'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

सीमोल्लंघन: नोव्हेंबर-डिसेंबर, २०१४

सौजन्य: अमृता ढगे

या अंकात

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
निर्माण प्रक्रियेतील दोन नवे प्रयोग आणि निर्माणच्या अधिकृत फेसबुक पेजबद्दल

सियाचीन
पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या निष्पाप मुलांच्या कत्तलीनंतर भारताला घाबरून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी भारत-पाक मैत्रीची गरज दोन्ही देशांत जाणवू लागली आहे. असाच प्रयत्न करणार्यार PIPFPDबद्दल अद्वैत दंडवतेचा पुढील लेख...

TRY LOVE, IT WORKS...
जर डॉक्टरांनी पेशंटच्या नजरेतून आजाराकडे पाहिलं तर? सागर काबरा याला पेशंटच्या चष्म्यातून पाहताना काय जाणवलं?

गडचिरोलीच्या मलेरियाशी दोन-दोन हाथ
गडचिरोली+पावसाळा=मलेरियाची साथ हे दरवर्षीचं समीकरण. हे समीकरण सोडवताना भूषणला आलेले अनुभव

आम्ही निर्णय घेणार नाही, पण...
GM बियाण्यांच्या चाचण्यांविरुद्ध आंदोलनातून तन्मय जोशीचे झालेले शिक्षण आणि आंदोलनाची पुढील दिशा

जी.एम.ओ. (Genetically Modified Organisms) सोबत जगताना : अमेरिकेतून आलेले पत्र

जवखेड हत्या प्रकरणाचा निर्माण पुणेगटाकडून निषेध !

निर्माणीच्या नजरेतून

आपलेच प्रश्न आपलेच उत्तर: देवाजी तोफांसोबत मोकळ्या गप्पा

नवं शोधग्राम
कलाकारांची सामाजिक क्षेत्रात काय भूमिका असू शकते? अमृता ढगेचे अनुभव...

वैभवच्या नजरेतून ‘जन स्वास्थ्य सहयोग’

जिवती तालुक्यात डॉ. कुलभूषण मोरे च्या ‘अर्थ’ संस्थेद्वारे आरोग्य शिबीर

वृत्तांत कुरूड
प्रणाली साळवे कुरूड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिचे कुरूडचे काही अनुभव...

शस्त्रक्रिया शिबिरातून शिकताना

पुस्तक परिचय 
गंगेमध्ये गगन वितळले या अंबरीश मिश्र यांच्या पुस्तकाचा परिचय करून देतेय ऋतगंधा देशमुख

निर्माणीच्या नजरेतून २

कविता

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

दोन प्रयोग:
            निर्माणच्या नियमित प्रक्रियेला पूरक अशी दोन प्रायोगिक कार्यशाळा सर्चमध्ये झाल्या. IIT मुंबईतील TATA Center for Technology & Design चे ३३ फेलोज व प्राध्यापक आणि गुजरातमधील MD (Preventive & Social Medicine) चे ३९ विद्यार्थी या कार्यशाळांत सहभागी झाले होते.

            दोन्ही कार्यशाळांतील युवांचे वय निर्माणच्या युवांच्या सरासरी वयापेक्षा जास्त होते. दोन्ही कार्यशाळांतील युवा post graduation करत असून पुढील १-२ वर्षांत ते आपले कॉलेजमधील शिक्षण पूर्ण करून करीअर सुरू करतील. अशा युवांना गडचिरोलीतील case studiesfield visitsच्या माध्यमांतून Bottom of Pyramid बद्दल व त्यांच्या समस्यांबद्दल जाणीव व्हावी, सर्चचा action-research च्या माध्यमातून problem solving approach त्यांच्या-पर्यंत पोचावा व त्यांना आपल्या ध्येयाबद्दल स्पष्टता यावी असे या कार्यशाळांचे ध्येय होते. अमराठी युवांच्या निर्माणसदृश कार्यशाळा कशा आयोजित कराव्या याबद्दल निर्माण टीमचे शिक्षण झाले. 
            IIT मुंबईच्या कार्यशाळेतील युवक करण वोहरा याने आपल्या कुंचल्यातून ही कार्यशाळा चित्रबद्ध केली असून (उजवीकडील चित्र) लवकरच या शिबिराची चित्रपुस्तिका तो आपल्यासोबत शेअर करेल.

या कार्यशाळेला लोकमत Oxygen ने उत्तमरित्या कव्हर केले. 
Oxygen मधील लेखाची लिंक http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=1220

लाईक?
बदलत्या कालानुसार अखेर निर्माणचे अधिकृत फेसबुक पेज सुरू झाले आहे. या पेजवर पुढील गोष्टी update केल्या जातील:
१.      सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या संधी व फेलोशिप
२.      निर्माणसंबंधित घडामोडी
३.      सीमोल्लंघनमधील ठराविक बातम्या
या पेजचा पत्ता: https://www.facebook.com/nirmanforyouth
तरी या पेजला भेट द्या. लाईक करा. आणि पुन्हा पुन्हा भेट देत रहा...

पाकिस्तान – इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी

पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या निष्पाप मुलांच्या कत्तलीनंतर भारताला घाबरून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी भारत-पाक मैत्रीची गरज दोन्ही देशांत जाणवू लागली आहे. असाच प्रयत्न करणार्याी PIPFPDबद्दल अद्वैत दंडवतेचा पुढील लेख...

भाग ३ - सियाचीन
India and Pakistan are not fighting with each other in Siachen, they are both fighting the glacier, and nature takes its revenge by killing soldiers.” - Abbasi
Siachin Glacier and Surrounding areas
            १३ एप्रिल, १९८४ ला भारतीय सैन्याची एक छोटी तुकडी “मेघदूत” या अत्यंत गुप्त मोहिमेसाठी साठी सियाचीन येथील Salt-oro या शिखरावर पोहोचली. पुढील काही दिवसात तिने १८००० ते २०००० फूट उंची दरम्यान असणाऱ्या Bila fond La, Sia La, Indira Col या आणखी काही ठिकाणी ताबा मिळवला मात्र याच वेळी पाकिस्तानी सैन्याला याची माहिती मिळाली आणि त्यांनी देखील Salt-oro च्या खालील भागात चौकी स्थापन केली. पुढील काही वर्षातच सैन्याच्या या छोट्या तुकड्यांनी विशाल रूप धारण केले व सियाचीन पर्वत रांगांतील १०० किमी परिसरात पसरली आणि इथून सुरुवात झाली ‘Highest Battle Field on Earth’ म्हटल्या जाणाऱ्या सियाचीन प्रश्नाची.

            आज सियाचीनवर उंचीच्या ठिकाणी भारतीय सैन्याच्या चौक्या आहेत तर खालील भागात पाकिस्तानी सैन्याच्या. हे “Operation मेघदूत” भारतीय सैन्याचे आजपर्यंत चाललेले सगळ्यात मोठे Operation मानले जाते. २०१२ साली संसदेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय संरक्षण खाते सियाचीन येथील छावणी टिकवून ठेवण्यासाठी दर वर्षी  सुमारे १००० कोटी रुपये खर्च करते अशी माहिती दिली गेली, तर पाकिस्तानमधील ज्येष्ठ वकील अस्मा जहांगीर याच्या अभ्यासानुसार पाकिस्तान याचसाठी दर वर्षी ३०० मिलियन डॉलर खर्च करते.
            २००३ सालापर्यंत Cease Fire agreement वर सह्या होईपर्यंत जवळजवळ रोज दोन्ही देशातील सैन्य एकमेकांवर गोळीबार करत होते. मात्र या काळात युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांशिवाय अत्यंत वाईट वातावरणामुळे भारताचे १००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले तर ३००० पेक्षा जास्त सैनिकांना कायमचे अपंगत्व आले. याहून जास्त पाकिस्तानी सैन्य मृत्युमुखी पडले किंवा मारले गेले. एका मिलिटरी रिपोर्ट नुसार सियाचीनला दर ३ दिवसांनी एक पाकिस्तानी सैनिक मृत्यमुखी पडतो.
            स्वतःच्या चौक्यांचे रक्षण करण्यासाठी दोन्ही देशांनी प्रशिक्षण शाळा, बंकर, शस्त्रास्त्राचा साठा करण्यासाठी मोठाले गोडाऊन बांधले आहेत, ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर केमिकल्सचा वापर करून बर्फाचे तुकडे करण्यात आले आहेत. याचसोबत अन्न शिजवण्यासाठी केरोसीनची पाईप लाईन टाकण्यात आली आहे ज्या द्वारे सर्व चौक्यांना केरोसीन पोहोचवले जाते.
            US मधील नील केमकर यांनी Stanford Environmental Law Journal मध्ये लिहिलेल्या एका रिपोर्टनुसार भारतीय आर्मी ऑफिसर सियाचीनचा उल्लेख “The world’s highest garbage dump” म्हणून करतात. यानुसार फक्त भारताकडूनच दर दिवशी ९०० किलो कचरा सियाचीनला टाकला जातो ज्यातील ४०% कचरा हा प्लास्टिक आणि मेटल हा असतो.
            या सर्व प्रकारामुळे सियाचीनयेथील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत असून मिलिटरी इंजिनिअरिंग, पुणे यांच्या एका report नुसार १९९१ पर्यंत तेथील तापमानात २.६ सेल्सिअस वरून १०.६ सेल्सियसएवढी वाढ झाली आहे. यानंतर मात्र यासंबंधीची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली नाही.
            याचेच विपरीत परिमाण नद्यांना येणाऱ्या अचानक पुरात दिसून येत आहेत. २०१० साली नुब्रा नदीला अचानक आलेल्या पुरात ३३ भारतीय जवानांचा मृत्यू झाला, तर ऑगस्ट, २०१० साली सियाचीन आणि लेह येथे झालेल्या ढगफुटीत २०० लोकांचा जीव गेला.
            सियाचीन येथील बदलेल्या वातावरणाचा परिणाम गिर्यारोहणावर देखील झालेला असून ७०च्या दशकात जिथे वर्षाला सरासरी ६५ लोक सियाचीन येथे गिर्यारोहणाला जात होते तीच आकडेवारी २०११ सालापर्यंत वर्षाला सरासरी ३५ वर आली आहे.
            आजपर्यंत अनेक चर्चांमधून दोन्ही देशांनी सियाचीनवरून सैन्य मागे घ्यावे असे सुचवण्यात आलेले आहे. पाकिस्तानची याला मान्यता असली तरी भारत याला तयार नाही. पर्यावरणीय दृष्टीकोनातून सियाचीन वरील सैन्य ही बाब जरी चिंताजनक असली तरी भारतीय सैन्याच्या ताब्यात वर नमूद केल्याप्रमाणे मोक्याच्या आणि वर उंचीच्या जागा आहेत. चीन आणि पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा या चौक्यांवरून सैन्य मागे घेण्यास भारत तयार नाही.
            पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसीने गेल्या काही वर्षापासून सियाचीन प्रश्नावर सतत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्य नागरिकांशिवाय, दोन्ही देशातील आर्मी ऑफिसर्सं, पर्यावरणतज्ञ यांच्या चर्चा घडवून विविध पर्याय सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. याच संदर्भात मुंबई येथे झालेल्या चर्चेत पुढील मुद्यावर एकमत झाले.
·       सियाचीनमधून टप्प्या-टप्प्याने सैन्य काढून घेण्याच्या दृष्टीने १९९२ साली सुचवण्यात आलेल्या प्रस्तावित ठरावाच्या दृष्टीने पुढील पाऊले उचलण्यासाठी राजकीय नेत्यांसमवेत, जम्मू-काश्मीर तसेच लेह-लदाख मधील जनतेचे प्रतिनिधी, आर्मीमधील ऑफिसर व पर्यावरणतज्ञ यांची समिती बनवावी.
·       भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी सियाचीनवरून एका ठराविक वेळेत सैन्य काढून घेण्यासाठी तसेच सियाचीन पर्वतरांगांवरील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरणतज्ञ, शास्त्रज्ञ व Glaciologists यांची Joint-Task Force तयार करावी.
·       सियाचीनला “highest battlefiled on earth” हे बिरूद मिटवून “Mountain of Peace” हे जगातील एक सर्वोत्तम उदाहरण बनवण्यासाठी प्रयत्न करणे जेणेकरून येथे निर्माण झालेल्या पर्यावरणीय धोका टाळण्यास मदत होईल.
·       सियाचीन वर कार्यरत असलेल्या जवानांसाठी तसेच तेथे राहत असलेल्या सामान्य नागरिकांच्या पुनर्वसनासाठी निधी देण्यात यावा.
·       असे झाल्यास सियाचीन वर होत असेलेला दोन्ही देशांचा अमाप खर्च टाळता येईल व तो पैसा गरिबी निर्मूलन, शिक्षण व आरोग्यसेवा यांसाठी पुरवण्यात यावा.
              दोन्ही देशांच्या सैन्याच्या हालचालींमुळे सियाचीनचे पर्यावरणीय नुकसान, त्याचे तेथे पहारा देणाऱ्या सैन्याला भोगावे लागणारे परिणाम, त्यासाठी होणारा अमाप खर्च हे सगळे टाळता येण्यासारखे आहे का? असा प्रश्न जर उपस्थित झाला तर त्याचे उत्तर आहे “होय, हे टाळता येण्यासारखे आहे.” मात्र ते सहज शक्य नक्कीच नाही आणि याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांचा एकमेकांवरील अविश्वास. जोपर्यंत दोन्ही देशात परस्पर विश्वासाचे नाते निर्माण होत नाही तोपर्यंत सियाचीन आणि त्याच्याशी निगडीत अनेक प्रश्न तसेच राहणार, ज्याची किंमत मात्र तिथे राहणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि पहारा देणाऱ्या दोन्ही देशांच्या सैन्याला भोगावे लागणार हे मात्र खरे!

संदर्भ:
·       www.pipfpd.org
·       Siachen: End to the Impasse? – Compilation of reports and articles on Siachen dispute published by Dialogue for Action unit of Programme for Social Action.
·       Indian and Pakistani proposal on Siachen,November, 1992

 क्रमशः 
स्रोत: अव्दैत दंडवते,, adwaitdandwate@gmail.com


गडचिरोलीच्या मलेरियाशी दोन-दोन हाथ

गडचिरोली-पावसाळा-मलेरियाची साथ हे दरवर्षीचं समीकरण. हे समीकरण सोडवण्याची जबाबदारी सर्चचे मोबाईल मेडिकल युनिट सांभाळणाऱ्या भूषण देववर आली. ते सुटले का? ते सोडवण्याची काय प्रक्रिया होती? त्यादरम्यान भूषणचे काय शिक्षण झाले? वाचूया त्याच्याच शब्दांत...

मलेरिया हा गडचिरोली जिल्ह्यासाठी एक मोठा 'थंडी वाजून ताप आणणारा' प्रश्न आहे. २०११-१२ च्या सरकारी आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या १% पेक्षाही कमी आहे. मात्र महाराष्ट्रातील मलेरियाच्या एकूण रूग्णांपैकी जवळपास १४% रूग्ण गडचिरोली जिल्ह्याचे आहेत. मलेरियाचे प्रामुख्याने Plasmodium-vivax (PV) व Plasmodium-falsiparum (PF) हे दोन प्रकार भारतात आढळून येतात. यापैकी PF मलेरियाचा उपचार जर झाला नाही तर तो जीवघेणा ठरतो. PF मालेरियाचेच रुपांतर cerebral (मेंदू) मलेरिया मध्ये होते, व ह्याच PF मलेरियाचे रूग्ण गडचिरोलीत प्रामुख्याने दिसून येतात (75%). मुंबईत हेच प्रमाण ८% आहे. गडचिरोलीचा मलेरिया chloroquine resistant आहे. (chloroquine हे औषध सामान्यतः मलेरियाच्या उपचारासाठी सर्वत्र वापरले जाते.)
            साधारण पावसाळ्या नंतर मलेरियाचे प्रमाण वाढते. मलेरियाशी दोन हाथ करण्यासाठी मी व सर्चच्या मोबाईल मेडीकल युनिटची (MMU) आमची सर्व टीम सज्ज होतो. ४५ आदिवासी दुर्गम गावांचा मलेरिया नियंत्रण करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता.
            ऑगस्ट महिन्यात काही गावात साधारण एक-दोन मलेरियाचे रूग्ण आढळून येऊ लागले. ह्या महिन्यात ४५ गावांतील एकूण १२००० लोकसंखेपैकी २२ मलेरियाचे रूग्ण आढळून आले. मलेरियाची चाहूल लागली होती. मलेरियाचे प्रमाण इथून पुढे वाढणार हे लक्षात आले, व त्यानुसार आम्ही आमची जय्यत तयारी सुरु केली. MMU ऑफिसला war रूमचे रूप दिले. दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे कोंदावाही व त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये मलेरियाचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणून ह्या गावांच्या महिन्यात एकऐवजी दोन-दोन भेटींचे नियोजन केले. औषधे, मलेरियाचे गावातल्या गावात तात्काळ निदान करण्यासाठीचे RDK(Rapid Diagnostic Kit) हे सुद्धा मुबलक प्रमाणात आधीच उपलब्ध करून घेतले होते. सोबतच लोकांमध्ये जागृतीसाठी आम्ही गावा-गावात आरोग्यशिक्षण करण्याचेही नियोजन केले. मालेरीया war साठी लागणारी सगळी हत्यारे आमच्याकडे होती.
             सप्टेंबर महिना आला. आता शत्रू बळकट होत चालला होता. ह्या महिन्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या एकदम २२ वरून ११९ वर गेली व ऑक्टोबर मध्ये ही संख्या ११४ वर राहिली. आता आम्ही थोडे अधिक सतर्क झालो. आमचे प्रयत्न सुरूच होते जास्तीत जास्त रुग्णांना उपचार करण्याचे.
            नोहेंबर महिना सुरु झाला. पहिल्याच दिवशी कोंदावाही ह्या गावात गेलो तिथे तर ५०० लोकसंख्येत तब्बल ७१ मलेरियाचे रूग्ण आढळून आले. आता परिस्थिती फारच गंभीर होत चालली होती. सर्चच्या रुग्णालयात सुद्धा रूग्णांची संख्या वाढत होती व मेंदूच्या मलरियाचे रूग्णसुद्धा आता आढळून येऊ लागले.
            आम्ही आमच्या war रूम मध्ये बसून कुठल्या गावात मलेरियाचे प्रमाण अधिक आहे हे शोधून काढलं. ह्यादरम्यान वेळोवेळी योगेश दादचे मार्गदशन मिळतच होते. मलेरियाग्रस्त गावांसाठी विशेष कृती कार्यक्रम आखला. आम्ही तातडीने दंतेश्वरी सेवकांचे शिबीर आयोजित केले. त्यात त्यांना मलेरियाच्या वाढत्या प्रमाणाची व त्यावर नियंत्रण व निदान करण्याची तसेच गंभीर रूग्ण ओळखून सर्चला रेफर करण्याची माहिती दिली. तसेच त्यांच्या गावात मलेरियाचे प्रमाण कुठे जास्त आहे हे जाणून घेऊन आम्ही आमची भेट प्राधान्यक्रमाने त्या गावांत देण्याची तयारी केली. त्या गावांत २ भेटी द्यायच्या ठरवल्या. मलेरियाचे आरोग्यशिक्षण केले व मच्छरदाणीचा वापर करण्यास आम्ही लोकांमध्ये जनजागृती केली. निरीक्षणातून असे लक्षात आले की मच्छरदाणी ही भारीत करण्याची (औषधीत बुडविण्याची) खूप गरज आहे. दर सहा महिन्यांनी मच्छरदाणी भारीत करावी लागते. भारीत न केलेल्या मच्छरदाणीचा उपयोग होत नाही. त्यासाठी आम्ही शासनाकडे डेल्टामिथ्रीन नावाच्या औषधाची मागणी केली. (या औषधाचा उपयोग मच्छरदाणी भारीत करण्यासाठी होतो. हे औषध शासनामार्फतच मिळू शकते.). धक्कादायक बाब म्हणजे ऐन मलेरियाच्या साथीत शासनाकडे हे औषधच उपलब्ध नव्हतं. तसेच ACT ची लहान मुलांसाठीची एकही गोळी शासनाकडे उपलब्ध नव्हती. ACT हे औषध PF मलेरियाच्या उपचारासाठी देतात. सर्चने वर्तमानपत्रे व टीव्ही न्यूज चॅनल्स यांच्यामार्फत आवाज उठवल्यानंतर शासनाने डेल्टा मिथ्रीन त्वरित उपलब्ध करून दिले. प्रत्येक गावातील दंतेश्वरी सेवकाला हे औषध देण्यात आले व गावातील मच्छरदाण्या भारीत करण्याचे काम त्यांनी केले.
            नोहेंबर महिन्यात सगळ्यात जास्त ४१० रूग्ण आढळून आले. ह्या सगळ्याचा उपचार करण्याचा दिव्य अनुभव आम्ही घेतला. आता मालेरियाचे प्रमाण भरपूर कमी आहे. मलेरियाचे प्रमाण जास्त का अढळले? तर ह्यावर्षी पाऊस हा उशिरा अनियमित आला व त्यामुळे मच्छरवाढीला अनुकूल असे वातावरण होते.
            ह्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात माझे खूप मोठे पब्लिक हेल्थचे शिक्षण झाले. मोठ्या प्रमाणावर एखाद्या रोगाचे नियंत्रण कसे करावे हे शिकायला मिळाले. टीमवर्क किती महत्वाचे आहे हे सुद्धा लक्षात आलं. निर्माणच्या ५.२ शिबिरात जे मलेरिया, डायरिया इ. आजारांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी जे ग्रुप Presentation केले ते काम प्रत्यक्ष करण्याची संधी ह्यातून माला मिळाली. शिबिरादरम्यान किंवा शिकत असताना रोगचिकित्सा व त्याच्या नियंत्रणाबद्दल लिहिणे, वाचणे व त्याविषयी बोलणे मजेशीर व कधी-कधी भीतीदायक असते. परंतु प्रत्यक्षात तो एक संघर्ष असतो. परंतु तो वेगळाच आनंद व समाधान आपल्याला देवून जातो.

 स्रोत: भूषण देव, drbhushandeo@gmail.com

TRY LOVE, IT WORKS...

सर्वांनी pk पाहिला असेलच. जेव्हा परग्रहावरच्या माणसाच्या नजरेतून आपण देव-धर्माकडे पाहतो, तेव्हा त्याचं वेगळच चित्र आपल्याला दिसतं. जर डॉक्टरांनी पेशंटच्या नजरेतून आजाराकडे पाहिलं तर? आपला डॉक्टर मित्र सागर काबरा याला पेशंटच्या चष्म्यातून पाहताना काय जाणवलं?
एक मुलगी - १८ वर्षांची.. सुंदर दिसणारी.. मेक अप करण्याची हौस असणारी.. दिवसभर गाणी गप्पा गोष्टी .. 
            पण काही दिवसांपासून तिला काय होतंय हे तिलाच कळत नव्हते . शरीर हळूहळू सुकत जात होतं -जरी भूक वाढलेली असली तरीही हात-पायांची सुकलेल्या काठीगत अवस्था झालेली.. गालावर  पातळ कातडीचा थर राहिलेला . हळूहळू  शारीरिक बदल तिला जास्तच दुःखदायक होता. मग जावून तिला डॉक्टर कडून कळले की तिला मधुमेह झालाय. मधुमेह काय असतं हे कळण्याच्या आतच तिच्यावर दररोज रक्त तपासण्यांचा मारा सुरु करण्यात आला. अशक्त झालेल्या  शरीराला लवकरच न्यूमोनियाने ग्रासले.  न शमणारा ताप, छातीचं दुखणे, सततचा खोकला, रोजच्या रक्त तपासण्या, इन्सुलिन व प्रतीजैवाकांचा अतिशय त्रासदायक औषधोपचार- ती अतिशय उदास झाली होती. तिला काही काळतच नव्हते की  हे माझ्यासोबतच का होतंय. तिला कोणी प्रेमाने समजावलंच नव्हतं की तिला नेमकं काय झालाय ते. शेवटी तिनेही हार मानली . कधी यातून सुटका मिळेल असं तिला नेहमी वाटायचं. डोळ्यांची नजर गेलेली- न चालू शकणारी- भर तारुण्यात असलेली एक मुलगी- या क्षणी पूर्णतः औदासीन्यात- कोणीही बोलायला तयार नाही- मित्र-मैत्रिणी तर दूरच... 
            एक डॉक्टर म्हणून मी सपशेल हरलो होतो. कर्तव्य पार पडत असल्यासारखं मी रोज round घ्यायचो. रोज तिच्या ग्लूकोज लेवल वर लक्ष ठेवायचो व ती लेवल नॉर्मल कशी ठेवता येईल यासाठी आकडेमोड करायचो. माझं लक्ष फक्त तिच्या FBS, PDS आणि temperature वर-- एखाद्या यंत्रासारखं - तिच्याकडं -तिला होणार्‍या शारीरिक व मानसिक त्रासाकडं माझं लक्षच नव्हतं . रोज मी एखाद्या यंत्राला सूचना देतोय अशा तिला सूचना द्यायचो-- की  “खाण्यापिण्यात नियमितता पाहिजे, हे करायचं, ते नाही करायचं” ते हि अशा अविर्भावात, की तिच्यापेक्षा तिच्या शरीराची जास्त काळजी मला आहे.. 
            माझ्यासाठी हा अनुभव अतिशय depressing होता. मी औषधं देतोय आणि हिचं शरीर त्याला response का देत नाही- ते पाहून माझा अभिमान दुखावला गेला. माझा स्वतःवरील विश्वासही कमी होत होता. आता या पोरीचं काय करावं असं क्षणोक्षणी वाटत होतं. नंतर विचार आला आपण या पोरीच्या जागेवर असलो असतो तर... मी दृष्टिहीन, शरीराने अतिशय कृश, अनेक दिवसांपासून तापाने फणफणलेलो.. खोकला आणि छातीच्या दुखण्याने हैराण - त्याहीपेक्षा जास्त हैराण टोचणार्‍या सुयांनी...  कोणीतरी अनोळखी, न दिसणारी व्यक्ती मला सुई लावतेय, कोणीतरी माझं रक्त शोषतोय आणि कोणीतरी स्वतःला शहाणा समजणारा व्यक्ती मला येउन सूचना देतोय.. माझ्याशी बोलायला कोणीही मित्र मैत्रिणी नाहीत.. दवाखान्याच्या खाटेवर निपचित पडलेलो मी... खेळणं तर दूरच... सर्व स्वप्नंच काळोखात गेलेली…’
            ‘मला दुसरं काहीच नको- फक्त माझ्याशी प्रेमाने बोलावं हीच इच्छा.. मला हा हॉस्पिटलचा वार्ड नकोय.मला घरी जायचंय. मला मोकळा श्वास पाहीजे, मला माझी काळजी घेण्याचा आव आणणारा डॉक्टर नाही पाहीजे.मला पाहीजे कोणीतरी प्रेमाने बोलणारी व्यक्ती….’
            हे विचार सहज माझ्या मनात आले. मी ‘LOVE, MEDICINE & MIRACLES’ मधील गोष्टी आठवण्याचा प्रयत्न केला. बर्‍याच लोकांना बरं होण्यासाठी फक्त औषधं अपुरी पडतात. सोबतच त्यांना गरज असते ती प्रेमाच्या चार शब्दांची, मैत्रीचीआजारातून बरं  होण्यासाठी प्रेमासारखं दुसरं motivation नाही. 
            काल मी तिच्याशी बराच वेळ बोललो- एका मित्राच्या भूमिकेतूनआज तिने सांगितलं की तिला गाणी ऐकायची आहेतमला जग जिंकल्यासारखं वाटलं…. 
            ‘डॉक्टरची एक व्याख्या मला खूप आवडते- “doctor is one who cures sometimes, relieves often, and comforts always.” 
            मला एक प्रचंड, प्रगाढ ज्ञान असलेल्या डॉक्टरपेक्षा एक नेहमीच comfortable असणारा मित्र बनायला जास्त आवडेल
सागर काबरा, kabrasagar19@gmail.com
टीप: Love, Medicine and Miracles या पुस्तकात Bernie Siegel या सर्जनचे self-हेयालिंग संदर्भात अनुभव आहेत.

आम्ही निर्णय घेणार नाही, पण...


२९ ऑक्टोबरला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात (MPKV) जमून महाराष्ट्रातील विविध लोक चळवळीच्या प्रतिनीधींनी विद्यापीठाच्या आवारात चालू असलेल्या GM मक्याच्या वादग्रस्त खुल्या चाचण्यांबद्दल चर्चेची मागणी केली. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे ह्या विवाद्य चाचण्या सुरू झाल्या आहेत. या आंदोलनाचे सविस्तर वृत्तांकन शुभदा पांढरे हिने व्हिडीओ फिल्मच्या माध्यमाद्वारे केले आहे.
या आंदोलनाच्या सद्यस्थितीबद्दल आणि पुढील दिशेबद्दल तन्मय जोशी (निर्माण ३) म्हणाला,
            “राहुरीला लोकांनी गोळा होवून विरोध तर दर्शविला आणि जी.एम. पिकांच्या क्षेत्र चाचण्या बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. परंतु हा सगळा उपद्व्याप करून चाचण्या थांबल्यात का? तर नाही. उलट यानंतर GM समर्थनार्थ campaigning ला जास्तीचाच जोम चढलेला जाणवितो. GM बियाण्यांचे समर्थन करणार्‍या लॉबीला बलाढ्य कोर्पोरेट्सचा (विशेषतः बलाढ्य बियाणे कंपन्यांचा) पाठिंबा आहे. असे जाणवते की प्रचलित मेडियामध्ये GM विरोधी बाजूला योग्य न्याय दिला जात नाही. मग प्रश्न पडतो की आपली मोजकी ऊर्जा अशा प्रकारच्या निष्फल कामांवर खर्च का करावी?
            आम्हा शेती चळवळीशी जोडलेल्या बर्‍याच जणांना हा प्रश्न पडतो. आणि आम्हाला वारंवार तेव्हा एकामेकांना आठवण करून द्यावी लागते की निकालापेक्षा प्रक्रिया ही जास्त महत्त्वाची आहे. जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर त्याबद्दल स्पष्ट भूमिका घेणं  व ती सरकार व लोकांपर्यंत पोहोचवणं ही लोकशाही प्रक्रियेत आपली जबाबदारी आहे.
            लोकांचं मत बनलं तरच ते GM बियाणे किंवा इतर कोणत्याही गोष्टीला समर्थन / विरोध करतील. परिस्थिती अशी आहे की प्रत्यक्ष कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनाही GM बियाण्यांच्या फायदे/तोटे याबद्दल स्पष्ट माहिती नाही, मग सामान्य शेतकरी तर दूरच राहिला. हे मत बनण्यापूर्वीच लोकांना अंधारात ठेवून एखादा प्रकल्प रेटणं किंवा लोकांवर लादणं अनैतिक आहे. Top-down ऐवजी bottom-up approach स्वीकारायला हवा.
            मात्र सरकारी निर्णयपद्धतीच्या या मर्यादा जन-आंदोलनातही दिसतात. लोकांपर्यंत पोहोचण्याऐवजी आम्ही अधिकार्‍यांकडे विरोध नोंदवतो. आंदोलनातील मोजके लोक (जरी त्यांचे हेतू लोक-कल्याणाचा असला) आंदोलनासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतात. आंदोलन सहसा केंद्रीत असते. त्यामुळे कापणीचे काम सोडून विदर्भातल्या शेतकर्‍यांनी नगरला बेमुदत आंदोलन करण्यासाठी सहभागी व्हावं अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे. आंदोलनातील नेत्यांनी स्वतः निर्णय घ्यायला नको, पण सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती केली पाहिजे.
            आमची पुढची नीती कशी असावी? आम्ही लोकांपर्यंत पोचून विकेंद्रीत दबाव बनवण्यावर भर द्यायला हवा. प्रचलित मेडियाकडून मिळणारा थंड प्रतिसाद पाहता पर्यायी मेडियाचा वापर करायला हवा. संघर्षात्मक कार्यक्रमासोबत रचनात्मक कार्यक्रमदेखील राबवायला हवेत. नाही तर प्रेरणा टिकून राहणे कठीण जाते. शेतकर्‍यांच्या अडचणींना पर्याय द्यायला हवेत. पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन करायला हवे.
            आजचे आंदोलन नक्कीच आदर्श नाही. त्यामुळे लगेच बदल / क्रांती घडणार नाही. पण लोकांपर्यंत पोचण्यासाठी हे नक्कीच एक पुढचे पाऊल आहे.”

तन्मय जोशी, tanmay_sj@yahoo.com

जी.एम. पिकांबाबत सावध करण्यासाठी अमेरिकन जनतेने लिहिलेले खुले पत्र

२१ नोव्हेंबर,२०१४
वैज्ञानिक, सुप्रसिद्ध व्यक्ती, असरकारी संस्था (NGO), खाद्यवस्तू निर्माते आणि इतरांनी ५७ दशलक्ष अमेरिकनांचे प्रतिनिधित्व करणारे खुले पत्र इंग्लंड (U.K.) आणि युरोपियन युनियनला लिहिले आहे. जी.एम. पिके जोखमी असल्याचा गंभीर इशारा देणारे हे पत्र इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिले गेले शिवाय प्रत्येक संसद सदस्य आणि प्रमुख माध्यम वाहिन्यांनीही हे पत्र पोचते केले आहे.
            पत्रात गेल्या दोन दशकात जी.एम. पिके शेतात पेरण्याचा आणि जी.एम. खाद्यान्न सेवनाचा नुकसानकारी अनुभव दिला आहे. जी.एम. बियाणे आणि पिकांवर जैवतंत्रज्ञान (Biotechnology) क्षेत्रांतील मुठभर कंपन्यांचे नियंत्रण आहे. युरोपियन युनियनवर बड्या कंपन्या आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील दलाल (lobbyist) मंडळींचा दबाव असल्याचाही उल्लेख या पत्रात आहे.

            “जी.एम. बियाण्यांमुळे कीटकनाशकांचा वापर कमी होईल आणि उत्पादन वाढेल हा कंपन्यांचा दावा पूर्णपणे फसला आहे. शिवाय तणनाशकांचा वाढता वापर, उत्पादन खर्चातील वाढ, परंपरागत बियाण्यातील प्रदूषण आणि ऱ्हास, निर्यात व्यापारात घट, तणनाशकांना न जुमानणारे तण (Superweed) आणि कीटकनाशकांना दाद न देणारे किडे (superbug), शेतातील मित्र-सजीवांवर (सूक्ष्मजीव,पक्षी,किडे इ.) होणारा परिणाम, खाद्यान्न आणि मातेच्या दूधात सापडलेले तणनाशकांचे अंश” इ. माहिती या पत्रात आहे.
            जी. एम. खाद्यान्नांचे प्राणीमात्रांवर होणारे परिणाम, जी.एम. खाद्यान्नाच्या सुरक्षिततेबाबत वैज्ञानिकांमध्ये असलेली मतभिन्नता हेही मुद्दे या पत्रात आहेत.
Third World Network
131, Jalan Macalister
10400 Penang
Malaysia

  जी.एम.ओ. (Genetically Modified Organisms) सोबत जगताना : अमेरिकेतून आलेले पत्र
            आम्ही अमेरिकेतील नागरिक जी.एम.पिकांचे शेतातील आणि अन्य अनुभव तसेच आमच्या खाद्यान्न पुरवठ्यात होत असलेल्या जी.एम.च्या भेसळीबद्दल लिहीत आहोत.
            आमच्या देशातील अर्धी जमीन आज जी.एम. पिकांखाली आहे; ९४% सोयाबीन, ९३% मका आणि ९६% कापूस जी.एम. आहे(i).
            इंग्लंड (U.K.) आणि युरोपियन युनियनने (EU) जी.एम. अजून पर्यंत आमच्यासारखी स्वीकारलेली नाहीत. मात्र त्यासाठी तुमच्यावर बड्या कंपन्या, जैवतंत्रज्ञानाचे दलाल (lobbyist)  आणि शासनाचा प्रचंड दबाव आहे.
            हे तंत्रज्ञान अयशस्वी असल्याचे आमचे मत झाले आहे. मतगणनेनुसार ७२% अमेरिकनांना जी.एम. अन्न नको आहे आणि ९०% पेक्षा अधिकांना जी.एम. खाद्यान्नावर लेबल हवे आहे(ii).
            जनमताचा कौल अशा प्रकारे जी.एम.विरोधी असताना आमच्या संघीय आणि राज्य सरकारांनी अधिक प्रभावी नियंत्रण ठेवावे, किमान लेबलिंग तरी व्हायला हवे. मात्र याविरुद्ध भरपूर पैसा आणि प्रभाव वापरून बायोटेक आणि खाद्यान्न कंपन्या कारवाया करीत आहेत(iii,iv,v).
            तुम्हाला पर्याय निवडताना मदत व्हावी म्हणून जी.एम. पिकांबाबातचे गेल्या दोन दशकांचे अनुभव आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. यातून तुम्हाला संभाव्य धोक्याची जाणीव होईल अशी आशा आहे.
वचनभंग-
            जी.एम. बियाण्यांमुळे  उत्पादन वाढेल, कीटकनाशक रसायनांचा वापर कमी होईल असा प्रचार करून हे बियाणे बाजारात आणले गेले मात्र प्रत्यक्षात यापैकी काहीच झाले नाही(vi). जी. एम. बियाण्यांपासून मिळणारे उत्पादन त्याच पिकांच्या इतर बियाण्यांपासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी असू शकते असा निष्कर्ष खुद्द अमेरिकन सरकारचा ताजा अहवाल सांगतो(vii).
            जी.एम. बियाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात मोठी वाढ होईल असे सांगितले गेले होते मात्र अमेरिकन कृषी खात्यानुसार वास्तविकता वेगळीच आहे(viii).एकीकडे नफ्यात खूपच चढ-उतर आहेत. तर दुसरीकडे जी.एम. पिकांचा उत्पादनखर्च सतत वाढत आहे(ix).
            जी.एम. बियाण्यांच्या पुनर्वापरास कायद्याने बंदी आहे, शेतकऱ्यांना दरवर्षी हे बियाणे कंपन्यांकडून विकत घेणे अपरिहार्य आहे. या बियाण्यांच्या किंमतीवर बायोटेक कंपन्यांचे नियंत्रण आहे. जी.एम. बियाण्यांसाठी ३ ते ६ पट अधिक किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागते(x). शिवाय जी.एम. पिकांना इतर रसायनेसुद्धा लागतात. त्यामुळे परंपरागत पिकांपेक्षा जी.एम. पिकांना अधिक खर्च लागतो.
            जी.एम. पिकांवर भर दिल्यामुळे परंपरागत वाणांचे बियाणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या पसंतीचे बियाणे वापरण्याची संधीच नाही परिणामी एकूण पीक नियोजनसुद्धा शेतकऱ्याच्या नियंत्रणात नाही(xi).
            ज्या शेतकऱ्यांनी जी.एम.पिके पेरायची नाहीत असे ठरवले आहे त्यांची पिके परिसरातील जी.एम. पिकांमधून निघणाऱ्या परागकणांमुळे (Cross pollination) प्रदूषित होऊ शकतात(xii). शिवाय साठवणूक करताना सुद्धा दोन्ही प्रकारची पिके एकमेकांत मिसळू शकतात.
            यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या हातून निर्यात व्यापार निसटत आहे. अनेक देशांनी जी.एम.पिके पेरण्यावर अथवा आयातीवर बंधने घातली आहेत किंवा संपूर्ण प्रतिबंध आहेत(xiii). आणि यामुळेच काही निर्यात व्यवहार जी.एम. भेसळीपायी वादग्रस्त ठरले आहेत(xiv).
            अमेरिकेतील सेंद्रिय शेतीचा उमलत्या बाजारावरही परिणाम झालेला आहे. अनेक सेंद्रिय शेतकऱ्यांचे बियाणे उत्पादनाचे करार प्रदूषणाच्या उच्च पातळीमुळे रद्द झालेत. ही समस्या वाढत आहे आणि भविष्यात ती आणखी वाढू शकते.
तणनाशके आणि महातण (Pesticides & superweed)-
            जी.एम.पिकांमध्ये ‘राउंडअप रेडी’ या तणनाशक सहिष्णू (H.T.) प्रकारचा भरणा अधिक आहे. यात सोयाबीन आणि मका सर्वाधिक आहे. ग्लायफोसेटयुक्त राउंडअप तणनाशकांची फवारणी केल्यावर तण मरते मात्र पिकांची वाढ होत राहते अशी यात योजना आहे.
            तणांमध्ये प्रतिरोधशक्ती (Resistance) विकसित झाल्यामुळे शेतकऱ्यांना तणनाशकांचा वापर वाढवावा लागतो आणि या वाढत्या वापरामुळे (तणनाशकांना) न जुमानणाऱ्या महातणांची (superweed) निर्मिती आणि त्यापायी आणखी जास्त तणनाशकांचा वापर असं हे दुष्टचक्र निर्माण झालं आहे.
  
          ताज्या पाहणीनुसार १९९६ ते २०११ चे दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी राउंडअप रेडी (तणनाशक सहिष्णू) पिके पेरली होती त्यांना इतर (बिगर जी.एम.) पिके पेरणाऱ्यापैकी २४% अधिक तणनाशके वापरावी लागली होती(xv).
            राउंडअप रेडी पिकांचा याच प्रमाणे वापर होत राहिल्यास तणनाशकांचा वापर दरवर्षी २५% वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपला भविष्यकाळ निश्तितच सुखद नसेल. गेल्या १० वर्षात ग्लायफोसेटला न जुमानणाऱ्या १४ नवीन जाती निर्माण झाल्या आहेत(xvi,xvii).
            जी.एम. बियाणे आणि तणनाशके दोन्हीही विकणाऱ्या बायोटेक कंपन्यांनी यावर उपाय म्हणून 2-4 D आणि Dicamba सारखी अधिक विषारी तणनाशके सहन करू शकतील असे बियाणे विकसित करण्याचे सुचविले आहे.
            अशा प्रकारची अधिक जहाल रसायने सहन करू शकतील अशा वाणांना परवानगी मिळाल्यास तणनाशकांचा वापर ५०% ने वाढण्याचा अंदाज आहे(xix).
पर्यावरणीय नुकसान-
            राउंडअप रेडी पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या तणनाशकांचा नैसर्गिक पर्यावरणावर घातक परिणाम होत असल्याचे निष्कर्ष आहेत. उदा. राउंडअप मुळे मिल्कविड मरते, यावर मोनार्क बटरफ्लाय जगतात(xx). मधमाशा आणि त्यासारख्या इतर महत्वाच्या किड्यांवर या तणनाशकांचा आघात होतो(xxi).
            जमिनीसाठी सुद्धा ते नुकसानकारक आहे, जमिनीचे स्वास्थ्य सांभाळणाऱ्या आणि पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्य पुरविणाऱ्या भू-जीवांचा या तणनाशकांमुळे नाश होतो(xxii,xxiii).
            बी.टी. पिकांमध्ये आपोआप कीटकनाशक तयार होण्याचे तंत्र विकसित केले आहे. अशी पिके सुद्धा मित्र किडींसाठी (उदा. Green lecewings, Daphia magna waterflea, ढाल किडे, पाण्यातील किडे) घातक आहेत(xxiv,xxv,xxvi,xxvii).
            बी.टी. विषाबाबत (Toxin) किड्यांमध्ये प्रतिरोध शक्तीसुद्धा निर्माण होत आहे(xxviii). यातून महाकीड (superbug) निर्माण होते, कीटकनाशकांचा वापरही वेगवेगळ्या वेळी वाढवावा लागतो(xxix). इतके असूनसुद्धा अमेरिकेत मका आणि सोयाबीनच्या नवीन B.T. वाणांना मान्यता दिली गेली; लवकरच त्याची लागवड सुरु होईल.
मानवी आरोग्याला धोका-
            जी.एम. पिकांचे अंश आमच्या अन्नसाखळीत सर्वत्र आहेत. अमेरिकेत प्रक्रिया केलेल्या खाद्यवस्तूंपैकी ७०% पदार्थांमध्ये जी.एम. युक्त घटक असल्याचा अंदाज आहे. यात जी. एम. युक्त पशुखाद्य दिल्या जाणाऱ्या प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ धरल्यास हा आकडा बराच वर जाईल.
            राउंडअप पिकांमध्ये ग्लायफोसेट आणि त्याच्या विघटनानंतर तयार होणाऱ्या AMPA चे अंश इतर पिकांपेक्षा अनेक पटींनी अधिक असल्याचे संशोधनाचे निष्कर्ष आहेत(xxx).
            अमेरिकन मातांच्या दूधात, लघवीत आणि पेयजलातसुद्धा ग्लायफोसेटचे अंश आढळले आहेत(xxxi). मातांच्या दुधामधील ग्लायफोसेट चे अंश खूपच जास्त (युरोपमधील पेयजलातील किमान मर्यादेपेक्षा १६०० पटीने अधिक) होते.
            ग्लायफोसेट रसायन हार्मोन्स मध्ये मोडतोड करते त्यामुळे मातेचे दूध आणि पेयजलातून जाणारे ग्लायफोसेटचे अंश बालकांसाठी धोकादायक ठरू शकतात(xxxii).
            नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार हे तणनाशक शुक्राणूंसाठी विषारी आहे(xxxiii).
            बी.टी. विषाचे अंश सुद्धा माता आणि बालकांच्या रक्तात सापडले आहेत(xxxiv).
            जी.एम. खाद्यान्नाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी कोणत्याही चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत; त्याआधीच ते मानवाच्या अन्नसाखळीत आणले गेले. या खाद्यान्नाचे शरीरावर होणारे परिणाम- शरीरात याचे अंश साठणे अथवा प्रवाहित होणे इ.बाबत कोणत्याही सरकारने अथवा जी.एम. खाद्यान्न विकसित करणाऱ्या कंपनीने अध्ययन केलेले नाही.
            जी.एम. खाद्यान्न आणि/अथवा ग्लायफोसेट तणनाशकांच्या प्राण्यांवरील परिणामांबाबतच्या अभ्यासाचे चिंताजनक निष्कर्ष असे आहेत- यकृत, मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवाचे नुकसान, आतड्यातील पेशी आणि सूक्ष्मजीवांचे नुकसान, प्रतिकारशक्ती बाधित होणे, प्रजाननातील अपसामान्यता आणि ट्यूमरसुद्धा.
            या अभ्यासाचे निष्कर्ष, मानवावर होऊ शकणाऱ्या जी.एम. खाद्यान्नाच्या गंभीर परिणामांकडे निर्देश करतात. अगदी आरंभी जेव्हा आमच्या देशाने जी.एम. खाद्यान्न स्वीकारले तेव्हा या परिणामांबाबत पूर्वानुमान करणे शक्य नव्हते. मात्र, ज्यांनी जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायची तेच आजही या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करत आहेत.
            बायोटेक कंपन्यांनी पैसे पुरवून करून घेतलेले कालबाह्य अभ्यास आणि त्यांनी दिलेली अन्य माहिती आमचे नियामक प्रमाण मानतात आणि जी.एम. खाद्यान्नाच्या मानवी आरोग्यावर होऊ शकणाऱ्या परिणामांना नाकारले जाते.
हे विज्ञान नव्हे-
            स्वतंत्र वैज्ञानिकांचे जी.एम. खाद्यान्नाबाबतचे निष्कर्ष आणि कंपन्यांद्वारे प्रकाशित माहिती यात प्रचंड तफावत आहे.
            २०१३ साली जगभरातील ३०० स्वतंत्र वैज्ञानिकांनी जाहीरपणे जी.एम. खाद्यान्नाबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते जी.एम. खाद्यान्नाच्या सुरक्षिततेबाबत एकमत नाही आणि स्वतंत्रपणे केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष गंभीर स्वरूपाचे आहेत(xxxiv).
            स्वतंत्र वैज्ञानिकांना आपले निष्कर्ष जाहीर करणे सोपे नाही; त्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागला. कंपन्यांचे समर्थन करणाऱ्या वैज्ञानिकांनी त्यांची खोटी निंदा केली. संशोधनासाठी निधी नाकारला गेला, काही ठिकाणी त्यांच्या नोकऱ्या आणि भविष्यावर सुद्धा गदा आली(xxxvii).
खाद्य पुरवठ्यावर नियंत्रण-
            आमच्या अनुभवातून लक्षात येते की खाद्यान्नामध्ये जनुकीय अभियांत्रिकी (Genetic engineering) आम जनतेच्या हिताची नाही.
            भुकेची समस्या सोडविण्यासाठी अथवा शेतकरी हितासाठीही ते नाही. ग्राहकांचे सुद्धा हित नाही. यातून खाद्यान्न व्यवस्थेवर खाजगी कंपन्यांचे नियंत्रण मात्र साध्य होईल.
            दैनंदिन जीवन, अन्नसुरक्षा,विज्ञान आणि लोकशाही व्यवस्थेवरसुद्धा या तंत्रज्ञानाचा सखोल परिणाम संभवतो. पर्यावरणस्नेही, शाश्वत शेती व्यवस्थेच्या मुळावरच हे तंत्रज्ञान आघात करणारे आहे. पारदर्शी, स्वास्थ्यवर्धक खाद्यान्न पुरवठा यामुळे बाधित होईल.
            आजमितीस अमेरिकेत बियाण्यांपासून तर आतापर्यंत उत्पादन,वितरण,पणन,सुरक्षा चाचणी,अन्नाचा उपभोग या सर्वांवर मूठभर कंपन्यांचे नियंत्रण आहे. त्यांच्यापैकी अनेकांचे जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानात हितसंबंध गुंतलेले आहेत.
            आधी ते समस्या निर्माण करतात. नंतर ते आपल्याला त्या समस्यांवरील तथाकथित उपाययोजना विकतात, त्यातून नफा कमावला जातो. इतर कोणत्याही व्यापारापेक्षा हा वेगळ्या प्रकारचा व्यापार आहे.
            आपल्या सगळ्यांना भूक लागतेच. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने हा विषय काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे.
आता बोललेच पाहिजे-
            जी.एम. पिकांचे तंत्रज्ञान जोखमी आणि सिद्ध न झालेले आहे. अमेरिकेत या तंत्रज्ञानाचे हानिकारक परिणाम नजरेस येत आहेत.
            जी.एम. पिकांचे एवढे फायदे नाहीत की त्यांच्या दुष्परिणामांकडे डोळेझाक करता येईल. युरोपियन युनियन (EU) ने हे लक्षात घ्यावे. जे अधिकारी ह्या वास्तवाकडे कानाडोळा करतात ते आपल्या कर्तव्यात कसूर करतात. आम्ही अमेरिकनांनी केलेल्या चुकांची आपल्याकडे पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आमचे अनुभव आपल्यापुढे ठेवत आहोत.
            जी.एम. (जनुकीय परिवर्तीत- Genetically modified) पिकांना आपण मान्यता देऊ नये, ज्या पिकांना परवानगी दिली गेली आहे ते पेरू नये, जी.एम. बाधित पशुखाद्य आणि मानवी खाद्यान्नाची आयात आणि/अथवा विक्री नाकारावी.
            कार्पोरेट कंपन्यातर्फे होणारे राजकारण, नियमन (Regulation) आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या ढवळाढवळीबद्दल आपण आवाज उठवावा.
            इंग्लंड (U.K.) आणि युरोपियन युनियन (EU) जी.एम. पिके आणि खाद्यान्नाची नवी बाजारपेठ झाले तर ‘जी.एम. लेबलिंग’ आणि नियमनाची मागणी करणे अशक्य नसले तरी आम्हाला अधिकच कठीण होईल. आमचे प्रयत्न असफल झाले तर युरोप जी.एम. मुक्त ठेवणेही तुम्हाला शक्य होणार नाही.
            आपण एकत्र मिळून-मिसळून काम केल्यास विश्व स्तरावर खाद्य व्यवस्थेचे आपण पुनरुज्जीवन करू शकू. त्यातून स्वस्थ, सुपीक जमीन, स्वस्थ शेती व्यवस्था, आरोग्यदायी भोजन आणि स्वस्थ नागरिक घडतील.

The Ecologist
संदर्भ- (i ते xxxvii)
http://www.theecologist.org/blogs_and_comments/commentators/2632105/living_with_gmos_a_letter_from_america.html
अनुवाद- श्री.वसंत फुटाणे
‘संवाद’ रवाळा
पोस्ट-सातनूर, तहसील-वरुड
जिल्हा-अमरावती
पिन- ४४४९०७
मोबाईल क्र.- ९४२२९५८७६७
अधिक माहितीसाठी :
स्रोत: तन्मय जोशी, tanmay_sj@yahoo.com

आणि तेजश्री कांबळे, tejashri2211@gmail.com