'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 31 December 2014

पुस्‍तक परिचय

 गंगेमध्‍ये गगन वितळलेअंबरीश मिश्र
            गांधींविषयीचे पुस्‍तक या कुतूहलापोटी गंगेमध्‍ये गगन वितळले हे पुस्‍तक वाचायला घेतले. गांधींचा राजकीय, आध्‍यात्मिक, वैचारिक प्रवास श्री अंबरिश मिश्र यांनी या पुस्‍तकातून मांडला आहे. गांधीचे चरित्र माहित असणार्‍यांनाही हे पुस्‍तक वाचावेसे वाटेल, कारण या पुस्‍तकांत गांधीच्‍या जीवनमार्गाचा त्रयस्‍थपणे विचार केलेला आहे. काळाच्‍या पटावर मोहनदास गांधी ते महात्‍मा गांधी असे उलगडत जाणारे गांधी आपल्‍याला समजतात. गांधीच्‍या मोठेपणाबरोबरच त्‍यांच्‍या प्रयोगातील यश-अपयश देखील लेखकाने छान विशद केले आहे.
            दक्षिण आफ्रिकेमध्‍ये विचारांची जडणघण होत असतानाचे गांधी, फिनिक्‍स, टॉलस्‍टॉय आश्रमात प्रयोग करताना अपयश आल्‍यास, प्रयोग बंद करून ‘अजून पुष्‍कळ परिवर्तन करावे लागेल’ असे म्‍हणारे गांधी आपल्याला या पुस्तकात सापडतात.
            गांधींची माणसं जोडण्‍याची कला, त्‍यांचं संघटनकौशल्‍य, थक्‍क करून टाकणारं असं आहे. महादेवभाई, जमनालालजी बजाज, हरिलाल गांधी, मनुबेन गांधी यांच्या नरजेतील गांधीजी आपल्‍याला कळतात. त्‍यांचातले पत्रसंवाद, ‘गीता, सत्‍याग्रह, जीवन कसे जगावे’ या विषयी होणारी चर्चा, या गोष्‍टींचा घटनाक्रम आपल्‍यासमोर उभा राहतो. तसेच महादेवभाई, जमनालालजी बजाज व यांसारख्‍या निष्‍ठावान सहकार्‍यांची सर्मपणवृत्‍तीही दिसून येते. राष्‍ट्रीय चळवळीचा तो मंतरलेला काळ, गांधीच्‍या नेतृत्‍वाखाली प्राणपणाला लावून स्‍वांतत्र्ययुध्‍दात उतरलेली असंख्‍य माणसं, त्‍यांचे क्‍लेश-आनंद, गांधींनी लोकसहभागातून उभी केलेली चळवळ, त्‍यातले चढउतार, त्‍या चळवळीतली माणसं, त्‍यांचे भले-बुरे अनुभव या साऱ्या गोष्टी पुस्तकातील महादेवभाईंच्या प्रकरणांमधून उलगडत जातात.
            लेखक मनुबेन गांधी यांना सत्‍तांतराच्‍या महानाट्याची निरूपक म्‍हणून संबोधतात. देशाच्या फाळणीच्या साक्षीदार असणाऱ्या मानुबेन गांधींच्या दैनंदिनीतील गांधीजीचे अहिंसेबद्दलचे विचार विशेष उल्लेखनीय वाटले. फाळणीपेक्षाही देशभर उसळलेल्‍या हिंसाचाराने आणि रक्‍तपातानं गांधीजी खिन्‍न झाले होते. ‘आज विरोचित अहिंसेची गरज आहे’ असे म्हणणारे गांधीजी, दुर्बलतेतून पत्करलेल्या अहिंसेपेक्षा सक्षम असताना पालन केलेल्या अहिंसेचे महत्व अधोरेखित करतात आणि वीरत्व आणि अहिंसेची अद्भुत सांगडही घालून देतात.
            अहिंसा आणि सत्‍याचा छिन्‍नी हातोडा घेउन नवभारताचं शिल्‍प साकारण्‍यात आपण कमी का पडलो, यांची विस्‍तृत कारणमीमांसा लेखकाने केली आहे. विज्ञानवाद- समाजवाद- निधर्मीवाद- पंचवार्षिक योजना- भाक्रा धरण या सगळया गोष्‍टींमध्‍ये ग्रामपातळीपर्यंत सत्‍तचे विक्रेद्रीकरण, सार्वजनिक निधीचा चोख हिशेब, जबाबदारीचं तत्‍व अशा गांधींच्‍या गोष्‍टी मागे कशा पडत गेल्‍या याची जाणीव करून देतो.
            सत्‍य, अहिंसा, दया, क्षमाशीलता या उदात्त तत्त्वांपेक्षा गांधी आपली दैनंदिन कामे कसे करत, एखांदं छोंटं कामदेखील किती कौशल्‍याने, चिकाटीने करत, यांचे वर्णन लेखक करतो. गांधींमधला पत्रकार, त्‍यांचं व्‍यवस्‍थापन कौशल्‍य, या गुणांची जाणीव आपल्‍याला होते.
            थोर नेत्‍यास दैवत न मानता, त्‍याचा सर्वप्रथम माणूस म्‍हणून विचार करायला हवा ही नवी दृष्‍टी या पुस्‍तकाने मला दिली.

ऋतगंधा देशमुख, hrt.deshmukh@gmail.com

No comments:

Post a Comment