निर्माण 1 ची सायली
तामणे, अमृत बंग आणि निर्माण 4 च्या रंजन पांढरे यांनी नुकताच सोलापूरचा दौरा
केला. या दौऱ्याचे मुख्यत्वे दोन उद्देश्य होते. दुष्काळाचा प्रश्न समजून घेणे आणि
सोलापूर व आजुबाजुच्या परिसरातील काम करणाऱ्या निर्माणींना भेटणे. सांगोल्यातील
श्री. गणपतराव देशमुख हे गेली ५० वर्षे सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत.
निर्माण ४ च्या बाबासाहेब देशमुखचे ते आजोबा आहेत. दुष्काळाचा प्रश्न समजून
घेण्याच्यानिमित्त त्यांना भेटण्याचा या तिघांना योग आला. मॉन्सूनचे वारे
महाराष्ट्रातील दक्षिण पूर्व भागाकडे (सांगली, सातारा, सोलापूर ह्यांचा पूर्वभाग)
येईपर्यंत त्यांच्यातील आर्द्रता कमी होत जाते. म्हणूनच हा पट्टा – जत, खटाव,
मंगळवेढा इत्यादी. दुष्काळी भाग आहे. सांगोला तालुका सोलापुरातील इतर
दुष्काळग्रस्त भागांपेक्षा वेगळा दिसून येतो तो गणपतरावांच्या प्रयत्नांमुळे.
त्यांच्या मते सांगोल्याचा सर्व विकास हा रोजगार हमी योजनेमुळेच शक्य झाला.
त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी सांगोल्यात १००० हून अधिक पाझर तलाव व ३-४ हजारहून
जास्त बंड / बंधारे / नाले रोजगार हमी योजनेचा योग्य वापर करून बांधले. सांगोल्यात
८१ खेड्यांना पंढरपूरहून ८० – ९० कि.मी. पाणी आणले गेले आहे. उन्हाळात देखील
सांगोल्यात डाळींब, बोर अशी बागायती शेती भरभरून दिसते. गणपतरावांच्या मते दुष्काळ
निवारणासाठी सर्वात मोठा अडथळा मागील अनेक वर्ष तंत्रज्ञान हे होते. कृष्णा व भीमा
नद्यांतून पाणी उपसण्याचे तंत्र १९८४ नंतर उपलब्ध झाले. तसेच राजकीय इच्छाशक्तीचा
अभाव हे देखील फार मोठे कारण ठरले.
गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सूतगिरणीत निर्माणी |
सांगोल्याचा विकास
व्हावा ह्या हेतूने गणपतरावांनी सहकारी तत्वावर चालणाऱ्या सूत गिरणीची स्थापना केली.
खुद्द सांगोल्यात कापूस पिकतच नाही, तर गिरणीसाठी लागणारा कापूस हा बीड आणि
विदर्भातून आणला जातो. 1982 साली सुरु झालेल्या या गिरणीची आताची वार्षिक उलाढाल
ही 150 कोटी रुपयापर्यंत पोहोचली आहे. अत्यंत अद्ययावत असलेल्या या गिरणीची सगळी
व्यवस्था कामगारांचे हित लक्षात ठेवूनच चालते. गिरणीत दर वर्षी मिळणारा बोनससुद्धा
कामगार स्वत:च ठरवतात. कामगारांसाठी अपघातप्रसंगी, अडचणी प्रसंगी, निवृतीनंतर
त्यांच्या हिताच्या अनेक योजना गिरणी राबवते.
सोलापूरनजीक ‘रेबीज’
या रोगावर काम करीत असलेला सारंग देसाई तसेच टेंभूर्णीजवळ गावात मुलांसाठी वाचनालय
तसेच वृक्षारोपण अशी ग्राम विकासाची कामे करीत असणार्या रणजित लोंढे या निर्माणच्या मुलांशीही या दौरादरम्यान भेट
झाली.
No comments:
Post a Comment