'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 July 2024

युवानिर्मितीसाठीचे निर्माण

“तुमच्याशी एक तास बोलणे हा एक भारी अनुभव होता. वेळ कसा गेला कळालेच नाही. ही कुठेही फॉर्मल मुलाखत वाटली नाही, कुठले दडपण देखील जाणवले नाही. इतका मोकळा संवाद मी याआधी कोणाशीच केला नव्हता. तुम्ही जे प्रश्न विचारलेत, जे मार्गदर्शन केले, ज्या असाइनमेंट्स सुचवल्यात, त्या फार उपयोगी आहेत आणि मी नक्की त्यावर काम करेन. आता पुढे कार्यशाळेकरता निवड झाली तर उत्तमच आहे पण नाही झाली तरी काही हरकत नाही. तुम्हाला भेटून, बोलून फार चांगले वाटले.”

कुठल्याही एखाद्या निवडप्रक्रियेदरम्यान इच्छूक उमेदवारांकडून या प्रकारची प्रतिक्रिया कितीशी बघायला मिळते? आमच्यासाठी मात्र हा दरवर्षी सातत्याने येणारा अनुभव आहे. जुलै ते ऑक्टोबर हे चार महिने म्हणजे निर्माण या आमच्या युवा उपक्रमाच्या नवीन बॅचसाठीच्या निवडप्रक्रियेचा काळ. ‘निवडप्रक्रिया ही विकासप्रक्रिया देखील असली पाहिजे’ या भूमिकेतून आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना दरवर्षी हमखास मिळणारा हा सुखद प्रतिसाद!

पहिलीपासून ते पुढे उच्च शिक्षणापर्यंत मी अनेक परीक्षा दिल्यात, आपण सर्वच देतो. माझा वैयक्तिक अनुभव असा की परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासाने माझे काहीतरी भले झाले, मला काहीतरी शिकायला मिळाले. पण परीक्षाकेंद्रावर जाऊन प्रत्यक्ष तीन तास पेपर लिहिण्याचा जो खटाटोप होता त्याचा मात्र मला वैयक्तिकदृष्ट्या काहीही उपयोग झाला नाही. अमृत बंगवर (किंवा इतर कुठल्याही विद्यार्थावर) किती मार्कांचा शिक्का मारायचा हे ठरवायला परीक्षकांना आणि विद्यापीठाला नक्कीच मदत होते पण प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्याला मात्र केवळ एक ‘चिंतातूर रेस अगेन्स्ट टाईम’ अनुभवायला मिळते. पहिली ते बारावी, आणि पुढे बॅचलर्सची साधारण चार वर्षे, असे एकूण 16 वर्षांत, दरवर्षी सुमारे तीन तासाचे किमान दहा पेपर्स, म्हणजे एकूण जवळपास पाचशे तास, प्रत्येक विद्यार्थी लेखी परीक्षा देण्यात घालवतो. यात प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांचा, आणि जर्नल कंप्लिशन सारख्या तद्दन टुकार गोष्टीचा वेळ पकडलाच नाही आहे. पाचशे तासांना आठने भागल्यास साधारण दोन महिने एवढे ‘वर्क डेज’ एका विद्यार्थ्याचे व्यतीत होतात. भारतातील 26 कोटी युवांना हे गणित लागू केल्यास 4 कोटी वर्षे एवढे ‘वर्क डेज’ / कार्य कालावधी हा निव्वळ परीक्षा देण्यात जातो. ही ढोबळमानाने केलेली आकडेमोड आहे हे मानले तरी ऐन तारुण्यातील एवढा मोठा काळ जी परीक्षा नावाची गोष्ट बळकावणार आहे तिच्यावर ‘निव्वळ विद्यापीठांसाठी मार्कशीट बनवण्याची सोय’ या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसाठी किमान काही उपयुक्तता असण्याची नैतिक जबाबदारी आहे असे मला वाटते. शिक्षणप्रक्रियेतील मूल्यांकन पद्धती ही देखील एक शैक्षणिक अनुभव असायला पाहिजे ना? तो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ बिनडोक माहिती पुनरुत्पादनाचा आणि काहींसाठी तर आत्यंतिक दडपणाचा अनुभव होऊन कसे चालेल? “संपली परीक्षा, सुटलो बुवा एकदाचा” अशा सार्वत्रिक निश्वासापेक्षा “मजा आली, बघुया काय होतयं” असा उल्हास नको का?

व्यापक बदल कधी होईल ते माहीत नाही पण किमान आम्ही चालवत असलेल्या निर्माण प्रकल्पामध्ये तरी हा विचार कसा अंमलात आणता येईल याचा गेले दशकभर आम्ही सातत्याने प्रयत्न केला आहे.

भारतीय तरुणांना ‘फ्लरिश’ होण्यास व त्यांचा ‘पर्पज’ शोधण्यास मदत व्हावी, आणि त्यांच्यात सामाजिक बदल घडवून आणण्याची प्रेरणा व कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने 2006 साली निर्माणची सुरवात झाली. सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय व डॉ. राणी बंग आणि एम. के. सी. एल.चे श्री. विवेक सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निर्माणने भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुणांसोबत काम केलेले आहे. आम्ही चालवत असलेल्या विविध उपक्रमांपैकी गडचिरोलीला होणारी शिबिरे आणि त्यानंतरचा सातत्याने होणारा पाठपुरावा हा एक अतिशय सघन उपक्रम आहे. आमच्या वेळेच्या आणि संसाधनांच्या मर्यादा लक्षात घेता हे ‘इंटेन्स इनपुट’ कोणाला द्यायचे हे ठरविण्यासाठी आम्ही दरवर्षी एक निवडप्रक्रिया करतो आणि साधारण दीडशे युवांना निवडतो.

ही निवडप्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये असते – ‘अप्लिकेशन फॉर्म, इंटरव्ह्यू आणि असाइनमेंट्स’. निर्माणच्या वेबसाईट वर एक अतिशय सुंदर आणि आत्मनिरीक्षणात्मक असा अर्ज आहे. मी सगळ्या युवा वाचक-मित्रांना आवाहन करीन की त्यांनी तो किमान एकदा तरी बघावा. यातील प्रश्न हे युवांना स्वत:च्या जीवनाबद्दल अंतर्मुख व्हायला तसेच बाह्य सामाजिक परिस्थितीविषयी विचार करायला भाग पाडणारे असे दोन्ही प्रकारचे आहेत. त्यांचे कुठलेही एक ठराविक योग्य उत्तर असे नाही तर ते पूर्णत: ‘ओपन एंडेड’ स्वरुपाचे आहेत. हे प्रश्न सोडवतांना इतर ज्ञानस्त्रोतांचा वापर करायची देखील पूर्ण मोकळीक विद्यार्थ्यांना असते. आणि हो, यातील प्रश्न हे दरवर्षी काही प्रमाणात बदलत असतात त्यामुळे त्यातली उत्सुकता व नावीन्य टिकून राहते.


यातील काही प्रश्न असे:

1. शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही काय काम करू इच्छिता/ सध्या काम करत असल्यास, काय काम करत आहात? हेच काम करावे असा निर्णय घेताना काय विचार केला?
2. आजच्या घडीला तुम्हाला स्वतःच्या आयुष्याबद्दल पडलेले असे कुठले प्रश्न आहेत ज्यांचा तुम्हाला शोध आहे?
3. तुमच्या जीवनातील असा एखादा प्रसंग सांगा जिथे तुम्ही सोय, फायदा किंवा इतरांचा विरोध याची चिंता न करता स्वत:च्या मूल्यांना सुसंगत अशी नैतिक भूमिका घेतली.
4. दर वर्षी, आरोग्यसेवेवरील खर्च न झेपल्यामुळे सुमारे 5 कोटी भारतीय जनता ही दारिद्र्यरेषेखाली ढकलली जाते. तुमच्या मते अशी परिस्थिती उद्भवण्याची काय कारणे आहेत?
5. कुठल्याही शासकीय संस्थेला अथवा कार्यालयाला भेट देऊन तिथे काही तास व्यतीत करा, आजुबाजुच्या लोकांशी बोला. तेथे येणा-या लोकांना काय अडचणी जाणवतात याबद्दलची तुमची निरीक्षणे सांगा.

अशा प्रकारच्या विविध चालना देणार्‍या प्रश्नांमुळेच की काय पण आम्हाला अनेकदा अशा प्रतिक्रिया मिळतात: “निर्माणच्या अर्जातील प्रश्नांची उत्तरे देणे हा एक आनंददायी अनुभव होता. माझ्या मनात नेमके काय चालले आहे ते एक पॉज घेऊन समजून घेण्याची संधी मला यामुळे मिळाली” किंवा “माझे विचार खूप विखुरलेले आणि खंडित स्वरुपात होते. पण या फॉर्मने मला माझ्या स्वतःच्याच जीवनाशी संबंधित प्रश्नांचा ठोस व नेमकेपणे विचार करण्यास मदत केली.”

समाजकार्य करायला कुठल्या पदवीची गरज नाही पण विचारांची, प्रेरणेची, क्षमतेची आणि सातत्यपूर्ण परिश्रमांची मात्र नक्कीच गरज आहे. या अनुषंगाने आम्ही या निवड प्रक्रियेमध्ये वेगवेगळे पैलू बघतो. अर्थातच या उपक्रमाचा उद्देश्य हा स्व:च्या पलीकडे जाणे असा असल्यामुळे केवळ स्वतःच्या आर्थिक प्रश्नांमध्ये गुरफटून न राहता त्याच्या पलीकडे जाता येणं, मी इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं आतून वाटणं, हा निर्माणमध्ये निवड होण्यासाठीचा महत्वाचा निकष आहे. त्याबरोबरच सामाजिक कार्य हे निव्वळ आपल्या हौसेखातर करायचे नसल्यास ज्याने इतरांना उपयोग होईल, त्यांची काही समस्या दूर करता येईल असे काही ज्ञान, कौशल्य, क्षमता अंगी असणे देखील आवश्यक आहे. आणि केवळ बोलून भागणार नाही, तर याला कृतीमध्ये उतरवण्याची धमक असली पाहिजे किंवा त्याचा अनुभव असला पाहिजे. भारतातल्या अनेकविध नामांकित कॉलेजेसमधून जसे विद्यार्थी निर्माणमध्ये निवडले जातात तसेच अनेक युवा असेही आहेत ज्यांचं फारसं औपचारिक शिक्षण झालेलं नाही, ज्यांनी जीवन-विद्यापीठातूनच शिक्षण घेतलं आहे मात्र प्रत्यक्षात काहीतरी करुन दाखवलं आहे. अशी शैक्षणिक आणि भौगोलिक विविधता हा एकूणच अनुभव अतिशय संपन्न करते. सोबतच फार आनंदाची आणखी एक बाब म्हणजे निर्माणच्या निवडप्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर आणि शेवटी निवडलेल्या गटातदेखील मुला-मुलींचे प्रमाण हे जवळजवळ अर्धे असते, कित्येकदा तर मुली कांकणभर जास्त असतात. समाजबदलासाठीच्या निर्माणसारख्या उपक्रमात मुली हिरीरीने भाग घेताहेत हे अत्यंत आश्वासक आहे.




या पहिल्या टप्प्यानंतर आम्ही साधारण पाचशे जणांना मुलाखतीसाठी निवडतो. स्वत:ची मूल्ये, मनातील प्रश्न, पुढील दिशा, समाजातील समस्या, त्यांची कारणमीमांसा, त्यावरील संभाव्य उपाय, रोल मॉडेल्स, इ. बाबत युवांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल, आणि त्यांच्या भावना, संभ्रम ते मोकळेपणे सांगू शकतील असा हा विकासात्मक संवाद असतो. निरुत्तर करणार्‍या प्रश्नांपेक्षा विविध प्रकारच्या शक्यता ज्यातून उलगडतील, स्वत:च्या भविष्याविषयी ‘खुल के’ कल्पनारंजन होईल, स्वत:च्याच भूमिकांची चाचपणी करता येईल, त्यावर चर्चा आणि भिन्न मतांना सामोरे जाता येईल, व हे सर्व होताना एका अस्सल परस्परसंवादाचा आणि मानवी नात्याचा अनुभव येईल असा हा विलक्षण प्रकार असतो. वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठी वर्षातील अत्यंत समाधानकारक असा हा भाग!

तासाभराच्या प्रदीर्घ संवादानांतर आम्ही प्रत्येकाला काही असाइनमेंट्स देतो आणि मग त्यावरुन साधारण दीडशे जणांची अंतिम निवड करतो. या अभ्यासकृती देखील युवांना विचारप्रवण आणि कृतीशील बनवणार्‍या असतात. समाजातील खर्‍या गरजूंसोबत समोरासमोर येण्याची, त्यांचे जीवन, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची आणि शक्य असल्यास तत्काळ काही योगदान देण्याची संधी या निमित्ताने अनेक युवांना प्राप्त होते. सामाजिक प्रश्नांविषयी जिज्ञासा, वंचित घटकांप्रती सहानुभूती आणि स्वत:च्या सामाजिक जबाबदारीची जाणीव अशी तिहेरी उद्दिष्टपूर्ती व्हायला यातून मदत होते. या संपूर्ण निवडप्रक्रियेतील महत्वाची गोष्ट अशी की यातील प्रत्येक टप्पा हा स्वतःमध्ये स्वयंपूर्ण आहे, आणि आज तो युवा जिथे आहे त्यापेक्षा त्याला काही पावलं पुढे जायला मदत करेल असा आहे. ही आमची युवा मित्रांना कमिटमेन्ट आहे.
मी सगळ्या युवा वाचक-मित्रांना आवाहन करीन की त्यांनी किमान एकदा तरी हा अनुभव घ्यावा. स्वत:च्या फ्लरीशिंगची सुरुवात आणि सोबतच समाजाला योगदान या जोडप्रक्रियेची ती नांदी असू शकते. निव्वळ अर्थप्राप्तीपेक्षा त्यासोबतच अर्थपूर्ण जगण्याच्या शोधात असलेल्या युवांना भेटायला आम्ही उत्सुक आहोत!


अमृत बंग


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.






निर्माणच्या पुढील बॅचची निवडप्रक्रिया आता सुरु झालेली असून याविषयी अधिक माहिती https://nirman.mkcl.org/selection/selection-process या संकेतस्थळावर बघता येईल.



No comments:

Post a Comment