'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

सीमोल्लंघन, जुलै २०१२


‘निर्माण’चा तारुण्यात प्रवेश


निर्माण सुरु होऊन आता सहा वर्षे पूर्ण झालीत. निर्माणच्या चौथ्या बॅचचे शेवटचे शिबिर नुकतेच शोधग्राममध्ये संपन्न झाले. गेल्या सहा वर्षात निर्माणची नियमित 17 शिबिरे व विशेष विषयांवर 4 शिबिरे अशी एकूण 21 शिबिरे झालीत ज्यात आतापर्यंत जवळपास 350 युवांनी (निर्माणी) भाग घेतला.

निर्माण आता ख-या अर्थाने तारुण्यात प्रवेश करते आहे कारण निर्माण संयोजनाच्या जबाबदारीची पुनर्रचना करून यापुढे ती निर्माण शिक्षणप्रक्रियेमधून निघालेल्या युवांनीच सांभाळावी असा प्रयत्न राहील. तसे होणे हे तरुण होणे व जबाबदारी घेणे याचे चिन्ह असेल.

यानुसार निर्माण संयोजनाची जबाबदारी आता नव्या युवा टीमने स्वीकारली आहे. ती टीम आहे - अमृत बंग, सायली तामणे, संदीप ढोले, संदीप देवरे, मुक्ता नावरेकर, आनंद बुडईकर, त्रिशूल कुलकर्णी, चारुता गोखले, निखिल जोशी, अतुल गायकवाड, अश्विन भोंडवे, वैभव आगवणे, क्रांती डोईबळे, रंजन पांढरे, भाग्यश्री अग्निहोत्री, विक्रम सहाने. यापैकी अमृत व सायली हे संयोजनाची केंद्रीय जबाबदारी पूर्ण वेळ सांभाळतील व इतर सर्वजण आपापल्या गावाहून त्या त्या भागातील जबाबदारी सांभाळतील तसेच विविध उपक्रमात मदत करतील.
या शिवाय अमिताभ व वेंकी हे दोघे सल्लागार म्हणून त्यांना वेळोवेळी मदत करतील.

निर्माणच्या वाढत्या कक्षा व जबाबदा-या सांभाळून ‘अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध’ घेण्यामध्ये पुढे वाटचालीसाठी या नव्या निर्माण संयोजन टीमला आपण सर्व शुभेच्छा व सहयोग देऊ या!
      अभय व राणी बंग                                       विवेक सावंत

निर्माणच्या चौथ्या बॅचच्या शेवटच्या शिबिराचे समापन


दीपप्रज्वलन करून निर्माण शिबिराचे उद्घाटन करताना डॉ. राणी बंग (अम्मा)
निर्माणच्या चौथ्या बॅचचे शेवटचे शिबिर 30 जून ते 8 जुलै या कालावधीत शोधग्राममध्ये पार पडले. शिबिरात सातारा, सांगली, सोलापूर, यवतमाळ, जळगाव, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, पुणे, नाशिक, मुंबई, रत्नागिरी येथून आलेली सुमारे 70 मुले सहभागी झाली होती. समाजातल्या विविध समस्यांमागील आर्थिक, राजकीय व वैचारिक पार्श्वभूमी समजून घेणे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मी काय योगदान देऊ शकतो या अनुषंगाने प्रत्येकाने स्वत:च्या पुढील दिशेविषयी विचार करून पाच वर्षांचा कृती कार्यक्रम आखणे ही या शिबिराची मध्यवर्ती कल्पना होती. यासाठी मार्गदर्शन करायला अनेक मान्यवरांना या दरम्यान आमंत्रित करण्यात आले होते. 

ग्रामीण गरिबी आणि त्याचा शेतीशी असणारा संबंध यावर वर्ध्याचे ‘श्री विजय जावंधिया’ यांनी मार्गदर्शन केले. महात्मा गांधीनी 1909 साली लिहिलेल्या ‘हिंदस्वराज्य’ या पुस्तकाचे सद्यपरिस्थितीतील महत्त्व आणि त्याची उपयुक्तता याविषयी ‘हिंदस्वराज्य आणि नवे मन्वंतर’ या पुस्तकाचे लेखक ‘सुरेश पांढरीपांडे’ यांनी दोन दिवस आपल्या सत्रादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग़डचिरोलीतील ‘मेंढा लेखा’ या गावात ग्रामस्वराज्याची संकल्पना विविध प्रयोगांमधून प्रत्यक्षात आणणारे ‘देवाजी तोफा’ यांनी मुलांशी संवाद साधला. लोकसहभागातून ग्रामसभेच्या मदतीने ‘देवाजी तोफा’ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या प्रयोगांविषयी त्यांचे अनुभव ऐकणे हा विद्यार्थांसाठी विलक्षण अनुभव ठरला. तसेच गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ‘अभिषेक कृष्णा’यांनीही शिबिरादरम्यान आमंत्रित केले होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात काम करताना प्रशासनासमोर येणारी आव्हानं या विषयावर ते मुलांशी बोलले. भांडवलशाही व्यवस्थेतला बाजार नेमका कसा काम करतो हे नंदा खरेंनी समजावून सांगितले तर अनिल अवचटांनी उपेक्षित वर्गातील लोकांसोबतच्या त्यांच्या अनुभवांचे निर्माणींसोबत शेअरिंग केले.  

निर्माणींना मार्गदर्शन करताना डॉ. अभय बंग (नायना) व सु. श्री. पांढरीपांडे
निर्माण 4 मधील प्रत्यक्ष कामात उतरलेल्या मुलांनी घेतलेली सत्रं हे शिबिराचे विशेष आकर्षण ठरले. गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात गट्टा व पेंढरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणार्‍या निर्माण 4 च्या डॉ. विक्रम सहाने आणि डॉ. शिवप्रसाद थोरवे यांचा आत्तापर्यंतचा प्रवास ऐकणे हा सर्वांसाठी प्रेरणादायी अनुभव होता. या दोन डॉक्टरांबरोबरच नाशिक येथील ‘प्रगती अभियान’ या संस्थेबरोबर रोजगार हमी योजनेवर काम करणारा अजय होले, गडचिरोलीच्या आदिवासी गावांमध्ये सिव्हिल इंजिनीयरींगच्या अंगाने स्वच्छतेचे काम करणारा रंजन पांढरे, आरोग्य आणि टेलिकम्युनिकेशन यांची सांगड घालू पाहणारा निखिल जोशी, ग्रामीण भागात पुस्तक विक्रीचा व्यवसाय करणारा शरद आष्टेकर, सांगलीतील खेड्यांमधल्या स्त्रियांसोबत सोशल आंत्रप्रुनरशिपचा प्रयोग करणारे संदीप ढोले व भाग्यश्री अग्निहोत्री, ‘प्रथम’ संस्थेबरोबर शिक्षणाबाबत काम करणार्‍या महेश लादे यांचीही सत्रे शिबिरादरम्यान आयोजित करण्यात आली होती. या सर्वांनी आत्तापर्यंत केलेले काम, यासंबंधीचे त्यांचे अनुभव आणि मुलांची प्रश्नउत्तरे यामुळे ही सत्रे खूप रंगली. 
     
पुढील दिशेबाबत स्पष्टता येण्यासाठी डॉ. अभय बंग, अमिताभ खरे व अमृत बंग यांनी विविध सत्रे घेतली आणि शेवटी प्रत्येक शिबिरार्थ्याने स्वत:चा पाच वर्षांचा कृती कार्यक्रम निश्चित केला. शिबिर संपण्याच्या आदल्या रात्री धमाल सांस्कृतिक कार्यक्रम झाला व शेवटच्या दिवशी सकाळी डॉ. राणी बंगांकडून आपापला “लर्निंग स्टोन” घेऊन सर्व शिबिरार्थी पुढील प्रवासाला निघाले!

उमेश भाऊंना निरोप


सुमारे 4 वर्षांपासून श्री. उमेश खाडे हे निर्माणच्या कोऑर्डिनेशन टीमचे एक सदस्य म्हणून काम करत होते. वाशी, नवी मुंबई येथे एम.के.सी.एल.ने निर्माणला उपलब्ध करून दिलेल्या जागेतून प्रामुख्याने उमेश भाऊ कार्यरत होते. मागील 4 वर्षांदरम्यान निर्माण प्रक्रिया वाढावी म्हणून त्यांनी हातभार लावला आणि विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेतला. या जुलै महिन्यापासून आता उमेश भाऊ निर्माणच्या टीममध्ये नसतील. पुढील प्रवासासाठी त्यांना सर्व निर्माण समुदायातर्फे शुभेच्छा!

डॉ. अश्विनी महाजनचे छत्तीसगडमधील ‘जन स्वास्थ सहयोग’ या संस्थेबरोबर काम सुरु

निर्माण 1 च्या अश्विनी महाजनने 2011 मध्ये पुण्यातील ह्डपसर कॉलेजमधून आयुर्वेदाचे शिक्षण पूर्ण केले. पुढे तिला community medicine मध्ये काम करण्याची इच्छा आहे. परंतु त्याआधी वैद्यकीय कौशल्य वाढवण्याच्यादृष्टीने तीन महिन्यांसाठी पुण्यातील स्वत:च्या कॉलेजात तीने वैद्यकीय अधिकारी म्हणून काम सुरु केले. मागील महिन्यात तिने community medicine क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी छत्तीसगडमधील बिलासपूर येथील ‘जन स्वास्थ सहयोग’ या स्वयंसेवी संस्थेबरोबर काम सुरु केले आहे. डॉ. योगेश जैन, डॉ. रमण आणि डॉ. भार्गव या AIIMS दिल्ली येथील डॉक्टरांनी मिळून बिलासपूरहून 25 किमी अंतरावर असलेल्या ‘गणयारी’ या गावात 1999 मध्ये कम्युनिटी सेंटर सुरु केले. या तिघांनीही Medico friend circle या चळवळीपासून प्रेरणा घेऊन comprehensive rural health care प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली. या सेंटरद्वारे त्यांनी एकूण 104 आरोग्यसेवक प्रशिक्षित केले असून 53 गावांमध्ये आज आरोग्यसुविधा पुरवल्या जातात. अश्विनी येथे सध्या वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असून येत्या काही महिन्यात हळूहळू संशोधनाच्या कामातही तिचा सहभाग वाढेल. निर्माण 1 चा सचिन बारब्देही काही महिन्यांपूर्वी या संस्थेत रुजू झालेला असून या दोघांना मिळून काम करणे शक्य होणार आहे. अश्विनीला तिच्या पुढील कामासाठी शुभेच्छा!  

‘प्रथम’ संस्थेतर्फे पवनी येथे आयोजित केलेल्या शिक्षकांच्या प्रशिक्षणात निर्माणच्या गटाचा सहभाग


निर्माण 4 च्या वृंदन बावनकर हिच्या भंडारा जिल्ह्यातील ‘पवनी’ तेथील शाळेत ‘प्रथम’ संस्थेतर्फे 5 ते 17 जून या कालावधीत शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ‘प्रथम’ च्या मुंबई, नंदूरबार आणि औरंगाबाद येथील शाखांमधून गणित, विज्ञान, मराठी आणि इंग्लिश या भाषांचे तज्ञ प्रशिक्षण देण्यास आले होते. या प्रशिक्षणास निर्माणमधील शिक्षण क्षेत्रात सध्या काम करत असणारी आणि पुढे काम करण्याची इच्छा असणारी अनेक मुले उपस्थित होती. यात निर्माण 3 ची पूर्वा जोशी आणि महेश लादे, तसेच निर्माण 4 चा सुहास शिगम आणि वृंदन यांचा समावेश होता. प्रथमतर्फे 1 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यात किमान बेरीज, वजाबाकी तसेच गणितातील इतर व्यवहार आणि लिहितावाचता येण्याइतपत इंग्लिश आणि मराठी शिकवण्यासाठी ‘कमाल’ पध्दत विकसित करण्यात आली आहे. पूर्वा आणि सुहासला यानिमित्ताने ही पध्दत शिकण्याची संधी मिळाली.
पूर्वा येत्या काही महिन्यात ‘प्रथम’ संस्थेबरोबर काम सुरु करेल तर सुहास सध्या रत्नागिरीतील एका शाळेत मुख्याधापक म्हणून काम करत आहे. दोघांनाही या प्रशिक्षणाचा आपल्या शिकवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी नक्कीच फायदा होईल. 

निर्माण 2 च्या संतोष गवळे आणि जयश्री कलंत्री यांच्या पुढाकाराने मन्याळी येथे नेत्र तपासणी शिबीर


नेत्र तपासणी शिबिरादरम्यान
ग्रामीण भागातील लोकांमध्ये डोळ्यांची काळजी घेण्याबाबत जागृती नसते. डोळ्याला पाणी येणं. डोळे लाल होणं. अंधूक दिसणं, हे डोळ्यांचे आजार डॉक्टरांक़डे जाऊन तपासून घेण्याइतपत महत्वाचे आहेत असं त्यांना वाटत नाही. अन शेवटी अंधत्व येतं. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्माण 2 च्या संतोष गावळे व जयश्री कलंत्री यांनी उमरखेड तालुक्यातील ‘मन्याळी मध्ये 17 जून रोजी नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. यासाठी पद्मश्री डॉ. विकास महात्मे नागपूर यांची आठ लोकांची टीम नेत्र तपासणीसाठी आली होती. यांच्या सहकार्याने शिबीरात 238 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 148 लोकांना चष्म्यांची गरज असल्याचे निदर्शनास आले. तर 33 लोकांना मोतिबिंदू असल्याने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे दिसून आले. 

या कामात निर्माणच्या डॉ. स्वप्निल गिरीची मोलाची मदत झाली. संतोष व जयश्री यांनी नुकतीचनिर्मिती बहुउदेशिय संस्था मन्याळी’ या संस्थेची नोंदणी केली. त्या अंतर्गत हे नेत्र शिबीर घेण्यात आले. शिबीर दोन टप्यात पार पाडण्यात आले. उमरखेड येथे आमदार विजयराव खडसे ह्यांच्या उपस्थितीत तर मन्याळीत ठाणेदार, सरपंच, पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत शिबीर पार पडले. नेत्र तपासणी मोफत न ठेवता ज्यांना डोळ्यांची तपासणी करायची होती अशा व्यक्तीकडून 20 रू तर ज्यांना चष्मा हवा अशा व्यक्तीला 50 रू फी आकारली होती. यातून 10,510 रू जमा झाले. परंतू अजून 18700 रूपयांची या संस्थेला गरज भासते आहे. ज्यांना मदत करणे शक्य आहे अशांनी निर्मीती बहूउद्देशिय संस्था मन्याळी खाते state bank of India  AC No. 32385886558, IFS Code SBINO-001468, MICR no. 445002804  या नावे रुपये जमा करावे.