सुहास शिगम (निर्माण ४) जावडे (ता. लांजा, जि. रत्नागिरी)
येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गेले २ वर्षे मुख्याध्यापक म्हणून
जबाबदारी सांभाळत आहे. सध्याचे प्राथमिक शिक्षण मुलांच्या पातळीवर उतरत नसल्याचे
सुहासला जाणवत होते. मुलांना स्वयंअध्ययन करण्यास कसे प्रवृत्त करता येईल, विचार
करणे व निर्णय घेणे हे मुलांना कसे जमू शकेल हे शिकण्याच्या दृष्टीने ‘ग्राममंगल’
संस्थेतर्फे ऐना येथे आयोजित करण्यात आलेल्या आकलनशास्त्रीय विचार व प्राथमिक
शिक्षण प्रशिक्षण शिबिरात सुहासने सहभाग घेतला.
भाषा, गणित, इतिहास, भूगोल व परिसर अभ्यास या विषयांचा
सर्वांगाने कसा विचार करता येईल हे या शिबिराचे सूत्र होते. विषयांचे भाषिक आकलन
होत नाही म्हणून बरेचदा मुलांना इतर विषय अवघड वाटू लागतात. त्यामुळे भाषा विकसित
करण्याच्या दृष्टीने मुलांची श्रवणक्षमता विकसित करणे, संभाषण कौशल्य विकसित करणे,
मुलांना वाचन व लेखन शिकवणे हे खेळ, सामूहिक/वैयक्तिक कृती व गाणी यांच्या
माध्यमातून कसे करता येईल यासाठी सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. गणितातील
अमूर्त संकल्पना समजणे ८-९ वर्षांच्या मुलांना कठीण जाते. त्यामुळे आधी मूर्त
स्वरूपातील वस्तूंचा वापर करून हळुहळू अमूर्ततेकडे कसे घेऊन जाता येईल यावरदेखील
शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याच धाग्याला पुढे नेत आपल्या कुटुंबाची
वंशावळ, स्वतःचा लहानपणीचा इतिहास इथून सुरुवात करून इतिहास कसा शिकवावा;
गावाच्या/पाड्याच्या नाकाशापासून सुरुवात करून भूगोल कसा शिकवावा याविषयी
शिबिरार्थ्यांना सामूहिक कृतीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरादरम्यान शिबिरार्थ्यांना ग्राममंगल संस्थेच्या
सुकापाडा व ऐराली पाड्यावरील शाळांना भेट देण्याची व तेथील शिकवण्याची पद्धत
प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली.
‘ग्राममंगल’बद्दल अधिक
माहितीसाठी: http://www.grammangal.org/
स्त्रोत- सुहास शिगम, shigamsuhas06@gmail.com
No comments:
Post a Comment