'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 10 May 2013

सीमोल्लंघन, मे २०१३सौजन्य: अमृता ढगे
(यावेळी एक बदल केलेला आहे. एप्रिल महिन्याच्या बातम्या असल्यामुळे पूर्वी या अंकाला आपण एप्रिलचा अंक म्हटले असते. मात्र मे महिन्यात प्रकाशित होत असल्यामुळे आपण याला मेचा अंक म्हणू (बहुतेक मासिकांसाठी हीच पद्धत वापरली जाते). यापुढेही आपण हीच पद्धत वापरत जाऊ.)

निर्माण, युक्रांद व खेळघरच्या युवकांचा दुष्काळी भागात काम करण्यासाठी बीड मध्ये दौरामहाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने निर्माण, युवक क्रांती दल (युक्रांद) व खेळघरच्या युवांनी बीडच्या शिरूर (कासार) तालुक्याला भेट दिली. ह्या गटाने बीडचे जिल्हाधिकारी श्री. केंद्रेकर तसेच शिरूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम ह्यांच्यासोबत दुष्काळाची परिस्थिती व त्यासाठी कोणते कृतीकार्यक्रम करता येतील याबद्दल चर्चा केली. त्यानुसार सर्वांनी गट करून चारा छावण्यांचे ऑडीट केले. तसेच दुर्गम वाड्या-वस्त्यांमधील लोकांचे प्रश्न समजावून घेऊन ते तहसीलदारापर्यंत पोहोचविले. कामाची मागणी असणाऱ्या गावांतल्या लोकांमध्ये व सरकारी यंत्रणेमध्ये दुवा बनून ह्या गटाने लोकांसाठी काम मिळविण्यात हातभार लावला.
उल्लेखनीय बाब म्हणजे निर्माणच्या सायली तामणे व मकरंद दीक्षितसोबत ह्या गटामध्ये अकरावी-बारावीमध्ये शिकणारी खेळघरची ७ मुलेही सामील झाली होती.

वैभव ढेरे आणि अजिंक्य काळेचे UPSCच्या मुख्य परीक्षेत घवघवीत यश


वैभव ढेरे आणि अजिंक्य काळे (निर्माण २) यांना संघ लोक सेवा आयोगाच्या (UPSC) मुख्य परीक्षेत (२०१२) घवघवीत यश मिळाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार संपूर्ण भारतात वैभवचा ३३५वा तर अजिंक्यचा ५३८वा क्रमांक आला आहे.

अजिंक्य काळे
वैभव ढेरे
मूळचा डॉक्टर असणाऱ्या वैभवला इंटर्नशिप-दरम्यान मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळेत बदल घडवून आणण्यासाठी प्रशासकीय सेवा हे उत्तम माध्यम असल्याचे लक्षात आले. मात्र पदासोबत मिळणारे अधिकार हे एक दुधारी अस्त्र असून त्यांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे असे वैभव सांगतो. अजिंक्यही डॉक्टर असून सिंधुदुर्ग येथे वैद्यकीय अधिकारी असताना सरकारकडे मोठ्या प्रमाणात संसाधने असल्याचे तसेच सरकार अगदी तळागाळात पोहोचल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात लहानसहान गोष्टींवर लोक सरकारवर अवलंबून असल्याने उपलब्ध संसाधनांचा जबाबदारीने वापर करण्याची गरज जाणवली. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून ही जबाबदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे अजिंक्यने ठरवले.
दोघांना कोणत्या सेवेमध्ये योगदान देण्याची संधी मिळेल हे लवकरच कळणार आहे. दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!

शेती, आरोग्य समजून घ्यायचंय? खेळ खेळा...


आदिवासी बालशिक्षणात निखिलेश बागडेचे प्रयोग
निखिलेश बागडे (निर्माण २) याने नुकतेच BAIF या स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमांतर्गत उच्चमाध्यमिक मुलांना अनुभवाधारित व कृतीशील शिक्षण मिळावे यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ८५ आदिवासी शाळांसोबत शिक्षणसामग्री विकसित करण्याचे काम केले. त्याने शेती, आरोग्य, सरकारी योजना, पर्यावरण व व्यक्तिमत्त्व विकास या पाच विषयांचे सर्वसामान्य ज्ञान मुलांना देणारे २२ खेळ (उदा. सापशिडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण शिडी) विकसित करून त्यांची चाचणी घेतली व मुलांमध्ये खेळातून शिक्षणाची पद्धत दृढ केली. या प्रयोगाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या विजय होनकळदकर यांनी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवावे, आदिवासी योजनांचा लाभ कसा घ्यावा, त्या भागातले सर्वसामान्य आजार व त्यांवरची स्थानिक औषधे कोणती इ. माहिती आदिवासी मुलांना सांगता आल्याचे निरीक्षण नोंदवले.
या उपक्रमाअंतर्गतच अन्य एका कार्यक्रमात शेतीची नवनवी तंत्रे वापरून एकाहून अधिक पिके कशी घ्यावीत याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. काही शाळांमध्ये या प्रशिक्षणाला व्यवसायाची जोड देण्यात आली, ज्याअंतर्गत बियाणे विकत घेण्यापासून आपले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकण्यापर्यंतच्या कृतीतून मुलांचे शिक्षण झाले.
या प्रकल्पावर निखिलेश ऑगस्ट २०१० पासून काम करत असून हा प्रकल्प पुढे चालवण्यासाठी BAIF ने शाळांना सुपूर्द केला आहे. नयी तालीम पद्धतीने मुलांच्या सक्षमीकरणाचे प्रयोग करणाऱ्या निखिलेशचे अभिनंदन व त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !

डॉ. रामानंद जाधवला जारावंडीवासियांचा भावपूर्ण निरोप


रामानंद जाधव (निर्माण ४) हा गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी (ता. एटापल्ली) येथील प्राथमिक आरोग्य पथकात गेले एक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. शासकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर करारानुसार एक वर्ष शासकीय सेवा देणे आवश्यक असते. हा करार रामानंदने ३० मार्चला पूर्ण केला. रामानंदने घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे एका महिन्याला बाह्यरुग्ण विभागाला भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या १७८ वरून ९९० पर्यंत वाढली. आपला कार्यकाळ संपवून परतताना जारावंडीच्या गावकऱ्यांनी त्याला भावपूर्ण निरोप दिला. यासाठी त्यांनी २५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला गावातील सामान्य जनतेपासून तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान, महाराष्ट्र पोलीस व इतर सरकारी अधिकारीसुद्धा उपस्थित होते. या सर्वांनीच रामानंदच्या मेहनतीचे कौतुक केले. यावेळी रामानंद याला शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गावकऱ्यांनी स्वखर्चातून सामूहिक जेवणदेखील ठेवले होते. रामानंद पदव्युत्तर शिक्षणाची तयारी करणार असून पुढील प्रवासासाठी त्याला शुभेच्छा!

Thursday, 9 May 2013

गणित-विज्ञानानंतर आता सोशल ऑलिम्पियाड


गणित व विज्ञान ऑलिम्पियाडच्या धर्तीवर शालेय वयोगटातील मुलांना (पाचवी ते नववी) समाजातील प्रश्नांची ओळख व्हावी, त्यांच्याप्रती  संवेदना निर्माण व्हावी तसेच ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी कृती करावी व ह्या सर्वातून त्यांच्यामध्ये सोशल इण्टेलिजन्सची वाढ व्हावी ह्या हेतूने सोशल ऑलिम्पियाड उपक्रम सुरु करण्याचे योजिले जात आहे. MKCL व सर्च ह्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आकार घेणार असून त्याबद्दलचे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी एक बैठक नुकतेच MKCL येथे संपन्न झाली. ह्या उपक्रमांतर्गत मुलांना सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने एक विशिष्ट, नेमका कृतिकार्यक्रम देण्यात येणार असून त्यासाठी त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. ठराविक कालावधी नंतर केलेल्या कामाचे मूल्यमापन करून मुलांच्या गटांना सामुदायिक पुरस्कार देण्यात येणार आहे. ह्या उपक्रमाच्या नावात जरी ऑलिम्पियाड हा शब्द असला तरी स्पर्धेपेक्षा सहकार्यावर भर असणार आहे. तसेच पुरस्कार देखील वैयक्तिक गटाला न देता, मुलांच्या गावाला किंवा शाळेला किंवा त्यांच्या कम्युनिटीला देण्यात येणार आहे.
हा उपक्रमाचा पथदर्शी प्रयोग  जून २०१३ मध्ये सुरु होणार असून ज्यांना ह्या उपक्रमामध्ये पूर्णवेळ/अर्धवेळ सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी त्वरित श्री. उदय पंचपोर (udayp@mkcl.org ) यांच्याशी संपर्क साधावा  व  hrd@mkf.org या पत्त्यावर आपला résumé पाठवावा.

होळी व शिवजयंतीचे औचित्य साधून अमोल लगडचा गावातल्या व्यसनांवर हल्लाबोल


अमोल लगडने (निर्माण ५) त्याच्या गावात अभिनव पद्धतीने होळी व शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम केला. अमोल मूळचा तेलगावचा (जि. बीड, ता. धारूर). सध्या तो  मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून निर्माण ५ चे शिबीर झाल्यानंतर त्याने त्याच्या गावातील दारू दुकानांचे सर्वेक्षण करून गावात दारूवर किती पैसा खर्च होतो याचा शोध घेण्याचे ठरविले. साधारणपणे ४५०० लोकसंख्या असणाऱ्या त्याच्या गावात ७ बार, ६ बिअर शॉपी तसेच एक देशी दारूचे दुकान आहे, तसेच गावात सरासरी ४५ लाख रुपयांची दारू महिन्याला विकली जात असल्याची आकडेवारी त्याच्या सर्वेक्षणातून पुढे आली. गावात व्यसनाधीनतेबद्दल जागृती करण्याची गरज असल्याचे त्याच्या ध्यानी आले.
सुरुवातीलाच होळी व शिवजयंतीचे औचित्य साधून त्याने त्याच्या गावात एक आगळावेगळा प्रयोग केला. तंबाखू, गुटखा इत्यादींच्या पुड्या जाळून होळी साजरी करण्यात आली. शिवजयंतीची सुरुवात सकाळी रक्तदान शिबिराने झाली. १७ ते १८ जणांनी ह्या प्रसंगी रक्तदान केले. रात्री दारू पिऊन धिंगाणा घालण्याऐवजी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ह्याप्रसंगी कीर्तनकार बाईंनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता ह्यावर टीका केली. खुद्द कीर्तनकार बाईंच्या तोंडूनच अंधश्रद्धेवर केलेली टीका ऐकून लोक देखील प्रभावित झाल्याचे निरीक्षण अमोलने नोंदवले.

गजानन फुटके व त्याच्या मित्राची सर्चला औषधांच्या स्वरूपात देणगी


गजानन फुटके (निर्माण ५) MBBS चा विद्यार्थी असून सध्या औरंगाबाद येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. गजाननचा एक मित्र medical representative असून त्याने नुकतीच कंपनी बदलली होती. मात्र जुन्या औषध कंपनीचे अनेक नमुने त्याच्याकडे होते. हे नमुने लोकांच्या कामी यावे या हेतूने गजानन व त्याच्या मित्राने सर्च संस्थेशी संपर्क केला असता त्या औषधांची गरज असल्याचे त्यांना कळले. त्यांनी तातडीने ती १५-१६ प्रकारची औषधे सर्चला देणगी म्हणून पाठवली.

प्रवेश परीक्षांची तयारी आता पळशी(झाशी)त !

प्रताप मारोडे, धनंजय मारोडे व मित्रमंडळींनी आपल्या गावात सुरू केले वाचनालय


प्रताप मारोडे (निर्माण ४), धनंजय मारोडे (निर्माण ५) व मित्रमंडळींनी पळशी(झाशी) (ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) या आपल्या गावात वाचनालय सुरू केले आहे. पळशी(झाशी)त अनेक तरुण मुले पदवीचे शिक्षण घेत असून भविष्यात रोजगार मिळवण्याच्या दृष्टीने अनेक जण पोलीस भरती, PSI-STI प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत. या मुलांना तयारी करण्यासाठी शहरात शिकवण्या लावणे परवडत नसल्याचे प्रताप, धनंजय व मित्रमंडळींच्या लक्षात आले. गावातल्या गावात परीक्षांची तयारी करण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी तसेच गावात वाचनाची आवड लागावी यासाठी त्यांनी वाचनालय सुरू केले. अनुदानाअभावी गावातल्या लोकांनी काही पैसे वाचनालयासाठी दिले. उरलेले पैसे जमा करणे तसेच वाचनालय चालवण्याची जबाबदारी मित्रमंडळींनी घेतली. २३ मार्च रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय सुरू झाले असून आज या वाचनालयात २५० पुस्तके व नियमित येणारी वर्तमानपत्रे वाचनासाठी उपलब्ध आहेत. पळशी(झाशी) मध्ये अभ्यास व वाचनाची सोय काचही प्रमाणात झाली असली तरी ती अजूनही पुरेशी नाही. पुस्तके किंवा देणगीरूपात वाचनालयास मदत करण्यासाठी संपर्क साधा (प्रताप मारोडे, pratapmarode@gmail.com ).

अश्विन पावडेचा Science for Society सोबत प्रवास सुरू


अश्विन पावडे (निर्माण ३) हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर. शाश्वत व अपारंपरिक उर्जा ह्या त्याच्या आवडीच्या विषयावर त्याने मागील वर्षभर Nimbkar Agricultural Research Institute येथे संशोधनाचे काम केले. मागील तीन महिन्यांपासून अश्विनने त्याच्या मित्रांसोबत ‘Science for Society’ (S4S) ह्या कंपनीत अपारंपरिक उर्जेसंबंधी संशोधनाचे काम सुरु केले आहे. सध्या ह्या कंपनीकडील तीन मुख्य प्रकल्प, १- सोलर फूड ड्रायर (सौर उर्जेचा खाद्यपदार्थ वाळविण्यासाठी वापर), २- सोलार ग्रेन ड्रायर (सौर उर्जेचा धान्य वाळविण्यासाठी वापर), ३- अल्ट्रा हेल्थ (हस्तचलित पाणी शुद्धीकरण यंत्र), यामध्ये अश्विन मुख्यत्वे पायलट टेस्टिंग व ऑप्टिमायाझेशनची जबाबदारी सांभाळणार आहे. अश्विनला त्याच्या नवीन कामासाठी शुभेच्छा!

बीजोत्सावाला निर्माणींचा भरभरून प्रतिसाद


सुरक्षित अन्न, जैवविविधता आणि संतुलित पर्यावरण हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून नुकताच नागपूर येथे बीजोत्सव संपन्न झाला. परंपरागत बियाणे काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेलं असतं. त्यात जैवविविधता, विपरीत परिस्थितीत टिकाव धरण्याची क्षमता असते. संकरित आणि जनुकीय परावर्तित (GM) बियाण्यांच्या रेट्यात परंपरागत बियाण्यांच्या अनेक जाती नष्ट झाल्या असताना उरल्यासुरल्या दुर्मिळ जाती शोधून काढण्याचे काम अनेकजण निष्ठेने करत आहेत. अशा लोकांचे अनुभव व बियाण्याचे आदानप्रदान हा बीजोत्सावाचा प्रमुख उद्देश होता. उद्घाटनात डॉ. तारक काटेंनी संकरित व GM बियाण्यांच्या पार्श्वभूमीवर बीज स्वायत्ततेपासून बीज गुलामीकडेआपला प्रवास कसा झाला याची मांडणी केली. आपल्या सर्वांना परिचित असणाऱ्या संजय पाटलांनी त्यांच्या परंपरागत बियाण्यांच्या संवर्धनाच्या अनुभावाधारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेंद्रीय शेतीच्या प्रयोगशील शेतकऱ्यांनीही आपले अनुभव येथे कथन केले. बीजोत्सवाच्या आयोजनात परीक्षा उंबरठ्यावर असतानाही प्रसिद्धी, नोंदणी, पाहुण्यांची व्यवस्था, वक्त्यांची ओळख, शेतकऱ्यांचा सत्कार इ. कामांत नागपूरच्या निर्माण गटाने मोलाची भूमिका बजावली. बीजोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक निर्माणींनी सहभाग नोंदवला. नंदा काकांच्या मार्गदर्शनाखाली कोरडवाहू गटाच्या या निमित्ताने बैठकी झाल्या. गेल्या ६ महिन्यांत या गटातल्या मुलांनी केलेली शेतीसंदर्भातील कृती-वाचन-अभ्यास, आलेल्या अडचणी, पुढील कामाचे नियोजन याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. तन्मय जोशीने समन्वयकाची भूमिका पार पाडली.

कोरडवाहू गटाची वर्ध्यातील शेतीसंबंधित संस्थांना भेट


बीजोत्सवाच्या निमित्ताने नागपूरला आलेल्या कोरडवाहू गटाने व इतर निर्माणींनी वर्ध्याच्या चेतना विकास आणि ग्राम सेवा मंडळ या संस्थांना भेट दिली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर अडीच एकरमध्ये सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याचे स्वावलंबन व नगदी पिकांद्वारे अर्थार्जन कसे करता येईल याचे मॉडेल चेतना विकासने विकसित केले आहे. श्री. अशोक बंग आणि श्रीमती निरंजना मारू यांनी या मॉडेलमागची विचारधारा आणि शेतीची आजची परिस्थिती याबद्दल गटाशी संवाद साधला. नेमक्या मोजमापाच्या आधारे संशोधन या पद्धतीने चेतना विकासमध्ये कोरडवाहू व ओलिताची शेती तसेच फळबागांवर संशोधन सुरू आहे.
ग्रामीण विकासाच्या दृष्टीने संशोधन करण्यासाठी स्थापन झालेल्या ग्राम सेवा मंडळाला या गटाने भेट दिली. गोशाळा, शेती व वर्कशॉप ही संस्थेची प्रमुख अंगे आहेत. त्यापैकी वर्कशॉपला भेट देऊन या गटाने काळाला सुसंगत चरखे बनवणे, सूत कांतून त्याचे कापड विणणे, तेलबियांपासून तेल काढणे इ. प्रक्रिया समजून घेतल्या.
या गटाने धरामित्रच्या डॉ. तारक काटे यांची भेट घेतली. तारक काटेंनी त्यांचा व्यक्तिगत व धरामित्रचा प्रवास सर्वांना सांगितला. त्यातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर रासायनिक शेतीत सेंद्रीय शेतीपेक्षा उत्पादन जास्त असले तरी उत्पन्न कमी आहे हे आकडेवारीच्या आधारे ते संस्थेशी संलग्न शेतकऱ्यांना पटवून देऊ शकले व त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवू शकले.

पुणे-नगरच्या तीन संस्थांना अश्विन भोंडवेची भेट


            सामाजिक काम करण्याची इच्छा तर आहे, पण कसे करावे हा प्रश्न आहे. आपल्या आधी बऱ्याचजणांनी अशा कामाला हात घातलेला आहे. हे काम कसे उभे राहिले, कोणत्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागले, सध्या त्यांच्यासमोरील आव्हाने काय आहेत, आपण निर्माणी त्यांना काही मदत करु शकतो का किंवा ते आपल्याला काही मदत करु शकतील का अशा विविध उद्देशांनी मी (अश्विन भोंडवे, निर्माण ३) पुढील तीन संस्थांना अभ्यास भेटी दिल्या.

विज्ञान आश्रम (पाबळ): डॉ. कालबाग यांचे शिक्षणातून ग्रामविकासहे ध्येय समोर ठेऊन संस्था कार्यरत आहे. ग्रामीण भागातील लोकांना ग्रामीण भागात कार्य करण्याचे कौशल्य आणि संधी नयी तालीम पद्धतीने प्राप्त व्हावी असा त्यांचा प्रयत्न आहे. आश्रमामध्ये विद्यार्थी प्रामुख्याने १. शेती व पशुपालन २. आरोग्य आणि गृह ३. अभियांत्रिकी  ४.ऊर्जा या चार क्षेत्राशी संबंधित कौशल्य आणि ज्ञान प्रत्यक्ष काम करुन मिळवत असतात. सध्या श्री. योगेश कुलकर्णी या प्रकल्पाचे संचालन करतात. महेश लादे हा निर्माणीदेखील तिथे काम करत आहे.

शाश्वत (मंचर): धरणाला विरोध करण्यासोबतच धरणग्रस्तांना विविध पद्धतीने मदत करणे हीदेखील एक विकासाची पद्धत
असू शकते. या पद्धतीचा स्वीकार करुन श्री. आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक अंबेगाव तालुक्यात काम करत आहेत. डिंभे धरणाची निर्मिती झाल्यानंतर तेथील आदिवासी लोकांचे झालेले विस्थापन व अन्य समोर येतील त्या समस्यांचे समाधान शोधणे असा कार्यामागचा प्रामुख्याने दृष्टीकोन आहे. प्रामुख्याने जगण्यासाठी अर्थार्जन कसे करता येइल याचा शोध घेत सर्वांच्या सहभागाने मत्स्योत्पादन, ‘पडकईपद्धतीने डोंगरावर शेती, ‘गाळपेरपद्धतीने धरणाचे पाणी कमी झाल्यावर शेती इ. पद्धती विकसित केल्या आहेत.

स्नेहालय (अहमदनगर): श्री. गिरीश कुलकर्णी यांच्या संवेदनशीलतेतून सुरु झालेले हे कार्य. स्नेहालय प्रामुख्याने अनाथ, वेश्या व्यवसायाची पार्श्वभूमी असणाऱ्या मुला-मुलींचे शिक्षण, रोजगार, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे यावर काम करते.
तिन्ही संस्थांमध्ये विविध क्षेत्रातील चांगल्या लोकांची गरज आहे. (उदा. आरोग्य, अभियंत्रिकी, शिक्षण इ.) ज्या निर्माणींना योगदान देण्याची इच्छा आहे, त्यांनी जरुर संपर्क साधावा.
यादरम्यान मला औरंगाबाद, पुणे येथील निर्माणींना भेटण्याचीदेखील संधी मिळाली.
अश्विन भोंडवे

निखिल जोशी, वेंकटेश अय्यर यांच्या कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर येथे अभ्यासभेटी

नुकतेच वेंकटेश अय्यर व मी (निखिल जोशी, निर्माण ४) कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली व लातूर येथील सामाजिक समस्यांवर काम करणाऱ्या संस्था/व्यक्ती व त्या त्या भागातील निर्माणींना भेट दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अभयारण्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर बॉक्साईट खाणींविरुद्ध शास्त्रीय अभ्यास आणि जनजागृतीच्या आधारे कायदेशीर लढाई देऊन त्या खाणी बंद करायला लावणाऱ्या वनस्पतीतज्ञ डॉ. बाचूळकरांनी त्यांच्या लढ्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली. बाचूळकर सर व त्यांच्या काही सहकाऱ्यांकडून त्यांच्या निसर्गमित्रया संस्थेचे कार्य समजून घेता आले. निसर्गमित्र कोल्हापूरमधील शाळकरी मुलांचे पर्यावरण शिक्षण व शहरात पर्यावरणपूरक
उपक्रम राबवण्याचे काम करत आहे. आम्ही कोल्हापुरात अपंगांचे वसतीगृह चालवणाऱ्या Helpers of the Handicapped या संस्थेला भेट देऊन त्यांचे कार्य समजून घेतले. अपंग मुलांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने (रोजच्या कामांत व आर्थिकदृष्ट्या) प्रशिक्षण, त्यांचे आरोग्य व सर्वसामान्य मुलांच्या शाळेतच त्यांचे शिक्षण या पैलूंवर ही संस्था काम करत आहे. (अधिक माहितीसाठी: http://www.hohk.org.in/) कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात लॉरी बेकर यांच्यापासून प्रेरणा घेवून काम करणारे वास्तुविशारद धनंजय वैद्य यांची आम्ही भेट घेतली. गावापासून १० किमी परिसरात मिळणाऱ्या साहित्याचा वापर करून घरे बांधणे व सेंद्रीय शेती यांच्या माध्यमातून आजच्या विकासाला निसर्गगामी पर्याय शोधण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
त्यानंतर पश्चिम घाट उतरून सिंधुदुर्ग जिल्ह्या-तील झाराप येथे (ता. कुडाळ) ग्रामविकासाचे काम करणाऱ्या डॉ. प्रसाद देवधर यांनी सुरू केलेल्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला आम्ही भेट दिली. बेसलाईन सर्व्हेद्वारे गावातील गरजा समजून घेणे, काही काळ काही प्रमाणात अर्थसहाय्य करून विकासाची कामे करणे व गाव स्वयंपूर्ण झाल्यानंतर ही कामे गावाच्याच हाती सुपूर्द करणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. Biogas च्या प्रसारात त्यांचे मोठे योगदान असून ४० खेड्यांमध्ये ३००० biogas त्यांनी बसवलेले आहेत. (http://www.bhagirathgram.org/) यानंतर आम्ही सुहास शिगम (निर्माण ४) सोबत जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाविरुद्ध लढा देणाऱ्या प्रवीण गवाणकरांना भेटून आंदोलनकर्त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला.
लातूरजवळील सेवालयया संस्थेला भेट देण्याची आम्हाला संधी मिळाली. सेवालय HIV बाधित मुलांसाठी वसतीगृह चालवत असून त्यांचे आरोग्य व शिक्षण या पैलूंवर मुख्यतः काम करत आहे. आरोग्याच्या नाजूक स्थितीसोबातच मुलांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिक्षण देताना गावकऱ्यांकडून अस्वीकार व हेटाळणी अशा गंभीर अडचणी असतानाही ही संस्था खंबीरपणे आपले काम करत आहे. (http://sevalay.weebly.com/) यानंतर दुष्काळ व हवामानबदल या विषयांवर अभ्यास असणारे लातूरचे पत्रकार श्री. अतुल देऊळगावकर यांची आम्ही भेट घेतली. आहे.
या अभ्यासदौऱ्यात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व लातूरचे निर्माणी व त्यांच्या स्थानिक गटासोबतही आमची भेट झाली. कोल्हापुरात ओसंडून वाहणाऱ्या टाक्या तर लातूरला सामूहिक बोअरवेल समोर पाण्याची वाट पाहत कळशांची रांग, कोल्हापुरात सर्वत्र सिंचनाच्या सहाय्याने घेतला जाणारा ऊस तर लातूरला दूरवरची ओसाड माळराने असा विरोधाभास यावेळी ठळकपणे दिसून आला.
निखिल जोशी

श्रम ही है श्रीराम हमारा


निर्माणचे ५चे तरुण डॉक्टर्स कुलभूषण मोरे, भूषण देव, देवल सावरकर, अनिकेत पवार, अरुंधती उपरे व मित्रमंडळींनी नुकतीच आनंदवनला भेट दिली. बाबा आमटेंनी १९४९ साली मुख्यतः कुष्ठरोगी आणि अपंगांच्या पुनर्वसनासाठी सुरू केलेले आनंदवन ही आज ३५०० कुष्ठरोगी, अपंग, अनाथ, वृद्ध व आदिवासींच्या श्रमांतून फुललेली वसाहत आहे. शारीरिक व्यंग  असतानाही त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी सुरू केलेल्या अनेक लघुउद्योगात त्यांचे कौशल्य पाहण्याची संधी आपल्या डॉक्टर मित्रांना मिळाली. या गटाने डॉ. विकास व डॉ. भारती आमटे यांच्याकडून आनंदवनचा प्रवास व त्यामागची विचारधारा समजून घेतली. (अधिक माहितीसाठी: http://anandwan.in/ )

बी. जे. मेडिकलच्या मुलांनी जेनेरिक औषधांबद्दल समजून घेण्यासाठी घेतली डॉ. अनंत फडकेंची भेट


बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये प्रजासत्ताक दिना-निमित्त समाजासाठी महत्वपूर्ण असलेल्या वैद्यकीय शाखेशी निगडीत विषयांवर व्याख्यानमालिकेचे आयोजन करण्यात आले होते. ह्याचदरम्यान डॉ. अनंत फडके ह्यांच्याशी झालेल्या चर्चेतून 'जेनेरिक औषधे' हा विषय पुढे आला. त्याचवेळी कोर्टात सुरु असलेल्या नोव्हार्टिस प्रकरणामुळे ह्या विषयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यानुसार जेनेरिक औषधे ह्या विषयावर मुलांची डॉ. फडकेंसोबत सखोल चर्चा झाली. डॉ. फडके हे लोकायतह्या संस्थेमार्फत जेनेरिक औषधांबद्दल जागृती करत असून त्यांचा ह्या विषयावर सखोल अभ्यास आहे. ह्या चर्चेमध्ये समोर आलेले काही मुद्दे असे -
१.      भारतामधील फार्मा कंपन्या औषधांवर ४० ते ५० पट नफा कमावतात. त्यामुळे सामान्य जनतेला औषधे परवडत नाहीत. भारतातील औषध कंपन्या नगण्य रिसर्च करतात, तरीसुद्धा औषधे अत्यंत महाग विकतात.
२.      तामिळनाडू मध्ये सर्व सरकारी संस्थांमध्ये जेनेरिक औषधे वापरली जातात. हे इतर राज्यात देखील लागू करता येईल.  
३.      प्रोडक्ट पेटंट कायदा २००५ व त्याचे दुष्परिणाम ह्यावर देखील ह्याप्रसंगी चर्चा झाली. ह्या चर्चेत निर्माणचे  श्रेणिक लोढा, कौस्तुभ प्रभुदेसाई, संतोष, निकिता, उदय इत्यादी हजार होते.

का बरं फुगते पोळी?


वर्ध्यातील निर्माणींची नऊ जणांची आमची टीम ४ एप्रिल २०१३ रोजी आनंद निकेतन या नयी तालीमच्या तत्वांवर चालणाऱ्या शाळेच्या संचालिका आणि मुख्याध्यापिका सुषमा शर्मायांना भेटली. त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमधून जगणं आणि शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी नसून परस्परपूरक कशा आहेत याची जाणीव आम्हाला झाली. उदाहरणार्थ आपण रोज जेवतो. पोळी-भाजी खातो. ही पोळी तव्यावर टाकली की फुगते कशी? या पोळीच्या फुगण्याच शास्त्रीय कारण पोळी बनवायला शिकतानाच समजून घ्यायचं..
तर अशी ही पहिली ते पाचवी पर्यंतच्या मुलांची शाळा निसर्गासोबत राहून तन, मन आणि बुद्धीचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करते. (या शाळेच्या अधिक माहितीसाठी - http://www.nayeetaleem.org ). सुषमाताईंबरोबर झालेली ही भेट आम्हाला अंतर्मुख करून गेली. आपल्या गरजा, सामाजिक जाणीवा, निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या गोष्टींकडे त्रयस्थपणे न पाहता रोजच्या जगण्यातून यावर उत्तरे शोधण्याची प्रेरणा देवून गेली.
खरोखरच.. का बर फुगते पोळी? मी बनवली तरी फुगेल का? चला करके देखो.. अहं.. करके सिखो..
कल्याणी राउत

सृष्टीत...दृष्टीत...मला आता सगळं कळतंहे मी बौद्धीक आणि नैतिक भ्रष्टतेचे लक्षण मानतो. महावीरांच्या बाबतीत एक किस्सा सांगतात. महावीर त्यांच्या प्रत्येक प्रवचनात कदाचितहा शब्द फार वापरायचे. उदा. असे केले तर कदाचित तुला हे कळेल. ज्ञानप्राप्ती झालेला हा एवढा थोर अध्यात्मिक नेता त्याच्या ज्ञान किंवा अनुभवाविषयी इतका लवचिक होता. मला एवढेच माहित आहे. यापलीकडे नक्कीच अनेक गोष्टी असू शकतात. असे महावीर नम्रपणे लोकांना सांगत होते.
बाह्य सृष्टी आणि आतली दृष्टी! सृष्टी दृष्टीला घडवते की दृष्टी सृष्टीला ह्याचा शोध घेत घेत माणसाने मोठ्ठं तत्वज्ञान (Mind vs. Matter) उभे केले आहे. सुरुवातीला सृष्टी माणसाच्या दृष्टीवर नक्कीच वर्चस्व गाजवत असते. भोवतालच्या व्यक्ती आणि वास्तव त्याच्या जाणीवा घडवत असतात. पण माणसाचा विवेक जागृत झाल्यावर सृष्टीचा प्रभाव ओसरतो आणि तो निकोप दृष्टीने सृष्टीकडे बघायला लागतो. मग दृष्टी सृष्टीला प्रभावित करायला, बदलायला लागते. 
माझ्या आजूबाजूला अत्यंत भणंग, अमानवी अवस्थेत जगणार्या  समाजातल्या वंचित, शोषित घटकासाठी मी काहीतरी केले पाहिजे ह्या तारुण्यसुलभ उर्मीतून मी पाच वर्षांपूर्वी सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. त्या निर्णयामागे वैचारिक स्पष्टतेपेक्षा भावनिक उर्जा जास्त होती असे आता जाणवते. अर्थात त्यावेळी भावनांचीच गरज जास्त होती. कारण काही कठीण निर्णय घ्यायचे होते. विचार बाळबोध असले आणि पद्धती माहिती नसल्या तरी उद्देश्य डोक्यात पक्का होता – “हे बदलायचं आहे”.
मी सामाजिक क्षेत्रात प्रवेश करण्याचे कळीचे निमित्त झाले ते निर्माण प्रक्रिया. निर्माण प्रक्रियेने समाजातल्या प्रश्नांना बघण्याची, भिडण्याची एक दृष्टी त्यावेळी दिली. त्या दृष्टीत जसा एक ठोस विचार होता तसा प्रेमळ ओलावा सुद्धा होता. ज्येष्ठांनी कठीण विचार दिला पण मोठ्या प्रेमाने. निर्माण मधील मित्रांची प्रेमळ साथ फारच पक्की होती. शिवाय सोबतीला जगावेगळी स्वप्ने होती. त्यामुळे निर्णय घ्यायला फार वेळ आणि त्रास झाला नाही.
मागील पाच वर्षांच्या प्रवासाचे तीन टप्पे सांगता येतील - गडचिरोलीत सर्च संस्थेसोबत सव्वा दोन वर्षांचा पहिला टप्पा. मग नाशिक येथे प्रगती अभियान संस्थेसोबत एक वर्ष आणि मुंबईतील टीआयएसएस या कॉलेजात दोन वर्षे. या तीनही टप्प्यांना जोडणारा एक धागा होता रोजगार हमी योजनेची (NREGA) अंमलबजावणी सुधारणेचे  काम.   
जग घडवण्याचं-बदलण्याचं काम नेते (leaders) करतात. फार थोडे जाणीवपूर्वक नेत्यांचा मार्ग अनुसरतात. त्यात अधिक सुधारणा करतात आणि हातभार लावतात. उरलेले बाकी सगळे मेंढरं असतात. सर्चचे नेतृत्व विचारांनी गांधीवादी. लोकांकडे जा. त्यांना स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करा. राज्यसंस्थेवर अवलंबून राहू नका. (गांधीजींना राज्यसत्ता मान्यच नव्हती)”. अशी नेतृत्वाची दृष्टी. तशीच सर्चची कार्यपद्धतीची सृष्टी निश्चित झालेली. प्रगती अभियानचे नेतृत्व विचारांनी सुधारणावादी (liberal). लोकशाही चौकटीतील राज्यसंस्थेचे अस्तित्व मान्य असणारे. एकीकडे लोकांना स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम करत त्यांना लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी सुद्धा सक्षम करा. लोकांचे प्रश्न निर्माण करण्यात राज्यसंस्थेचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे ते सोडवण्यासाठी राज्यसंस्थेसोबत, रचनात्मक आणि संघर्षात्मक दोन्ही प्रकारे, काम करण्याला पर्याय नाही. शिवाय ज्या स्केलवर लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे ते काम खाजगी क्षेत्र किंवा एनजीओ करु शकत नाही.अशी प्रगती अभियानची दृष्टी आणि त्यातनंच संस्थेची कार्यपद्धती आकारास आलेली.         
रोजगार हमीच्या प्रश्नावर काम करतांना त्या त्या टप्प्यावर ह्या दोन्ही दृष्टीकोनांचा माझ्यावर मोठा प्रभाव होता. या दोन संस्थांच्या नेतृत्वाने आणि कार्यपद्धतीने रोजगार हमीच्या प्रश्नाला अभ्यासण्याचा आणि भिडण्याच्या माझ्या दृष्टीला नक्कीच प्रभावित केले. पण मला काम करतांना कधी पूरक तर कधी विरोधी अनुभव येत गेले. शिवाय याहून वेगळ्या दृष्टी असलेल्या इतर अनेक व्यक्ती आणि शासकीय/अशासकीय संस्थांचा कामानिमित्त अधिक परिचय झाला.      
कामात फार गुंतण्याचा एक धोका असतो, त्याकडे तटस्थपणे न बघता येण्याचा. मी टीआयएसएस मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी गेलो. तिथे माझ्याकडे तसे काम कमी होते. त्यामुळे तटस्थपणा जास्त होता. तिथे जाऊन कळायला लागलं की निरनिराळ्या विचारधारा (Ideology) माणसाच्या दृष्टीला घडवतात किंवा बिघडवतात. सामाजिक प्रश्नांना अभ्यासण्याच्या, भिडण्याच्या पद्धती विचारधारेतनं येतात. यातल्या प्रत्येक विचारधारेची कार्यपद्धती वेगळी. उद्दिष्टे मात्र जवळपास समान माणसाच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानाची. पण तरीही एकमेकांविषयी कमालीची असहिष्णूता भरलेली. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची तीच पूर्वग्रहदूषित दृष्टी.
मला आता सगळं कळतंहे मी बौद्धीक आणि नैतिक भ्रष्टतेचे लक्षण मानतो. महावीरांच्या बाबतीत एक किस्सा सांगतात. महावीर त्यांच्या प्रत्येक प्रवचनात कदाचितहा शब्द फार वापरायचे. उदा. असे केले तर कदाचित तुला हे कळेल. ज्ञानप्राप्ती झालेला हा एवढा थोर अध्यात्मिक नेता त्याच्या ज्ञान किंवा अनुभवाविषयी इतका लवचिक होता. मला एवढेच माहित आहे. यापलीकडे नक्कीच अनेक गोष्टी असू शकतात. असे महावीर नम्रपणे लोकांना सांगत होते.
गांधीवादी, समाजवादी, भांडवलवादी, आंबेडकरवादी, स्त्रीवादी, माओवादी, सुधारणावादी, क्रांतीवादी, वगैरे अशी सगळीच मंडळी विकासाच्या प्रश्नांबाबत आपापले दावे करत असतात. या प्रत्येकाच्या बोलण्यात काही तथ्य आहे पण ते अपूरे आहे. प्रत्येकजण आपापल्या सोयीचा पुरावा निवडत आणि दाखवत असतो. प्रत्येकाची विचारधारा ही त्यांच्यासाठी देव बनली आहे, ज्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्याची गरज नाही. असलीच तर ते सोयीचा पुरावा गोळा करतात किंवा सांगतात. ही तर वैचारिक गुलामी झाली. असे गुलाम मला विद्यापीठांमध्ये दिसतात आणि सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा भेटतात. ते जसे समवयीन असतात तसे ज्येष्ठ सुद्धा असतात. ज्येष्ठांकडे जसे ज्ञान आणि अनुभव असतो तशी झापडं सुद्धा असतात.
विकासाचे प्रश्न फार गुंतागुंतीचे आहेत. त्यांचे अतिसुलभिकरण (over-simplification) करुन चालणार नाही. विकासाच्या परस्पर विरोधी कल्पना किंवा मतप्रवाहांच्या जंजाळात आपण हरवून जाऊ नये म्हणून स्वतंत्र आणि पूर्वग्रहरहीत दृष्टीची गरज आहे. स्वतंत्र, पूर्वग्रहरहीत दृष्टीने सृष्टीला बघण्यासाठी, बदलण्यासाठी नीरक्षीर विवेक अंगी बाणवता आला पाहिजे. त्यासाठी बुद्धीला शास्रकाट्याची धार आलीच पाहिजेत. विकासाच्या प्रश्नांकडे बघण्याची आपली दृष्टी शास्त्रीय असली पाहिजे. टीआयएसएस मध्ये असतांना माझ्यासोबत सर्वोत्तम काही घडले असेल तर ते म्हणजे सामाजिक शास्त्रांचा आणि विवेकनिष्ठ मानसशास्त्राचा परिचय. विकासाच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी, भिडण्यासाठी मला आता सामाजिक शास्त्रे मदत करतात तर माणसांना समजून घेण्यासाठी विवेकनिष्ठ मानसशास्त्र उपयोगी पडते.
थोडक्यात सांगायचे तर विकासाच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची नितांत गरज आहे असे मला वाटते. एक, समस्यांकडे बघण्याची स्वतंत्र, व्यापक दृष्टी (perspective) आणि दोन, क्षमता बांधणी (Knowledge and skills). आपले प्रयत्न योग्य दिशेने
आहेत ना ते तपासण्यासाठी व्यापक दृष्टी हवी आणि त्या दिशेने जोमाने पुढे जाण्यासाठी विशिष्ट विषयातील ज्ञान आणि कौशल्ये हवी.

(प्रस्तृत लिखाणाचा उद्देश सामाजिक क्षेत्रातील माझ्या ५ वर्षांतील अनुभवांची/शिक्षणाची सविस्तर मांडणी करणे नसून आपण सामाजिक प्रश्नांना काय दृष्टीने बघतो हे अधोरेखीत करणे असा आहे. विकासाच्या प्रश्नांना बघण्याची आपली दृष्टी कुठून येते? कशी बनते? ती स्वतंत्र, वस्तुनिष्ठ आणि पूर्वग्रहरहित आहे का? की पोथीनिष्ठ आहे, भाड्याने घेतली आहे? अशा प्रश्नांची छानणी काही व्यक्तिगत अनुभवांमधून करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.)
गोपाल महाजन