'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 26 July 2012

निर्माण 4 च्या डॉ. आरती गोरवाडकर, स्वाती देशमूख आणि युगंधरा काटे महाराष्ट्राच्या दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत


एम.बी.बी.एस. झाल्यावर सर्व सरकारी कॉलेजेस मधून बाहेर पडणाऱ्या डॉक्टर्सने एक वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा देणे अनिवार्य असते. तसा करार (बॉंड) असतो. मात्र फार कमी मुले हे गांभीर्याने घेतात. एम. डी. ची तयारी करण्याच्या निमिताने मुले घरी राहून आभ्यास करणे पसंत करतात. सरकारी यंत्रणासुद्धा ही बाब फार मनावर घेत नाही. त्यामुळे एकी\कडे आपल्याला ग्रामीण / आदिवासी भागात योग्य वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही असे चित्र दिसते तर दुसरीकडे एम.बी.बी.एस. झालेली ९० टक्के मुले बॉंड न पाळता घरी बसून केवळ पुस्तकी अभ्यास करताना दिसतात.

निर्माणच्या डॉक्टर्समध्ये मात्र एक वेगळा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. प्रियदर्श तुरे (मेळघाट) पासून सचिन बारबदे, विठ्ठल साळवे, विक्रम सहाने, रामानंद जाधव, शिवप्रसाद थोरवे (गडचिरोली) , स्वप्नील गिरी (यवतमाळ), बाबासाहेब देशमुख (परिते – सोलापूर) या सर्व मुलांनी स्वत:हून मागणी करून ग्रामीण भागात पोस्टिंग घेतले. विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे मुली सुद्धा यात मागे नाहीत. निर्माण 4 च्या स्वाती देशमुख, युगंधरा काटे, आरती गोरवाडकर या मुलींनी आदिवासी भागात सेवा देण्याचा घेतलेला निर्णय वाखाण्याजोगा आहे.
 
  निर्माण ४ ची आरती गोरवाडकर ही मुळची नाशिकची. पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेज मधून तिने एम.बी.बी.एस. पूर्ण केले. सध्या ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यातील हरसूल या आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. निर्माण 4 च्या स्वाती देशमुखने मुंबईमधील जे. जे महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असून ती नुकतीच गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाली आहे. निर्माण 4 च्या सुजय काकरमठच्या संपर्कातून निर्माण परिवाराला सामील झालेली डॉ. युगंधरा काटे हीनेही याच रुग्णालयात एका वर्षासाठी वैद्यकीय अधिकारीपद स्विकारले आहे. युगंधरा मूळची मुंबईची असून तिने अकोल्याच्या सरकारी महाविद्यालयातून एम.बी.बी.एसचे शिक्षण पूर्ण केले आहे. या तिघींचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा! 

युगंधरा काटे
आरती गोरवाडकर
स्वाती देशमुख

No comments:

Post a comment