'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 10 July 2013

पुस्तक परिचय

How Children Fail - John Holt


          काही पुस्तकं हातात घेतली की वाचाविशी वाटतात. How Children Fail या पुस्तकाबाबत माझं तसंच झालं. त्याची  एका पानाची प्रस्तावना वाचूनच हे पुस्तक म्हणजे फ़ार महत्वाचं दस्तावेजी-करण झालेलं काम आहे, हे जाणवतं.
जॉन होल्ट नावाच्या पाचवीच्या शिक्षकाने त्याच्या एका शिक्षक मित्रासोबत वर्गाचे निरीक्षण करण्याचा अभिनव उपक्रम आखला. याच उपक्रमातून निघालेल्या रोजच्या टिप्पण्णींपैकी काहींचं संकलन म्हणजे हे पुस्तक आहे. वर्गातील मुलांचे निरीक्षण आणि त्यावरीकारणीमीमांसा करणारे हे काम म्हणजे 'लहान मुलांचे शिक्षण' या दुर्लक्षित विषयावरिल एक परिवर्तनवादी अभ्यास आहे.
पुस्तक वाचताना त्यातील प्रत्येक गोष्ट आपण केली आहे किंवा आपल्यासोबत झाली आहे असं जाणवतं. १९५८-६१ च्या काळात मांडलेलं वर्गाचं चित्रण आजही दिसतं. अगदी तसंच ! यात लेखकाचं कौतुक करावं की आपली 'शिक्षित' समाज म्हणून हेटाळणी करावी हा प्रश्नच आहे.
एखादं मूल शाळेत का जातं? शाळेत सांगितलेल्या गोष्टी ते का करतं? याला आपण नेहमीच तोंडदेखलं उत्तर देतो - तो शिक्षणासाठी शाळेत जातो, त्याला शिकायला आवडतं, तो शिक्षकांचा मान ठेवतो - तशी उत्तरं नाहीत हे आपल्यालासुद्धा कुठेतरी जाणवत असतं. मुलं शाळेत जातात कारण त्यांना दुसरा पर्याय नाही. ती वर्गात सांगितलेल्या गोष्टी ऐकतात कारण तसं केलं नाही तर त्यांना जास्त त्रास दिला जाईल, हे त्यांना चांगलंच माहिती असतं. असं सत्य एका शिक्षकानं स्वीकारणं हे विशेष आहे. जॉन होल्टने ते केलं आहे. त्याहीपुढे जाऊन अनेक गोष्टींच्या मुळापर्यंत जाण्याचा आणि मुलांच्या मनाचा ठाव घेण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला गेला आहे.
साधारण तीन वर्ष चार महिन्यांच्या काळातल्या नोंदी या पुस्तकात सामाविष्ट केल्या आहेत. या नोंदी strategy (रणनीती), fear and failure (भीती आणि अपयश), real learning (खरे शिक्षण) आणि why schools fail (शाळा अयशस्वी का होतात?) या चार भागात विभागल्या आहेत.
strategy या भागात मुलं वर्गात कशा पद्धतीने स्वतःच्या रणनीती तयार करतात, त्याची कारणं कोणती, हे सांगितलं आहे. fear and failure हा भाग भय आणि त्यामुळे ठरणारे मुलांचे प्रतिसाद, त्यातून येणारं अपयश यावर प्रकाश टाकतो. Real learning मधे काय शिकायला हवं? काय शिकल्यासारखं वाटतं / दाखवलं जातं? खरंच काय शिक्षण झालं? यांचा लेखकाने प्रयोगातून अभ्यास केला आहे. Why schools fail यात लेखकाने तत्कालीन अमेरिकन शाळा (आणि सद्यस्थितीतल्या आपल्या शाळा !) खरं, अपेक्षित शिक्षण देण्यास का अपयशी ठरतात याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
शाळांमधे सगळं वाईट आहे, बरीचशी मुलं अयश्स्वी ठरत आहेत असं बोलताना कुठेतरी लेखक पूर्वग्रहदूषित आहे असंदेखील वाटतं. पण लेखकाचा सच्चेपणा पुस्तकात जागोजागी दृष्टीस पडतो. मग शेवटाकडे येताना पुस्तकात चर्चिलेल्या विद्यार्थ्यांबद्दल लेखक जेव्हा बोलतो तेव्हा तो सगळा संभ्रम गळून पडतो
आपल्या सभोवतालचा समाज त्याला हवे तसे लोक निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या शाळा नावाच्या मूलभूत घटकावर सातत्याने आक्रमण करित असतो. त्यात शिकणाऱ्या मुलांना काय हवं आहे, हा मुद्दा अलाहिदा! काही वाटणंच बंद करावं, सर्जनशीलता नष्ट करावी असा सगळा डाव असतो. बिचाऱ्या मुलांना आपल्यासोबत काय होत आहे याची कल्पनाच नसते. कित्येकांना मी काय उत्तम करू शकतो हे शोधण्याची संधीच मिळत नाही.
लहान जीवांवर प्रचंड ओझं टाकून, त्यांची सहजता गमावून, वरवर अगदीच सहाजिक वाटणाऱ्या पण मुळातच अमानुष असणाऱ्या पद्धतींना एका सत्यशोधकाने सगळ्यांसमोर मांडलं आहे. ते सगळं वाचून कसं असावं शिक्षण? शाळा असव्या का? असेल तर कशा असाव्याभांडवलशाही अर्थव्यवस्थेचे हे सगळे पडसाद आहेत का? खरंच या सगळ्यांचा फ़रक पडतो का? असे बरेच प्रश्न मनात येतात. चला, प्रश्न पडतात म्हणजे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.
हे पुस्तक वाचण्यासाठी: http://www.schoolofeducators.com/wp-content/uploads/2011/12/HOW-CHILDREN-FAIL-JOHN-HOLT.pdf   
अतुल गायकवाड, atuldd99@gmail.com

No comments:

Post a Comment