२९ जानेवारीला नाशिकमधील एका १४ वर्षीय मुलीला धुळ्यातील कुंटणखान्यात डांबून
ठेवल्याची घटना समोर आली. त्या अल्पवयीन मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा व
आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी, धुळ्यातील निर्माणच्या गटाने प्रतिभा शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली २
फेब्रुवारी २०१३ रोजी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी व एस.पीं.ना निवेदन सादर केले.
ह्या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना त्वरित अटक केली, मात्र
गुन्ह्यातील मुख्य आरोपी विजय ताटीया याचे वरपर्यंत लागेबांधे असल्यामुळे त्यांना
अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते.
ह्यावर पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असता
ती नाकारण्यात आली. मात्र विरोधाला न जुमानता निर्माण गटाने ४ फेब्रुवारीला धरणे
आंदोलन केले. ह्यावर प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी १४ लोकांना अटक केली. ह्यात
निर्माणचे संदीप देवरे, पूजा वारुळे, माधुरी मगर, जागृती बोरसे ह्यांचा समावेश होता. ह्या
सर्वांवर कलम १६८, १६९ खाली गुन्हा नोंदवून त्यांना दीड
तासाने सोडण्यात आले.
अटकेने घाबरून न जाता या गटाने प्रतिभा शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानभवनात
नीलम गोऱ्हेंची भेट घेतली व श्री. आर. आर. पाटील ह्यांना निवेदन सादर केले. यानंतर
काही दिवसांतच धुळे पोलिसांनी २ आरोपींना अटक केली व फरारी विजय ताटीयावर १०,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. तसेच धुळ्यातील महिला
सुरक्षेबद्दल एक समिती स्थापन करून त्यात निर्माण सदस्यांचाही समावेश करण्याचे
आश्वासन धुळे पोलिसांनी दिले. बलात्कार झालेल्या मुलीचा जबाब पोलिसांनी कलम १६४
अंतर्गत न्यायाधीशांसमोर लिहून घेतला.
त्या अल्पवयीन मुलीच्या पुनर्वसनाचे काम सध्या निर्माण गट पुढे नेत असून
त्यासाठी जिल्हाधिकारी व महिला बालकल्याण
विभागाशी चर्चा सुरु आहे.
No comments:
Post a Comment