सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
समाजात असंख्य प्रश्न आहेत. काळानुरूप हे प्रश्न बदलतात,
उत्क्रांत होतात, नव्याने उत्पन्न होतात. आणि त्या प्रश्नांना भिडण्याचा ध्यास,
वृत्ती आणि कृती प्रत्येक काळात दिसतेच. माणूस समुहात राहत असल्याने दुसऱ्या
माणसांबद्दल किंवा निसर्गाबद्दल सहवेदना ही निसर्गानेच त्याला दिलेली देणगी आहे. ह्या
दृष्टीकोनातून समाजातील प्रश्न, विषमता, अन्याय, नैतिक ऱ्हास यांविरुद्ध केलेली
प्रत्येक कृती हे माणसाचं जीवशास्त्रीय कर्तव्य (बायोलॉजीकल ड्युटी) आहे.
नव्या वर्षात मी माझे जीवशास्त्रीय कर्तव्य पार पडण्यासाठी
काय पाऊले उचलली किंवा उचलणार याची आपण सर्वजण नोंद घेऊया. ह्या अंकात अशाच काही
जीवांच्या कर्तव्याच्या कहाण्या घेऊन आलो आहोत. तुम्हाला त्या कशा वाटल्या हे
आम्हाला नक्की कळवत चला.
नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आरोग्यदायी, आनंदी आणि अर्थपूर्ण
जावो!
निर्माण ९ निवड प्रक्रिया
सामाजिक प्रश्नांवर काम करू इच्छिणाऱ्या तरुणांची नवी फळी
तयार करण्याहेतू गेले काही महिने महाराष्ट्रात निर्माण ९ शिबीरमालिकेची
निवडप्रक्रिया जोरात सुरु होती. ह्या वर्षी निर्माण ९ साठी तब्बल ९२२ अर्ज
महाराष्ट्रातून आणि राज्याबाहेरून आले. आतापर्यंत आलेले हे सर्वाधिक अर्ज आहेत.
महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यातून ८० पेक्षा अधिक अर्ज ह्या वर्षी आले, ज्यात एम्स
दिल्ली, एम्स रायपुर, आयआयटी मद्रास, आयआयटी वाराणसी, आयआयएम इंदौर, आयसर भोपाल
अशा राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांतील युवांचा समावेश आहे.
अर्जछाननी आणि मुलाखतींच्या प्रक्रियेतून जाऊन निर्माण ९
ह्या शिबीरमालिकेसाठी २०६ युवांची निवड करण्यात आली आहे, ज्यात मागच्या वर्षीच्या
११ जणांचाही समावेश आहे. ह्या वर्षीच्या निवडप्रक्रियेतही पुढच्या शिबीरमालिकेसाठी
निर्माण १० साठी १६ युवांची आगाऊ निवड करण्यात आली आहे. निवडप्रक्रियेसाठी निर्माण
टीमचे महाराष्ट्रभर फिरणे झाले, तेव्हा बऱ्याच निर्माणींना आणि त्यांच्या
कुटुंबियांना भेटता आले.
निर्माण ९ निवडप्रक्रियेसाठी प्रत्यक्ष आणि
अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचे आभार!
निर्माण ९.१ अ शिबीर
निर्माण ९ शिबीरमालिकेतील ‘अ’ गटाचे
पहिले शिबीर २६ डिसेंबर, २०१८ ते ३ जानेवारी, २०१९
या दरम्यान शोधग्रामला पार पडले. “तारुण्यभान ते समाजभान” अशी थीम असलेल्या
निर्माण ९.१ अ शिबिरात एकूण ५३ शिबिरार्थी सहभागी झाले होते.
- स्वतःच्या
लैंगिकतेविषयी, भावनांविषयी, मूल्यांविषयी, प्रेरणांविषयी, स्वप्नांविषयी
निरोगी समज तयार होणे.
- ‘स्व’चा
विस्तार – स्वच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयी
जाणीव वाढणे, समाजातील मुख्य आव्हानांची ओळख होणे.
- अर्थपूर्ण
आयुष्य, जीवनातील ध्येयाविषयी स्वतःसाठी स्पष्टता यावी.
ही काही मुख्य उद्दिष्टे या शिबिराची होती.
वयात
आल्यावर जागृत होणारे कुतूहल आणि पुरुष प्रजनन इंद्रिये हा विषय अम्मांनी समजावून
सांगितला. डॉ. आरती आणि अमोलने ‘स्व’ चा स्वीकार, अमोलने सामाजिक विषमता हे विषय समजावून सांगितले. माया
स्टोरी, जितो जितना जीत सको अशा खेळांतून स्वतःसाठी काही मुल्ये
शोधण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. अमृतने सर्चच्या कामाबद्दल सांगताना एखाद्या
सामाजिक संस्थेकडे कसे बघावे या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतला. सामाजिक काम
करण्यामागे माझ्या प्रेरणा काय आहेत, याचे आत्मपरीक्षण केले, वेगवेगळ्या
पुस्तकांतून सामाजिक-राजकीय-आर्थिक परिप्रेक्ष विस्तारले, सतीशने
घेतलेल्या सेशनमधून माझी आर्थिक गरज आणि आर्थिक नियोजन समजून घेतले. गावात एक दिवस
घालवल्यावर तिथल्या प्रश्नांवर निरीक्षणे नोंदवली. पी. साईनाथ यांच्या विदर्भातील
शेतकरी आत्महत्येवरील कामावर आधारित ‘निरोज् गेस्ट’ ही
डॉक्युमेंटरी पाहिली.

शेतकरी
आत्महत्येचा प्रश्न सतीशने एका सरकारी रिपोर्टचा आधार घेऊन समजावून सांगितला.
जुईने निर्माणी ज्या ‘एमर्जिंग अडल्टहूड’ या वयोगटात आहेत, त्याच्या
वैशिष्ट्यांबद्दल सांगितले. शिबिरात मिलिंद बोकील यांनी “सामाजिक संस्थांची समाजात
भूमिका काय” यावर सुंदर मांडणी केली. तसेच “महात्मा गांधी ह्या काळात प्रासंगिक का
आहेत” या प्रश्नावरही मिलिंद काका बोलले. मंदारने (निर्माण ४) पानी फाउंडेशनचा
त्याचा प्रवास आणि स्वानंदने (निर्माण ७) विश्वाचा व्याप आणि त्यात मानवप्राण्याचे
स्थान यावर शिबिरार्थ्यांशी चर्चा केली. नायनांनी शिबिरात झालेल्या प्रश्नोत्तरीत
शिबिरार्थ्यांशी गप्पा मारल्या. आणि शेवटच्या दिवशी आपल्यासाठी एका मोठ्या
ध्येयाचा विचार करून पुढील सहा महिन्यांसाठी स्वतःचा कृतीकार्यक्रम सर्व
शिबिरार्थ्यांनी बनवला.
निर्माण
परिवारात नव्याने दाखल झालेल्या निर्माणींचे स्वागत!
आदिती आणि स्वप्नील निर्माण टीममध्ये दाखल
मुळची चंद्रपूरची आदिती पिदुरकर (निर्माण ८) नुकतीच
निर्माणच्या कार्यकारी टीमचा भाग झाली आहे. आदितीने नागपूरहून इंजिनिअरिंगचे
शिक्षण घेतले आहे. ‘हिताची’ या कंपनीमधील नुकतीच लागलेली नोकरी सोडून तिने सामाजिक
क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत तिच्याकडे निर्माण टीममध्ये व्यवस्थापन
आणि पब्लिसिटी या कामाची जबाबदारी आहे. आदिती ही उत्तम क्राफ्ट्स आणि पेंटीग करते.
मुळचा वाशीमचा स्वप्नील बोडखे (निर्माण ८) नुकताच सर्चमध्ये
रुजू झाला आहे. स्वप्नीलचे आयसर, पुणे येथून जीवशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर
शिक्षण झाले आहे. नुकतेच स्वप्नीलने सर्चमध्ये आदिवासी आरोग्य विभागासोबत कामाला
सुरुवात केली आहे. गडचिरोलीतील आदिवासी भागांतील संसर्गजन्य रोगांवर मुखत्वे
संशोधन करणे ही त्याची मुख्य जबाबदारी असून निर्माण उपक्रमाच्या डेटा
अॅनॅलिसिसच्या कामातही मदत करतो. अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स हा त्याच्या
जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
आदिती आणि स्वप्नील त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या
शुभेच्छा!