'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 10 May 2013

शेती, आरोग्य समजून घ्यायचंय? खेळ खेळा...


आदिवासी बालशिक्षणात निखिलेश बागडेचे प्रयोग
निखिलेश बागडे (निर्माण २) याने नुकतेच BAIF या स्वयंसेवी संस्थेच्या उपक्रमांतर्गत उच्चमाध्यमिक मुलांना अनुभवाधारित व कृतीशील शिक्षण मिळावे यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील ८५ आदिवासी शाळांसोबत शिक्षणसामग्री विकसित करण्याचे काम केले. त्याने शेती, आरोग्य, सरकारी योजना, पर्यावरण व व्यक्तिमत्त्व विकास या पाच विषयांचे सर्वसामान्य ज्ञान मुलांना देणारे २२ खेळ (उदा. सापशिडीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण शिडी) विकसित करून त्यांची चाचणी घेतली व मुलांमध्ये खेळातून शिक्षणाची पद्धत दृढ केली. या प्रयोगाचे दस्तावेजीकरण करणाऱ्या विजय होनकळदकर यांनी जातीचे प्रमाणपत्र कसे मिळवावे, आदिवासी योजनांचा लाभ कसा घ्यावा, त्या भागातले सर्वसामान्य आजार व त्यांवरची स्थानिक औषधे कोणती इ. माहिती आदिवासी मुलांना सांगता आल्याचे निरीक्षण नोंदवले.
या उपक्रमाअंतर्गतच अन्य एका कार्यक्रमात शेतीची नवनवी तंत्रे वापरून एकाहून अधिक पिके कशी घ्यावीत याचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. काही शाळांमध्ये या प्रशिक्षणाला व्यवसायाची जोड देण्यात आली, ज्याअंतर्गत बियाणे विकत घेण्यापासून आपले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकण्यापर्यंतच्या कृतीतून मुलांचे शिक्षण झाले.
या प्रकल्पावर निखिलेश ऑगस्ट २०१० पासून काम करत असून हा प्रकल्प पुढे चालवण्यासाठी BAIF ने शाळांना सुपूर्द केला आहे. नयी तालीम पद्धतीने मुलांच्या सक्षमीकरणाचे प्रयोग करणाऱ्या निखिलेशचे अभिनंदन व त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा !

No comments:

Post a Comment