'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 21 March 2017

समाजासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय?

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या दहा वर्षांत निर्माणच्या एकूण सहा बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची वेगळीनजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा प्रश्न :

तुमच्या मते समाजिक काम म्हणजे काय? त्याची गरज व व्याप्ती काय?

'सामाजिक काम करणे'/ 'चळवळीतला कार्यकर्ता बनणे'/ 'तळागाळातल्या (Bottom of the pyramid) लोकांच दुख: दूर करण्यासाठी काम करणे'/ 'व्यवस्थेत अंगभुत असणार शोषण कमी करण्यासाठी व्यवस्थापरिवर्तनाच काम करणे' म्हन्जे नेमकं काय? हे मला कधीच समजल नाही. चळवळ/ अन्याय/ दुख:/ व्यवस्था/ शोषण अशा शब्दांच धुकं पार करून गेलेले काही मित्र नक्कीच भेटले. पण ते जे काही करत होते त्याला 'सामाजिक काम' किंवा दुस-याला काहीतरी मदत करत असल्याची आणि स्वतःच काहीतरी नुकसान सोसत असल्याची भावना उत्पन्न करणार नाव द्याव अस नाही वाटल. त्यापैकी एखादा डॉक्टर म्हणून त्याच त्याच काम करत होता. एखादा इंजिनियर म्हणून तर एखादा शिक्षक म्हणून त्याच त्याच काम करत होता. एक जण तर भारतीय नागरिक म्हणून त्याच त्याच काम करत होता.
त्यामुळ मग मला अस वाटत की मी एक व्यक्ती म्हणून जगत असताना माझ्या गरजा भागवण्यासाठी इतरांनी केलेल्या कामाचा उपयोग मला होतो तसच मी पण इतरांची कुठलीतरी गरज भागवणारं काम कराव म्हंजे मग या देवाणघेवाणीतून समाज नावाची यंत्रणा चालू राहील. आता कोणाची कोणती गरज भागवण्यासाठी काम केल जातय यावरून काहीतरी वर्गीकरण करता येतील. पण तस न करता सगळ्याच गरजेच्या कामांना सारखच समजाव अस मला वाटत.
निरंजन तोरडमल, निर्माण ५


परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मित्राला भेटले. तिथे तो माझी ओळख करून देताना म्हणाला, ही चारुता, ही सध्या Public Health मध्ये पीएचडी करत आहे. हिने डॉ. अभय बंगांबरोबर काम केले आहे. मित्राची बहिण लगेच म्हणाली, “अरे वा तुझी आणि माझ्या आईची ओळख करून दिली पाहिजे, तिलाही सोशलवर्क ची आवड आहे.मी विचार करता करता अडखळले, बंग करतात ते सोशलवर्क आणि चारुता बंगांकडे काम करायची म्हणजे ती पण सोशलवर्क करते. चारुता Public Health शिकते म्हणजे Public Health हेही समाजकार्य झाले का? सामाजिक काम म्हणजे काय? त्याची व्याप्ती काय आणि कोणते काम असामाजिक असू शकते? माझ्यासमोर अनेक प्रश्न उभे ठाकले.
रूढार्थाने सामाजिक काम म्हणजे लोकांच्या थेट आयुष्याशी संबधित आणि नाममात्र किंवा कोणताही आर्थिक मोबदला ना घेता केलेले काम. मग ते अंध व्यक्तीला writer म्हणून काम करणे असो, नियमित रक्तदान करणे असो, गरजू लोकांना आरोग्यसेवा देणे असो, गरीब वस्तीतील मुलांसाठी अभ्यासाचे वर्ग घेणे असो किंवा बिल गेट्स फाउंडेशन करत असलेले HIV AIDS चे काम असो, ही सर्व कामे समाजिक कामातच मोडतात.
बँकेत काम करणारा कॅशिअर, भाजी विकणार हे देखील खरतर समाजोपयोगी काम करत असतात. अगदी विप्रो कंपनीतील इंजिनीअर सुद्धा उपयोगी कामच करत असतो. पण त्याचा लाभार्थी त्याला थेट दिसत नाही आणि याचा तो भरघोस मोबदला घेतो या निकषांवर तो समाजिक काम करत नाही असे ठरविले जाते. याविषयीचे माझे मत अजून पक्के नाही. सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारी व्यक्ती ही विप्रोमधील व्यक्तीपेक्षा किंचित अधिक श्रेष्ठ आहे का? माझ्या मते नाही, पण ही समाजधारणा मात्र आहे.
अत्यंत प्रामाणिकपणे लिहायचं तर या लोकांच्या मताचा सध्या माझ्यावर इतका पगडा आहे मी सामाजिक कार्याची व्याख्या करू शकत नाही. पण हेही तितकच खर आहे कि हा प्रश्न जरी मला पडला असला तरी उत्तराची मला फारशी भूक नाही किंवा घाई नाही. कारण जो पर्यंत मी विध्वसंक काम करत नाही. तोपर्यंत मी समाजिक काम करते आहे असेच समजेन. सामाजिक किंवा असामाजिक हे वर्गीकरण येथे अकारण ठरते.
चारुता गोखले, निर्माण १


समाज या संकल्पनेची व्याप्ती बरीच मोठी आहे. समाजाचा, सिस्टीमचा रहाटगाडा सुरळीतपणे चालवा यासाठी असंख्य मानवीय नैसर्गिक घटक प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे काम करत असतात. समाजातील प्रत्येक घटक वेगवेगळी कामे करताना, सामाजिक जवाबदारी पार पडताना आपल्याला दिसतो. मी कामावरून घरी जात असताना रस्त्याच्या कडेला दिसलेलं फुलपाखरू असू देत की चौकात उभा असणारा ट्राफिक हवालदार, प्रत्येकाच स्वतःच एक वैशिष्टपूर्ण स्थान आहे. शिक्षक मुलांना शिकवत असतात, डॉक्टर रोग्यांना सेवा देत असतो, बस ड्रायव्हर लोकांची ने-आन करत असतो, सफाई कामगार सफाई करतो इ. हे सर्व घटक महत्वाचे आहेत, ते सर्व सामाजिक कामच करत आहेत.
आक्रमक धर्मसत्ता, औद्योगीकरण, भांडवलशाही, सो कॉल्ड सिव्हिलायझेशन यांचा जागतिक रेटा व त्याचा मुठभर लोकांना झालेला फायदा यामुळे आहेरे आणि नाहीरे वर्ग समाजात उदयास आला आहे. शासन, राज्यकर्ते, नेते व सक्षम नागरिक यांचे उपेक्षित वर्गाकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या भौतिक व भावनिक गरजा पूर्ण होत नाहीत व समाजामध्ये प्रचंड असमतोल निर्माण होतो.
म्हणजेच समाजाचा रहाटगाडा अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी मुख्य दोन प्रकारच्या कामाची गरज आहे.
१.           रुटीन कामे करणे
२.           असमतोल दूर करणारी कामे करणे
मला वाटत जगातील विविध प्रकारचे असमतोल, विषमता, अन्याय दूर करणारे लोक एक अधिक चांगला माणूस म्हणून प्रतीके निर्माण करत असतात जी सिव्हिलायझेशन ला सकारात्मक दिशेने पुढे जाण्यास मदत करतात. वैज्ञानिक पद्धतीने, सर्जनशीलपणे, सह्वेद्नेला साक्ष ठेऊन समाजातील प्रश्न सोडवणाऱ्या बुद्धिमान तरुणांना मी सामाजिक कार्यकर्ता म्हणेन.
सामाजिक काम कशाला म्हणायचं याचा विचार करताना मी करत असलेल्या कामाची युटीलीटीकाय हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो. थंडगार ज्यूस पिऊन बसलेल्या माणसासाठी पाण्याच्या एका ग्लासची युटीलीटी व उन्हातान्हात अनवाणी भटकणाऱ्या व्यक्तीसाठी पाण्याच्या त्याच ग्लासची युटीलीटी खूप वेगळी असेल. मला वाटत सामाजिक काम देखील असच आहे, पाण्याचा ग्लास तोच पण मी तो कुणाला देण्याच काम करत आहे यावरुन ते काम किती सामाजिक आहे हे ठरत.
प्रफुल्ल शशिकांत, निर्माण ५


मला वैयक्तिकदृष्ट्या सामाजिक कामात आनंद मिळतो, हे काम आव्हानात्मक आहे व त्याची गरज आहे म्हणून समाधान लाभते, या गोष्टींच्या पलीकडे जाउन मुळात सामाजिक कामाची अथवा सामाजिक क्षेत्राची गरज काय यासंबंधी विचार करायची संधी या प्रश्नामुळे मिळाली.
समाजाला सुरळीत चालण्यासाठी गरजेचे असे कायदेकानून व नीती बनवणे हे प्रामुख्याने शासकीय क्षेत्राचे (Government Sector) काम आहे असे मला वाटते. लोकांना जगण्यासाठी आवश्यक अशा वस्तू व सेवा पुरवणे हे मुख्यत: खाजगी आणि व्यवसाय क्षेत्राचे (Private Sector) काम आहे. मग सामाजिक क्षेत्राची गरज आणि व्याप्ती काय? टिपिकल सोशल वर्कअशा निव्वळ भावनिकदृष्ट्या बुळबुळीत पद्धतीने न बघता सोशल प्रॉब्लेम सॉल्विंगअशा दृष्टीने विचार केला असता मला या कामाचे खालील पैलू जाणवतात:-
1. समाजातील सर्वात गरजू आणि राजकीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आवश्यक सेवा पुरवणे, कारण सहसा शासन व बाजार व्यवस्था यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
2. सत्तेचा असमतोल आणि विषमता दूर करण्याच्या उद्देशाने लोकांना सक्षम करणे आणि विकेंद्रीकरणाच्या व लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकट करणे.
3. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक असे कल्पक व नाविन्यपूर्ण उपाय शोधणे.
4.  समाजाच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या, आपला वाटा उचलण्याच्या अनेकाविध लोकांच्या इच्छेसाठी एक चॅनेल ऑफ एक्स्प्रेशनम्हणून काम करणे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, आर्थिक दाते, हितेच्छूक लोक, जागरूक नागरिक, अशा विविध मंडळींचा समावेश होईल ज्यांना त्यांच्या समाजाप्रतीच्या उत्तरदायीत्त्वाच्या पूर्तीसाठी मदतरूप असे एक माध्यम म्हणून सामाजिक क्षेत्र उपयुक्त ठरते.
5. मानवी समाज आणि संस्कृती ज्या अनेक मूल्यांना महत्त्वाचे मानते (उदा. त्याग, परोपकार, शौर्य, साधेपणा व शुचिता, इ.) त्यांची कायम जाण राहावी म्हणून, ज्यांच्याकडे समाज एक आदर्श म्हणून बघू शकेल, ज्याद्वारे समाजाची नैतिक उंची वाढत राहील असे व्यक्ती आणि कृतींच्या रूपातील रोल मॉडेल्ससमाजापुढे येत राहावेत म्हणून.
6. जेव्हा कुठे अन्याय होत असेल अशा प्रसंगी जागल्या” (whistle blower) म्हणून भूमिका पार पाडणे.
           - अमृत बंग, निर्माण 1


सामाजिक काम खरंतर नदीप्रमाणे आहे. म्हणजे त्याची गरज तर आहे परंतु त्याची व्याप्ती ठरवणं अवघड आहे. सामाजिक काम म्हणजे सर्व सुखवस्तूंचा त्याग करून समाजसेवा करणे वगैरे असं मुळीच नाही. खरंतर माझे शिक्षण, कौशल्य, माझी मूल्ये व आवड या सर्वांची सांगड घालून कोणाचे हित होईल असे काम म्हणजे सामाजिक काम. त्यासाठी कोणताही मोठा त्याग करावा लागत नाही. याउलट असे काम करत असताना माझीच सर्वांगीण वाढ होणं अपेक्षित असते. आणि असे काम केल्याने माझ्याच जगण्याला अर्थ प्राप्त होईल.
कल्याणी पानसरे, निर्माण ६


समाजसेवा म्हणजे नैतिक बदल घडविणे. तो बदल मग गरजू व्यक्तीच्या मुलभूत गरजा मिळण्याचा असू शकतो, पर्यावरणाच्या विकासाचा असू शकतो किंवा कोणाची वैचारिक पातळी सुधारण्याचा असू शकतो.
  आज श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे (मला या पासून मुळीच नुकसान नाही) पण गरिबांना त्याचा काहीच फायदा न होता ते आणखी गरिब होत चालले आहेत. आर्थिक विषमता ज्या तेजीने वाढत आहे त्याच तेजीने सामाजिक क्षेत्रात काम करण्याची गरज पण वाढत आहे.
महात्मा गांधींचे वाक्य आठवते, “The World has enough for everyone’s need, but not enough for everyone’s greed.”  गरिबी, आर्थिक विषमता, पर्यावरणाचा ह्रास, दुष्काळ, मातीची ढासळती सुपीकता, शेतकरी आत्महत्या, प्रदूषण (ध्वनी, वायू, जल, मृदा), वाढत्या आजारांची समस्या, व्यसनं, भ्रष्टाचार, बेरोजगारी, तरुणांचे चुकीच्या मार्गांवर भटकणे, हे सर्व सामाजिक प्रश्न एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. असलं चित्र पाहतांना सामाजिक कामाची गरज काय? या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागत नाही.
सामाजिक काम करणाऱ्या, करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांमध्ये निदान संवेदनशीलता जागृत होते, ज्याने त्यांची वृत्ती योग्य दिशेने धाव घेते. फक्त सामाजिक काम करणारेच नाहीत तर सामाजिक अस्पेक्ट्स ना लक्षात ठेवून दुसऱ्या क्षेत्रात काम करणारे सुद्धा, चांगले तरुण घडतात. मग तो तरुण सामाजिक क्षेत्रात असो कि सरकारी क्षेत्रात  कि कोर्पोरेट क्षेत्रात, तो आपली नैतिकता जपून कर्तव्य पार पाडतो.  चांगले तरुण घडणे या पेक्षा आणखी सामाजिक क्षेत्राची आणि कामाची व्याप्ती कशी मोजणार?
- प्रतिक उंबरकर, निर्माण ६


सोबत राहणाऱ्या काही व्यक्तींच्या समूहाला आपण समाज म्हणतो. अशा समाजात सर्वांना आनंदाने राहता यावं आणि समाज चिरकाल टिकवा यासाठी समाज काही नियम ठरवतो. बरेचदा किंवा आधीतर वेळेस हे नियम अलिखित असतात. बरेचदा लिखित देखील असू शकतात. पण समाजातील सर्व लोक एक समान नसतात. काही कारणांनी पुढे चालून इतरांच्या तुलनेत विविध दृष्टीने बलशाली असणारे लोक समाजचे नियम वाकवून त्यांचा स्वतःच्या हितासाठी गैरवापर करतात. यामुळे समाजात अनेक प्रकारच्या असमानतांचा जन्म होतो. समाजातील एका मोठ्या वर्गाचे त्यामुळे शोषण होऊ लागते. एक मोठा वर्ग ज्याचे प्रत्यक्ष शोषण नाही झाले तरी त्यांचे हक्क डावलून त्यांना उपेक्षित ठेवले जाते. त्यामुळे समाजाचे आरोग्य बिघडते, समाजात असंतोष निर्माण होऊ लागतो आणि तो समाज चिरकाल टिकण्यासाठी (sustain होण्यासाठी) अपात्र ठरतो.
आजचा आपला समाज काही अर्थाने असाच आहे हे आपल्याला दुर्दैवाने मान्य करायला हवं. या बिघडलेल्या समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी, समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मिळवून देण्यासाठी केल्या गेलेला प्रत्येक प्रयत्न म्हणजे माझ्या दृष्टीने सामाजिक काम आहे.
समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी, आनंदी, निरोगी आणि sustainable समाजाच्या निर्मितीसाठी अशा प्रकारचं सामाजिक काम खूप महत्त्वाचं आहे.
अशा प्रकारच्या सामाजिक कामाची व्याप्ती खूप मोठी असू शकते. आज खूप लोकांचे हक्क डावलले जातायत, खूप लोकांवर अन्याय होतोय आणि सर्वात वाईट याचं वाटत कि यापैकी बऱ्याच लोकांना आपल्यावर अन्याय होतोय किंवा हा आपला हक्क आहे आणि तो डावलला जातोय हे माहिती देखील नाहीये. समाजात आज खूप मोठी असमानता आहे. ही असमानता अनेक स्वरुपांची आहे, त्यामुळे जगण्याची समान संधी लोकसंख्येच्या खूप मोठ्या वर्गाला मिळत नाहीये. पर्यावरणाचा जो ह्रास होतोय त्यातून तर आपण आपल्या स्वतःच्या देखील निरोगी जगण्याचा हक्क नाकारतोय. हे आणि असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक कामाची व्याप्ती देखील तेवढी मोठी असायला हवी.
आपल्या आणि उद्याच्या पिढीच्या आनंदी, समाधानी जीवनाचा तेवढा एकच आशेचा किरण आहे असं मला वाटत. आज मी प्रयत्न केला नाही तर उद्या परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल. नक्कीच! 
- शैलेश जाधव, निर्माण ६


'सामाजिक काम' म्हटलं की 'मदर टेरेसा', 'महात्मा गांधी ' व्हायचय का? असा टोमणा हमखास मिळतो. पण एवढ्या दूरपर्यंत कशाला जाता? आयुष्य जगण्यासाठी केलेल्या प्रत्येक कृतीचा समाजावर काय, कसा आणि किती (चांगला /वाईट ) परिणाम होतोय, त्यावरून ते काम सामाजिक आहे की स्वतःपुरते मर्यादित आहे हे समाजच ठरवतो.
 जरा समाजाकडे पाहिले आणि माझी तिथे किती गरज आहे हे दिसण्याऐवजी माझ्या 'मी' पणाचा गंज चढलेल्या मेंदूला (मनाला) ह्या समाजातल्या घटकांची, शिस्तीची, मूल्यांची किती जास्त गरज आहे हे जाणवायला लागते.
समाजात रहायला आवडतं! मग आंधळेपणाचा आव तरी का आणायचा? कचरा इतरत्र टाकून, विडी सिगारेट चा धूर सोडून, गुटखा तंबाखूच्या पिचकार्‍या मारून; बसगाड्या, रेल्वे, सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ व दुर्गंधीत न करणे हेच मोठ्ठ सामाजिक काम आहे! त्याची नितांत गरज आहेच. आणि ह्या सर्व असंस्कृत कृती इतरांना करू न देणे ही सामाजिक कामाची व्याप्ती!
मला वाटते, एवढे भान असणे पुरेसे आहे, पुढच्या दूर पर्यंतच्या वाटचालींकरीता!
-         सुजाता पाटील, निर्माण ६.


 “आपल्या क्षमतेचा, कौशल्यांचा, विचारांचा लोकांसाठी वापर करून त्यांच्या समस्या कमी करण्याचा प्रयत्न करायचा. हे करत असताना समाधान आणि आनंद मिळायला हवा.” – हेच काय ते सामाजिक काम. अजून काय वेगळं! असं वाटायला लागलेय मला.
आपल्याला ज्या कामाची गरज आहे असे वाटते ते न करता लोकांची काय गरज आहे?(आपण ज्या क्षेत्रात काम करतो तेथील लोक) त्यांना काय हवे आहे याचा विचार करून त्यासाठी काम करणे म्हणजे नेमके काम !
हे काम करत असताना मी नाही ठरवले की माझ्या कामाची व्याप्ती काय असावी? रचनात्मक काम कोणत्याही क्षेत्रात, कोणासाठीही, कधीही, कोणीही आणि कोणत्याही माध्यमातून केले जाऊ शकते. त्याची व्याप्ती ठरवणे म्हणजे बंधन घातल्यासारखे वाटते. आपणच आपल्याला नव्याने ओळखत जातो आणि अधिकाधिक प्रगल्भतेने विषयाचा योग्य आशय समजून काम करतो. काम आपोआपच विस्तारत गेले पाहिजे. उदा. मी शिक्षण क्षेत्रात काम करते, तर त्यातील कोणत्याही/प्रत्येक पैलूवर मला काम करता आले पाहिजे, त्यासाठी मी माझ्या क्षमतांचा विकास केला पाहिजे. किमान तसा प्रयत्न करण्याची माझी तयारी असली पाहिजे.
-        अद्वैता वर्तक, निर्माण ५


खरे पहिले तर आपण करतो ती सगळी कामे सामाजिकच असतात, तरी पण यापैकी काहीच कामांना लोक रूढ अर्थाने सामाजिक कामम्हणतात. हा प्रश्न जर विचारायचाच असेल तर सोशल वर्कया शब्दापेक्षा सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हींगअसं शब्दप्रयोग अधिक उचित ठरेल. असो.
आपल्या समाजात सध्या खूप साऱ्या समस्या आहेत. गरिबी आहे, व्यसनांचे प्रमाण खूप आहे, शेतकरी आत्महत्या, नद्यांचे प्रदूषण, भूजल पातळी खालावत आहे  इ. इ... ह्या समस्या सोडविण्यासाठी काम करणे म्हणजे समाजिक काम होय. आपल्या समाजातील समस्या खूप प्रकारच्या आहेत, त्यामुळे समाजिक काम करण्याचे प्रकार देखील खूप आहेत. समस्या फक्त गरिबांच्या नाहीत, फक्त ग्रामीण भागातल्या लोकांच्या नाहीत तर त्या सगळ्यांच्याच आहेत. फक्त आर्थिक नाहीत, आरोग्याच्या, पर्यावरणाच्या, शिक्षणाच्या, वाहतुकीच्या इ. सगळ्याच क्षेत्रात आहेत. त्यामुळे समाजिक काम करण्याच्या संधी देखील प्रत्येक क्षेत्रात आहेत. त्यामुळे शहरातील एखाद्या सोसायटीमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि शेतमालाला भाव मिळावा म्हणून प्रयत्न करणे दोन्ही सामाजिकच कामे आहेत.
साधारणतः समाजिक बदल घडविण्याचे पाच प्रकार सांगितले जातात. (हे असेच वर्गीकरण करावे असे म्हणणे नाही, पण सामाजिक कामाची व्याप्ती समजायला याची मदत होईल.) याची काही उदाहरणे पाहू..
१.  सेवा गडचिरोलीतील आदिवासींना आरोग्यसेवा पुरवण्याचे डॉ. मंदा आणि प्रकाश आमटे यांचे कार्य
२.  शिक्षण यात फक्त मुलांचेच शिक्षण नाही, तर आरोग्य शिक्षण, कायद्याचे शिक्षण यांचा देखील समावेश करता येईल. उदा. वयमही संस्था पालघर येथे आदिवासींना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षण देते - वन हक्क कायदा, पेसा, माहितीचा अधिकार
३.  संघर्ष नर्मदा नदीवरील सरदार सरोवर विस्थापितांना न्याय मिळवून देण्यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्त्वाखाली उभारलेले आंदोलन
४.  संशोधन डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी विंचू दंशावर जे संशोधन केलं आहे. ते अख्या जगामध्ये मान्यताप्राप्त झालं आणि त्यामुळे शेकडो लोकांचे प्राण त्यांनी वाचवले.
५.  सामाजिक उद्योजगता हरीश हांडे यांनी सौर उर्जा कंपनी ची स्थापना करून ग्रामीण भागात वीज पोहोचवली, विवेक सावंत यांनी MSCIT या कोर्स द्वारे हजारो लोकांना संगणक साक्षर केले.
-    आकाश भोर, निर्माण ५


          जन्म आणि मृत्य यामधील कालखंडास मी जगणं संबोधतो. प्रत्येकाच्या आयुष्यात हा जगण्याचा कालावधी येतो मात्र ते जगणं तेव्हाच पूर्ण होऊ शकत जेव्हा या प्रवासात कुठेतरी सामाजिक कामात आपले योगदान असेल. सामाजिक काम एखाद्या सरळ सोप्या व्याख्येत बांधता येणार नाही मात्र समाजातील वंचित, दुर्लक्षित समाजघटकांसाठी आपण केलेली एखादी कृती त्यांच्या मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत असतील तर ते एक सामाजिक काम म्हणता येईल.
           अविनाश पाटील, निर्माण ६

आकाश, शेखर, निखिल, प्रताप, अमोल, रंजन, भूषण, प्रणाली, श्वेता, विवेक आणि कल्याण यांची उत्तरे येथे वाचता येतील  –

सामाजिक काम हेच करिअर निवडताना भीती नाही वाटली? (भाग २)

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या दहा वर्षांत निर्माणच्या एकूण सहा बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची वेगळीनजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा प्रश्न :

आयुष्याची, करिअरची अत्यंत महत्वाची वर्षे सोशल कॉजला देताना भीती नाही वाटली? त्यावेळी काय फायद्यातोटय़ाचा विचार केला?

इंजिनिअरींगच्या शिक्षणाने मला कौशल्य व आत्मविश्वास दिला. चांगलं करीअर म्हणजे मोठी challenges स्वीकारणे, प्रॉब्लेम्स सोडवणे याची उर्मी, प्रचंड इच्छाशक्ती दिली. मला वाटतं, या आधारे आम्ही पण इतरांसारखेच करीअर करत आहोत. फक्त निवडलेली challengesही थोडी वेगळी आहेत. social challenges आहेत. ही वेगळी आहेत म्हणूणच अवघड वाटतात. पण आपण जेवढं टफ, अवघड काम तेवढं ते करीअर भारी समजतो. मग खर तर सोशल कॉजमुळे आपले करीअर भारी बनत असते !
- निर्माणमध्ये नायना( डॉ. बंग) हे सांगत नवीन काम/business करण्याची एक strategy:-blue ocean startegy. ज्या भागात निळा समुद्र आहे तिथे मासे पकडण्यात तुम्हाला यश मिळू शकते. कारण इतर सर्व लाल समुद्रात मासे पकडण्याची गर्दी करत असतात व स्पर्धा करत असतात.  मला वाटतं social cause निवडून आम्ही करीअरसाठी blue ocean strategy स्वीकारतो. म्हणूणच यश मिळवण्याचे चॅन्स वाढतात. खर तर यशाची मापदंड / बेंचमार्क ठरवण्याची आम्हाला संधी असते. हे तर किती भारी करीअर !
- दुसरी गोष्ट वेगळं काही करताना, आपण एकटेच आहोत म्हणूण भिती वाटत असते. ही भीती जे करतो त्याबद्दल कमी असते,या पेक्षा आपण एकटेच आहोत याची जास्त असते. निर्माणमुळे असा समविचारी गट मिळाला व भिती कमी झाली.
- सद्य शिक्षण व समाजव्यवस्थेत फायदे फक्त tangible, दृष्य स्वरूपातच पाहण्याची सवय लागली आहे. पैसा मिळाला तरच फायद्याचं असे समीकरण पक्कं असतं. खरतर tangible गोष्टी एका मर्यादेपलीकडे आपल्याला आनंद देऊ शकत नाहीत. मग ते ice cream असो नाही तर गाडी बंगला. पण intangible, अदृष्य रुपातील गोष्टी नित्यनवा आनंद देत असतात. अशा intangible गोष्टी म्हणजे एखाद्या किचकट प्रॉब्लेमचं सोलूशन सापडणं.... ते विश्वासाची realtions बनणं, प्रेम, धन्यवादाचं smile, समाधान... यादी न संपणारी आहे. मला वाटतं आमच्या करीअरची ही खरी कमाई, खरा फायदा ! Tangible गोष्टी,पैसा हे तर बोनस आहे !
-आश्विन भोंडवे, निर्माण ३
ज्ञान प्रबोधिनी, हराळी


Start with End या तर्काने खूप विचार केला तेव्हा मला उत्तर मिळाले कि आयुष्याच्या शेवटी माझ्याकडं किती संपत्ती आहे ह्याच्यापेक्षा मी किती जणांना उपयोगी पडू शकले हे महत्वाचे आहे. निर्माण कॅम्प मध्ये नायनांनी सांगितल्याप्रमाणे Need आणि Greed या माझ्या मला ओळखता आल्या. त्या नंतर एखाद्या सोशल कॉजला आयुष्य देताना कसलीच भीती नाही वाटली.
माझं Profession चार्टर्ड accountant (CA). तरी पण मला सामाजिक संस्थांच्याच आर्थिक नियोजन साठी काम करण्यात  जास्त रस आहे. हीच माझी Main practice असेल (side practice नाही) याबाबतीत मी ठाम होते.
त्यासोबत आर्थिक गुन्ह्याच्या तपासा मध्ये सरकारी यंत्रणेला मदत करताना मला माहित असते कि मी जितकं चांगले काम करेन तितक सामान्ये लोकांना त्यांचे बुडालेले पैसे मिळतील. या दोन्ही कामात पैसे कमी मिळतात असे लोकांना वाटते पण तुमच्या गरजा भागवण्याइतके निश्चितच मिळते. रोज कामा ला जाताना मी खुश असते आणि येताना देखील. मी आज काहीतरी उपयोगी केलाय, इतका विश्वास असल्यावर आपण वेगळा मार्ग निवडल्याची कधीच भीती नाही वाटत.
गीता लेले, निर्माण ६
CA झाल्यानंतर गीता सध्या आर्थिक गुन्ह्याच्या तपासामध्ये सरकारी यंत्रणेला मदत करते


            'वैयक्तिक करियर विकसीत करणे' या फॅशनला फार जास्त महत्व देवू नये असं मला वाटत पण आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असाव असं पण वाटत.
म्हणून कॉलेज संपल्यासंपल्या, 'माझी आर्थिक गरज नेमकी किती?' हे मी 'व्यवस्थित' तपासून पाहिलं, आणि 'माझ्याजवळ असलेल्या कौशल्यांचा बाजारभाव खरचं किती?' हे पण तपासून पाहिलं. माझ्या गरजेइतके पैसे मी सहजच कमवू शकतो असं लक्षात आल्यामुळं आर्थिक असुरक्षिततेची भावनापण संपली.
                                                                                                                   
निरंजन तोरडमल, निर्माण ५
निरंजन Mechanical Engineer आहे. हमालांना पाठीचा त्रास कमी व्हावा या हेतूने ‘स्केलेटन’ बनवत आहे.              आयुष्य फार थोडं आहे, मस्त पैसे कमवायचे, मजा करायची आणि आयुष्यात एन्जॉय करायचं असतं असे माझे मित्र नेहमी मला म्हणायचे. पण मला मात्र नेहमी उलटच वाटायचं, की आयुष्य फार सुंदर आहे, फार मोठं आहे. आपण आपल्या आयुष्यात कोणाच्या कामी आलो नाही, कोणाच्या चेह-यावर आलेल्या आनंदाचं कारण बनू शकलो नाही तर आपलं आयुष्य निरर्थक ठरेल. म्हणून मी महाविद्यालयीन जीवनापासूनच 'आपलीच गाडी, आपलीच माडी आणी आपल्याच बायकोची गोल गोल साड़ी' या ठरावीक चक्रात न अडकता आपला तरुणपणीचा हा उमेदीचा काळ सोशल कॉजच्या (खरं तर हा सोशल कॉज नसून माझा आनंद त्यात आहे) गुंतवणुकीत टाकण्याचा निर्णय घेतला. आयुष्य छोटं जरी असलं तरीपण आपल्याला हे छोटं आयुष्य समृद्ध कसं करता येईल? हा प्रश्न दिवस रात्र माझ्या मानगुटीवर बसलेला असायचा. मी कला शाखेचा (चुकुन) विद्यार्थी असल्यामुळे पुस्तकांशी, साहित्यांशी बराच संबंध येत गेला. त्यामुळे जगाची, जगातल्या प्रश्नांची ओळख होत गेली आणि त्यातूनच पुढे समृद्ध होण्याचा मार्ग गवसत गेला.
              आपण नेहमी व्यवस्थेला शिव्या घालत असतो, नावं ठेवतो त्यापेक्षा आपन प्रत्यक्ष काम करू मग ते काम कितीही लहान असो. त्यात खारीचा का असेना माझा वाटा असला पाहिजे असे मला वाटायचे. आणि पुढे मी कशात रमतो? मला काय आवडतं जे करता करता मला गरजेपुरते पैसे मिळवता येतील? मी कोणती गोष्ट आयुष्यभर उदात्त ऊर्जेने करू शकतो? या गोष्टीचा मार्ग सापडला. परिस्थितिवरून आणी स्वानुभवावरून लहानपणापासूनच कमीत कमी गरजांमध्ये जास्तीत जास्त जगायची सवय लागलेली होती. पगार अतिशय कमी होता. माझ्या बाकीच्या मित्रांनी स्वत:चे घर घेतले, गाड्या घेतल्या, धंद्यात सेटल झाले. आपलं कधी हे होणार? आपण असेच मरणार का? असे प्रश्नंही मधे मधे डोकवायचे. घरच्यांनाही याने मित्रांसारखं रहावं असं खुप वाटायचं. पण मी बाकीच्या गोष्टींना प्रायोरिटीज न देता वर्तमानात जगण्यासाठी सध्याच्या आनंदावर फोकस करण्याचे निश्चित केले.
              कशासाठी जगायचंय हे लक्षात आल्यावर कसं जगायचं हा प्रश्न उरत नाही असे नायना नेहमी म्हणायचे. त्याचा मलाही प्रत्यय आला. भीती ही काल्पनिक असते. भीती या गोष्टीचीच  आपल्याला खुप जास्त भीती वाटत असते. त्या भीतीवर जर का आपण मात करून वरती चढलो तर आनंदाचा धबधबा आपली वाट बघत असतो हे नक्की..
डर के आगे जीत हैं...!
धीरज वाणी, निर्माण ६
धीरज जिल्हा परिषद नाशिक (ता. सटाणा) मध्ये सर्व शिक्षा अभियान विभागात कार्यरत आहे


आयुष्याची 4 वर्षे इंजिनीअरींग मधे घालवल्यानंतर आता पुढे काय करायचं हा एक मोठाच प्रश्न माझ्यासमोर होता. माझ्या असण्याचा, जगण्याचा मला हवं असेल किंवा नसेल, कुठल्यातरी लोकांवर फरक पडणारच आहे हे एव्हाना माझ्या ध्यानात आलं होतं. म्हणजे समजा मी एखाद्या कंपनीत काम करायला गेलो तर त्या कंपनीने बनवलेल्या उत्पादन वापरणार्‍या लोकांवर व एकूणच मी राहत असलेल्या जागेतील अर्थव्यवस्थेवर माझ्या असण्याचा परिणाम होईल.
            मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलो. एखाद्या मध्यमवर्गीय कुटूंबातील मुलाच्या ज्या काही (आवश्यक आणि अनावश्यक) गरजा असतात त्या माझ्या आई वडिलांनी अगदी 100% पुरवल्या. ते माझ्या गरजा पुरवु शकतील या पातळीवर त्यांना पोचवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या कष्टांबरोबरच समाजातील खूप सार्‍या इतर लोकांचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कष्ट कारणी लागले आहेत. आणि कदाचित त्यातीलच खूप सार्‍यांच्या प्राथमीक गरजाच अजुनही पूर्ण होत नाहीयेत. मग माझ्या जगण्याचा नक्की कोणावर परिणाम व्हावा ?
मागिल 2 वर्षांपासून मी गडचिरोली जिल्ह्यातील दारु व तंबाखूच्या प्रश्नावर काम करतोय. एखाद्या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते व शास्त्रीय पद्धातीने एखाद्या प्रश्नाला कसे हाताळावे हे मी या काळात शिकलो. सतत लोकांपासुन दुर पळणारा मी लोकांशी संवाद साधायला व त्यातून एकूणच इतरांच्या साधेपणातील सौंदर्य अ‍ॅप्रिशिएट करायला शिकलो, शिकतोय.
काम करत असताना सतत स्वतःचे कम्फर्ट झोन तोडावे लागले.  मनात उडणारा वैचारिक गोंधळ, सतत येणारे भावनिक चढ -उतार, एकुणच आयुष्यातील अनिश्चीतते बद्द्ल वाटणारी भीती, प्रत्यक्ष काम करताना येणा-या  अडचणी हे सर्व हाताळताना मित्रांकडुन अगदी न थकता वारंवार मिळत असलेलं प्रेम व विश्वास यातुनच   स्वतःबद्द्ल व इतरांबद्दल असलेली माझी समज वाढतेयमाणुस म्हणुन मी सतत वाढतोय.  
आता यात नक्की कोणी कोणाला काय दिलं ?
प्रतिक वडमारे, निर्माण ६
प्रतिक गडचिरोली मध्ये दारू व तंबाखू विरुद्ध सुरु झालेल्या ‘मुक्तीपथ’ अभियानात काम करतो.            आवडणारं काम जे नैतिक सुद्धा आहे, ते काम करण्यास भीती कसली? कामाला सुरवात करतांना फायद्यातोट्यांचा फारसा विचार केला नव्हता. कॉलेजच्या दिवसांमध्ये सोशल कामं करतांना त्या कामांचं समाधान मिळत गेलं आणि मी पूर्णवेळ सोशल सेक्टर मध्ये काम करायचा निर्णय घेतला.
            कॉलेज मध्ये माझ्या कामांचे मला काही फायदे झाले. जसे, चांगल्या लोकांसोबत वेळ, अनुभवी मेंटर्स, चांगल्या विचारसरणीचे मित्रं, ‘निर्माणसारखे प्लेटफॉर्म, इत्यादी. एक आधार देणारा लोकसंग्रह एकविसाव्या वर्षातच  मिळाला. वेगवेगळ्या क्षेत्राचे मित्रं व त्यांचे वेगवेगळे अनुभव आणि कामाच्या अनुभवांनी बरच नवीन शिकवलं.
            तोट्यांचा खूप जास्त विचार केलाच नाही. माझ्या बऱ्याच इनसेक्युरीटीज ह्या समाजाने लादलेल्या आहेत असे वेळीच लक्षात आले. काही तर सोशल सेक्टर मध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रांच्याच इनसेक्युरीटीज माझ्या डोक्यात घर करून बसल्या होत्या. पण त्याच्यावर विचार केल्यानंतर लक्षात आले कि त्या माझ्या नाहीतच. हो, वडील थोडे नाराज आहेत म्हणून आमच्यात दुरावा निर्माण होणार असली भीती वाटायची. त्या नाराजी पेक्षापण आमच्यात न व्यक्त होणारा जिव्हाळा खूप जास्त आहे हे आता जाणवते. म्हणून दुरावाव्याची भीती संपली. सध्या करत असलेल्या कामामध्ये समाधान तर आहेच सोबतच भरपूर शिकायला पण मिळत आहे.

प्रतिक उंबरकर, निर्माण ६
प्रतिक समाज प्रगती सहयोग या संस्थेत अमरावती येथे रोजगार हमी या विषयावर काम करतो.


इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यावर आता काय करू हे ठरवताना भीती / चिंता तर नक्कीच वाटली. मी सामाजिक क्षेत्रात काम करायच ठरवल तर मी सेटल होईल का? मी तर इंजिनीअरिंग केलंय, मग आता कशा प्रकारचे काम करू? मग माझ्या करीअर च काय? मी एकटा पडलो तर? आणि सगळ्यात महत्त्वाच घरच्यांना काय सांगू? त्यांची पण जबाबदारी आहे माझ्यावर. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यात निर्माण प्रक्रियेची खूप मदत झाली. माझ्या गरजा किती याच गणित मांडल्यावर, पैशांची वाटणारी चिंता दूर झाली.
मग पुढचा प्रश्न होता, कोणत्या प्रकारचे करीअर निवडू? मी इंजिनीअर आहे, मग ते फील्ड सोडून इकडे येणे कितपत योग्य आहे? गरज कुठे आहे असा प्रश्न विचारून पहिला तर उत्तर आलं, दोन्हीकडे आहे. मग माझ्या सिनिअर निर्माण च्या मित्रांची यात मदत झाली. निखिलेश म्हणतो, “मी घेतलेल्या शिक्षणामुळे माझ्या कामाची कक्षा मर्यादित नाही झाली पाहिजे, तर मला जे करायचं आहे, त्यात मदत झाली पाहिजे. मी इंजिनीअर ‘पण’ आहे.” विक्रम म्हणतो, “माझी worth कशावर ठरते? मला मिळणाऱ्या पगारावर कि मी काम करत असलेल्या challenge वर?” या मित्रांमुळे एकटे पडण्याची भीती पण गळून गेली.
मला वाटणारी भीती मी ‘घरचे नाही म्हणतील’ यामागे लपवत तर नाहीये ना, याची मी माझ्याच मनाशी खात्री करून घेतली. मी ह्या प्रकारचे काम करतोय म्हणजे माझ्या जबाबदाऱ्यांपासून तर दूर पळत नव्हतो. आणि मला वाटत कि एकदा ही गोष्ट पटली कि घरच्यांना पटवणे तुलनेने सोप्पे असते. शेवटी तुम्ही आनंदी असण्यातच त्यांचा आनंद असतो.
आकाश भोर, निर्माण ५नाही, भीती नाही वाटली, पण थोडी असुरक्षितता वाटली. कारण कॉलेज संपल्यानंतर बऱ्याच जणांचं ठरलेल असत कि कुठं जॉब करायचा, एमपीएससी, युपीएससी करायच ई. पण सोशल सेक्टर मध्ये काम करताना काही ठरलेलं नसते. कामाबद्दलची किंवा पैशाबद्दलची असुरक्षितता असते. आजूबाजूचे संबंधी, नातेवाईक यांना प्रश्नांची उत्तरे देताना फारच दमछाक होते आणि वाटायला लागत खरच मी जो मार्ग निवडला तो योग्य आहे कि नाही.पण हे सुद्धा आत्मपरिक्षणाच्या दृष्टीने फारच महत्वाचे असते.
         मूळातच सोशल सेक्टर निवडताना जे निकष असतात त्यात 'पैसे' हे कामा नंतर येणारा भाग असतो, काम महत्वाचे. त्यामुळे फायद्या-तोट्याचे निकष हे आपण करीत असलेल्या कामावरूनच आखल्या जातील. पण पैसे देखील महत्वाचे आहेतच. सामाजिक क्षेत्रात काम करायला आवडते, लोकांसोबत काम करताना मजा येते व समाधान पण मिळते या निकषावरुन फायदे जास्त आहेत. पण गलेलठ पगार नाही किंवा मुंबई, बेंगलोर सारख्या ठिकाणी फ्लॅट नाही किंवा महागडी गाडी नाही ह्या भौतिक सुखाचे निकष समोर आणले कि वाटते कि काही चुकतंय का आपलं. स्वताहून स्वतःच्या विकासावर अडथळा केला नाही ना असे वाटायला लागते.
पण स्वतःच्या गरजा defined केल्या तर सामाजिक क्षेत्रात, विकास क्षेत्रात काम करण्यात काहीच तोटे नसतात.
रवींद्र चुनारकर, निर्माण ६
रवींद्र शिक्षणाने इंजिनिअर आहे व सध्या पालघर येथील वयम या संस्थेत काम करतो.

साधना, कुणाल, राजू आणि अमोल यांची उत्तरे येथे वाचता येतील.