'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

सीमोल्लंघन मे - जून २०१४


(१० जून हा जागतिक नेत्रदान दिवस.. नेत्रदानाचे महत्त्व ठळक करणारी पल्लवी मालशेची कल्पक कलाकृती)

या अंकात...

‘निर्माण’बद्दल काही नव्या घडामोडी...

विशेष
वेगळ्या पद्धतीने योगदान देत आहेत निर्माणचे काही युवा

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील शांतता आणि लोकशाही सुद्धृढ करण्यासाठी १९९३ साली स्थापना करण्यात आलेल्या पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी या फोरम विषयी
शेतकऱ्यांच्या राहणीमान आणि आर्थिक स्थितीविषयी डोळे उघडणारी वस्तुस्थिती...

ताज्या घडामोडी


निर्माण मध्ये येणारा प्रत्येक युवा इतरांच्या दुःखाबद्दल नक्कीच संवेदनशील असतो. मात्र संवेदनशीलतेचा आणि सेवाभावी वृत्तीचा परमोच्च बिंदू असणाऱ्या डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर यांच्या चरित्राबद्दल लिहितेय मृण्मयी अग्निहोत्री...
सर्वांत बुद्धीचा प्राणी – अनिल  अवचट 

नमस्कार मंडळी...


निर्माणच्या धर्तीवर गुजरातमधल्या युवक-युवतींसाठी काही प्रक्रिया सुरु करता येईल का याबद्दल गुजरातमधल्या काही संस्था व व्यक्तींकडून गेले काही महिने विचारणा सुरु होती. यावर जास्त सखोल चर्चा करायला म्हणून भरुचजवळील झगडिया येथील सेवा रुरलया प्रख्यात संस्थेने एक मिटिंग आयोजित केली होती. त्याकरता सुनील चव्हाण व अमृत बंग हे दोघे ९-११ मे दरम्यान असे झगडियाला जाऊन आले. सेवा रुरल मधील निर्माणचे हितचिंतक व स्नेही डॉ. श्रेय व डॉ. गायत्री देसाई या तरूण जोडप्याने गुजरातमधल्या सामाजिक क्षेत्रातील इतर सुमारे १५ जणांना देखील बोलावले होते. मीटिंगनंतर उत्साही वातावरण तयार झाले असून गुजरातमधील ३ जणांच्या एका टीमने या कल्पनेला पुढे अधिक विकसित करायची जबाबदारी घेतली आहे. त्यांना आवश्यक ती मदत निर्माणच्या बाजूने होईलच. लवकरच याची पुढची पायरी काय ते कळेल.
या भेटीदरम्यान पूर्ण एक दिवस सुनील चव्हाण व अमृत बंग यांना सेवा रुरलचे काम देखील बघता आले. अतिशय उत्तम प्रतीचे आणि प्रेरणादायी असे त्यांचे काम आणि त्यांची टीम आहे. निर्माणमधील विशेषत: वैद्यकीय विद्यार्थ्यांनी तर जरूर जाऊन बघावी अशी सेवा रुरल ही जागा आहे.
*****
निर्माणची पुढची (सहावी) बॅच येत्या जानेवारीमध्ये (२०१५) सुरू होणार आहे. त्यासाठी निवडप्रक्रियेला आता सुरुवात झाली असून या बॅचमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्यांननी http://nirman.mkcl.org या आपल्या संकेत स्थळावरून प्रवेश अर्ज डाऊनलोड करावा आणि भरून त्वरित पाठवावा. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट, २०१४ आहे! ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यभरात मुलाखती होऊन २ ऑक्टोबर, २०१४ ला निवड झालेल्या शिबिरार्थ्यांची यादी जाहीर करण्याचा आपला मानस आहे.
या संदर्भात आपल्या परिचयातील युवावर्गामध्ये जरूर माहिती पोहोचवूयात! निर्माण ६ साठी सायली वाळके व अमृता ढगे या आपल्या मैत्रिणींनी सुंदर पोस्टर्स तयार केले
आहेत. त्यातील काहींची लिंक खाली आहे. यावरून प्रिंट काढून ते देखील शक्य त्या कॉलेजेस, क्लासेस, इ. ठिकाणी लावता येतील. आपल्या फेसबुक प्रोफाईलद्वारे देखील निर्माण ६ बद्दल इतर लोकांना आपण कळवू शकता! जास्तीत जास्त युवांपर्यंत ही माहिती पोहोचण्यासाठी सर्वांची मदत मोलाची राहील!

*****
मे महिन्यात वेळेच्या अभावी सीमोल्लंघनचा अंक पाठवणे संपादकीय टीमला शक्य झाले नाही. निर्माण ६ साठी प्रसिद्धी व निवडप्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी संपादकीय टीमच्या सदस्यांना आपल्या वेळेचा मोठा टक्का द्यावा लागणार आहे. त्यातच  बातमीदारांची संख्या कमी झाली असल्यामुळे दर महिन्याला सीमोल्लंघनचा अंक काढणे कठीण होत आहे. त्यामुळे इथून पुढे आपण दर २ महिन्यांतून एकदा सीमोल्लंघनचा अंक काढू. दोन अंकांमधील अंतर वाढल्यामुळे बातम्यांना अधिक चांगला न्याय देता येईल व अंकांची गुणवत्ता सुधारेल असा विश्वास वाटतो.
*****

KAG पासून AGK पर्यंत !


एखाद्या सामाजिक प्रश्नावर काम करायला सुरुवात करणे या एका क्षणासाठी अनेक महिने, अनेक वर्षे आपला मानसिक प्रवास चालू असतो. या काळात अनेक अडथळे आपण पार करतो. हा कालखंड शिक्षण व आत्मप्रत्ययाने अतिशय समृद्ध असा काळ असतो. निर्माण शिबिरात आपण आपल्या सहकाऱ्यांचे असे अनुभव अनेकदा ऐकतो.
मात्र प्रश्नावर काम करायला सुरुवात करताच हाती घेतलेला प्रश्न, सोबतचे लोक, सहकारी यांच्यासह आपला संयुक्त प्रवास होऊ लागतो. प्रवासातला ‘मी’ हळूहळू कमी होऊ लागतो. ‘मी पुढे काय करू?’ पासून ‘हा प्रश्न सोडवण्यासाठी मला काय कारावे लागेल?’ या दिशेने आपला अभ्यास, चिंतन, आचरण सुरू होते. एका निर्माण शिबिरात योगेश दादाने (डॉ. योगेश कालकोंडे) सांगितल्याप्रमाणेअसा तो प्रवास असतो.
आपले काही सहकारी काम व अभ्यास यांतून इतरांना सांगण्यासारखे ज्ञान बनेल अशा टप्प्यावर पोहोचत आहेत. गेल्या काही महिन्यात आपल्याच मित्र-मैत्रिणींनी विविध प्रश्नांवर लिहिलेले लेख आपली त्या त्या प्रश्नांबद्दल नक्कीच समज वाढवतील.
·       मोठ्या धरणांच्या आर्थिक व्याव्हार्यतेबद्दल अमृता प्रधानचा लेख: http://indiatogether.org/poor-returns-from-large-dams-economy
·       पशुजैवविविधतेच्या प्रश्नावर सजल कुलकर्णीचा लेख: http://www.bharat4india.com/easyblog-3/2014-05-06-12-13-13
·       भारतातील पोलिओचे समूळ उच्चाटन करणाऱ्या मोहिमेबद्दल चारुता गोखलेचा लेख: http://www.loksatta.com/lokprabha/polio-478915/?nopagi=1 

आपला प्रतिसाद अमृता (amrutapradhan@gmail.com ), सजल (sajalskulkarni@gmail.com ) व चारुताला (gokhale.charuta@gmail.com ) नक्की कळवा.

पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील शांतता आणि लोकशाही सुद्धृढ करण्यासाठी १९९३ साली स्थापना करण्यात आलेल्या पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसी या फोरमशी मी गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ जोडलेलो आहे. या फोरमचा महाराष्ट्राचा सह-सचिव म्हणून मी गेल्या २ महिन्यापासून काम करत आहे. मुळातच भारत-पाकिस्तान यांच्यातील व्देष-गैरसमज यांची करणे काय? याची सुरुवात कशी झाली? यावर उत्तर शोधता येईल का? तसेच फोरमचे गेल्या २० वर्षातील काम याचा आढावा घेण्याचा प्रयत्न मी या लेखातून केला आहे. या लेखातील काही मुद्यांबद्दल मतभेद असू शकतात मात्र दोन्ही देशातील लोकशाही आणि शांतता, मैत्री सुद्धृढ करण्याच्या फोरमच्या प्रमुख उद्देशाबद्दल मतभेद नसतील हि अपेक्षा.
-अव्दैत दंडवते
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला मात्र स्वतःचे दोन तुकडे पाडूनच. १७ ऑगस्टला भारताची फाळणी लोकांच्या समोर आली आणि भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्राचे नकाशे जगासमोर आले. त्यानंतर या देशाने कधीही पहिला नव्हता असा नरसंहार अनुभवला. लाखो-करोडो लोकांची आयुष्य नकाश्यावर मारलेल्या पेन्सिलीच्या काही उभ्या-आडव्या रेषांनी कायमची बदलून गेली. स्वातंत्र्य मिळवण्याची अनाकारण घाई म्हणा, सत्तेची लालसा म्हणा किंवा हिंदू-मुस्लिम व्देष कायमचा संपवण्याचा एक अभूतपूर्व पण असफल प्रयत्न म्हणा, जगाच्या नकाश्यावर भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे जन्माला आली होती.
या फाळणीचा संपूर्ण दोष (भारतीयांनुसार) आणि श्रेय (पाकिस्तांनी नागरीकांनुसार) ज्यांच्या माथी मारल गेलं त्या दोन्ही व्यक्ती पुढच्या दोन वर्षात निघून गेल्या होत्या. एका अहिंसेच्या प्रेषिताची बंदुकीच्या तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर दुसरा आजारपणाने खंगत जाऊन शेवटी हे जग सोडून निघून गेला.
मात्र गोष्ट इथेच संपत नाही. यांनतर सुरु झाला शह-काटशह, कट-कारस्थान यांचा कधीही न संपणारा खेळ. एकीकडे भारताने लोकशाही, सर्वधर्मसमभाव हि धोरणे स्वीकारली तर दुसरीकडे ज्या मुस्लिम धर्मियांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आला होता त्याला अपरिहार्यपणे मुस्लिम धर्मांधता स्वीकारवी लागली. एकीकडे भारतात प्रत्येक वर्षागणिक लोकशाही अधिकाधिक सुद्धृढ होत गेली तर दुसरीकडे पाकिस्तानात मात्र राष्ट्राध्यक्षांचे खून आणि धर्माच्या आधारावर सुरुवात झालेली आणि मानवी-मुलभूत अधिकाराचे हनन करणारी लष्करी हुकुमत यामुळे लोकशाही कधी रुजलीच नाही किंबहुना ती कधी रुजू दिलीच गेली नाही....
कोणत्याही देशाला प्रगती करण्यासाठी समोर ध्येयाची आवश्यकता असते. पाकिस्तानात ठरवून भारताचा द्वेष हे ध्येय लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न अगदी ठरवून सुरुवातीपासून केला गेला. याची सुरुवात सर्वप्रथम इतिहासाच्या विकृतीकारणापासून करण्यात आली. कोणत्याही देशाच्या जडण-घडणीत इतिहासाचा खूप मोठा वाटा असतो. मात्र पाकिस्तानचा इतिहास काय? असा प्रश्न पाकिस्तानातील इतिहासकारांना पडला कारण १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी पाकिस्तान नामक देशच अस्तित्वात नसल्याने या देशाला स्वतंत्र असा इतिहासच न्हवता. मात्र यावर उत्तर शोधण्यात आले आणि मग अलाउद्दीन खिलजी, बाबर यांच्या काळात झालेला मुस्लिम राष्ट्राचा / पाकिस्तानचा उदय, औरंगजेबाच्या काळात झालेला त्याचा विस्तार, इंग्रजांचे राज्य, स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीसाठी जागृत झालेली भावना आणि मग पाकिस्तानची निर्मिंती असा पाकिस्तानचा इतिहास लिहिण्यात आला. यामध्ये मग हिंदू बहुल लोकसंख्या असलेला भारत कसा वाईट आणि त्याने आपल्या अधिकारांचे हनन वर्षानुवर्षे कसे केले याचा विकृत इतिहास लहानपणापासून मुलांना शिकवून त्यांच्या मनात भारताबद्दल व्देष कायम राहील व तो सतत वाढत जाईल याची काळजी घेतली गेली.
दुसरीकडे भारतीयांच्या मनावर फाळणी, त्यांनतर झालेल्या नरसंहारास मुस्लिम धर्मीय आणि त्यांनी पाकिस्तानची मागणी कशी कारणीभूत आहे हे ठासण्याची सुरुवात भारतातील धर्मांध शक्तींनी सुरु केली. भारतातील ठराविक लेखकांनी पाकिस्तानांत हिंदुंवर कसे अत्याचार केले जातात याची मीठमसाला लावून वर्णन केलेली पुस्तके सत्यकथेच्या नावाखाली खपवली. संपूर्ण जगात पाकिस्तान हाच कसा भारताचा शत्रू आहे आणि पाकिस्तानकडूनच भारताला कसा धोका आहे हे पटवण्याचा प्रयत्न केला गेला. पाकिस्तानचा “कट्टर प्रतीस्पर्धी, पारंपारिक प्रतिस्पर्धी” असा सतत होणारा उल्लेख याचाच एक भाग आहे.
मात्र वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध सहजासहजी सुटत नाहीत. एका देशात, एका शहरात राहणारे अनेक लोकं एका रात्रीत वेगळे झाले. मात्र त्यांची परस्परांसंबंधीची ओढ कमी झाली नव्हती. जर हे लोकं एकमेकानंना भेटत राहिले तर बऱ्याच प्रयत्नांती घडवून आणलेला हा डाव उधळून लागण्याची शक्यता होती. म्हणुनच या दोन्ही देशातील सामान्य नागरिकांचा एकमेकांशी असलेला संबंध तोडण्यात आला. ते एकमेकांना भेटू शकणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. VISA चे नियम अत्यंत कठोर करण्यात आले त्यातील क्लिष्टता वर्षागणिक आणखी वाढवण्यात आली.
आज TV सुरु केला कि आपल्याला जगभरातील channels दिसतात मात्र पाकिस्तानातील एकही channel भारतात दिसत नाही. पाकिस्तानातील सद्य स्थिती लोकांसमोर येत राहील असे एकही news channel तसेच वृत्तपत्र भारतात येत नाही. पाकिस्तानात देखील एकही भारतीय channel दिसत नाही; तसेच एकही वृत्तपत्र येत नाही. गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानात भारतीय सिनेमांवर बंदी आहे.
भारतीय आणि पाकिस्तानातील संस्कृतीत, राहणीमानात फारसा फरक नाही. सिनेमा-सिरीयल यांवर एकूण जनमानसाचा, त्यांच्या राहणीमानाचा प्रभाव असतो. मात्र या गोष्टी लोकांसमोर येऊ नयेत यासाठीच हे प्रयत्न करण्यात आले.
दोन्ही देशातील व्देष वर्षानुवर्षे वाढतच गेला आहे. दोन्ही देश त्यांच्या देशातील वाढत्या दहशतवादासाठी एकमेकांना दोषी मानतात. चर्चा-मैत्री याने हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो असा विचारच फारसा कोणी केला नाही. या काळात दोन्ही देशांनी अनेक चूका केल्या. कदाचित भारताने १० चूका केल्या असतील तर पाकिस्तानने १२ चूका केल्या हे देखील एक वेळ मान्य करता येईल. असे असले तरी एक वेळ अशी येते ज्यावेळी झालेल्या चूका विसरून पुन्हा नव्याने डाव मांडण्याची गरज असते.
भारत-पाकिस्तानातील सामान्य जनेतेला युध्द नकोय तर मैत्री हवीय. या दोन्ही देशातील जनतेच्या मनात एकमेकांबद्दल असलेले संशय, गैरसमज दूर करायचे असतील तर त्यांनी एकमेकांना भेटायला हवे, एकमेकांच्या देशाला भेटी द्यायला हव्यात आणि दोन्ही देशांमधील शांतात-लोकशाही सुद्धृढ करण्यासाठी चर्चा करायला करायला हवी या विचारातून दोन्ही देशातील सामाजिक-मानवी हक्क कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, कलावंत यांनी १९९३ साली पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रॅसी या फोरमची स्थापन केली....
क्रमश....

स्रोत : अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com