'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 11 July 2013

सीमोल्लंघन, जुलै २०१३

सौजन्य: हृतगंधा देशमुख, hrtdeshmukh@gmail.com

निर्माण ५.२ अ शिबीर उत्साहात संपन्न



निर्माणच्या पाचव्या मालिकेतील दुसरे शिबीर (अवैद्यकीय मुलांसाठी) नुकतेच शोधग्राम येथे पार पडले. ह्या शिबिराची मुख्य उद्दिष्टे तरुणांना समाजातील विविध प्रश्नांची ओळख होणे, त्यांचा जवळून अनुभव घेणे, प्रश्न सोडविण्याच्या विविध पद्धती जाणून घेणे, तज्ञांशी संवाद व इतर समवयस्क तरुणांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन स्वत:च्या जीवनातील अर्थपूर्ण शोध पुढे नेणे अशी होती.
            ह्या शिबिरामध्ये सर्व सहभागी युवांना ४ दिवस विविध आदिवासी व गैर आदिवासी गावांमध्ये राहून तेथील जनजीवन, राहणीमान, प्रश्न व अडचणी समजून घ्यायच्या होत्या. तसेच ह्या प्रश्नाना अधिक सखोलपणे समजून घेण्याकरिता मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी अश्विनी कुलकर्णी (रोजगार हमी योजना), मिलिंद मुरुगकर (अन्न सुरक्षा), विजयअण्णा बोराडे (पाणी प्रश्न) व असरचे निकाल सादर करण्यासाठी प्रथमचे मार्गदर्शक भालचंद्र व सावित्री (भारतातील शिक्षणाची अवस्था) अशा विविध मान्यवरांनी मुलांशी संवाद साधला. तसेच निर्माणचे पूर्व शिबिरार्थी व संलग्न युवांनी देखील ह्या शिबिरात आपला वैयक्तिक प्रवास व कामाच्या स्वरूपाबद्दल मुलांशी चर्चा केली. ह्यामध्ये आकाश बडवे (दन्तेवाड्याचा पी.एम.आर.डी.एफ. फेलो), निखिलेश बागडे व राजश्री तिखे (शिक्षणमित्र प्रकल्प, बायफ), शिवप्रसाद थोरवे व विक्रम सहाणे (गडचिरोलीतील सरकारी वैद्यकीय सेवेतील अनुभव), प्रणीत सिन्हा (बचपन बनाओ) ह्यांचा समावेश होता. तसेच निर्माण २ चा यतीन दिवाकर देखील या प्रसंगी उपस्थित होता.
            ह्या शिबिरातील अनेक मुले आदिवासी गावात राहिली. तसेच निखिलेश, विक्रम, शिवप्रसाद, आकाश व यतीन यांच्यासोबत संवादाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सुमारे १०% प्रमाण असलेल्या पण तरीही दुर्लक्षित अशा आदिवासी जीवनाची शिबिरार्थ्यांना ओळख झाली. शिबिराची सांगता मुलांनी स्वत:चे पुढील ६ महिन्याचे कृती कार्यक्रम बनवणे व त्यावरील चर्चेने झाली.
स्रोत- सायली तामणे, , sayali.tamane@gmail.com

आदिवासींची ‘कठाणी’ आता शास्त्रज्ञांच्या कोषात दाखल !

पूर्व विदर्भातील आदिवासींच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असणारी, येथील तीव्र हवामानात टिकून राहिलेली, पानगळीचे जंगल, तसेच भातशेतीत सहज वावर करू शकणारी, कमी दूध देणारी, कमी आकाराची कठाणी ही गुरांची दुर्मिळ जात. ही जात आपल्या देशाच्या मान्यताप्राप्त गुरांच्या जातींच्या यादीत नाही. या जातीच्या वैशिष्ट्यांबद्दल संशोधन केलंय सजल कुलकर्णीने (निर्माण २). बायफच्या फेलोशिपअंतर्गत उरळीकांचन येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रात पशुसंवर्धनासंबंधित संशोधन करणाऱ्या सजलचे हे संशोधन Indian Journal of Animal Sciencesया शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालंय !     
Management and physical features of tribal Kathani cattle of Vidarbha region in Maharashtra stateया शोधनिबंधात सजलने कठाणीगुरांच्या मालकांचे सामाजिक-सांस्कृतिक स्थान, गुरांचे व्यवस्थापन, त्यांच्या आकाराचे मोजमाप इ. वैशिष्ट्यांबद्दल मांडणी केली आहे. ही माहिती मिळवण्यासाठी सजलने गडचिरोली, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांतील १२ खेड्यांमधल्या ३८९ कुटुंबांच्या १४७६ जनावरांचा सर्व्हे केला आहे. या गुरांचा रंग, शिंगांचा व डोळ्यांचा रंग; लांबी, उंची, शिंग-कान-शेपूट यांची लांबी; गुरांचा प्रचलित वापर, त्यांची काम करण्याची क्षमता, किंमत इ. परिमाणांबद्दल विस्तृत निरीक्षणे सजलने नोंदवली आहेत. 


स्त्रोत- सजल कुलकर्णी, sajalskulkarni@gmail.com

“प्राथमिक शिक्षण मुलांपर्यंत का उतरत नाही?”

सुहास शिगम (निर्माण ४) जावडे (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गेले २ वर्षे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. सध्याचे प्राथमिक शिक्षण मुलांच्या पातळीवर उतरत नसल्याचे सुहासला जाणवत होते. मुलांना स्वयंअध्ययन करण्यास कसे प्रवृत्त करता येईल, विचार करणे व निर्णय घेणे हे मुलांना कसे जमू शकेल हे शिकण्याच्या दृष्टीने ‘ग्राममंगल’ संस्थेतर्फे ऐना येथे आयोजित करण्यात आलेल्या आकलनशास्त्रीय विचार व प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण शिबिरात सुहासने सहभाग घेतला.
भाषा, गणित, इतिहास, भूगोल व परिसर अभ्यास या विषयांचा सर्वांगाने कसा विचार करता येईल हे या शिबिराचे सूत्र होते. विषयांचे भाषिक आकलन होत नाही म्हणून बरेचदा मुलांना इतर विषय अवघड वाटू लागतात. त्यामुळे भाषा विकसित करण्याच्या दृष्टीने मुलांची श्रवणक्षमता विकसित करणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, मुलांना वाचन व लेखन शिकवणे हे खेळ, सामूहिक/वैयक्तिक कृती व गाणी यांच्या माध्यमातून कसे करता येईल यासाठी सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. गणितातील अमूर्त संकल्पना समजणे ८-९ वर्षांच्या मुलांना कठीण जाते. त्यामुळे आधी मूर्त स्वरूपातील वस्तूंचा वापर करून हळुहळू अमूर्ततेकडे कसे घेऊन जाता येईल यावरदेखील शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याच धाग्याला पुढे नेत आपल्या कुटुंबाची वंशावळ, स्वतःचा लहानपणीचा इतिहास इथून सुरुवात करून इतिहास कसा शिकवावा; गावाच्या/पाड्याच्या नाकाशापासून सुरुवात करून भूगोल कसा शिकवावा याविषयी शिबिरार्थ्यांना सामूहिक कृतीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान शिबिरार्थ्यांना ग्राममंगल संस्थेच्या सुकापाडा व ऐराली पाड्यावरील शाळांना भेट देण्याची व तेथील शिकवण्याची पद्धत प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.


‘ग्राममंगल’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.grammangal.org/


स्त्रोत- सुहास शिगम, shigamsuhas06@gmail.com

Wednesday 10 July 2013

जळगाव परिसरातील सामाजिक प्रश्नांवर काम करण्यासाठी अद्वैत दंडवते व सहकाऱ्यांची वर्धिष्णू !

अद्वैत दंडवते, सुशील जोशी (दोघेही निर्माण ४), अद्वैतची पत्नी प्रणाली व त्यांच्या ४ अन्य सहकाऱ्यांनी जळगाव परिसरातील सामाजिक प्रश्नांवर उपाययोजना करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून Vardhishnu - Social Research & Development Society ही सामाजिक संस्था सुरू केली आहे. केवळ देणगी/दान या मार्गांचा उपयोग न करता प्रश्नांचा सखोल अभ्यास करून प्रश्न समूळ सोडवण्यासाठी त्यांवर नेमके उपाय शोधण्यावर वर्धिष्णूचा भर राहणार आहे. ११ जुलै रोजी या संस्थेचे अधिकृत उद्घाटन खानदेशातील ज्येष्ठ कार्यकर्ते शेखर सोनाळकर, वासंती दिघे व डॉ. संग्राम पाटील यांच्या हस्ते होईल. दरम्यान वर्धिष्णूमध्ये जळगाव महानगरपालिकेसोबत काम करणाऱ्या कचरा कामगारांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली आहे. अत्यंत कमी वेतनामध्ये काम करणाऱ्या या कामगारांचे आर्थिक पुनर्वसन व तरुण/बालकामगारांचे शैक्षणिक पुनर्वसन हे या उपक्रमाचे ध्येय असणार आहे. त्यांच्या वाटचालीसाठी वर्धिष्णूला शुभेच्छा !


स्त्रोत- अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com   

आरती गोरवाडकर धानोरा ग्रामीण रुग्णालयात रुजू

आरती गोरवाडकर (निर्माण ४) धानोरा (जिल्हा- गडचिरोली) येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. एम.बी.बी.एस. झाल्यावर सर्व सरकारी कॉलेजेस मधून बाहेर पडणाऱ्या डॉक्टर्सनी एक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा देणे अनिवार्य असते. यातले ३ महिने आरतीने हरसूल (जिल्हा- नाशिक, तालुका- त्र्यम्बक) येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा दिली होती. नाशिकच्या आदिवासी भागातील हरसूल येथील अनुभवाचा फायदा तिला गडचिरोलीच्या आदिवासी भागात सेवा देताना नक्कीच होईल.


स्त्रोत- आरती गोरवाडकर, aarti520g@gmail.com

गर्भाशयं काढताय??.. जरा थांबा !..


स्त्री कोणतीही तक्रार घेऊन गेली की तिला सर्रास गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो. अगदी पद्धतशीरपणे तिला पटवून दिलं जातं – जसं आपण नखे काढतो, केस कापतो तसंच पिशवीचं पण. मुलं झालेत तर कशाला त्रास सहन करायचा, टाक काढून! गर्भाशय काढलेल्यात सगळयात कमी (माहित असलेलं) वय – १८ वर्षे!


येरळा प्रोजेक्ट सोसायटी ही N.G.O.१९९८ पासून जालिहाळ येथे कार्यरत आहे. सांगलीपासून १४० किमी. अंतरावर असणाऱ्या जत तालुक्यातील जालिहाळ येथे आजूबाजूच्या २२ गावांमध्ये ग्रामविकासाचं काम ही संस्था अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने करत आहे. सांगली जिल्ह्याचा विद्रुप असा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक मधला दुष्काळी सीमाभाग, नेहमीच दुर्लक्षित आणि हेटाळणी झालेला. पण संस्थेने मात्र इथे अगदी अमूलाग्र परिवर्तन घडवून आणलेय. यापूर्वी निर्माण समुदायातील अनेकांनी इथे भेटही दिलीये. संस्थेच्या कम्युनिटी रेडिओचं उद्घाटन नायनांनीच केलंय.
त्यांना कांही दिवसांपूर्वी लक्षात आलं की या भागात महिलांचं गर्भाशय काढण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याकरिता येरळाच्या श्री. राजा देशपांडे यांनी अमृतला निर्माणकडून या समस्येवर काही करता यईल का याबद्दल विचारणा केली. म्हणून मग आम्ही जाऊन त्यांना भेटलो. त्यांच्यासोबत बोलण्यातून ज्या गोष्टी कळाल्या त्या प्रचंड धक्कादायक होत्या.
·       ही समस्या खूप दिवसांपासून आहे. स्त्री कोणतीही तक्रार घेऊन गेली की तिला सर्रास गर्भाशय काढण्याचा सल्ला दिला जातो.
·       अगदी पद्धतशीरपणे तिला पटवून दिलं जातं – जसं आपण नखे काढतो, केस कापतो तसंच पिशवीचं पण. मुलं झालेत तर कशाला त्रास सहन करायचा, टाक काढून!
·       गर्भाशय काढलेल्यात सगळयात कमी (माहित असलेलं) वय – १८ वर्षे!
·       कोणतीच कागदपत्रे वगैरे कुणाकडं फारशी दिली जात नाहीत.
·       प्रत्यक्ष येरळाच्या स्टाफच्या घरातल्यांचीही गर्भाशयं काढली गेलीयेत.
·       गावांमध्ये यासाठीची रॅकेट्स कार्यरत असावीत.
·       जवळपास सर्व ऑपरेशन्स जत किंवा सांगलीतील खाजगी डॉक्टरांकडे होताहेत.
या सगळ्या गोष्टी खूपच भयंकर होत्या. आम्ही विचारलं, प्रमाण किती आहे? त्यावर म्हणाले नक्की आकडे सांगता येणार नाहीत पण प्रत्येक घरात महिला सापडतीलच! समस्या तर फारच गंभीर होती. मग यावर तोडगा काय आणि कसा काढायचा?
आम्ही विचार करायला सुरुवात केली. समस्येला हात घालण्यापूर्वी ती वेगवेगळ्या अंगानी समजून घेणं गरजेचं होतं. तसंच उपाय देण्यासाठी आपल्याकडं काय काय साधनं (Resources) उपलब्ध आहेत हे पहाणं गरजेचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही उपाय द्यायचा होता तो शाश्वत असा द्यायचा होता. त्यासाठी समस्येला शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे हात घालायचा असं ठरवलं.
याबाबत चर्चा करताना लक्षात आलं –
·       २२ गावांमध्ये प्रत्येक गावातील लोकसंख्या सरासरी १००० ते २००० या दरम्यान होती.
·       तेथील आरोग्यसेवा ही मुख्यतः भोंदू डॉक्टरांच्या मार्फत पुरवली जातीये. ४ ते ५ गावांमध्ये कुठेतरी एखादा BAMS किंवा BHMS डॉक्टर आहे.
·       आजूबाजूला २ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पण दोन्हीही अकार्यक्षम आहेत.
·       जालिहाळपासून २० किमी अंतरावर कर्नाटकमधील विजापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी २ मेडिकल कॉलेजेस आहेत. एक ‘अल् आमिन’ आणि दुसरं ‘B.L.D.’ दोन्ही संस्थांचा लौकीक खूपच चांगला आहे.
·       येरळाचं स्वतःचं आरोग्य केंद्र आहे पण ते गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टर नसल्यामुळे बंद आहे.
·       २२ मधील प्रत्येक गावात येरळाच्या आरोग्यसेविका कार्यरत आहेत. ज्यांनी शासनाच्या RCH II कार्यक्रमात काम केलं आहे.
आता कामाला सुरुवात कुठुन करायची? समस्येला शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीरपणे हात घालायचा होता. आणि त्यासाठी नायना आणि अम्मांनी शिकविल्याप्रमाणे सुरुवात ही मोजमापाने करायचं ठरविलं. हातामध्ये कोणतीही आकडेवारी नव्हती. त्यामुळे समस्येचा अभ्यास करायचा आणि समस्या मोजायची ठरवलं. २२ गावांमध्ये ज्या आरोग्यसेविका आहेत, त्यांच्यामार्फत एक सर्वेक्षण करायचं. १५ ते ५० वर्षे वयोगटातील सर्वच महिलांचा सर्व्हे होईल.
सर्व्हेची काही मुख्य उद्दिष्ट्ये अशी आहेत –
१.      समस्येचं मोजमाप – समस्येची तीव्रता आणि व्यापकता समजून घेणे. गर्भाशय काढण्याचं प्रमाण नेमकं किती आहे हे जाणून घेणे.
२.      गर्भाशय काढण्याची नक्की कारणे काय आहेत हे जाणून घेणे.
३.      गर्भाशय काढण्यामुळे ज्या नवीन आरोग्यविषयक समस्या उत्पन्न होतात त्यांचं प्रमाण जाणून घेणे.
४.      या सगळ्यांचा महिलांवर किंवा त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक ताण किती पडतो हे जाणून घेणे.
५.      हे ऑपरेशन्स कोणत्या ठिकाणी होताहेत ते जाणून घेणे.
६.      अनावश्यक गर्भाशय काढण्याचा कोणत्या शासकीय योजनेशी वगैरे काही संबंध आहे का ते जाणून घेणे.
असा अभ्यास यापूर्वी कुठे झालाय का हे शोधण्यासाठी Googleला विचारुन पाहिलं. फारसं काही दिसलं नाही. आंध्रप्रदेश आणि गुजरात मध्ये काही सर्व्हे झालेत. यामध्ये एक गोष्ट वाचण्यात आली. आंध्रप्रदेशमध्ये राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना (RSBY)’ अंतर्गत २००९ आणि २०१० दरम्यान गर्भाशय काढण्याचा प्रकार प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरु होता. त्या काळात एक विनोद फिरत होता. काही दिवसांत कुणितरी RTI च्या अंतर्गत माहिती विचारेल की छत्तीसगड मधील गर्भाशय असणाऱ्या महिला किती शिल्लक आहेत?इतकी भयंकर परिस्थिती होती तिकडे! म्हणून हे एखाद्या योजनेअंतर्गत केलं जातंय का हेदेखील पाहणं गरजेचं होतं. तसंच काही महिला स्वतःहूनच पिशवी काढण्याचा आग्रह करतात असंही लक्षात आलं. त्याचासुद्धा अभ्यास यातून केला जाईल .
अभ्यासाची कार्यपद्धती ठरवली. सर्वेक्षण करण्यासाठीची प्रश्ऩावली तयार केली जी अगदी ‘होय’ किंवा ‘नाही’ या स्वरूपाची किंवा योग्य तो पर्याय टीक करता येण्यासारखी आहे जणेकरुन आरोग्यसेविकांना फार माहिती स्वतःहून भरावी लागणार नाही. आरोग्यसेविकांना सर्व्हे कसा करायचा आणि प्रश्ऩावली कशी भरायची याचं प्रशिक्षण द्यायचं आणि सर्व्हे सुरु करायचा. सर्व्हेनंतर त्याचे निष्कर्ष जसे निघतील तशा प्रकारचे उपाय शोधयचे असं ठरलं. अम्मा व आनंदकडून  याबाबत मार्गदर्शन घेतलं. अम्मांनी सर्व्हे आम्हाला स्वतःला करायला सुचविलं होतं. पण १४० किमी अंतर ही खूप मोठी अडचण होती. त्यामुळे ते शक्य नव्हतं. त्यामुळे कार्यपद्धती व प्रश्ऩावलीमध्ये आवश्यक ते बदल केले.
५ मे ला सर्व २२ आरोग्यसेविकांना जालिहाळला एकत्र बोलाविलं. आम्ही म्हणजे अनिकेत, पांडुरंग, नीलजा, ऋचा, लीना, अमृता आणि मी असे गेलो. देशपांडे काकाही होतेच. सुरूवातीला महिलांना आपल्या जननेंद्रियांची रचना, कार्य, मासिक पाळी, गर्भाशय आणि अंडाशयाचे महत्व ppt द्वारे समजावून सांगितले. गर्भाशय काढण्याचे दुःष्परिणाम, ते कोणत्या आजारांमध्ये काढावे लागते आणि कोणत्या आजारांमध्ये काढावे लागत नाही हेसुद्धा पटवून सांगितले. तसंच त्रास होवू लागला तर काय करावं याबद्दल सांगितलं. या समस्येवर आपल्याला कसं काम करायचं आहे व त्यात त्यांची भूमिका किती महत्वाची आहे याची कल्पना दिली. त्यांना प्रश्ऩावली दाखवली. त्यातली प्रत्येक संज्ञा समजावून सांगितली. त्या प्रचंड उत्साही आणि उत्सुक आहेत. त्यातल्या बऱ्याचजणी शोधग्रामला येवून गेलेल्या आहेत. आणि त्यांनी यापूर्वी संस्थेचे बरेच सर्व्हे केलेले आहेत. त्यांच्यासोबत बोलताना सहज विचारल्यानंतर कळालं की, त्यांच्यापैकी २२ मधल्या १० जणींची गर्भाशयं काढली हाती! म्हणजे ४५% ! सगळ्या ४० वर्षांच्या आतल्या होत्या. हा आणखी एक मोठा धक्का होता. आणि त्यांच्या मते गावातील महिलांमधील प्रमाण तर ७०% पर्यंत होतं!
त्यावेळी २ महिला आल्या होत्या ज्या गर्भाशय काढून घेण्यासाठी जाणार होत्या पण आरोग्यसेविकांनी त्यांना थांबवून तिकडे आणलं होतं. एक २२ तर दुसरी ३७ वर्षांची. तक्रार फक्त पोटात दुखणे आणि अंगावरुन जाणे. त्यांना थांबायला सांगितलं. अशांकरिता काय करता येईल यावर आम्ही विचार करत होतो. त्याचवेळी त्यांचं आरोग्यकेंद्र पाहिलं. खुप वाईट वाटलं. इतका छान सेट् अप असूनही फक्त डॉक्टर नसल्यामुळं ते बंद होतं.
समस्येवर अभ्यास केल्यानंतर आणि सांगलीचे ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ डॉ.एम.पी.पाटील सर, डॉ.व्होरा सर, आनंद, अमृत, देशपांडे काका यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आणि अम्मांच्याकडून मार्गदर्शन घेतल्यानंतर या निष्कर्षापर्यंत आलो की ही समस्या अगदी पूर्वीपासून अस्तित्वात आहे. आणि त्यावर दोन गोष्टी तोडगा म्हणून करता येवू शकतात आणि त्या करायच्या ठरल्या.
१.      जनजागृती: हाच सगळ्यात जास्त परिणामकारक उपाय असू शकतो. त्याकरिता वेगवेगळे मार्ग वापरले जातील. जसं ppt सादरीकरण, पथनाट्य इ. करता येईल. आणि जागृतीकरिता सगळ्यात परिणामकारक माध्यम म्हणजे येरळावाणी’ कम्युनिटी रेडिओ! त्याद्वारे जास्तीत जास्त प्रबोधन करत रहायचं. आरोग्यसेविकांनीही सर्व्हे करताना समुपदेशन व मार्गदर्शन करायचं.
२.      आरोग्यसेवा: फक्त चुकीचं काय आहे ते सांगून थांबून चालणार नव्हतं. पर्याय देणं गरजेचं होतं. आणि तो शाश्वत असा देणं जास्त महत्वाचं होतं. त्यासाठी ठरविलं की ठराविक अंतरानं जालिहाळमध्ये स्त्रीरोग ओपीडी चालवायची. ज्या महिलांना ॲडमिट करुन उपचार देण्याची गरज आहे किंवा ऑपरेशनची गरज आहे अशांना संस्थेमार्फत तिथून जवळ असणाऱ्या ‘अल् आमिन’ आणि ‘B.L.D.’ या २ मेडिकल कॉलेजेसना पाठवायचं. संस्थेमार्फत त्यांना योग्य उपचार आणि सवलत मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा.
आता याकरिता स्त्रीरोगतज्ञ लागणार होते. आणि त्यासाठी अगदी योग्य व्यक्ती आम्हाला मिळाली. डॉ. एम.पी.पाटील सर. प्रचंड अनुभवी, ज्येष्ठ आणि तरीही उत्साही. सरांचं नेटवर्कसुद्धा खुप मोठं! सरांनी एक ते दीड महिन्याच्या अंतराने २ स्त्रीरोगतज्ञ आणि आम्ही २ MBBS ग्रॅड्जुएट्स असे मिळून ओपीडी चालवू असं ठरविलं. ‘अल् आमिन’च्या विभागप्रमुखांसोबत संपर्कही साधून तिकडूनही डॉक्टर्सना पाठविण्याची विनंती केली.
पाटील सरांसोबत मुकुंद व अनिकेत
त्याप्रमाणे २६ मे रोजी एम.पी.पाटील सर, त्यांचे सहकारी डॉ.शरद कारे सर, अनिकेत आणि मी असे ४ डॉक्टर्स आणि येरळाचा स्टाफ असे मिळून जालिहाळच्या आरोग्य केंद्रात ओपीडी चालविली. प्रतिसाद खूप चांगला असा मिळाला नाही आणि त्याला तशी कारणेही होती. पण पहिलीच वेळ असल्याने ठीक होतं. त्यातल्या २ महिलांना पुढील उपचारासाठी पाठविलं. पुढची ओपीडी ६ जूलै ला आहे. त्याची जाहिरात ऐकुन लोक संस्थेला फोन विचारू लागले की इतर आजारांसाठी काही करताय का? म्हणून मग यावेळी इतर आजारांचीही ओपीडी चालवणार आहोत.
आता जुलैमध्ये जालिहाळ गावात ‘Pilot Basis’ वर सर्व्हे होणार आहे. त्याचा ‘Data Analysis’ करुन जसे निष्कर्ष निघतील व अनुभव येतील त्यानुसार इतर गावांमध्ये सर्व्हे होईल. ‘Data Storage and Analysis’ करिता ‘Database Management’ चा जो प्रोग्रॅम लागणार आहे तो नुकतंच वालचंदमधून इंजिनिअर झालेल्या निलजा (निर्माण ४) व ऋचा (निर्माण ५) या तयार करणार आहेत. आता सर्व्हे पूर्ण होण्याची वाट बघतोय.
यावर काम करताना मात्र खुप मजा आली आणि येतीये. काम करताना सर्चमध्ये झालेल्या ‘Health Camps चा आणि ३ वर्षांपूर्वी केलेल्या ‘Tobacco Survey’चा खूप उपयोग झाला. आणि एक गोष्ट मात्र जाणवली की आपल्या शिक्षणाचा, आत्मसात केलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग करुन जेंव्हा एखाद्या समस्येवर काम करतो तेंव्हा काम करायला खूप मजा येते आणि समाधानही मिळतं. याबाबत कांही सूचना किंवा मार्गदर्शन मिळाले तर आनंदच होईल.

डॉ. मुकुंद जाधव, dr.mbjadhav@gmail.com

एक कोटी मृत्यूंचे कारण काय?


आकडेवारी हेच सत्य असते. पूर्वाग्रहाचा चष्मा लावून काढलेले निष्कर्ष हे पूर्ण सत्य कधीच नसते. ती बहुतेक त्या व्यक्तीची मते असतात. हा अहवाल वाचून तुम्हाला सत्याची कोणती बाजू उमजली? जरूर सांगा. डॉक्टर मित्रमैत्रिणींसाठी ही एक ज्ञानाची खाण आहे. जेवढे तीतून काढू तेवढे कमीच आहे. कशावर, का, कुठे, कोणासोबत काम करावे हे सांगणारे ते गाईडच आहे. अवैद्यकीय मित्रांनी नाराज व्हायचे काहीच कारण नाही. आपल्याला verbal autopsy चे शक्तीशाली साधन तर मिळाले ! कशी सुरुवात करू म्हणून रडत बसायचे कारण नाही. एखादा प्रश्न घेऊन त्याची verbal autopsyने कारणे शोधायला आजच सुरुवात करू शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या? रस्त्यावर वाहनांचे अपघात का झाले? सर्प/विंचूदंश कशामुळे झाले? एखादी सरकारी योजना अपयशी ठरायचे कारण काय होते? रोजगार हमीद्वारे काम मिळण्यामध्ये अडचणी कोणत्या आल्या? महिलांवर अत्याचार होण्याची कारणे कोणती होती? एखाद्या सरकारी कार्यालयात कुठे, किती भ्रष्टाचार झाला? आपल्या गावापासूनच आजच सुरूवात करू शकतो. करायची का?


भारतात दरवर्षी सुमारे एक कोटी मृत्यू होतात. पुढच्या जनगणनेतील लोकसंख्येची आकडेवारी बदलण्यापलिकडे या मृत्यूंचे काही महत्त्व आहे का? हे मृत्यू कुणाचे होत असावेत? कशामुळे होत असावेत? ते थांबवता येऊ शकतात का? आपल्या देशात नव्याने कोणत्या रोगाची साथ तर नाही आली? (१९८०च्या दशकात सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तरुण पुरुषांमध्ये प्रतिकारशक्तीशी संबंधित मृत्यूंचे प्रमाण अचानक वाढलेले आढळले. ही अमेरिकेतील HIVच्या साथीची नांदी होती.) विविध कार्यक्रमांवर जो वारेमाप पैसा आपले सरकार खर्च करते, त्या कार्यक्रमांचा खरंच परिणाम होत आहे का? या अनेक प्रश्नांची उत्तरे ही मृत्यूंच्या कारणात दडलेली असतात. ठराविक अंतराने मृत्यूच्या कारणांसंबंधित नोंदीं या आपल्या आरोग्यव्यवस्थेचा आरसाच आहेत. आपली आरोग्यविषयक नीती बदलण्याची व पुढील दिशा ठरवण्याची जबरदस्त क्षमता या कारणांमध्ये आहे.
मात्र भारतातले बहुतेक मृत्यू (> ७५%) हे इस्पितळात न होता घरात होतात. त्यामुळे या मृत्यूंची कारणे कोणतीही नोंद न होता सामान्यपणे मारणाऱ्या माणसासोबत नाहीशी होतात. घडून गेलेल्या मृत्यूच्या कारणांची माहिती कशी मिळेल? शवविच्छेदन (autopsy) करून मृत्यूचे कारण कळू शकते हे आपण वाचलं/ऐकलं/टीव्हीवर पाहिलं असेल. आपल्या काही डॉक्टर मित्रांनी शवविच्छेदन केलंही असेल. मात्र एवढ्या मृत्यूंवर नजर ठेवून मृत्यू झाल्या झाल्या त्याचे शवविच्छेदन करणे शक्यही नाही आणि परवडणारे तर नाहीच नाही. सुदैवाने हा प्रश्न सोडवण्यासाठी verbal autopsy (तोंडी शवविच्छेदन) चे साधन उपलब्ध आहे व ते उत्तरोत्तर विकसित होत आहे. कशी असते ही verbal autopsy ची पद्धत?
Verbal autopsy द्वारे मृत्यूच्या कारणांचा अभ्यास Sample Registration System (SRS) या ठराविक कालावधीने जन्म-मृत्यूंची नोंद ठेवणाऱ्या सर्व्हेअंतर्गत करण्यात येत आहे. या अभ्यासात पूर्ण वेळ काम करणाऱ्या अवैद्यकीय कार्यकर्त्यांना verbal autopsy चे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार या कार्यकर्त्यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांकडून व अन्य खात्रीलायक सूत्रांकडून मृत्यूच्या आधी घडलेल्या घटनांची स्थानिक भाषेत सविस्तर नोंद केली. याशिवाय त्यांनी महत्त्वाच्या रोगाच्या लक्षणांसंबंधित प्रश्नांच्या उत्तरांचीही नोंद केली. प्रत्येक मृत्यूच्या verbal autopsy च्या नोंदी १३० प्रशिक्षित डॉक्टरांपैकी randomly निवडलेल्या २ डॉक्टरांकडे पाठवल्या गेल्या. या नोंदींचा आधार घेत दोघांनीही स्वतंत्रपणे मृत्यूचे कारण निश्चित केले. दोघांची सहमती न झाल्यास ‘मृत्यूचे हेच कारण का निश्चित केले गेले’ याबाबत दोघांना एकमेकांच्या notes दिल्या गेल्या व दोघांना पुन्हा एकदा मृत्यूच्या कारणाबाबत निर्णय द्यायला सांगण्यात आले. तरीही सहमती न झाल्यास एका वरिष्ठ डॉक्टरने अंतिम निर्णय दिला.  ह्या अभ्यासाबद्दल अधिक विस्ताराने जाणून घेऊ.
SRS सर्व्हे नेमका कुणाचा केला जातो? यात भारतातील २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश यातील १.१ दशलक्ष कुटुंबांतील (लोकसंख्या सुमारे ६.३ दशलक्ष) जन्म-मृत्यूंची नोंद ठेवली जाते. (१२० कोटी लोकांची नोंद ठेवणे व्यावहारिक कारणांमुळे शक्य नसते. त्यामुळे ६.३ दशलक्ष लोकांच्या आकडेवारीवरून १२० कोटी लोकांच्या आकडेवारीचा अंदाज केला जातो.) ही सर्वच्या सर्व कुटुंबे केरळ किंवा झारखंडमधून घेतली तर? ही आकडेवारी काही देशाचं प्रतिनिधित्व नाही करू शकणार. त्यामुळे १९९१ च्या लोकसंख्येनुसार भारताला १००० लोकसंख्या असलेल्या १ दशलक्ष तुकड्यांत विभागले गेले. त्यातील ६,६७१ तुकड्यांची निवड या सर्व्हेसाठी यादृच्छिक पद्धतीने (randomly) करण्यात आली. ही निवड randomly केली असल्यामुळे यात ग्रामीण-शहरी, आदिवासी-गैरआदिवासी, प्रगत-बिमारू राज्यांतील अशा संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुटुंबांचा समावेश होण्याची शक्यता वाढते. २००२ नंतर SRSच्या कार्यकर्त्यांनी दर ६ महिन्यांनी या तुकड्यांना भेट देऊन घडलेल्या प्रत्येक मृत्यूच्या verbal autopsyची नोंद घेतली. २००१-०३ दरम्यान झालेल्या १,२३,००० मृत्यूंची कारणे निश्चित करून त्यांचा उपयोग भारताच्या आकडेवारीचा अंदाज येण्यासाठी करण्यात आला. काय मिळाले या सर्व्हेतून? काही ठळक निष्कर्ष पुढीलप्रमाणे:
·       भारतात कमी वयाच्या व मध्यम वयाच्या मृत्यूंचे प्रमाण खूप जास्त आहे. (४७% मृत्यू ५५ वर्षांच्या आतच होतात. भारताचे सरासरी आयुर्मान ६५.५ वर्षे आहे.) याचाच अर्थ प्रतिबंधक उपाय आणि आरोग्याच्या सोयी यांच्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.
·       भारतातील एकूण मृत्यूंपैकी १९% मृत्यू हे बालमृत्यू (५ वर्षांच्या आतले) आहेत. हे प्रमाण बिमारू राज्यांमध्ये (बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड) तब्बल २७% पर्यंत जाते. शहरी भागातील प्रमाण (१०%) व ग्रामीण भागातील प्रमाण (२१%) यात खूप मोठा फरक आढळतो.
·       असंसर्गजन्य आजारांचा गट (उदा. हृदयरोग, लकवा, दमा, कॅन्सर इ.) हे भारतातील मृत्यूंचे सर्वात मोठे कारण (४२%) असून त्यांनी संसर्गजन्य रोग (उदा. टीबी, एच.आय.व्ही., मलेरिया, हगवण), माता मृत्यू, मृत अर्भक किंवा जन्मापासून ७ दिवसांच्या आत मृत्यू, कुपोषण या आजारांच्या गटाला (३८% मृत्यू ) मागे टाकले आहे. मात्र बिमारू राज्यांमध्ये उलटी परिस्थिती असून वरील आजारांच्या गटामुळे मृत्यूचे प्रमाण ५०%पर्यंत जाते. तसेच ग्रामीण भागातही हे प्रमाण ४१% पर्यंत जाते.
प्रगत राज्ये/शहरी भाग आणि बिमारू राज्ये/ग्रामीण भाग यांच्या आरोग्याच्या गरजांमध्ये सरळसोट वेगळेपण दिसून येते.
·       हृदयरोग व रक्तवाहिन्यांचे रोग यामुळे भारतात एकूण मृत्यूंपैकी तब्बल १९% मृत्यू होतात. हा बदलत्या जीवनशैलीचा तर परिणाम नसेल?
·       AIDS चे प्रमाण जास्त असलेल्या राज्यांत (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मिझोरम, मणिपूर, नागालँड) १५-५९ या वयोगटांतील मृत्यूचे प्रमाण (३.७%) हे अन्य राज्यांतील प्रमाणापेक्षा (०.४%) खूप जास्त आहे.
·       १५-२४ वयोगटात आत्महत्या हे मृत्यूंचे सर्वात मोठे कारण आहे (१६%). पौगंडावस्थेत आणि तारुण्याच्या सुरुवातीच्या वर्षांत निराशा येण्याची कोणती कारणे असतील?
·       एकूण आत्महत्यांपैकी निम्म्या या विषप्राशानामुळे (बहुतेक कीटकनाशके) होतात.
·       मलेरियाच्या एकूण मृत्यूंपैकी ९०% आणि सर्पदंशाच्या एकूण मृत्यूंपैकी ९७% मृत्यू खेड्यांत होतात. दोन्ही बाबतीत रुग्ण अचानक गंभीर होतात व उपचाराची तातडीची गरज निर्माण होते. मात्र मलेरियाच्या एकूण मृत्यूंपैकी केवळ १४% आणि सर्पदंशाच्या एकूण मृत्यूंपैकी केवळ २३% मृत्यू हे कोणत्याही प्रकारच्या आरोग्यसुविधांमध्ये होतात. याचाच अर्थ खेड्यातील लोक डॉक्टरकडून उपचार न घेता खेड्यातील भोंदूकडे जात असावेत किंवा डॉक्टर/दवाखाना या सोयी त्यांच्यासाठी सहज उपलब्ध नसाव्यात.
·       पावसाळ्यात मलेरिया व सर्पदंशाच्या मृत्यूचे प्रमाण अचानक खूप वाढते.
·       भारतात वाहनांच्या अपघातामुळे दरवर्षी ६ लाख मृत्यू होतात, पोलिसांकडे त्यापैकी केवळ ३ लाख नोंदी असतात.
·       कॅन्सरमुळे होणाऱ्या पुरुषांच्या एकूण मृत्यूंपैकी ४२% तंबाखूजन्य कॅन्सरमुळे होतात, तर स्त्रियांच्या एकूण मृत्यूंपैकी १८% तंबाखूजन्य कॅन्सरमुळे होतात. कॅन्सरचे मृत्यू कमी करण्याचा मार्ग तंबाखूमुक्तीतून सुरू होतो आणि त्यासाठी आपण oncologist असण्याची गरज नाही. सामान्यातला सामान्य माणूस तंबाखूमुक्तीचे काम हाती घेऊ शकतो.

या अहवालातल्या सगळ्या गोष्टी कळल्या असं म्हणायचं धाडस मी करणार नाही. शेवटी आकडेवारी हेच सत्य असते, पूर्वाग्रहाचा चष्मा लावून काढलेले निष्कर्ष हे पूर्ण सत्य कधीच नसते. ती बहुतेक त्या व्यक्तीची मते असतात. भारतातल्या मृत्यूंच्या कारणांची आकडेवारी तुम्ही स्वतः पाहून तुम्हाला सत्याची कोणती बाजू उमजते हे तुम्ही सगळ्यांसमोर मांडू शकता. डॉक्टर मित्रमैत्रिणींसाठी ही एक ज्ञानाची खाण आहे. जेवढे तीतून काढू तेवढे कमीच आहे. कशावर, का, कुठे, कोणासोबत काम करावे हे सांगणारे ते गाईड आहे. अवैद्यकीय मित्रांनी नाराज व्हायचे काहीच कारण नाही. या अहवालातून पुढे आलेली कामे करण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे आपण डॉक्टरच असले पाहिजे असे काही नाही. त्याशिवाय आपल्याला verbal autopsy चे शक्तीशाली साधन तर मिळाले ! कशी सुरुवात करू म्हणून रडत बसायचे कारण नाही. एखादा प्रश्न घेऊन त्याची verbal autopsyने कारणे शोधायला आजच सुरुवात करू शकतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या? रस्त्यावर वाहनांचे अपघात का झाले? सर्प/विंचूदंश कशामुळे झाले? एखादी सरकारी योजना अपयशी ठरायचे कारण काय होते? रोजगार हमीद्वारे काम मिळण्यामध्ये अडचणी कोणत्या आल्या? महिलांवर अत्याचार होण्याची कारणे कोणती होती? एखाद्या सरकारी कार्यालयात कुठे, किती भ्रष्टाचार झाला? आपल्या गावापासूनच आजच सुरूवात करू शकतो. करायची का?
(हा अहवाल इथे वाचा: http://www.cghr.org/wordpress/wp-content/uploads/Causes_of_death_2001-03.pdf  
 याबद्दल अधिक शोधसाहित्य इथे वाचा: http://www.cghr.org/index.php/publications/million-death-study/)

निखिल जोशी, josnikhil@gmail.com