निर्माणच्या पाचव्या मालिकेतील
दुसरे शिबीर (अवैद्यकीय मुलांसाठी) नुकतेच शोधग्राम येथे पार पडले. ह्या शिबिराची
मुख्य उद्दिष्टे तरुणांना समाजातील विविध प्रश्नांची ओळख होणे, त्यांचा जवळून अनुभव घेणे, प्रश्न सोडविण्याच्या विविध पद्धती जाणून घेणे, तज्ञांशी संवाद व इतर समवयस्क तरुणांच्या कार्यातून प्रेरणा
घेऊन स्वत:च्या जीवनातील अर्थपूर्ण शोध पुढे नेणे अशी होती.
ह्या शिबिरामध्ये सर्व सहभागी
युवांना ४ दिवस विविध आदिवासी व गैर आदिवासी गावांमध्ये राहून तेथील जनजीवन, राहणीमान, प्रश्न व अडचणी समजून घ्यायच्या
होत्या. तसेच ह्या प्रश्नाना अधिक सखोलपणे समजून घेण्याकरिता मुलांना मार्गदर्शन
करण्यासाठी अश्विनी कुलकर्णी (रोजगार हमी योजना), मिलिंद मुरुगकर (अन्न सुरक्षा), विजयअण्णा बोराडे (पाणी प्रश्न) व ‘असर’चे निकाल सादर करण्यासाठी ‘प्रथम’चे मार्गदर्शक भालचंद्र व सावित्री
(भारतातील शिक्षणाची अवस्था) अशा विविध मान्यवरांनी मुलांशी संवाद साधला. तसेच
निर्माणचे पूर्व शिबिरार्थी व संलग्न युवांनी देखील ह्या शिबिरात आपला वैयक्तिक
प्रवास व कामाच्या स्वरूपाबद्दल मुलांशी चर्चा केली. ह्यामध्ये आकाश बडवे
(दन्तेवाड्याचा पी.एम.आर.डी.एफ. फेलो), निखिलेश बागडे व राजश्री तिखे (शिक्षणमित्र प्रकल्प, बायफ), शिवप्रसाद थोरवे व विक्रम सहाणे
(गडचिरोलीतील सरकारी वैद्यकीय सेवेतील अनुभव), प्रणीत सिन्हा (बचपन बनाओ) ह्यांचा समावेश होता. तसेच
निर्माण २ चा यतीन दिवाकर देखील या प्रसंगी उपस्थित होता.
ह्या शिबिरातील अनेक मुले आदिवासी
गावात राहिली. तसेच निखिलेश, विक्रम, शिवप्रसाद, आकाश व यतीन यांच्यासोबत
संवादाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या सुमारे १०% प्रमाण असलेल्या
पण तरीही दुर्लक्षित अशा आदिवासी
जीवनाची शिबिरार्थ्यांना ओळख झाली. शिबिराची सांगता मुलांनी स्वत:चे पुढील ६
महिन्याचे कृती कार्यक्रम बनवणे व त्यावरील चर्चेने झाली.
No comments:
Post a Comment