले यांच्यासह निर्माण ५च्या युवांनी मंचर येथील ‘शाश्वत’ संस्थेला भेट दिली. शाश्वत संस्थेचे आनंद कपूर हे आय.आय.टी. मधील सिव्हील इंजिनिअर असून गेली अनेक वर्ष ते डिंबे धरणामुळे निर्वासित झालेल्या लोकांच्या प्रश्नावर कार्यरत आहे. निर्वासित लोकांच्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या, जमिनीच्या अशा सर्व आघाड्यांवर शाश्वत ही संस्था काम करीत आहे. अधिक माहिती साठी खालील संकेतस्थळ बघा -


·     ·     पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या कचरा डेपोला भेट – एक उत्साहवर्धक अनुभव   
कचऱ्याचा प्रश्न समजून घेण्याच्या हेतूने मूळच्या इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर असलेल्या मृण्मयीने नुकतेच पी.सी.एम.सी. च्या कचरा डेपो ला भेट दिली. मात्र तेथे तिला अपेक्षेपेक्षा वेगळे व उत्साहवर्धक चित्र पहायला मिळाले. कचऱ्याला वास येऊ नये म्हणून फवारणी केली होती. आजूबाजूचा परिसर अस्वच्छ वाटू नये म्हणून तेथे एक छोटेखानी बाग बनवली आहे. कचऱ्याचे व्यवस्थित segregation होत असून ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासाठी नेटका व स्वयंचलित प्लांट उभारण्यात आला आहे. तसेच खत विकण्यासाठी एका कंपनीशी करार देखील केला गेला आहे. 

                                               
·     ·     निर्माण ५च्या सतीश सोनावणेची ‘आरती’ला भेट


जैविक कचऱ्यावर संशोधन करणाऱ्या डॉ. आनंद कर्वे यांच्या ‘आरती’ या संस्थेला निर्माण ५च्या सतीश सोनावणेने भेट दिली. घरच्या घरी Biogasची कशी निर्मिती होऊ शकते, पालापाचोळ्यापासून charcoal (ज्याची calorific value खाणीतून मिळण्याऱ्या कोळशापेक्षाही जास्त असते) कसा बनवता येऊ शकतो  अशा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाविषयी ऐकण्याची व पाहण्याची त्याला संधी मिळाली.
‘आरती’ बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.arti-india.org/