कॉलेजच्या कट्ट्यांवर तरुण-तरुणींच्या गटात होणार्या गप्पांमध्ये सहसा नैतिक मुद्द्यांवर चर्चा होत नाहीत. पण जर का कधीमधी एखाद्या विषयाला घेऊन योग्य – अयोग्य काय यावर वादविवाद झालाच तर बहुतांश वेळा त्याचा शेवट कसा होतो?
‘तू तुझ्याजागी आणि मी माझ्याजागी योग्य आहोत’,
‘इट डिपेण्ड्स ऑन द सिच्युएशन’,
‘सबका अपना अलग अलग पर्स्पेक्टिव्ह होता है, सभी अपनी जगह ठीक है’, ‘छोड ना... क्यूँ टेंशन लेता है?’
ही अथवा अशा वाक्यांचे विविध प्रकार आपल्याला वारंवार ऐकू येतात. हे कशाचे द्योतक आहे?
वैयक्तिक आवडीनिवडीच्या पलीकडे नैतिक मुद्द्यांवर विचार व भाष्य करताना, त्याबाबत आपली काही भूमिका ठरवतांना अनेक युवांना अडचण जाते. या पुढे जाऊन स्वत:च्या जीवनात जेव्हा प्रत्यक्ष काही निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा एकतर त्यांचा फार गोंधळ उडतो किंवा काही एका विशिष्ट पद्धतीनेच (फायदा / तोटा) बहुतांश निर्णय घेतले जातात.
युवांची ‘मॉरल डेव्हलपमेंट / नैतिक विकासाची’ प्रक्रिया काय असते? ते नेमका कसा विचार करतात?
निर्माणमधील आमचा अनेक युवांसोबतचा अनुभव तसेच या विषयाच्या वैज्ञानिक शोधसाहित्याच्या अभ्यासातून काही मुद्दे पुढे येतात:
1. बर्याचशा तरुण-तरुणींनी नैतिक मुद्द्यांविषयी फारसा विचारच केला नसतो. परीक्षा, कॉलेज, पी.जी. / प्लेसमेंट्स आणि मजा यांच्या गदारोळात मी जे काही शिकतो आहे किंवा पुढे जे काही करणार आहे, जसा जगणार आहे त्याचा नैतिक बाजुने विचार करण्याची त्यांना कधी गरज भासत नाही व उसंत देखील मिळत नाही. मेकॅनिकल इंजिनियरिंग केल्यानंतर मी लॉकहीड मार्टिन या युद्धसामग्री व शस्त्रे बनविणार्या कंपनीमध्ये नोकरी करणार की एखाद्या ‘इलेक्ट्रिक व्हेहिकल्स’ अथवा ‘रिन्युएबल्स रिसर्च’ करणार्या कंपनीत, हा निव्वळ कोणाचे पॅकेज किती एवढाच प्रश्न नसून नैतिक देखील आहे हे सहसा तरुण मुला-मुलींच्या ध्यानीमनी नसते. आणि म्हणूनच कधी अशा विषयांविषयी चर्चा छेडल्यास त्यांच्या प्रतिक्रिया या ‘म्हणजे...’, ‘माहित नाही...’, ‘पण...’, ‘मला वाटते...’, ‘आय गेस...’ अशा अनिश्चिततापूर्ण असतात. या इमर्जिंग ऍडल्ट्सना गुंतागुंतीच्या नैतिक प्रश्नांना कसे सामोरे जायचे, सुसंगत तर्क कसा करायचा यासाठीचे मार्गदर्शन व बौद्धिक साधने कोणी फारशी दिलेलीच नसतात. तशा विचारांना, संवादांना ते अगदी क्वचितच सामोरे गेले असतात. आणि म्हणुनच एक प्रकारचा ‘नैतिक सापेक्षतावाद’ (मॉरल रिलेटीव्हिजम) – सब रिलेटिव्ह है, हर कोई अपनी जगह पे ठीक है – बळावताना दिसतो. मग हिटलरपण आपल्या जागी ठीकच होता असे म्हणायचे का? पोस्टमॉडर्निझमच्या वाढत्या प्रभावात बळावलेला नैतिक व्यक्तिवाद नैतिक बाबींवर सामाजिक चर्चा, विवाद, संवाद व सहमती साध्य करण्याच्या जबाबदारीपासून मुक्तता देतो आणि म्हणुनच अनेकदा सोईस्कर वाटतो. पण म्हणून तो श्रेयस आहे का? बहुलता आणि विविधतेचा स्वीकार करणे, विरुद्ध नैतिकदृष्ट्या सापेक्षतावादी असणे यात फरक आहे आणि तो कळणे महत्त्वाचे आहे.
2. याचाच दुसरा परिणाम म्हणजे स्वतःच्या नैतिक विचारांना आवाज देणे हेच जणू अनैतिक आहे असे वाटायला लावणारे पियर प्रेशर! स्वतःचा नैतिक दृष्टिकोन व्यक्त करणे (मद्यपान असो वा रॅगिंग, कट प्रॅक्टीस असो वा विजेचा अपव्यय, ...) म्हणजे जणू इतरांवर वर्चस्व गाजवणे आणि नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे असे भासवले जाते. यामध्ये काही नैतिक मूल्य नाही तर ही केवळ एक वैयक्तिक निवड आहे, व्यक्तीगत मामला आहे असे मानले जाते. म्हणूनच अनेक युवा स्वत: कोणतेही भक्कम नैतिक दावे करणे पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करतात, तसेच इतरांच्या नैतिक मतांवर टीका करणे टाळतात. फळस्वरूप आम्ही नैतिक संभाषण कमी करतो आणि त्यावर आधारित भूमिका घेणे हे गप्पाटप्पा, गॉसिप आणि निष्क्रियतेवर सोडतो. माझी मॉरल आयडेंटिटी, नैतिक ओळख काय आहे हे समजणे हा ‘यूथ फ्लारिशिंग’चा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या अभावात नैतिक निर्णय घेण्याची आणि नैतिकदृष्ट्या सुसंगत जीवन जगण्याची असमर्थता ही युवांमधली एक प्रकारची निर्धनता व कुपोषण आहे.
3. व्यक्तीच्या नैतिक विचार प्रक्रियेचा विकास कसा होतो याबाबात शिकागो विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोहलबर्ग यांची स्टेज थिअरी प्रसिद्ध आहे. सुलभ रुपात सांगायचे झाल्यास कोहलबर्गच्या मते व्यक्तीच्या नैतिक विचार व निर्णयक्षमतेचा विकास तीन पातळ्यांतून टप्प्याटप्प्याने होतो. यातील पहिल्या पातळीला कोहलबर्ग प्रि-कन्व्हेंशनल असे म्हणतो ज्यामध्ये प्रामुख्याने ‘फायदा / तोटा काय’ (प्रोज अँड कॉन्स) या विचारसरणीतून निर्णय घेतले जातात. आई रागावेल म्हणून अमकी गोष्ट करु नये, काका चॉकलेट देतील म्हणून तमके वागावे असे ज्याप्रमाणे लहान मुले ठरवतात ती ही पातळी. पुढची पातळी म्हणजे कन्व्हेंशनल. आजुबाजुचे लोक काय विचार करतात, कसे वागतात, ‘गुड बॉय – गुड गर्ल’ कडून काय अपेक्षित आहे, सहजगत्या समाजमान्य काय, त्यानुसार निर्णय घेण्याची ही पातळी. पौंगंडावस्थेतील अनेक मुले ‘सभी लोग तो यही कर रहे है’ अशा कारणाने जेव्हा निर्णय घेतात ती ही विचारसरणी. तिसरी आणि या थियरीमधील सर्वात वरची पातळी म्हणजे पोस्ट-कन्व्हेंशनल अथवा ‘मूल्याधिष्टीत’ पातळी. या टप्प्यावर इतर लोक काय म्हणतात किंवा फायदा/तोट्याचे हिशेब यापेक्षा व्यक्ती स्वतंत्ररीत्या आपला मूल्यविचार ठरवते, योग्य – अयोग्य कशाला म्हणायचे ते ठरवते आणि त्यानुरुप निर्णय व वर्तन करते. समजायला सोपे असे एक ठळक उदाहरण म्हणजे महात्मा गांधींची दांडी यात्रा! स्वत:ला अटक होऊ शकते या तोट्याचा विचार न करता आणि तत्कालीन समाजमान्यता व कायद्यालाही झुगारुन त्यांना जे नैतिकदृष्ट्या योग्य वाटले तो निर्णय घेऊन तद्नुसार वागणे ही म्हणजे कोहलबर्गची तिसरी पातळी. विविध समाजसुधारकांच्या जीवनात अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्याला दिसतील. आपण स्वत:ही कधी आपल्या जीवनात असे निर्णय घेतले असतील किंवा आजुबाजुच्या लोकांमध्ये बघितले असतील. ज्यांच्याविषयी आपल्याला नैतिक आदर वाटतो असे लोक नजरेपुढे आणाल तर त्यांत या प्रकारे ‘मूल्याधिष्टीत’ विचार करणारे लोक दिसतील.
कोहलबर्गचे संशोधन मात्र असे देखील सूचित करते की बहुतांश लोक हे नैतिक तर्काच्या दुसर्या (कन्व्हेंशनल) टप्प्याच्या पलीकडे जात नाहीत. आणि जर यदाकदाचित तिसर्या पातळीकडे वाटचाल झालीच तर ती सहसा वयाच्या विशीच्या दशकात होते. म्हणुनच या काळात युवांना माझी नैतिक संहिता कोणती ज्यानुसार मला माझे जीवन जगायचे आहे ही स्पष्टता येण्यास मदत करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझ्या जीवनातील निर्णय आणि निवडींची क्रमवारी कशी लावायची? त्याला नैतिक आधार असू शकतो का? कुठला? या बाबत तरुणांना स्पष्ट विचार करण्याची, ओळखण्याची आणि निर्णय घेण्याचा सराव करण्याची (मॉरल जिमिंग) संधी मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. मुळात मनाने चांगले असणारे अनेक युवा यामुळे मात्र अयोग्य विचार करताना दिसतात. नुकताच घडलेला एक प्रसंग: महाराष्ट्रातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील एक रेसिडेंट डॉक्टर तेथील एम.बी.बी.एस.च्या अंतिम वर्षाला असलेल्या काही मुलींना त्रास देत होता. मात्र त्या मुली याविषयी ठामपणे बोलायला, तक्रार करायला घाबरत होत्या. का तर त्यांना भीती होती की तो रेसिडेंट त्यांना परीक्षेच्या वेळेस अडचण पैदा करेल. तुम्ही नापास व्हाल अशी धमकी त्याने दिलेली. ‘क्यूँ रिस्क लेना’ असा पातळी एक वरील विचार किंवा ‘ऐसा थोडा बहोत तो होता ही है, पिछले बॅच वालोंनेभी सह लिया था’ असा पातळी दोन वरील विचार, दोन्हीनुसार मान खाली घालून अन्याय सहन करणे हा मार्ग होता. एम.बी.बी.एस.ला गेलेल्या मुलींची ही अवस्था तर बाकीच्यांची काय गत असेल? सुदैवाने आमच्या निर्माण शिबिरात सहभागी झालेली अशी त्यांची एक सीनियर होती तिने हा मुद्दा लावून धरायचे ठरवले. कुठल्याही हालतीत असली अयोग्य वागणूक खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका तिने घेतली. पीडित मुलींना एकत्र करुन समजावले, धीर दिला, कॉलेजच्या डीनकडे एकत्र तक्रार नोंदवली आणि शेवटी त्या रेसिडेंटला रस्टिकेट करण्यात आले. तिचे अभिनंदन करतानाच इतर युवांमध्ये या प्रकारचे धैर्य कसे निर्माण होईल यावर विचार करणे गरजेचे आहे.
4. फायदा / तोटा काय यानुसार निर्णय घेणे ही दैनंदिन जीवनातल्या साध्या सोप्या व्यावहारिक प्रसंगांमध्ये बर्याचदा उपयुक्त पडणारी पद्धत आहे. मात्र तिला तिथेच मर्यादित नाही ठेवले आणि जास्त महत्त्वाच्या निर्णयांसाठी तिचा वापर करायचा ठरवला तर मात्र अडचणी आणि संभ्रम सुरू होतो. उदाहरणार्थ, माझा पर्पज काय, मी नेमके काय प्रकारचे काम करु, जोडीदार म्हणून कोणाला निवडू अशा मूलभूत मुद्द्यांसाठी ‘प्रोज अँड कॉन्स’ ही विचारपद्धती मदतरुप ठरत नाही, कारण आज एक गोष्ट चांगली वाटते तर उद्या तिचाच दुसरा पैलू चिंताजनक वाटतो. स्पष्टता आणि निश्चय याऐवजी गोंधळ, काळजी व सततची अस्वस्थता अनुभवास येते. म्हणूनच माझी मूल्ये काय, योग्य – अयोग्य ठरवण्याचे माझे निकष काय व त्यानुसार जगण्याचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित होणे हे तरुण वयासाठी अत्यावश्यक आहे. तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासोबतच, तरुणांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात मार्गदर्शन करणारी नैतिक मूल्ये शोधण्यात मदत करणे हे देखील शिक्षणाचे, पालकांचे आणि आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. त्यातूनच युवांचा निर्णय-गोंधळ दूर होईल.
अमृत बंग
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.
amrutabang@gmail.com
No comments:
Post a Comment