'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 30 July 2012

विश्वासाच्या ‘पाया’तील काटा दूर.....

सर्च’ आणि ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेला फिरता दवाखाना (MMU) आदिवासी गावांमध्ये चांगला जम बसवत आहे. निर्माणचा 1 चा वैभव आगावणे आणि निर्माण 4 चा सुजय काकरमठ हे या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. रुग्ण डॉक्टरची सतत परिक्षा घेत असतात, आणि ते त्या चाचणीत यशस्वी ठरले तरच लोक त्यांच्याकडून उपचार घ्यायला तयार होतात हे सिध्द करणारा एक प्रसंग नुकताच फिरता दवाखान्याच्या टीमबरोबर घडला. गाडी ‘कोवानटोला’ या आदिवासी गावात उभी होती. 15 मिनिटे थांबल्यावरसुद्धा गाडीकडे येणारे कुणीही दिसत नव्ह्ते. टीम ने घरोघरी जाऊन ‘कुणी बीमार आहे का?’ असे विचारायला सुरूवात केली. पण गावात कुणीच आजारी नव्ह्ते. दवाखाना निघण्याच्या तयारीत होता. तेव्हा एक 8-9 वर्षांची मुलगी तिचा पाय दाखवायला आली. तिच्या पायात पू भरलेला एक मोठा फोड होता. ती गेल्या 8-10 दिवस त्याचा त्रास सहन करत होती. तिचा फोड फुटून पू काढावा लागणार होता. डॉ. सुजयने गावाच्या चौकातच ही छोटी शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. ह्ळूह्ळू बघ्यांची गर्दी जमायला लागली. फोड फोडल्यावर त्यातून एक 3 सेंमी. X 0.5 सेंमी अशी काडी बाहेर निघाली. लोक चकित झाले. तिचे वडील सांगायला लागले की तिला एका बंगाली doctor कडे नेले होते. त्याने 2 इंजेक्शन दिले आणि 300 रुपये घेतले. ‘ही काडी त्याला नाही का दिसली?’ असे कोणीतरी म्हणाले. लोकांत या विषयावर चर्चा सुरू झाली. आणि MMU कडे तपासायला भली मोठी गर्दी जमली!  येवढया वेळ घरात दडी मारुन बसलेले लोक डॉक्टरच्या एखाद्या Success story ची वाट बघत होते. आणि अखेर डॉक्टर चांगला असल्याची खात्री झाल्यावर लोक तपासणीसाठी बाहेर आले. फिरत्या दवाखान्यातील वैद्यकीय सेवेचे अजून एक वैशिष्ट समोर येते. डॉक्टर जेव्हा आपल्या दवाखान्यात बसलेला असतो तेव्हा रुग्ण त्याच्याकडे येतात. यात डॉक्टर राजा असतो. परंतु फिरत्या दवाखान्याची टीम घरोघरी जाऊन लोकांना दवाखान्यात तपासणी करुन घेण्याची विनंती करते. यात डॉक्टर आणि रुग्णाचे नाते पूर्णत: बदलते. मी डॉक्टर आहे याचा अहंभाव दूर सारुन रुग्णसेवा हे अंतिम फलित मानणार्‍या या टीमचे यामुळे कौतुक वाटते.

No comments:

Post a comment