'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 1 November 2014

“आधी कंपन्या बंद करा...”

गडचिरोली तंबाखूमुक्ती अभियाना अंतर्गत जनजागृतीसाठी निर्माणच्या व निर्माणमध्ये येऊ घातलेल्या युवांनी एक आठवडा दिला. बस स्टँड, शाळा, खेडी इ. ठिकाणी जागृतीचे काम करताना या मुलांचा थेट वास्तवाशी सामना झाला. यानंतर प्रतीक वडमारेच्या (निर्माण ६) मनात काय तरंग उमटले?


बस स्टँडवर पोस्टर प्रदर्शनीसह प्रतीक
            महाराष्ट्रात जो तंबाखू बंदीचा कायदा झालाय त्या कायद्याबद्दल लोकांना सजग करण्यासाठी SEARCH आणि इतर काही शासकीय आणि अशासकीय संस्थांच्या वतीने "तंबाखू मुक्त गडचिरोली " अभियान राबवण्यात आल. त्यात भाग घेण्यासाठी २४ ऑगस्टला गडचिरोलीला गेलो होतो . २ दिवसांच्या ट्रेनिंगनंतर आम्हा मुलांचे २-२ चे गट करून प्रत्येक गटाला ४ गावे याप्रमाणे गावे विभागून करण्यात आली होती.
आम्हाला दिलेल्या प्रत्येक गावामध्ये आम्ही शाळांमध्ये कार्यक्रम घेतले, गावातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, लोकांची मते जाणून घेतली. प्रत्येक गावात आम्ही जेंव्हा तंबाखूच्या दुष्परिणामांची, कायद्याची माहिती लोकांना द्यायचो त्यावेळी बहुतांश लोकांचा एकाच सूर असायचा,आधी कंपन्या बंद करा! दरवेळी समोरच्याला ओरडून सांगाव वाटायच “अरे, उद्या कंपन्यावाले पानठेल्यांवर विष विकायला लागले तर तू तेही विकत घेणार आहेस का
s s s (पण मी असं काही कोणाला बोललो नाही ). चौथ्या दिवशी तर मी इतका वैतागलो होतो की मला आणखी एकदा कोणी म्हणाला असता की कंपन्या बंद करा तर विचारू नका काय केल असत मी त्याच...
            या अभियानाच्या निमित्ताने समाजसेवा/ सुधारणा हा काय भयानक (चांगल्या अर्थाने ) प्रकार आहे हे कळले. आजवर फक्त पुस्तकात समाज सुधाराकांबद्दल  वाचल होतं. पण समाजातील कुठल्याही वाईट गोष्टीवर बोट ठेवताना त्यांना काय दिव्य करावं लागत असेल याची थोडीफार प्रचीती आली. लोकांमध्ये तंबाखूबद्दल अज्ञानच इतक होतं की तंबाखू खाणं चुकीचं आहे हेच त्यांच्या गावी नव्हतं. गावांमध्ये मुलाला दुधाचे दात आले के त्याने तंबाखू खाणं नॉर्मल समजतात. सुशिक्षित आणि त्यातल्या त्यात तंबाखू न खाणाऱ्याचं प्रमाण कमीच.
            या ४ दिवसांमध्ये positive response देणारेही लोक भेटले. शाळा ,कौलेजमधील मुलांचा छान प्रतिसाद मिळाला. आम्ही तंबाखू सोडू, आमच्या मुलांना देणार नाही असं म्हणणारे लोकही भेटले. काही मोजक्या लोकांनी आमच कौतुकही केल. पण जर सुरुवात लोकांच अज्ञान घालवणे, त्यांचे समज बदलण्यापासून असेल तर या कामासाठी खूप वेळ लागणारेय हे नक्की. अर्थात अशा एखाद-दुसऱ्या कार्यक्रमाने लोक तंबाखू खाणे सोडतील अशी अपेक्षा करता नाही येणार, पण शाळा, कॉलेज मधील मुलांनी कमीत कमी या निमित्ताने तंबाखू वाईट आहे हा विचार केला तरी मी याला या अभियानाच यश समजतो.
            या अभियानाच्या निमित्ताने खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. डॉ. अभय बंग यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली. निखिल, अमृत आणि SEARCH मध्ये काम करणाऱ्या इतर तरूण मित्रांना जवळून पाहता आलं. स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून स्वतःच स्वतःवर घातलेल्या मर्यादा ओलांडल्यामुळे एकंदरीतच स्वतःकडे आणि आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. स्वतःला फाsssर सिरीअसली घेण्यात काही अर्थ नाही हे पुन्हा एकदा नव्याने कळलं..
            मी गडचिरोलीला गेलोय म्हणल्यानंतर जनरली लोकांच अस मत होतं / होईल की मी पण लागलो समाज सेवेच्या नादाला. पण मला मुळात समाज सेवा हा प्रकारच पटत नाही. मी काहीतरी मोठा त्याग करून समाजासाठी काहीतरी करतोय ही भावनाच मला मुळात पांचट वाटते (कदाचित यातूनच मी समाजाचा मालक असल्याची भावना आपल्या नेत्यांमध्ये येत असावी असही मला वाटतं) समाजासाठी कोणी काही करत नसतं या मताचा मी पक्का आहे.
            असो परत आल्यानंतर मला सगळ्यांना (त्यातल्या त्यात माझ्या मित्रांना ) आवर्जून सांगावं वाटत होतं बेट्यांनो भाग घ्या या मोहिमेमध्ये or at least go through the selection procedure of NIRMAN, you might find a whole new world waiting to be explored...
प्रतीक वडमारे, pratikwadmare@gmail.com
(अभियांत्रिकीची पदवी घेतलेला प्रतिक मूळ अंबेजोगाईचा आहे. त्याची निर्माण ६ साठी निवड झाली आहे.)

No comments:

Post a Comment