'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

सीमोल्लंघन, फेब्रुवारी २०१४

सौजन्य: निहाली भोईर, freebirdnihali@gmail.com
या अंकात...
छत्तीसगढ मध्ये वैद्यकीय सेवा देत असताना डॉ. बाबासाहेबने त्याच्या वरिष्ठ सहकारी डॉ. अॅक्विनस यांनी ओडीशा तील ‘कलाहांडी या दुर्गम भागात सुरू केलेल्या आरोग्याच्या कामाला भेट दिली. काय होते त्याचे अनुभव?
पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या प्रचारासाठी नाशिकच्या झालेल्या ‘जीवन उत्सव’मध्ये निर्माणींचे अनुभव कसे होते?
चारूताचा सहभाग असणारे संशोधन काय सुचवते?
पुण्यातील आंबेडकर वस्तीत केलेल्या कामाबद्दल जुई जामसंडेकरचे अनुभव
खेळ-कला-संवाद यांच्या सहाय्याने शिकवावे कसे? ‘खेळघर’च्या कार्यशाळेबद्दल लिहितेय अमृता ढगे
हिटलरच्या छळछावणीतही जीवनाचा अर्थ शोधणारे २०व्या शतकातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. विक्टर फ्रांकेलयांच्या ‘अर्थाच्या शोधात’ या पुस्तकाचा परिचय करून देते आहे पल्लवी मालशे
ü कविता: 'I' - Rabindranath Tagore
निर्माणीच्या नजरेतून

डायग्नोसिस स्वभाव-स्वधर्म-युगधर्माचे

३ ते ११ फेब्रुवारी दरम्यान निर्माण ५ च्या वैद्यकीय बॅचचे तिसरे शिबीर संपन्न झाले. या शिबिराची उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती:
१.      शिबिरार्थ्यांना आपल्या ‘करीअर’ व पुढील वाटचालीबद्दल अधिक स्पष्टता येणे
२.      सध्याच्या आरोग्यव्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होणे
३.      वैद्यकीय सेवेखेरीज तितक्याच महत्त्वाच्या आरोग्यव्यवस्थेच्या इतर अंगांची (उदा. औषधे, रक्त, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इ.) त्यांना ओळख होणे
४.      सध्याच्या राजकारणाबद्दल व मार्केट व्यवस्थेबद्दल स्पष्टता येणे
५.      एक गट म्हणून त्यांच्यातील नाते घट्ट होणे
ध्येयनिश्चितीच्या दृष्टीने शिबिरार्थ्यांना मदत व्हावी यासाठी स्वभाव-स्वधर्म-युगाधार्माचे सत्र यावेळी शिबिराच्या सुरुवातीलाच अधिक विस्तृतपणे घेण्यात आले. याचसोबत याबाबतीत अधिक स्पष्टता येण्यासाठी अमृतने Maslow pyramid ची रचना सर्वांना समजावून सांगितली. शिबिराच्या शेवटच्या भागात प्रत्येकाने आपापले ध्येय नेमक्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न केला व सर्वांसमोर सादरीकरण केले.
‘सर्वांसाठी आरोग्यसेवा’ हे ध्येय ठेवले तर सध्या भारताची काय स्थिती आहे आणि यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याविषयी नायनांचे सत्र झाले. सध्या ग्रामीण व आदीवासी भागांत सरकारी आरोग्यव्यवस्थेची काय स्थिती आहे, ती सुधारण्यासाठी निर्माणचे युवक/युवती काय करू शकतात याबद्दल महाराष्ट्राच्या आरोग्यसेवा संचालनालयाचे संचालक (Director of Health Services) डॉ. सतीश पवार व त्यांच्या पत्नी डॉ. अर्चना पाटील यांनी शिबिरार्थ्यांशी संवाद साधला. या जोडप्याने डॉक्टर झाल्यानंतर ५ वर्षे नाशिकच्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा दिली होती. निर्माणचे अनेक डॉक्टर्स सध्या याच टप्प्यावर असल्याने या जोडप्याचे अनुभव सर्वांना भावले. महाराष्ट्रात अनेक डॉक्टर्स दरवर्षी बाहेर पडत असूनही ग्रामीण भागांत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त राहतात. याचे कारण RTI च्या माध्यमातून शोधताना वैद्यकीय व्यवस्थेबद्दल आलेले अनुभव अमृत बंग व विठ्ठल साळवे यांनी मांडले. डॉ. योगेश काळकोंडे यांनी भारतात येऊ घातलेल्या असंसर्गजन्य रोगांच्या मोठ्या संकटाबद्दल विस्तृत मांडणी केली. आनंद बंग याने The lost art of healing या पुस्तकाचा परिचय करून दिला.
‘धरामित्र’चे संचालक श्री. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी फार्मा व्यवसाय करणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या व वैद्यकीय सेवा यांचं साटंलोटं कसे घडवून आणले जाते, त्याचा रुग्णाला कराव्या लागणाऱ्या खर्चावर काय परिणाम होतो आणि यातूनच जेनेरिक मेडिसीनची चळवळ कशी आकार घेत आहे याविषयी मांडणी केली. तसेच गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा अस्तित्वात येण्यासाठी रवींद्र काका आणि त्यांच्या गटाने दिलेला लढ्याविषयी सत्र घेतले. ‘मुंबईत एखादा गंभीर रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात येतो तेंव्हा त्याला तशा परिस्थितीत रक्त मिळवण्यासाठी वणवण फिरायला लागू नये’ ही समस्या श्री. विनय शेट्टी यांनी कशी सोडवली हे विस्तृतपणे सांगितले. 
श्री. विश्वंभर चौधरी यांनी आजच्या पक्षीय व सांसदीय लोकशाहीविषयी, तसेच नागरिक लोकशाहीत कसा सहभाग घेऊ शकतात याविषयी अतिशय मार्मिक मांडणी केली. अतिहव्यासापोटी आलेल्या २००८ च्या आर्थिक मंदीच्या संकटावर भाष्य करणारा ऑस्कर पुरस्कार विजेता लघुपट Inside job या शिबिरात दाखवण्यात आला. हा क्लिष्ट विषय श्री. सुनील चव्हाण यांनी रोल प्लेच्या माध्यमातून सोपा करून सांगितला.
या शिबिराच्या शिक्षणप्रक्रियेत शिबिरार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. सुरुवातीलाच शिबिरार्थ्यांनी गेल्या ६ महिन्यात झालेला बाहेरील व आतील प्रवास सर्वांसमोर सादर केला व गटाच्या सामूहिक शिक्षणात प्रत्येकाने योगदान दिले. या ‘जेनेरिक’ शेअरिंगनंतर ‘प्रेमाच्या कसोट्या, जोडीदार व लग्न’ याविषयी झालेल्या ‘स्पेसिफिक’ शेअरिंग मध्ये सर्वच उत्साहाने सहभागी झाले. या व इतर ज्वलंत प्रश्नांना दिशा देण्यासाठी अम्मा-नायनांसोबत झालेल्या प्रश्नोत्तरीमध्येही मुलांनी अनेक प्रश्न विचारले. ‘भारताचे पंतप्रधान कोण असावे- नरेंद्र मोदी, राहुल गांधी का अरविंद केजरीवाल?’ या धगधगत्या विषयावर वादविवाद-चर्चा झाली. या वादविवादाची तयारी करण्यासाठी शिबिरार्थ्यांनी ‘नाईट-आउट’मध्ये इंटरनेट, वृत्तपत्रे, सामूहिक चर्चा अशा माध्यमांचा आधार घेतला.

अतिशय तीव्र स्पर्धा व ठरलेल्या साचेबंद करीअरचा वेगवान प्रवाह यांचा सामना निर्माणच्या डॉक्टरांना नेहमी करावा लागतो. स्पर्धेकडे पाठ फिरवून जेथे गरज आहे तिथे जाऊन वैद्यकीय सेवा देण्याची शिबिरार्थ्यांनी दाखवलेली तयारी ही या शिबिराची मोठी उपलब्धी होती.

तरुण डॉक्टरांची नवी बॅच खेड्यांमध्ये !

सरकारी महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ची पदवी घेतल्यानंतर सर्व डॉक्टर्सना एक वर्ष ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास त्यांना दंड भरून ह्या करारातून मुक्त होता येते. मात्र प्रशासन व विद्यार्थी दोन्ही बाजू ह्याबाबत उदासीन असल्यामुळे अधिकतर पदवीधर डॉक्टर हा करार मोडतात. ह्याचा एक परिणाम म्हणजे अनेक खेडी वैद्यकीय सेवांपासून वंचित राहतात. निर्माण मधील अनेक युवा डॉक्टर मात्र ह्याला अपवाद ठरत असून अत्यंत मनापासून ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचा एक पायंडाच त्यांनी पाडला आहे. त्यातच आता रश्मी कुलकर्णी, संतोष चव्हाण, विवेक हिंगमिरे, विकास वानखेडे, महेश पुरी ह्यांची भर पसली आहे.
            रश्मी कुलकर्णी (निर्माण ५) ही मल्हारपेठच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (ता. पाटण, जि. सातारा) वैद्यकीय अधिकारी म्हणून २० जानेवारीपासून कार्यरत असून ह्या केंद्रात तिच्याआधी निर्माणचाच सुहेल शिकलगारही काम करत होता. सुहेलच्या वर्षभरातील परिश्रमांमुळे लोकांचा सरकारी वैद्यकीय सेवेबद्दलचा विश्वास वाढला असून लोक त्यांच्या वैद्यकीय अधिकारांबद्दल जागृत झाले आहेत असे रश्मीचे निरीक्षण आहे.   
            संतोष चव्हाण (निर्माण ५) हा सिंधुदुर्ग येथून १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नुकताच रुजू झाला आहे. कॉलेजमध्ये असताना इंटर्नशिप प्रामाणिकपणे केल्याचा संतोषला खूप फायदा जाणवत असून रुग्णालयात येणाऱ्या केसेस हाताळणे त्यामुळे बरेच सोपे झाले आहे असे तो म्हणतो.
            महेश पुरी (निर्माण २), विवेक हिंगमिरे व विकास वानखेडे (दोघेही निर्माण ५) देखील महाराष्ट्रातील विविध भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. महेश पुरी अकोल्याजवळील आगर येथे, विवेक जवळाबाजार (ता. औंढा नागनाथ, जि.हिंगोली) येथे, तर विकास नांदेड जवळील आष्टी येथे असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाला आहे.
            ह्या आपल्या सर्व डॉक्टर मित्रांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा !

स्रोत – रश्मी कुलकर्णी, विकास वानखेडे, महेश पुरी, संतोष चव्हाण, विवेक हिंगमिरे 

कलाहांडी !

आपला मित्र डॉ. बाबासाहेब देशमुख (निर्माण ४) छत्तीसगढ मधील बिलासपूर जवळच्या गनियारी येथील जन स्वास्थ्य सहयोगया संस्थेत कार्यरत होता हे आपण जाणतो. याचदरम्यान त्याच्या वरिष्ठ सहकारी डॉ. अॅक्विनस यांनी ओडिशामधील दुर्गम व वैद्यकीयदृष्ट्या मागास अशा कलाहांडी नावाच्या आदीवासी जिल्ह्यात आरोग्यसेवेचे काम सुरू केले. साठीनंतर डॉ. अॅक्विनस यांना हे कठीण काम हाती घेण्याचा उत्साह कसा आला, तसेच एखाद्या दुर्गम प्रदेशात नवीन काम कसे आकार घेत जाते हे पाहण्यासाठी बाबासाहेब व त्याचा सहकारी डॉ. वत्सल यांनी कलाहांडीला भेट दिली. हा अनुभव दोघांनी मिळून शब्दबद्ध केला आहे.

For three days, Dr.Vatsal and me were with Dr Aquinus Mam at Kalahandi. Aquinus Mam along with Sister Angelina, Sister Annes and Palak have initiated a new health program for the tribal people of Kalahandi district, Orrisa. They are soon to be registered NGO is named “Swasthya Swaraj”. These four daring women have undertaken a huge challenge and are working tirelessly to achieve it. We were overwhelmed by the complexities of this project and the simplicity of these women. Hereby we are trying to summarize the present status of the project at Kalahandi so that more and more people are aware of it and may extend a helping hand in their own capacities.
            Kalahandi has the most beautiful landscape I have ever seen. The environment is serene, lush and filled with enormous riches of vegetation and minerals. However, the plight of health care facilities in the area lends a gloomy face to this beautiful picture. The PHCs and CHCs are almost non-functional. People have heard of ASHAs but have seldom seen one in their own village. District Hospitals do provide some healthcare but most of the villages are about 70-90 kms away and then they don’t even have connecting roads! Therefore, villagers live without minimal health support, depending only on their traditional medications a few times or just ignoring their illnesses most of the times. Women deliver alone or with the help of their mothers if available. Even “dais” are not present in tribal villages. Education is another foreign concept for these villages. Each village had a maximum of 1 or 2 male inhabitant, who is 8th or 10th std passed. There are so many other deprivation issues and absence of facilities these people have become used to.
            Kalahandi district has 16 blocks and out of these, Thaumul Rampur block is considered the most backward. Swasthya Swaraj team is currently initiating health related activities in 4 Gram Panchayats of Th. Rampur block namely: Gunpur, Kerpai, Kaniguma and Th Rampur. The team is based at Bhavanipatna from where they have to make excursions on jeep to the village areas. The nearest railway station to Bhavanipatna is Kesinga (well connected by NH 201). Many villages can be reached by road but a larger number of isolated villages are not connected. The team has to walk about 6-10 kilometres every alternate day to reach different villages. They are also running weekly clinics in the aforementioned gram panchayats. The current focus is on identifying one village healthworker “Swasthya Sathi” from each village and arranging for their training along with running weekly clinics in different gram panchayats. They have managed to select about 50 Swasthya Sathis at present, a tremendous achievement for a project which was started just about 8 months ago. Clinics are also gaining popularity among the locals. They see about 30-50 patients per day, arrange for onsite necessary lab investigations and medications, all free of cost. The myriad of diseases is extensive with tuberculosis and leprosy being very rampant, scabies is almost ubiquitous.
            Some other organisations have previously done substantive work in the area. Among these, “Gram Vikas” must be especially congratulated. Over past 30 years, they have done tremendous work ranging from providing water, building toilets, schools and helping in agriculture. Gram Vikas is however an aging organisation, losing its vigour every passing year due to lack of support from younger generation. Government has also done its part by installing solar panels in most of the villages, at least providing electricity to a single bulb in one village. However, on other issues the policy is to neglect.
            The times ahead are testing. Constructive struggle has begun but there is huge amount of work to do. Start by “Swathya Swaraj” is praiseworthy but it demands more than our praises to sustain. There is need for more and more young doctors, engineers, scientists, sociologists and economists to join social organisations like Swasthya Swaraj, infuse their energy and lend expertise to such efforts. Working with Swasthya Swaraj will also give a much better understanding of Indian societies to the young generation and make them eager to take responsibility for the future. Hoping that we will not let them down.

Dr. Babasaheb Deshmukh, deshmukhbabasaheb@gmail.com ,

Dr. Vatsal

‘जगण्यासाठी उत्सव’ ते ‘जगणे हाच उत्सव’


जीवन उत्सवच्या प्रचार फेरीदरम्यान कॉलेजची मुले
जीवन उत्सव हा कार्यक्रम मागील ६ वर्षांपासून नाशिकमध्ये होतो. पर्यावरणीय आणि वैज्ञानिक जीवनशैली ही या कार्यक्रमाची मुख्य थीम ! यंदा २४ ते ३० जानेवारी दरम्यान जीवनशैली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात नाशिकमधील ५० संस्था, शाळा महाविद्यालये आणि काही इंडस्ट्रीज सहभागी झाल्या होत्या. आणि साधारण २०० कार्यक्रम या आठवड्यात नाशिकमध्ये झाले. उद्घाटनाच्या दिवशी नाशिकमधील निवडक भागातून प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. शाळा कॉलेजची शेकडो मुलं-मुली-शिक्षक यात सहभागी झाले. या फेऱ्यांमध्ये ५ छोटे चित्ररथही बनवण्यात आले होते. त्यातून जीवनशैलीचा संदेश लोकांना मिळावा अशी रचना होती. या कार्यक्रमात कुठेही फ्लेक्स, प्लास्टिक, थर्मोकोल, पुष्पगुच्छ, हार वापरण्यात आले नाहीत. पाहुण्यांना भेट म्हणून सेंद्रिय गूळ, चरबीविरहित साबण आणि खादीचं कापड देण्यात आलं !

कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे अशा प्रकारची जीवनशैली जगणाऱ्या हरित साधकांच्या मुलाखती. यात मंदार देशपांडे (निर्माण ४) याच्या नाशिकमध्ये ३ ठिकाणी मुलाखती झाल्या आणि एका परिसंवादातही त्याचा सहभाग होता. मंदारची आकाशवाणीवरही मुलाखत झाली. ३० जानेवारीला जीवनशैली दिन साजरा होतो. यात डॉ. राणी बंग (अम्मा) यांचे व्याख्यान झाले. त्यालाही नाशिककरांचा छान प्रतिसाद मिळाला.  
या जीवन उत्सवात प्रचार फेऱ्यांचं आयोजन, शाळांच्या मिटींग्स घेणं, स्वयंसेवकांची जमवाजमव, शाळा-कॉलेजात बोलायला जाणं, मुलाखती घेणं, banners बनवणं आणि रंगविणं, स्टेज तयार करणं अशा सर्व कामात मुक्ता नावरेकर (निर्माण ३) सहभागी होती. या अनुभवाबद्दल बोलताना मुक्ता म्हणाली, “गेली सहा वर्षे सातत्याने आम्ही पर्यायी जीवनशैलीचे विचार विविध माध्यमांतून मांडतोय. सुरुवातीला कित्येकदा निराशा यायची. वाटायचं, या जागतिकीकरणाच्या, प्रदूषण आणि चंगळवादाच्या मोठ्या वादळात आपल्या या विचारांचा टिकाव कसा लागणार? पण आता हळूहळू या विचारांचा स्वीकार जाणवतोय. यंदा आम्ही आयोजनात लोकांना सहभागी होण्याचं आवाहन केलं. त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला की आता जीवन उत्सव हा काही संस्थांपुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने लोकांचा उत्सव बनू लागलाय. आपलं वागणं, आपली साधनं पर्यावरणाला धोका पोहोचवणारी नसावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतो. आम्ही कुठलीही sponsorship घेत नाही. लोकांकडूनच या उत्सवाचा खर्च व्हावा असा आमचा प्रयत्न असतो आणि तो सध्या होतोही. हे काम करताना मला एखादा विषय मांडण्याची विविध माध्यमं, त्यातलं सातत्य, त्याचा आधी स्वतः अभ्यास करणं इ. गोष्टी शिकायला मिळतात.”

चित्ररथ
स्त्रोत- मुक्ता नावरेकर, muktasn1@gmail.com

पायरी ओलांडणारे पायऱ्यांवरचे नाटक

राही मुजुमदारला (निर्माण ५) शाळेत असल्यापासून थिएटरची आवड होती आणि कॉलेजमध्ये सामाजिक शास्त्र हा तिचा विषय. या दोन्हीचा मेळ साधून तिला काही काम करण्याची इच्छा होती. त्याच वेळी तिची मैत्रिण त्यांचा ग्रुप स्त्रियांच्या स्वच्छतेचे प्रश्न, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता या विषयांवर 'Woman' हे थिएटर करत होते. या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी राहीने घेतली. Woman हे स्टेजवरचं नाटकही नव्हतं आणि रस्त्यावर केलं जाणारं पथनाट्यही नव्हतं. त्यामुळे त्याचे नेपथ्य हे आव्हानात्मक काम होतं. शिवाय नेपथ्यासाठी खर्चाची वेगळी तरतूद सुद्धा नव्हती. मग घरातीलच जुन्या वस्तू वापरून, टाकाऊतून टिकाऊ असे सेट्स तिने तयार केले. या नाट्याचे पुण्यात आणि मुंबईत काही प्रयोग झाले. भविष्यात चेन्नतही प्रयोग करण्याचा या मंडळींचा विचार आहे.
प्रयोगादरम्यानचा एक क्षण
या अनुभवाविषयी बोलताना राही म्हणाली, “आमचं नाटक हिंदी व मराठीत आहे. आम्ही जिथे जाऊ तिथला प्रेक्षक वर्ग बघून कुठल्या भाषेत सादर करायचं ते ठरवतो. पुण्याच्या प्रेक्षकांना हा विषय तितकासा भावला नाही. पण तरी त्यांना नाटकाचा साचा व सादरीकरणाची पद्धत आवडली. मुंबईत छान प्रतिसाद मिळाला. लोक relate करू शकले. नाटकानांतरच्या चर्चेत लोकांनी आनंदाने सहभाग घेतला. हे नाटक आम्ही सहसा नाट्यगृहाच्या पायऱ्यांवर किंवा अशा जागेत करतो जिथे प्रेक्षक जवळून पाहू शकतील आणि त्यांनाही आपण नाटकाचा एक भाग आहोत असं सतत वाटत राहील. 
नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी राहीने स्वीकारली होती
मी हे नाटक करायचं असं ठरवून जेव्हा टीमसोबत काम सुरू केलं, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी मला अनेक गोष्टी वाचायला दिल्या. त्यात महिलांचे आरोग्याचे प्रश्न, स्वच्छतेचे प्रश्न अणि स्वच्छतागृहांचे प्रश्न ह्यांची रीतसर माहिती होती. त्यानंतर हे नाटक ‘black comedy असल्याने ह्याचे नेपथ्य भरपूर व रंगीबेरंगी असावे असे ठरले. आमचे एकुण ७९ property elements आहेत; अणि ते सगळे हाताने बनवलेले आहेत. त्यामुळे ते नीट संभालणे हे मोठे आव्हानच होते. ह्यासाठी लागणारी शिस्त व नीटनेटकेपणा मला शिकवा लागला. तसेच अभ्यास सांभाळून हे करावं लागत होतं. तिथे balance ठेवणे जरा अवघडच गेले. पण आवडीचा विषय असल्याने प्रचंड मजा येत होती व आनंदाने मी ते केलं.” 
थोडासा वेगळा विषय वेगळ्याच पद्धतीने मांडणाऱ्या राही आणि तिच्या ग्रुपला पुढील प्रयोगांसाठी शुभेच्छा !

स्त्रोत – राही मुजुमदार,

rahmujumdar@gmail.com

नरेगाच्या सामाजिक अंकेक्षणात निर्माणींचा सहभाग

महाराष्ट्र शासन गेल्या दोन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (नरेगा) केंद्र शासनाने नव्याने अवलंबलेली सामाजिक अंकेक्षणाची (Social audit) पद्धत राज्यात सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या २ वर्षांत राज्यात वेगवेगळ्या भागात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात आले. प्रगती अभियान ही संस्था या सर्व प्रक्रियेत अगदी सुरुवातीपासून सहभागी आहे. निर्माणचे गोपाल महाजन आणि अजय होले प्रगती अभियानचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक अंकेक्षणाच्या या प्रक्रियेत काम करत आहेत.
महाराष्ट्र शासनाने सामाजिक अंकेक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी पहिल्यांदाच एका संपूर्ण जिल्ह्याचे अंकेक्षण करण्याचे ठरवले. त्यासाठी धुळे जिल्ह्याची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात ४ तालुके मिळून ५५६ ग्रामपंचायती आहेत. त्यातील धुळे तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींची जबाबदारी प्रगती अभियानकडे देण्यात आली. २२ डिसेंबर २०१३ ते २८ जानेवारी २०१४ या दरम्यान धुळे तालुक्यात नरेगासाठी २०१२-१३ साली खर्च करण्यात आलेल्या एकूण २० कोटी रुपयांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात आले. त्यात ४२५ प्रशिक्षित मनुष्यबळ, जे मुख्यत: युवक होते, सहभागी झाले. त्यातील ४०० स्थानिक गावपातळीवरील युवक/युवती होते आणि २५ हे ग्रामीण/आदिवासी भागात काम करणार्‍या संस्थांचे कार्यकर्ते होते.
माहितीचा अभाव हे नरेगा लोकांपर्यत न पोचण्याचे अजूनही कळीचे कारण आहे. सामाजिक अंकेक्षणातून मोठ्या प्रमाणात नरेगाबाबत जनजागृती झाली. गावातील युवांना नरेगाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. आता धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात २-३ प्रशिक्षित युवा आहेत जे,  ठरवले तर, नरेगाला गावात खेचून आणू शकतात. युवक मजुरांच्या अडचणी/तक्रारींचे ग्रामसभेत क़िंवा जनसंवादाच्या माध्यमातून निवारण झाले. अशा काही उपलब्धी सामाजिक अंकेक्षणाच्या सांगता येतील.
४२५ युवांना प्रशिक्षित करणे, गावपातळीवरील अंकेक्षण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे, शासकीय अधिकार्‍यांशी संवाद साधणे, मोठ्या प्रमाणात माहितीचे संकलन-विश्लेषण करणे, काही विघ्नसंतोषी लोकांना हाताळणे, ग्रामसभा/जनसंवाद शांततेत पार पाडणे अशा जबाबदार्‍या आव्हानात्मक होत्या.
प्रगती अभियानने या कामाची संपूर्ण जबाबदारी गोपाल आणि अजयकडे सोपवली होती. तसेच धुळ्यातील संदीप देवरे ह्याचासुद्धा या प्रक्रियेत मोलाचा सहभाग होता. आयआयटी, मुंबईमध्ये शिकणार्‍या निकेश इंगळेने माहिती व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.  
सोशल ऑडीटचा कार्यक्रम

स्त्रोत- गोपाल महाजन, mahagopsu@gmail.com

मलेरिया नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय असावा का स्थानिक?

भारतातील लोकसंख्येच्या ८% असणाऱ्या आदिवासींमध्ये भारतात मलेरियामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू होतात. मलेरियाचा सामना करण्यासाठी सरकारी कार्यक्रम व्यापक प्रमाणावर सुरू आहे. मात्र मुंबईतील शहरी लोकसंख्येत आढळणारा आणि गडचिरोलीच्या जंगलातील आदिवासींमध्ये आढळणारा मलेरिया निराळा! गडचिरोलीच्या आदीवासी लोकसंख्येत मलेरिया नियंत्रणात येणारे अडथळे शोधण्यासाठी झालेले चारुता गोखलेचा (निर्माण १) सहभाग असणारे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
२०१२ मध्ये सर्च आणि Harvard विद्यापीठातील राधिका सुंदरराजन यांच्यासोबत ‘गडचिरोलीतील आदिवासी लोकांमधील मलेरिया या रोगाविषयीच्या समजुती’ यावर एक संशोधन झाले होते. यातून निघालेले निष्कर्ष हे शोधनिबंधाच्या स्वरूपात Plos One या जर्नलमध्ये जानेवारी महिन्याच्या अंकात वाचायला मिळू शकतात. गेले २० वर्ष आदिवासी भागात काम करणाऱ्या सर्चच्या आदिवासी आरोग्य विभागाचे हे पहिले प्रकाशित संशोधन असून राधिकासोबत डॉ. अभय बंग, डॉ. योगेश काळकोंडे आणि चारुता यांचा या संशोधनात प्रमुख सहभाग होता.      
मलेरिया हा रोग कसा पसरतो, तो कशामुळे होतो, त्यावर उपाय काय, तो कसा टाळता येऊ शकतो याविषयीच्या आदिवासींच्या संकल्पना हा या शोधनिबंधाचा गाभा आहे. या संशोधनातून सांस्कृतिकदृष्ट्या सुयोग्य साहित्य वापरून आदीवासींचे मलेरियाबद्दल आरोग्यशिक्षण, पारंपारिक उपचार करणाऱ्या आदीवासी पुजाऱ्यांना मलेरिया नियंत्रण कार्यक्रमात सहभागी करून घेणे, गावातल्या गावात मलेरियाचे जलद निदान व उपचाराच्या सोयी उपलब्ध करून देणे, कीटकनाशक औषधांत बुडवलेल्या मच्छरदाण्यांचे वाटप करून त्यांचा वापर करण्यास चालना देणे इ. उपायांचे महत्त्व जाणवते. हे निष्कर्ष राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम सुधारण्यासाठी कसे उपयुक्त ठरतील यादृष्टीने शासकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा ही यापुढची पायरी असेल.
शोधनिबंध वाचण्यासाठी-
स्त्रोत: चारुता गोखले, charutagokhale@yahoo.co.in

‘आनंदवन’च्या प्लास्टिक सर्जरी शिबिरात गौरी चौधरीचे सहकार्य

दुभंगलेले ओठ, वाकडे / जास्तीचे बोट, जुळलेली बोटे, चपटे नाक, जन्मजात व्यंगे, शरीराचा भाजलेला एखादा भाग इ. वर शस्त्रक्रिया करण्यासाठी इंग्लंडचे प्लास्टिक सर्जन डॉ. अश्विन पावडे गेल्या १४ वर्षांपासून दर दिवाळीला न चुकता आनंदवनात येतात. शस्त्रक्रियांदरम्यान व नंतरही त्यांना फ़िजिओथेरपिस्टची गरज भासते. डॉ. पावडे दरवर्षी आपल्यासोबत फ़िजिओथेरपिस्टची टीम घेऊन येतात. मात्र भारतातच एक सक्षम टीम बनावी यादृष्टीने २०१३ पासून ही जबाबदारी गौरी चौधरी (निर्माण ४) व तिची मैत्रीण अर्चना रानडे यांनी सांभाळायला सुरुवात केली आहे.
शस्त्रक्रिया शिबिरानंतर दीड महिन्यांनी गौरी व अर्चनाने शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचे फ़िजिओथेरपी शिबीर घेतले. दीड महिना हालचाल नसल्यामुळे रुग्णाची शस्त्रक्रिया ज्या भागात झाली तेथे ताकद कमी असते आणि प्लास्टर काढल्यानंतर अचानक हालचाल करणे कठीण जाते. त्यामुळे या शिबिरात शस्त्रक्रिया झालेल्या भागाचे परीक्षण (उदा. पूर्वी वाकडा असणारा हात शस्त्रक्रियेनंतर सरळ झाला आहे का?), त्या भागाला मसाज करणे, हालचाली व्यवस्थित होण्यासाठी व्यायाम करून घेणे या जबाबदाऱ्या दोघींनी पार पाडल्या. या शिबिरांच्या निमित्ताने अपवादात्मक परिस्थितीत येणाऱ्या गंभीर रुग्णांची काळजी कशी घ्यायची हे शिकायला मिळाल्याचे गौरीने सांगितले.

स्त्रोत- गौरी चौधरी, gauriec@gmail.com  

निर्मलग्राम पुरस्कृत गावात शोध स्वच्छतेचा

यशश्री धाये (निर्माण ५) ही यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूरची civil engineering ची विद्यार्थिनी. वानाडोंगरी हे गाव तिच्या कॉलेजच्या रस्त्यावर आहे. या गावाला शौचालय बांधणीसाठी दिला जाणारा निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे, मात्र गावातील एका विशिष्ट भागात शौचालये नाहीत. या भागातील लोकांची गैरसोय होतेय, त्यांना उघड्यावर शौचासाठी जावं लागतंय, हे लक्षात आल्यावर यशश्रीने गावकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली. त्या भागातील लोकांना निर्मल ग्राम पुरस्कार योजनेची माहिती देखील नव्हती. मग तिला या विषयावर काहीतरी काम करावं असं वाटू लागलं. कामाची पहिली पायरी म्हणून तिने सर्व्हे करण्याचं ठरविलं. कुटुंबातील एकूण व्यक्ती, उदरनिर्वाहाचे साधन, आर्थिक परिस्थिती, शौचालयासाठी जागेची उपलब्धता, शौचालायाविषयी त्यांचा प्रतिसाद इ. गोष्टींचा तिने सर्व्हेद्वारे अभ्यास केला. या कामात भाग्यश्री खाकरे आणि रोहन केशरे यांचाही सक्रीय सहभाग होता. ‘संडास ही लोकांना गरज वाटत नाही, सरकारने फुकट बांधून दिला तरच लोक संडास बांधायला तयार होतात.’ या प्रचलित समजाच्या अगदी उलट ‘कोणी मदत करणार असेल तर संडास बांधण्यासाठी लोक पदरचे पैसेदेखील मोजायला तयार आहेत.’ असे यशश्रीचे निरीक्षण आहे. या कामातून data collection चे महत्व कळले आणि सध्याच्या तिथल्या व्यवस्थेमधल्या नियोजनाच्या त्रुटीही लक्षात आल्या असं यशश्री म्हणाली. 
स्त्रोत- यशश्री धाये, yashaadhaye19@gmail.com