क्रांतीचे पुढचे पाउल-
दादा धर्माधिकारी
दादा धर्माधिकारी |
आतापर्यंत
भूदान चळवळ ही केवळ शाळेतील इतिहासाच्या पुस्तकात संक्षिप्त रूपात वाचली होती. हे
पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच प्रमाणात या चळवळीविषयी स्पष्टता येते. आचार्य
विनोबाजींचा ही चळवळ सुरू करण्यामागचा हेतू, त्याचा अर्थ,
देशाला त्याचा होणारा फायदा हा विनोबाजींच्याच विचारांचा आधार घेऊन
स्पष्ट केलेला आहे.
यात भूदान चळवळीला भूदानयज्ञ आणि या यज्ञात आपले जीवन समर्पित करणाऱ्यांना
जीवनदानी म्हटले आहे. असे जीवनदानी निर्माण करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल
असे विनोबाजी प्रस्तावनेत म्हणतात.
हे पुस्तक वाचताना यातली
उदाहरणे ही तंतोतंत आपल्या जीवनाला किंवा आजच्या काळाला लागू पडतात आणि त्या काळी
मांडलेल्या विचारावरून आज आपली कोणत्या दिशेने वाटचाल सुरू आहे याबद्दल आपल्या
मनात प्रश्न उभे राहतात. समाजात विषमता, गरीबी आणि वर्गभेद निर्माण होण्याची कारणे आणि संपवण्यासाठी
भूदानयज्ञाच्या रूपाने विनोबाजींनी त्याकाळात केलेले प्रयत्न यांचे वर्णन येथे
मांडलेले आहे. त्याकाळच्या वर्णनावरून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे वास्तव
चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते.
आज ‘गरीबी हटाव’चा जो प्रयत्न आपल्याकडे केला जात आहे,
त्यासाठी हे पुस्तक एक अभ्यासाचे साधन म्हणून फार उपयुक्त आहे. याचा
अभ्यास करून जर अंमलबजावणी करण्यात आली, तर काही प्रमाणात
आपल्यासमोरील प्रश्न नक्की कमी करता येतील.
काही
लोकांकडे मोठ्या प्रमाणावर संपत्ती व जमीन आणि दुसरीकडे खायला अन्न नाही व शेती
करायला जमीन नाही अशी जी परिस्थिती आज दिसते ती निवारण्यासाठी/निर्माण होऊ नये
म्हणून विनोबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढचे भविष्य ओळखून प्रयत्न सुरू
केल्याचे दिसते.
यामध्ये
सत्याग्रहाविषयीचे विनोबांचे विचार लेखकाने मांडले आहेत. तसेच सत्याग्रहामध्ये
किंवा क्रांतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या लोकांनी कसे असावे याचे मार्गदर्शन या
पुस्तकात केलेले आहे. आपण तरुणांसाठी किंवा सामाजिक क्षेत्रांत येऊ
इच्छिणाऱ्यांसाठी हे विचार मार्गदर्शक आहेत. त्यातील एक विचार पुढीलप्रमाणे आहे: ‘जो लोककार्यात मग्न आहे, तो लोकसेवेसाठीच पोट भरतो
आणि जो स्वार्थत्यागी आहे, तो इतरांना सुखी करण्यासाठी संयम
राखून बलिदान करतो. दोघांत हा बुनियादी भेद आहे.’
या पुस्तकातील प्रत्येक लेखातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे.
निखिल मुळ्ये
No comments:
Post a Comment