'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 21 March 2017

सामाजिक काम हेच करिअर निवडताना भीती नाही वाटली? (भाग १)

उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या दहा वर्षांत निर्माणच्या एकूण सहा बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची वेगळीनजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा प्रश्न :

आयुष्याची, करिअरची अत्यंत महत्वाची वर्षे सोशल कॉजला देताना भीती नाही वाटली? त्यावेळी काय फायद्यातोटय़ाचा विचार केला?

हा प्रश्नच मला रुचला नाही, घाबरलेल्या मन:स्थितीत विचारलेला वाटतो, आणि मला तर लागूच होत नाही कारण मी कोणालाही काहीही दिलेलंच नाही! वर्षही नाहीत! माझ्या आयुष्याची वर्ष मी कोणालाही कशी बरी देईन? मग तर त्या वर्षांवर माझा हक्कच नाही राहणार, ममत्वच नाही राहणार, ती वर्षच माझी नाही राहणार, माझ्या आयुष्यातून वजा होतील..
मी सोशल कॉजला अजिबात माझी वर्ष दिलेली नाहीत, उलट मी 'सोशल कॉजला', सामाजिक प्रश्नांना माझ्या आयुष्यात स्वीकारलंय! ते पाहिलेही होतेच, पण मी त्यांच्याकडे पाठ फिरवून बसली होती जणू. आत्ता मी त्यांचं अस्तित्व ओळखलंय, नोंदलंय, एक्नॉलेज केलंय. मी कोणालाही काहीही दिलेले नसून, माझ्यासाठी एका जीवनपद्धतीचा स्वीकार, अंगीकार केलाय, ज्यात मला स्वतःला कम्फर्टेबल वाटतं. हा स्वीकार सजगतेने केलाय, इतरांचं पाहून, किंवा काही वर्षांचा प्रयोग म्हणून नाही.
मला जर सरळ सरळ स्पष्टपणे दिसत होतं, की चंगळवादी जीवन जगून मला मजा नाही येत, समाधान नाही मिळत,रितं, रितं वाटतं. माझी भूक वेगळीच आहे, जी चंगळवादाने नाही भरत, तर मी 'खूप पैसे देणाऱ्या' पण मला समाधान न देऊ शकणाऱ्या सध्या 'mainstream' झालेल्या करिअरचा आणि त्यासोबत लागणाऱ्या बंदिस्त (माझ्या दृष्टीने) जीवनशैलीचा स्वीकार कसा करेन ? सुरुवातीला करिअरच्या मुख्य प्रवाहातून फेकल्या जाण्याची, एकटं पडण्याची, लोकं काय म्हणतील, याची भीती वाटली; साहजिक आहे ते. पण मला हवं असलेलं आयुष्य मिळवायला ह्या गोष्टींचा सामना करणं क्रमप्राप्तच होतं.
बाकी फायद्या-तोट्याच्या बाबतीत मी खूप कच्ची आहे. मला नाही जमत एवढं अनॅलिसिस. सुरुवातीला वाटलेलं, की आपण रिस्क घेतोय, तर त्या रिस्कचं मॅनेजमेंट केलेलं असलं पाहिजे, बॅकअप प्लॅन्स वगैरे सुरुवातीला बनवले होते, पण कसलं काय? त्या प्लॅन्स प्रमाणे वागणं वगैरे काही जमलं नाही मला. सुरुवातीला आपटले जोरदार, पण तरीही वाचले. (आपोआप). हळूहळू (खूपच हळू) आपोआप ठीक पण झाले आणि उत्तरोत्तर उत्तरं पण मिळत गेली! ते म्हणतात "टफ टाईम नेव्हर लास्टस, टफ पीपल डू "  तसा काहीसा अनुभव आला. या एकूण अनुभवातून 'स्वतःचा धीर वाढवायला हवा', हे शिकायला मिळालं आणि आयुष्याच्या अनप्रेडिक्टबलनेस चा प्रसाद मिळाला..
पल्लवी मालशे, निर्माण ५
पल्लवी सध्या 'दिशा' फॉर व्हिक्टीम, या संस्थेत Research Documentation आणि Coordination चे काम करते. ही संस्था अमरावती येथे गुन्हा पीडितांच्या पुनर्वसनासाठी काम करते.


सामाजिक क्षेत्राबद्दल अनेक प्रस्थापित गैरसमज आहेत. हे जगणे फाटके आहे. इथे खूप आदर्शवादी होवून जगावे लागते. पार जंगलात खादीचे कपडे घालून वणवण फिरावे लागते. इथे पैसा नाही. इथे खूप गंभीर होवून राहावे लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचे की हे काम समाजाच्या मुख्य प्रवाहापासून खूप बाहेरचे आणि वेगळे आहे. या नजरेतून सामाजिक कार्यकर्त्यांकडे किंवा सामाजिक कामाकडे अनेक वर्षे बघितल्यामुळे महत्त्वाची वर्षे’ ‘भीती नाही वाटली का?’ किंवा वैयक्तिक फायदा तोट्याचे काय?’ असले घोडचूकप्रश्न तयार होतात.
माझ्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कुठली हे ठरविण्याचा अधिकार मी केव्हाच भोवतालच्या समाजाला देवून टाकला आहे. मी १०वी ला होतो तर ऐकले की हे सगळ्यात महत्त्वाचे वर्ष आहे. पण पुन्हा १२वी ला तेच. MBBS च्या फायनल इयर ला तेच. आता २ वर्ष झाले गडचिरोलीत काम करतोय तरी तेच. आता काम करणार तर तुझ्या आर्थिक भरभराटीचे काय? सेटल कधी होणार? लग्नाचे काय? असे म्हणून वर्तमान देखील महत्वाचा होवून बसला आहे. हे आयुष्य माझे आहे त्यामुळे मी ते कसे घालवेन हा अधिकार देखील माझा आहे. जर मला माझ्या स्वत:च्या आयुष्याची एवढी ownership देखील घेता येत नसेल तर माझ्या समाजासमोर आ वासून उभ्या असलेल्या प्रश्नांची ownership तरी मी कसा घेईल? भीती वाटत असते अमूर्ततेची. अनिश्चिततेची. मी असा जगेन आणि हे करेन असे ठाम ठरवून मी अनिश्चितता घालवतो. आणि अमूर्तता ही. मग भिती उरली कुठे?
ही ownership च ठरवते माझ्या वैयक्तिक फायद्याच्या किंवा तोट्याच्या व्याख्या काय असतील! दवाखान्यात जाणे afford करू शकणार नाही अशा आदिवासी जनतेसाठी त्यांच्या गावांत त्यांच्या घरासमोर दवाखाना घेवून जाणे आणि त्यांना बरे करणे हा मला माझ्या वैयक्तिक फायदा वाटतो. श्रीमंत जीवनशैली किंवा मोठा बंगला, गाडी माझ्या फायद्याच्या व्याख्येत बसत नसल्यामुळे ते मिळत नाही म्हणून मला त्याचे काडीमात्र दुख नाही. बंगला, गाडी, शहरी जीवन हे फायद्याचे निकष आहेत असे पण तर उच्चभ्रू समाजानेच ठरवलेले आहे. स्वत:चा फायदा तोटा ठरविता येणार नाही एवढा मी पंगू झालो आहे का? फायदा तोट्याचा विचार काय केला या आधी फायदा आणि तोटा म्हणजे काय हा विचार व्हावा लागतो. तो झाला की ownership येते आणि मग आयुष्याची महत्त्वाची वर्षेसार्थक!
डॉ. ह्रषिकेश मुनशी, निर्माण ६
 (ह्रषिकेश सर्च संस्थेत आदिवासी आरोग्या चे सेवा आणि संशोधना मार्फत काम करतो)Symantec या सॉफ्टवेअर कंपनीतला जॉब सोडून सोशल सेक्टर मध्ये पूर्ण वेळ उतरण्याचा निर्णय मी २००८ साली जेव्हा घेतला तेव्हा भीती काही वाटली नाही. आपण नेमके काय करणार, त्यातून नेमके काय होणार यासंबधी काही प्रमाणात साशंकता नक्कीच होती. पण त्यातील अनिश्चिततेची मजा ही चिंतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. Symantec मधील आय. टी. लाईफला मी एका वर्षाच्या आतच कंटाळलो होतो आणि भीती ही खरतरं याची होती की भरपूर पगार आणि सोईसुविधा यांमुळे मी इथेच अडकून पडलो तर....? त्या सुरक्षिततेच्या नादात जीवनात काही जास्त आव्हानात्मक आणि अर्थपूर्ण करण्याच्या संधींपासून मी परावृत्त झालो तर....?
आपण स्वत:च्या हिकमतीवर पैसे कमवू शकतो हा विश्वास आणि आर्थिक स्वावलंबनाची खात्री तर पटलीच होती. मग काही वेगळ करून बघण्याची याहून अधिक चांगली वेळ कुठली असेल?
...तर फायदा तोटा या पद्धतीने विचार केला असता ज्याला कधीनाकधी सोशल कॉजसाठी काही करायाचे आहे त्यासाठी आत्ताहीच वेळ सर्वाधिक चांगली आहे या निष्कर्षाला मी आलो.
पण सोबतच फायदा तोटा या पद्धतीच्या पलीकडील देखील निर्णयाची एक पद्धत आहे ती म्हणजे निकषाधारीत! काय काम करायचे हे ठरविण्याचे माझे निकष काय? केवळ स्वत:ची आर्थिक सुरक्षा/सुबत्ता की अजून काही?
एक इंजिनियर म्हणून I am trained as a problem solver, But whose problems and which problems? हा निर्णय मी माझा केला पाहिजे. माझी मूल्य काय, माझ्या priorities काय, या माझ्या कामाच्या निर्णयातून झळकतात.
मी कुठल्या लीडरशीपच्या सोबत काम करतो हा पण माझ्यासाठी महत्त्वाचा निकष आहे. सामाजिक कामात उडी घेताना काही great and glorious minds सोबत काम करायची संधी मिळणार, असे लोक ज्यांच्या कमिटमेन्ट आणि चारित्र्याविषयी मला प्रचंड आदर आहे अशांच्या सोबत रहायला, त्यांच्या मिशनमध्ये योगदान द्यायला मिळणार हा माझ्यासाठी खूपच मोठा मुद्दा होता. या संधीच्या पुढे भीती कुठच्या कुठे पळाली...!
मला असं वाटत की मी जेव्हा सोशल कॉजसाठी आयुष्याची काही वर्ष (किंवा सगळीच!) द्यायची अस ठरवतो तेव्हा ही काही निर्वात पोकळीतील (vacuum) उडी नसते. त्या निर्णयाप्रत मी केवळ भावनेच्या भरात आलो असेल तर ठेच लागण्याची शक्यता भरपूर असते. पण त्या निर्णयामागे जर काही वैचारिक प्रक्रिया झाली असेल आणि तो पाया जर भक्कम असेल तर मग भीती देखील वाटत नाही आणि अडथळ्यामुळे निरुत्साही देखील वाटत नाही.  

अमृत बंग, निर्माण 1


     लोकमत ऑक्सिजनचा जिंदगी वसूल अंक वाचला होता. त्याप्रमाणे जिंदगी वसूल जगायचं ठरवलं होतं. काहीतरी वेगळं करायचं हे लहानपणापासून वाटायचं, पण म्हणजे काय करायचं हे माहिती नव्हतं. लोकांशी जोडून काही तरी काम करायचं होतं. कामातून समाधान आणि आनंद मिळायला हवा, पैसे मिळाले पाहिजे पण फक्त पैसे मिळवण्यासाठी काम करायचं नाही हे देखील कळाल होतं. गरज पडलीच तर कधीही पोट भरण्याइतपत आपण कधीही कमवू शकतो हा आत्मविश्वास देखील सोबतीला होता.
पण म्हणून कामात पडताना भीती वाटली नाही असं नाही, पण त्या भीती पेक्षा कामात पडायची प्रेरणा आणि इच्छा जास्त तीव्र होती. स्वतः वरचा विश्वास आणि निर्माणची सोबत या मुळेच ही प्रक्रिया सोपी झाली.
शैलेश जाधव, निर्माण ६
शैलेश सध्या ‘कुमार निर्माण’ या उपक्रमाचा समन्वयक आहे.


              टीचभर लांबीचा माझा मनुष्यजन्म जेव्हा मी विश्वाच्या पसाऱ्यापुढे पाहतो तेव्हा माझं करिअरही गोष्ट क्षणात स्वाहा होऊन जाते व त्या मर्यादित लांबीची रुंदी अमर्याद करण्याचा मी प्रयत्न करतो. गोतम बुद्धांच्या डोळ्यातून मला एक गोष्ट स्पष्ट दिसते की जीवन दु:खमय आहे आणि मी ते दु:ख कमी करू शकतो. तसच भांडवलवादाकडून मी ही गोष्ट शिकलो की मी एक साधन आहे आणि समाजाने त्याचं दु:ख कमी करण्यासाठी माझा उपयोग करून घ्यावा; त्यामुळे नाही वाटली भीती.

प्रफुल्ल शशिकांत, निर्माण ५
प्रफुल्ल गेली ४ वर्षे ‘कुमार निर्माण’ या उपक्रमाचा मुख्य समन्वयक आहे.  तसेच निर्माण टीम चा देखील सदस्य आहे.भीती? कसली भीती?
              मला वैयक्तिक अशी कोणतीच भीती वाटली नाही. आयुष्याच्या वैगेरे, महत्त्वाच्या टप्प्यावर वैगेरे, सोशल कॉजला दिली वैगेरे आणि भीती वैगेरे. असं काही घडलं नाही माझ्याबाबतीत. सामाजिक क्षेत्रात काम करायचं म्हणजे काय, हेच लोकांना समजत नाही असं मला वाटतं. समाजाचा/ समाजातील प्रश्न सोडवणेइतका जरी साधासरळ आणि वरवर अर्थ घेतला (जो की नाहीये), तरी ही भीती जस्टीफाय होत नाही. कुणासाठी त्याचा समाज, त्याची लोकं म्हणजे त्याचं कुटुंब असेल, आप्तेष्ट असतील तर कुटुंबाचे प्रश्न सोडवायला कुणाला भीती वाटते का? कोण भीतीपोटी पळून जातो?
              आतापर्यंतच्या जडणघडणीत कुणाला तरी मदत केल्याचा आनंद गाठीशी असेल; कुणाची तरी दुःखं, कुठेतरी अन्याय दिसला असेल, बघितला असेल बहुधा. त्याचा परिणाम म्हणून माझ्या स्वची (किंवा माझा समाजया संकल्पनेची) व्याप्ती आपोआप वाढलेली असावी आणि वाढतच आहे. मी ती वाढवलेली नाही, ती माझ्या जडणघडणीचाच एक भाग आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्राला वर्षे दिली-बिली असं कधी वाटलंच नाही.
हां, तसं, माझ्या आईवडिलांना, बहिणीला, नातेवाईकांना वाटते भीती. भौतिक गरजा पूर्ण न होण्याची कदाचित ती भीती असेल. पण लहानपणापासूनच कमीतकमी रिसोर्सेसमध्ये जगायची सवयसुद्धा आईवडिलांनीच लावलीये. आणि गरज, इच्छा व मौजयातला फरकही सुदैवाने समजत गेला. म्हणून जगण्यासाठी खूप काही लागतं, असा भ्रम लहानपणापासूनच नव्हता. मग त्यांच्या भीतीला कितपत मनावर घेऊ?
              आणि अजून तरी मी काठावरच्या गुडघाभर पाण्यातच पोहतोय. समुद्रात खोल पाण्यात निर्भयपणे उतरलेली, कर्तृत्वाने खूप मोठी असलेली माणसं मला दिसतात ना काठावरनं. आणि खोल पाण्याच्या दिशेने पोहत जाणारी मोठ्या भावा-बहिणीसारखी लोकं आजूबाजूला आहेतच. त्यांचा सहवास मला अल्ट्रानिर्भयबनवतो.
आणि तरी ठरलीच लोकांची भीती खरी, तर होऊन होऊन काय होईल?
              सुदैवाने मी मनुष्य प्राणी असल्यामुळे उत्क्रांतीत माझा मेंदू चांगलाच तयार झालेला आहे. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग निसर्गतःच माझ्यात आहे आणि ते रोजच्या रोज छोट्याछोट्या कामात वापरलंच जातं. बरं, उद्या जाऊन घडलंच सगळ्यात जास्त वाईटतर त्या वाईटासोबत घासाघीस करायला मजाच येणार. कारण या प्रवासात येणारे यश-अपयश, ठेचा (कोणत्या क्षेत्रात ते टाळता येतं?) सगळं स्वीकारलंच आहे ना? जितका मोठा प्रॉब्लेम तितका जास्त संघर्ष; जितका जास्त संघर्ष तितकी जास्त क्षमता चाचणी व वाढ, तितकंच जास्त सर्जनशील उत्तर; जितकं जास्त सर्जनशील उत्तर तितकं जास्त सुंदर आणि अर्थपूर्ण जगणं. त्यामुळे लोकांची भीती खरी ठरली तरी एकप्रकारे चांगलंच आहे.
अमोल शैला सुरेश, निर्माण ६
अमोल निर्माण टीम चा सदस्य आहे व ‘कृती निर्माण’ चा समन्वयक आहे.              college मध्ये असतात नेमका आपण कशाच्या मागे धावतो आहे, कुठे  पोहचायचे आहे काहीच माहित नव्हते. फक्त चांगले marks मिळवायचे आहेत, good placement with good package  हेच माहित होते.  ते मिळवल्यावर पुढे काय असा विचार केला की  grab another job with better package! परत तेच . ही  cycle काही संपतच नव्हती.  हे सगळं आरामात, सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी, पण ह्या भानगडी करताना अराम व सुरक्षितता तरी कुठे होती?
              मी जे काम करत आहे ते अर्थपूर्ण असावे, नुसती आपली ज्ञानाची भूक भागविणे म्हणजे R & D करणे नव्हे हे समजले. माझ्या कामाचा खरंच इतरांना सकारात्मक उपयोग होत आहे का? का मी  करत असलेले  फक्त समाजातील ठराविक सुखवस्तू लोकांच्या मनोरंजनासाठी उपयोगी पडत आहेत? ही  अस्वस्थता मनात होती. स्वतःला प्रामाणिक ठेवणे फार कठीण जात होते.
                करिअरची महत्वाची  वर्षे social cause ला देताना खरंच भीती वाटली मला. किती गंमत आहे इथे पुढील क्षणाला काय होईल याचा भरवसा नसताना मी मात्र माझ्या लांबलचक आयुष्याचे व करिअरचा विचार करत होते. माझे संपूर्ण आयुष्य व करिअर अशी  मांडणी करण्यापेक्षा  माझे पुढील एक वर्षाचे आयुष्य व करिअर अशी सांगड घातली. या एक वर्षामध्ये मी स्वतःचा शोध घेणार होते. आपल्या आजूबाजूला अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी अनेक वर्ष करीत असतात, मी तर माझ्या आयुष्यातील एकच वर्ष दिलं स्वतःला वाटणारा विचार पडताळून पाहण्यासाठी. हे पडताळून पाहणे धोका नसून ती माझी गरज होती स्वतःला टेस्ट करण्यासाठी की  मी पुढे हे काम करू शकते किंवा नाही. मनाशी ठरवलं कि हे काम नाही जमलं तर परत येऊ सरळधोपट मार्गावर.  त्यामुळे आपण काही वेगळे करत आहोत असा विचार नाही आला कधी. मी पूर्वीचेच काम करीत होते फक्त मी माझ्या कामाचा End User Change केला होता. या प्रवासात यश व अपयश आले तरी ती सर्वस्वी माझी जबादारी होती. I am responsible for myself, not others.
              आज मागे वळून पाहताना मला हा प्रवास एक माणूस म्हणून खुप समृद्ध व वैचारिक दृष्टीने स्पष्ट करत गेला. कामाला प्रत्यक्ष सुरवात करताना सर्वच बाबी स्पष्ट होत्या असे नव्हते. काय करायचे हे नाहीत नसले तरी मला काय नाही करायचे हे पक्के माहित झाले होते असे म्हणता येईल. हळूहळू माझ्या कामात नेमकेपणा अनुभवातून आला. काम करत गेले सोबत शिकत गेले आणि माझा Social Relevance Career करण्याचा निर्णय पक्का झाला. मित्रांनो कर के देखो.......!

ऋतगंधा देशमुख, निर्माण ४
ऋतगंधा सर्च संस्थेत रिसर्च विभागात IT Assistant या पदावर कार्यरत आहे.              कुठल्या तरी लेखात टिळकांबद्दल वाचलं होतं.. लेखकानं इतकं मुद्याचं लिहिलं होतं की टिळकांनी 1 वर्ष ब्रेक घेऊन आधी स्वतःची तब्येत नीट केली.. भाषणात तर आपण फारच अभिमान हे त्यांच्या बद्दल सांगत असतो.. पण फारसं काहीच बिघडत नसतानाही आपण किमान एक वर्ष आपल्याला हव्या त्या cause साठी द्यायला तयार नसतो.. असं का?..
              Bfa applied art झाल्या नंतर ग्राफिक डिझायनर म्हणून corporate क्षेत्रात काम करताना हळू हळू एक अस्वस्थता स्वस्थ बसू देईना.. ती म्हणजे where am i contributing?? 
काम करायला घेतलं तेंव्हा निर्माण मधल्या आणि इतरही काही मित्र मंडळी ज्यांनी अशी cause साठी स्वतःची वर्ष दिली होती त्यांच्याकडून शिकण्या सारखं आणि inspire होण्यासारखं खूप होतं. “where am i contributing?” ही अस्वस्थता आता खूपच कमी झाली हा फायदा पैशात कसा मोजायचा?

...भीतीचं विचाराल तर डर के आगे जीत है.. हाच मी भेटलेल्या कित्येकांचा अनुभव आहे.. (आणि आता माझाही) 😊 माझ्या priorities, माझी जीवन शैली, माझे निर्णय आणि त्यांची जबाबदारी मी घेतली तर आणि तरच तो प्रवास माझाम्हणता येईल. त्यातली अस्सलमजा फायद्या तोट्याच्या आणि भीतीच्या कैक पुढची असेल.. आहे!!

अमृता ढगे, निर्माण ५
अमृता कमर्शिअल आर्टीस्ट आहे.


महेश, मयूर, अजय, उमेश , अद्वैत आणि प्रणाली यांची उत्तरे येथे वाचता येतील - http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=4648


No comments:

Post a comment