सध्या सुरू असलेल्या आमच्या निर्माण उपकमाच्या पुढील बॅचच्या निवडप्रक्रियेसाठी भारतभरातून युवक-युवती अर्ज पाठवत आहेत. समाज परिवर्तनासाठी सहभाग नोंदवण्याची, प्रसंगी झोकून द्यायची त्यांची भावनिक प्रेरणा अतिशय उत्तम आहे. मात्र या मार्गावर लांब पल्ल्यात टिकायचे असल्यास आणि तात्कालिक यशापयशाने भुलून वा खचून जायचे नसल्यास काही एक वैचारिक स्पष्टता व आधार आवश्यक आहे. मी सध्या जे करतोय त्याचा कंटाळा आलाय, मला सामाजिक कामात समाधान लाभते, याला एक ग्लॅमर आहे या किंवा अशा इतर केवळ वैयक्तिक कारणांच्या पलीकडे जाउन मुळात सामाजिक कार्याची अथवा सामाजिक क्षेत्राची गरज काय यासंबंधी मूलभूत विचार करणे जरुरी आहे. पुढे जाऊन भ्रमनिरास व्हायचा नसेल आणि येणारी आव्हानं पेलायची असतील तर ही स्पष्टता मिळवणं भाग आहे.
सुप्रसिद्ध अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ पीटर ड्रकर यांचे 'मॅनेजिंग द नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन' हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यात ते असं म्हणतात की शासकीय क्षेत्राची प्रमुख भूमिका म्हणजे समाजाला सुरळीतपणे कार्य करण्यास सुकर व्हावे यासाठीचे विविध कायदे कानून, धोरणे व नियम बनवणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. खाजगी क्षेत्राचं मुख्य काम म्हणजे लोकांना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा उत्पादित व वितरित करणे. मग सामाजिक क्षेत्राचं मुख्य काम काय? पीटर ड्रकर असं म्हणतात की 'चेंज्ड ह्यूमन बीइंग्स' म्हणजेच ‘माणसं घडवणे’ ही सामाजिक क्षेत्राची प्राथमिक भूमिका आहे. एखादा खाजगी विक्रेता जेव्हा अमुक वस्तू विकतो आणि ग्राहक त्याचे पैसे देतो तेव्हा त्यांच्यातील व्यवहार संपला असे मानले जाईल. तथापि, सामाजिक क्षेत्र एवढ्यावरच समाधान मानून थांबू शकत नाही. व्यक्तीचा विकास होतो आहे की नाही, त्या व्यक्तीच्या अंतरंगात व बाह्य जीवनात, वर्तनात बदल होतो आहे की नाही यावरुन सामाजिक कार्याचे आणि त्याच्या परिणामकारकतेचे मोजमाप केले जाईल, करायला हवे. यामुळे सामाजिक क्षेत्राची भूमिका एकाचवेळी अतिशय रोमांचक आणि आव्हानात्मक अशी बनते.
या व्यापक भूमिकेला अनुसरून मग प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर सामाजिक क्षेत्राची नेमकी व्याप्ती काय, कामाचे ठोस प्रकार व त्याचे विविध पैलू काय या विषयी मी एक सहा-मितीय रचना सुचवतो:-
1. लोकसेवा:
समाजातील सर्वात गरजू आणि राजकीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जीवनावश्यक सेवा मिळवून देणे, प्रसंगी स्वत: ती सेवा देणे, कारण सहसा शासन व बाजार व्यवस्था त्यांच्यापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही किंवा पोहोचू इच्छित नाही. ग्रामीण, आदिवासी भागात किंवा शहरी झोपडपट्ट्यांमधील वंचित लोकांसोबत काम करणारे अनेक सामाजिक उपक्रम या पैलूवर काम करत असतात. महत्त्वाचा एक फरक मात्र लक्षात ठेवायला पाहिजे तो आहे मानसिकतेचा. ‘एखादी सेवा पुरवणे’ ही खासगी क्षेत्राची मानसिकता आहे, तर ‘गरजू लोकांची सेवा करणे’ ही सामाजिक क्षेत्राची मानसिकता आहे, असायला हवी.
2. लोक सक्षमीकरण:
सत्तेचा असमतोल आणि विषमता दूर करण्याच्या उद्देशाने व्यक्तींना सक्षम करणे आणि विकेंद्रीकरणाच्या व लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला बळकट करणे हे सामाजिक क्षेत्राचे अत्यावश्यक कार्य आहे. इंग्रजीतील ‘एंपॉवर’ हा शब्द बघा, ‘पॉवर’ पासून आलेला आहे. खासगी क्षेत्राकडे आर्थिक पॉवर आहे. शासकीय क्षेत्राकडे राजकीय, नोकरशाही, दंडशक्ती आणि संसाधन वाटपाची पॉवर आहे. सहसा असं दिसेल की हे दोन्ही क्षेत्र त्या सत्तेला घट्ट पकडून ठेवतात. नागरिकांनी निव्वळ मतदार, योजनांचे लाभार्थी, ग्राहक किंवा नोकर बनून रहावं, बाकीची सत्ता अधिकाधिक प्रमाणात स्वतःच्या हातात केंद्रित व्हावी अशी मानसिकता सरकारी व खाजगी क्षेत्रांत सहसा दिसते. हे शक्तीचे असंतुलन दूर करून लोकांना सक्षम करणं, जेणेकरुन ते स्वतः त्यांचे प्रश्न सोडवू शकतील आणि स्वतःच्या जीवनाचे सुकाणू हातात घेऊ शकतील, असे काम हे सामाजिक क्षेत्राचा आत्मा आहे. नुसतीच सेवा केली पण लांब पल्ल्यातही जर समोरची व्यक्ती स्वत:च्या पायावर उभी राहण्यास स्वतंत्र झाली नाही तर ती सेवा तर निव्वळ सामाजिक क्षेत्राची ‘रोजगार हमी योजना’ होईल. लोकांना आत्मनिर्भर होण्यास मदत करणं, त्यांच्यातल्या अव्यक्त सामर्थ्याला पूर्णत्वाने बहरता येणं, आणि याद्वारे विकसित, स्वायत्त आणि जागरुक 'चेंज्ड ह्यूमन बीइंग' घडवणं हे सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा गाभा आहे.
3. प्रश्न सोडविण्याचे पथदर्शी प्रयोग:
सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक व लोकसहभागाचे प्रयोग करणे आणि कल्पक व नाविन्यपूर्ण उपाय शोधणे. लोकांशी व त्यांच्या प्रश्नांशी जवळीक असणे, शासकीय नोकरशाहीतील लाल फितीचे बंधन नसणे आणि कॉर्पोरेट क्षेत्रामधील दर तिमाही नफा मिळवायचा दबाव नसणे ही सामाजिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आहेत जी या क्षेत्राला एक गतीशीलता आणि लवचिकता देतात. हे स्वातंत्र्य सामाजिक संस्थांनी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी आणि समस्या निवारणाचे सर्जनशील उपाय विकसित करण्यासाठी वापरले पाहिजे. ‘कुठलीही समस्या ज्या समजेतून निर्माण झाली त्याच पातळीवरून सोडवली जाऊ शकत नाही’ हे अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. म्हणूनच ‘सोशल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ साठी सृजनात्मक उपाय, कृतीशील ज्ञाननिर्मिती व पुराव्यावर आधारित पद्धती विकसित करणे हे सामाजिक क्षेत्राचं तिसरं महत्त्वाचं काम. तथापि, पुरेशी चाचपणी व चाचणी न करताच ‘यशस्वी मॉडेल’ म्हणून फार चटकन यशाचा दावा करण्याचा बौद्धिक अप्रामाणिकपणा हा अन्यांची दिशाभूल करणारा आणि शेवटी सामाजिक क्षेत्राच्याच विश्वासार्हतेला बाधा आणणारा असतो. म्हणून त्या प्रकारच्या पळवाटेपासून सावध राहणे आवश्यक आहे.
4. व्हिसल ब्लोअर:
समाजामध्ये जेव्हा कुठे अन्याय, अत्याचार किंवा भ्रष्टाचार होत असेल अशा प्रसंगी “जागल्या” म्हणून भूमिका पार पाडणे. राजकीय, सरकारी वा खाजगी क्षेत्राचे हितसंबंध जिथे आड येतात तिथे अनेकदा व्यक्ती, समूह, प्राणी, पर्यावरण, इ. वर अन्याय होतो. अशा वेळेस त्या अन्यायाला वाचा फोडणे आणि पीडितांच्या हक्कांसाठी लढणे ही सामाजिक क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
5. योगदानाचे माध्यम व व्यासपीठ:
समाजाच्या भल्यासाठी मदत करण्याच्या व आपला काही वाटा उचलण्याच्या अनेकाविध लोकांच्या इच्छेसाठी एक अभिव्यक्तीचे माध्यम (चॅनेल ऑफ एक्स्प्रेशन) असणे हे सामाजिक क्षेत्राचे एक अंगभूत काम आहे. समाजामध्ये सुदैवाने अनेक लोकांना असं वाटतं की मी इतरांसाठी काहीतरी मदत करायला पाहिजे. पण ते इतर कोण, त्यांच्यासाठी मी नेमकं काय करणार, कसे करणार हे शोधण्यात व ठरवण्यात बर्याचदा अडचणी जातात. म्हणूनच सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक, आर्थिक दाते, हितेच्छूक लोक, जागरूक नागरिक अशा विविध मंडळींना त्यांच्या समाजाप्रतीच्या उत्तरदायीत्त्वाच्या पूर्तीसाठी मदतरूप असे एक माध्यम म्हणून, आणि लोकांमधील परोपकाराच्या भावनेला व्यक्त होण्यासाठी एक संघटित व्यासपीठ म्हणून सामाजिक क्षेत्र अतिशय उपयुक्त ठरते.
6. मूल्यांची अभिव्यक्ती व प्रसार:
सामाजिक क्षेत्राने कितीही वेगवेगळ्या कृती केल्या तरी त्या कृतींच्या आवाक्याला शेवटी काहीतरी मर्यादा राहणारच. आख्या देशभर शाखा पसरवण्याची ‘स्केल’ आम्हाला प्राप्त व्हाही अशी महत्त्वाकांक्षा हे सामाजिक क्षेत्राचं लक्ष्य वा मानदंड नसावं. तर करत असलेल्या कृतींच्या माध्यमातून काय वृत्ती प्रसारित होतेय, कुठल्या मूल्यांची अभिव्यक्ती होतेय याकडे लक्ष देणे हे गरजेचे आहे. मानवी समाज आणि संस्कृती ज्या अनेक मूल्यांना महत्त्वाचे मानते त्यांची कायम जाण राहावी म्हणून व्यक्ती, संस्था आणि कृतींच्या रुपातील ‘रोल मॉडेल्स’ आवश्यक असतात, जे या मूल्यांचे दीप म्हणून काम करतात, या मूल्यांवर समाजाचा विश्वास कायम ठेवतात आणि व्यापक प्रमाणावर लोकांना नैतिकदृष्ट्या उन्नत जगण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच आपल्याला गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग किंवा ग्रेटा थनबर्ग हवे असतात. हा मूल्यात्मक प्रभाव समाजकार्याच्या इतर उपक्रमांच्या तात्कालिक फायद्यांपेक्षा खूप मोठा आणि दीर्घकालीन असतो.
या सहा-मितीय फ्रेमवर्कमुळे सामाजिक प्रश्नावर काम करू इच्छिणा-या युवक-युवतींना त्यांच्या वैयक्तिक प्रेरणेसोबतच सामाजिक क्षेत्राच्या अस्तित्वाचा व्यापक संदर्भ व प्रयोजन काय याविषयी स्पष्टता व नेमका दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होईल ही आशा! ‘का?’ याचं उत्तर मिळाल्यास पुढे ‘काय?’ आणि ‘कसं?’ ही उत्तरे मिळणं आपसूकच सोपं होईल.
लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.
वरील लेख हा लेखकाच्या लोकसत्ता लेखमालेतील सदरात प्रकाशित झालेला लेख आहे.
No comments:
Post a Comment