निर्माण 5 शिबीरमालिकेतील दुसर्या गटाचे
पहिले शिबीर 2 ते 10 फेब्रुवारी, 2013 या दरम्यान यशस्वीरित्या पार पडले. या गटात
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आरोग्य क्षेत्रात काम करु इच्छिणार्या 56
तरुण-तरुणींचा सहभाग होता.
निर्माणच्या प्रत्येक पहिल्या शिबिराप्रमाणे ‘तारुण्यभान
ते समाजभान’ व ‘स्वत:ची ओळख’ या शिबिराच्या मध्यवर्ती संकल्पना होत्या. याशिवाय आरोग्ययंत्रणेत
हितसंबंध असणाऱ्या विविध घटकांच्या दृष्टीने ‘सर्वांत चांगला डॉक्टर कोण?’ या
छोट्या स्वाध्यायाची आखणी करण्यात आली होती. विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या
मुलांनी सादरीकरण केले व संपूर्ण आरोग्ययंत्रणेचं चित्र उभे राहिले. यादरम्यान
डॉ.अभय बंग (नायना), डॉ. योगेश काळकोंडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
Nero’s Guest या शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांवर आधारित लघुपटाने शिबिरार्थ्यांना हलवून सोडले. त्याचा परिणाम होऊन शेतकर्यांच्या
संवेदना जाणण्यासाठी सर्वांनी एक वेळेचा उपवास केला. या वेळेचा सदुपयोग करून
स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्याचे संकल्प अनेकांनी केले, तसेच या प्रश्नाचा अभ्यास
करून त्यावर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
निर्माणच्या शिबिरांतून समाजाप्रती जबाबदारी
व त्या साठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. याची सुरुवात कशी करावी याचे
उदहारण काही जणांच्या प्रवासातून समोर आले. त्यामध्ये डॉ. अभय बंग (नायना) यांच्या
‘सेवाग्राम ते शोधग्राम’ बरोबरच आनंद बंग, सुजय काकरमठ यांनी देखील आपला प्रवास
सर्वांसमोर मांडला.
पुढील ६ महिन्यांत आपण प्रत्यक्ष काय करु
शकतो- याचे सर्वांनी व्यक्तिगत व सामजिक पातळीवर नियोजन केले. शेवटी ‘हम होंगे
कामयाब...’ गुणगुणत या शिबीराची समाप्ती व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली.
No comments:
Post a Comment