'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 5 June 2024

सृष्टी आणि युवांची जीवनदृष्टी

५ जून हा जागतिक पर्यावरण दिन. खरंतर आता अशी परिस्थिती आहे की वर्षातील कुठलातरी एक दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून निर्देशित करुन भागण्यासारखा नाही, तर प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येकच दिवस, त्यातील जगणे, नागरिक – ग्राहक – उत्पादक यापैकी कुठल्याही भूमिकेमधील आपले निर्णय आणि वर्तन, हे सर्वच पर्यावरणीयदृष्ट्या सुसंगत कसे असेल, कमीत कमी नुकसानदायक आणि शक्यतो पर्यावरण संवर्धन करणारे कसे असेल याचा विचार करणे हे अत्यावश्यक झाले आहे.

निर्माणच्या निमित्ताने विविध तरुण-तरुणींशी झालेल्या संवादात आम्हाला असे आढळून आले आहे की ‘ग्लोबल वॉर्मिंग’ बाबतीत अनेक युवांनी काहीना काही ऐकले असते, शाळेत थोडेफार वाचले असते. याबद्दल अगदीच अनभिज्ञ असणारे किंवा ‘क्लायमेट चेंज वगैरे झूट है’ असे म्हणणारे सहसा कोणी सापडत नाही. त्याबाबतीत भारतातील परिस्थिती अमेरिकेपेक्षा बरी आहे असे म्हणायला हवे. पण आपले युवा क्लायमेट चेंजविषयी निरक्षर जरी नसले तरी बहुतेकांची समज ही साधारण इयत्ता आठवीच्या दर्जाची असते. कारण त्यानंतर फारसे कोणी काही वाचलेच नसते. या विषयाचे गांभीर्य, त्याची व्याप्ती आणि तीव्रता, त्यासंबंधीचे विज्ञान व फॅक्टस, त्वरित कृतीची निकड, कृतीच्या विविध शक्यता व पर्याय, माझ्या वैयक्तिक जगण्यातील निर्णयांची पर्यावरणीय किंमत इ. बद्दल अनेकांना फारच जुजबी माहिती असते. २१व्या शतकातील आपल्या सगळ्यांच्याच जगण्याला क्लायमेट चेंजचा आयाम हा टाळून चालण्यासारखा नाही. त्यादृष्टीने, विशेषत: युवांचा विचार सुरू व्हावा म्हणून काही मुद्दे:

१. युवांनी सर्वप्रथम हे लक्षात घेणे आवश्यक आहे की क्लायमेट चेंजच्या विषयाचे सर्वात जास्त महत्त्व हे, प्रौढ अथवा वृद्ध व्यक्तींपेक्षाही अधिक, तरुणांसाठी आहे. असे समजा की एक आगगाडी चालली आहे आणि पुढे दूरवर एक दरी आहे. जे लोक अधेमध्येच गाडीतून उतरणार आहेत त्यांना गाडीचे पुढे जाऊन काय होणार याची फार फिकीर असेलच असे नाही. पण जे लोक गाडी दरीत कोसळायची वेळ येईल तोपर्यंत गाडीत बसून असणार आहेत त्यांच्यासाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न आहे. गाडीची सध्याची दिशा काय, वेग काय, तिला ब्रेक्स कसे लावता येतील, स्टीअरिंग व्हीलद्वारे दिशा कशी बदलवता येईल हे सर्व केवळ काल्पनिक नाहीत तर अस्तित्वाशी घट्टपणे निगडित असे प्रश्न आहेत. आणि यांची उत्तरे शोधायची सर्वाधिक गरज, जबाबदारी आणि संधी ही युवांकडेच आहे. परिस्थितीचे हे गांभीर्य आणि निकड ध्यानात घेऊन त्यानुसार आपल्या क्षमतांना आणि ऊर्जेला ध्येयाकडे केंद्रित करणे हे माझ्या तरुण मित्र-मैत्रिणींसाठी अनिवार्य आहे.

२. क्लायमेट चेंज बाबतचे नविनतम विज्ञान समजून घेत राहणे आवश्यक आहे. ‘ऑल इज वेल सिनारिओज’ किंवा ‘डूम्स डे सिनारिओज’ या दोन्हींच्या पलीकडे जाऊन नेमके फॅक्टस काय आहेत, उत्तरांच्या संभावना काय आहेत, त्यांची परिणामकारकता व मर्यादा काय आहेत, तसेच संबंधित राजकारण आणि अर्थकारण या विषयी समज विकसित होणे गरजेचे आहे. अगदी वैज्ञानिक जर्नल्स मध्ये प्रकाशित होणारे शोधनिबंध वाचणे कदाचित सगळ्यांना शक्य होणार नाही. पण अनेक चांगली पुस्तके आणि डॉक्युमेंटरीज आहेत ज्या द्वारे अभ्यासाला सुरुवात करता येईल. मराठीमध्ये अतुल देऊळगावकर यांनी या विषयाबाबतीत विपुल लेखन केले आहे. नुकतेच ‘सृष्टिधर्म’ हे कमलाकर साधले यांचे माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. सोबतच इंग्रजीमधील काही सुंदर पुस्तके सुचवायची झाली तर ‘द अनइनहॅबिटेबल अर्थ’ हे डेविड वॉलेस-वेल्स यांचे अप्रतिम पुस्तक, बिल गेट्सचे ‘हाऊ टू अव्हॉईड अ क्लायमेट डिझास्टर’, रामचंद्र गुहा यांचे ‘हाऊ मच शुड अ पर्सन कंझ्यूम’, वक्लाव्ह स्मिल यांचे ‘नंबर्स डोन्ट लाय’ व ‘हाऊ द वर्ल्ड रिअली वर्क्स’, एलिझाबेथ कोलबर्ट यांचे ‘अंडर अ व्हाईट स्काय’, डिटर हेल्म यांचे ‘नेट झिरो’ या काही पुस्तकांचे अगदी जरुर वाचन करावे. सोबतच अल गोर यांची ‘ऍन इनकनव्हिनियंट ट्रूथ’, लिओनार्दो डि कॅप्रिओची ‘बिफोर द फ्लड’, डेव्हिड अटेनबरो यांची ‘अ लाईफ ऑन अवर प्लॅनेट’, यान आर्थस-बर्ट्रन्ड यांची ‘होम’ अशा काही अत्यंत सुंदर डॉक्युमेंटरीज देखील बघता येतील.

३. उत्साहाला मोजमापाची आणि सातत्याची जोड देणे आवश्यक आहे. अन्यथा दर वर्षी पावसाळ्यात त्याच त्याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणारे अनेक उत्साही युवक गट आपण बघत असतो. पण केलेल्या उपक्रमांचे नेमके फलित काय, किती झाडे जगली, त्यांची वाढ कशी आहे, त्यांना योग्य पाणी व खत मिळते आहे का, इ. बाबी बघत राहणे व जरुर तेथे सुधारणा करणे गरजेचे आहे. या पलीकडे जाऊन ज्या कुठल्या विद्याशाखेमध्ये आपण शिक्षण घेत असू त्याचा पर्यावरणाशी काय संबंध आहे, इंटर्नशिप, प्रोजेक्टस अथवा थिसिस करतांना क्लायमेट चेंजच्या मुद्द्याला समर्पक असे विषय निवडता येतील का हे शोधता येईल. यातून पर्यावरण बदलाचा प्रश्न हा निव्वळ छंद किंवा प्रासंगिक सेवेपुरता मर्यादित न ठेवता त्याकडे एक व्यापक, गुंतागुंतीची, गहन समस्या सोडविण्याचा सर्जनक्षम अनुभव म्हणून बघण्याची सवय लागेल.

४. काही दिवसांपूर्वी RIBA म्हणजेच रॉयल इंस्टीट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सचे माजी अध्यक्ष श्री. सुनंद प्रसाद हे आमच्याकडे गडचिरोलीला आले होते. पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या ग्लोबल वार्मिंगविषयी असलेली तोकडी कृतीशीलता बघून ते फार अस्वस्थ होते. त्यांच्यामते सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत तिकडे बरीच जागरूकता निर्माण झाली होती. पण त्यानंतर मात्र तेल कंपन्या आणि इतर कॉर्पोरेट हितसंबंध यांनी अगदी सुनियोजितपणे मोहीम उघडून पर्यावरणाच्या विषयाबाबत आणि त्यावर काम करत असलेल्या वैज्ञानिक व कार्यकर्त्यांविषयी संशयाचे व अविश्वासाचे वातावरण पैदा केले. त्यामुळे या चळवळीची मोठी पीछेहाट आजच्या स्थितीत झाली आहे असे सुनंद यांचे म्हणणे होते. भारतात देखील असे होऊ घातले आहे का हे आपण काळजीपूर्वक तपासात राहायला हवे. पर्यावरणीय कृती किंवा पर्यावरणरक्षणाच्या मुद्द्यांना गांभीर्याने घेणे हे जणू विकास-विरोधी आहे, विकास हवा असेल तर थोडा फार निसर्गाचा नाश अटळ आहे असे आजकाल बर्‍याचदा भासवले जाते. युवांना हे लक्षात घेणे आवश्यक आहे की असे व्हायची गरज नसून, सुंदर निसर्ग आणि निरोगी पर्यावरण हे खरेतर सम्यक विकासाचे एक महत्त्वाचे अंग आहे, वैशिष्ट्य आहे. त्याला हानी पोहोचवणारे प्रकल्प, योजना वा कार्यपद्धती या उलट मुळात विकास-विरोधी आहेत. निवडणुकांमध्ये मत देताना देखील धर्म, जात अशा फूटीच्या राजकारणाला बळी न पडता पर्यावरणीय कृती ही ज्यांच्या विचारांमध्ये आणि जाहीरनाम्यात अग्रस्थानी आहे अशांना मत देण्याची आता वेळ आली आहे.


५. माझ्या दैनंदिन जगण्यात मी अधिकाधिक पर्यावरण सुसंगत कसा जगू शकतो? तरुण-तरुणी घरी, हॉस्टेल, फ्लॅट्स, कॉलेज कॅम्पस असे जिथे कुठे असतील तिथे विचारपूर्वक कृती करू शकतात आणि आपली एन्व्हायर्नमेंटल फूटप्रिंट कमी करण्यासाठी प्रयत्न करु शकतात. दुर्दैवाने अनेक ठिकाणी असे चित्र पाहायला दिसते की जिथे कॉलेज प्रशासनावरील आपला राग व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी सुट्टीत घरी जातांना देखील हॉस्टेल रूम्सचे सर्व दिवे व पंखे मुद्दामहून सुरु ठेवून जातात, काही ठिकाणी गच्चीत असलेले सोलर पॅनल्स उगाच मस्ती म्हणून फोडले जातात. असले बेजबाबदार वर्तन योग्य नाही हे युवांना उमजले पाहिजे. हॉस्टेलच्या पार्किंगमध्ये अनेकविध आकर्षक (पण वाईट मायलेज असलेल्या) बाईक्स उभ्या असलेल्या दिसतात. सहसा विद्यार्थी कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला गेला की पालकांकडून कौतुकाची भेट म्हणून या घेतलेल्या असतात. त्यांचा वापर बहुतांश वेळेस एक किलोमीटरच्या परीघात कॉलेजच्या आवारात फिरण्यासाठी होतो. हे टाळून या ऐवजी सायकलने अथवा पायी जाणे हे आता ‘कूल’ समजले पाहिजे. नाहीतर पृथ्वी ‘हॉट’ होणार आहे!

६. सरतेशेवटी हे महत्त्वाचे सत्य लक्षात घ्यायला हवे की सृष्टीचा प्रश्न हा अनेक बाबतीत युवांच्या जीवनदृष्टीशी निगडित आहे. ‘ज्यादा से ज्यादा पैसा कमाओ और चाहे जो ऐष करो’ अशी चंगळवाद वाढवणारी प्रवृत्ती ही पर्यावरणविघातक तर आहेच पण सोबतच ‘नवनवीन गोष्टी, सेवा, अनुभवांवर पैसा खर्च करणारा एक ग्राहक’ अशीच जर युवांकडे बघण्याची (आणि युवांची स्वत:कडे बघण्याची) दृष्टी प्रबळ होत असेल तर ती एक मोठी शोकांतिका आहे. ‘बेपर्वा उपभोग घेणारा’ यापलीकडेही माझ्या अस्तित्वाला काही अर्थ आहे काय याचा प्रामाणिक शोध युवांनी घेण्याची गरज आहे. निसर्गापासून आणि आपल्या सामुदायिक मुळांपासून फारकत झाल्याने आलेला एकटेपणा कसा सोसावा हे न कळल्याने अनेक युवा वाढीव उपभोगवादाकडे वळतात. उठसुठ ऍमेझॉन, स्विगीवरुन येणारे पार्सल्स हे त्याचेच द्योतक आहेत. दरवर्षी जगात होणार्‍या मानवनिर्मित कार्बन एमिशन्सच्या 8% हे सिमेंटच्या प्रॉडक्शन मधून होते. मग मी गरज नसतांनाही नवीन घर बांधायलाच हवे का? दोन, तीन, चार फ्लॅट्स विकत घ्यायलाच हवेत का? नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी असे सांगतात की आपली मिळकत जर 10% नी वाढली तर आपले कार्बन उत्सर्जन 9% ने वाढते. असे होणार नाही अशा पद्धतीने त्या वाढीव मिळकतीचा उपयोग युवा मित्र-मैत्रिणींना करता येईल का?


2021 ते 2031 हे जसे ‘यूथ फ्लरिशिंग’चे दशक असणार आहे तसेच ते ‘अपरिवर्तनीय क्लायमेट चेंजला रोखण्याचे’ देखील (शेवटचे) दशक असणार आहे. भारतीय युवा या आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहेत का?

अमृत बंग


लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.




No comments:

Post a Comment