'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 8 March 2013

पुस्तक परिचय


एका नक्षलवाद्याचा जन्म- विलास मनोहर

मी वाचलेल्या पुस्तकांपैकी हे एक अतिउत्तम दर्जाचं लिखाण केलेलं पुस्तक आहे. ही एक उत्तम कलाकृती तर आहेच पण त्या शिवाय ते वास्तवदेखील आहे. पुस्तकाच्या सुरुवातीसच लेखक हे स्पष्ट करतो की यातील घटना खऱ्या घडल्या आहेत. नावे बदलली आहेत.
इतक्या उत्तम पुस्तकाची माहिती द्यायला कुठून सुरुवात करावी हा एक प्रश्न आहे. त्याबद्दल माझ्या डोक्यात गोंधळ आहे. आणि हे पुस्तक आपल्या डोक्यातले अनेक गोंधळ तीव्र करत. माझ्यासारख्या शिकलेल्या आणि चार बुकं वाचलेल्या व्यक्तीच्या डोक्यातही  नक्षलवादाबद्दल गोंधळ आहेत. नीट माहिती नाही हे मी मान्य करायला हवं आणि मग आपण विचार करू शकतो की आदिवासी लोकांच्या मनात याबद्दल काय गोंधळ उडत असेल? हा गोंधळ कायम असताना लिहिलेला हा लेख आहे.
एका नक्षलवाद्याचा जन्मया शीर्षकातच खूप अर्थ सामावला आहे. नक्षलवाद्याचा जन्म का होतो? कसा होतो? त्याला कोण कोण जबाबदार असतं? या प्रश्नाची उत्तरे यात मिळतात, किंवा साहजिकच आपणच उत्तरे शोधायला लागतो.
नक्षलवादी हा कुणी आकाशातून टपकलेला प्राणी नसतो. तो पण आपल्यासारखा माणूसच असतो. पण मग तो अशी पावले का उचलतो? कुठल्याही गोष्टीचा जन्म/निर्मिती होण्यासाठी बऱ्याच घटना आणि  prerequisites ची गरज असते. या सर्व prerequisitesचा अभ्यास आपल्याला यात बघायला मिळतो.
एका सत्य घटनेबरोबरच ही एक कादंबरी देखील आहे. मला साहित्यातील फार काही कळत नाही पण जेवढे कळते त्यावरून याचे साहित्यिक मूल्यही खूप उच्च दर्जाचे आहे असे वाटते. हे पुस्तक एखाद्या report प्रमाणेही आहे. तसेच लिहिल्या गेलेल्या काळाचे ते documentation देखील आहे. (दुर्दैवाने ते आजही लागू पडत आहे असे वाटते). हे पुस्तक एक चिंतनही आहे. या आणि अश्या प्रकारच्या समस्या कश्या सोडवाव्यात या विचारांची बीजे आपल्याला या पुस्तकात सापडतात. नक्षलवादाची समस्या सोडवण्यासाठी त्याचा जन्म समजावून घेतला पाहिजे. आणि म्हणूनच ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी (मुख्यतः पोलीस) जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे. हे असं होतं मग त्यानंतर असं होतं आणि मग हे असं होतं अशी गणितीय समीकरणाप्रमाणे यातील arguments ची मांडणी आहे. गोष्टी कश्या घडत जातात याबद्दल बर्णन आहे. यात गोष्टी एका मागोमाग एक आधीच्या गोष्टींच्या आधाराने घडत जातात.
लेखकाची लेखनशैली अप्रतिम आहे. लेखक कोणाचीच बाजू घेत नाही पण सर्वांच्या बाजूचे दर्शन घडवतो. कोणाचीही बाजू न घेता भावनांचे वर्णन कसे करावे याचा हे पुस्तक जणू वस्तुपाठच आहे. देहबोलीच्या निरीक्षणातील बारकावे थक्क करायला लावणारे आहेत. उदाहरणार्थ
१. - मुलाला डोक्यावरून वजन घेऊन जाताना होणारा त्रास. त्याचे ते लपवणे, पण आईच्या लक्षात येणे!
२.- जुरू (कथेचा नायक) ला पोलिसांच्या हालचालींवरून कोण वरिष्ठ पदावर आहे आणि कोण कनिष्ट पदावर आहे हे समजणे.  
३. - शाळेत जात असणाऱ्या मुलाच्या विचारातील आणि त्यामुळे होणारे देहबोलीतील बदल.
४. - चेहऱ्यावरच्या भावना लपवायला शिकलेला आदिवासी पोलीस स्टेशनवर जाऊन आल्यावर कसा त्या दाखवायला शिकतो. इत्यादी
काही लेखकांची लिखाणाची शैली इतकी उत्तम असते की त्यांच्या शब्दांमुळे आपल्या डोळ्यासमोर सहज चित्र उभे रहाते. याला word picture असे म्हणतात. विलास मनोहरांची लिखाणाची शैली अशी word picture आहे. हे एक जीव ओतून लिहिलेले पुस्तक आहे.
हे पुस्तक फक्त नक्षलवाद ह्या समस्येच्या करणावर भाष्य करत नाही तर आदिवासींचे रोजचे जीवन, आणि त्यांची जीवन जगण्याची पद्धत याबद्दलही माहिती देते. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आदिवासींच्या जीवनात डोकावतो. त्यांच्या परंपरा, श्रद्धा, योग्य अयोग्यतेच्या कल्पनांबद्दल माहिती मिळते.
संपर्कात आलेल्या अनेक बिगर आदिवासींनी वर्षानुवर्षे आदिवासींचे केलेले शोषण किती तीव्र आहे हे सुस्पष्ट होते. आदिवासींना वाटणारी पोलिस आणि नक्षलवाद्यांची दुहेरी दहशत जाणवते. माझी नक्षलवादाच्या बातम्यांबद्दलची प्रतिक्रिया "अरे बापरे" अशी होती आणि आहे. पण सतत दहशतीखाली असणाऱ्यांची प्रतिक्रिया काय असेल याची कल्पना केलेलीच बरी. यातील बातम्यांवरून आपल्याला कितीक आणि किती खरी माहिती मिळते याबद्दलही आपण पुस्तक वाचल्यावर विचार करायला लागतो.
पोलिसांचे, फॉरेस्ट ऑफिसर्सचे वर्णन, पोलीस पाटलाचे वर्णन यातून परिस्थितीची कल्पना येते आणि हा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे याची जाणीव होते. त्यामुळे नक्षलवादाबद्दल बेजबाबदार, बेधडक विधाने करणे किमान मी तरी टाळेल याची मला खात्री वाटते.
आदिवासींना करावे लागणारे शारीरिक कष्ट, त्याकडे त्यांची बघण्याची पद्धत, त्यांची तंटा सोडवण्याची पद्धत, कपडे, शिक्षण याबद्दलचे मत यात वर्णन केले आहे. हे सगळे शहरी लोकांपेक्षा वेगळे असणारे घटक तर यात वर्णिलेले आहेतच पण त्याच बरोबर त्यांना शहरी लोकांबरोबर जोडणाऱ्या काही धाग्यांचेही यात वर्णन आहे. हे सर्व कथेच्या पार्श्वभूमीवर घडत असते.  काही प्रसंग इतके सखोल वर्णिलेले आहेत की त्यावेळी नक्की काय घडत असेल याची बरीच कल्पना येते.
हे पुस्तक नक्षलवादाच्या जन्माबद्दल आणि कारणांबद्दल भाष्य तर करताच पण त्याचबरोबर विचारांचा, भावनांचा आणि देहबोली आणि घटनांच्या निरीक्षणांचा एक खजिना आहे. ज्याची जेवढी आकलनक्षमता असेल, त्याला तेवढ्या प्रमाणात हे धन मिळतं. पोलिस, फोरेस्ट गार्ड आणि त्यांच्या मदतीला असलेले पोलिस पाटील यांनी जर आदिवासींचे इतके शोषण केले नसते, तर ही समस्या इतकी मोठी झाली नसती, किवा मुळात उभीच राहिली नसती.
हे पुस्तक मला पूर्णपणे समजले आहे असे मला काही वाटत नाही. तरीपण मला जेवढ समजले आहे ते share करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

अभिजीत सफई

1 comment: