'निर्माणीच्या
नजरेतून' साठी
फोटो धुंडाळताना मुक्ता नावरेकर ला सापडलेले हे दोन फोटो आणि त्यामागची कहाणी ..
“जव्हारला एका गावात गेलो तेव्हा आम्हाला
दारूच्या नशेतल्या एका म्हातारीने पकडलं आणि पैसे मागू लागली (या गावाला पिदाडांचं
म्हणजे दारू पिणार्यांचं गाव म्हणूनच ओळखतात). मग सहज लक्ष गेलं तर तिच्या घरात
एक कुपोषित बाळ दिसलं. चौकशी केल्यावर कळलं की त्या बाळाची आई ३ महिन्यापूर्वी
वारली, ती सुद्धा दारू प्यायची, बाळाचे वडीलही दारू पितात. मग निर्माणच्या काही डॉक्टर मित्रांना (काय
करता येईल ते) विचारलं. त्यांच्या सांगण्यावरून आधी आशा, अंगणवाडी
ताईंना भेटण्याचा प्रयत्न केला. नंतर संजय पाटीलांच्या मदतीने जव्हारच्या सरकारी
दवाखान्यात कळवलं. तिथले डॉक्टर काही सहकार्यांबरोबर गावात गेले तर आजीबाई पुन्हा
दारूच्या नशेत ! तिने एवढी शिवीगाळ केली की त्यांनाही पळ काढावा लागला.
नंतर एकदा तिने त्या बाळाला दवाखान्यात
अॅडमिट केलं खरं, पण काही दिवसानंतर ती पळून घरी आली. मग पुन्हा डॉक्टर
मित्रांच्या सांगण्यावरून बाळाला म्हशीचं दूध सुरु केलं. सुरवातीला स्वतःच नेउन
दिलं, मग तिला पाणी घालून गरम करायला
शिकवण्याचा प्रयत्न केला. तो थोडा यशस्वी झाला. मग गावातलाच गवळी तिला रोज दूध देऊ
लागला. ( मी जव्हारला फक्त ५-६ वेळाच गेले, त्यामुळे फार पिच्छा
करू शकले नाही) शुभदा त्याला महिन्याचे पैसे देऊन ठेवायची. २ महिन्यात बाळाची
तब्येत थोडी सुधारली. दुसऱ्या फोटोत जरा फरक दिसतोय. पण आजीची दारू आणि वडिलांचा
नाकर्तेपणा सुरूच आहे. त्या बाळाची ४-५ वर्षांची बहीण दिवसभर त्याला सांभाळते..
आजी शुद्धीवर असेल तर भात शिजवते. वडील बडबड करतात, आणि
अंगणवाडी ताई कधीच भेटत नाही..”
No comments:
Post a Comment