अमोल लगडने (निर्माण ५) त्याच्या गावात अभिनव पद्धतीने होळी
व शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम केला. अमोल मूळचा तेलगावचा (जि. बीड, ता. धारूर). सध्या तो
मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून निर्माण ५ चे शिबीर झाल्यानंतर त्याने
त्याच्या गावातील दारू दुकानांचे सर्वेक्षण करून गावात दारूवर किती पैसा खर्च होतो
याचा शोध घेण्याचे ठरविले. साधारणपणे ४५०० लोकसंख्या असणाऱ्या त्याच्या गावात ७
बार,
६ बिअर शॉपी तसेच एक देशी दारूचे दुकान आहे, तसेच गावात सरासरी ४५ लाख रुपयांची दारू महिन्याला विकली
जात असल्याची आकडेवारी त्याच्या सर्वेक्षणातून पुढे आली. गावात व्यसनाधीनतेबद्दल
जागृती करण्याची गरज असल्याचे त्याच्या ध्यानी आले.
सुरुवातीलाच होळी व शिवजयंतीचे औचित्य साधून त्याने
त्याच्या गावात एक आगळावेगळा प्रयोग केला. तंबाखू, गुटखा इत्यादींच्या पुड्या जाळून होळी साजरी करण्यात आली.
शिवजयंतीची सुरुवात सकाळी रक्तदान शिबिराने झाली. १७ ते १८ जणांनी ह्या प्रसंगी
रक्तदान केले. रात्री दारू पिऊन धिंगाणा घालण्याऐवजी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले
होते. ह्याप्रसंगी कीर्तनकार बाईंनी अंधश्रद्धा, व्यसनाधीनता ह्यावर टीका केली. खुद्द कीर्तनकार बाईंच्या
तोंडूनच अंधश्रद्धेवर केलेली टीका ऐकून लोक देखील प्रभावित झाल्याचे निरीक्षण
अमोलने नोंदवले.
No comments:
Post a Comment