'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 21 November 2013

तारुण्यभान औरंगाबादमध्ये . .

कळीचं फुल व्हावं इतक्या सहजपणे येत खरतर तरुणपण! पण प्रसारमाध्यमे आणि इंटरनेटच्या विळख्यामुळे हा प्रवास दिवसेंदिवस अधिक खडतर अन काटेरी होत चालला आहे हे आपण सर्वजण अस्वस्थपणे पाहतो आहोत. या विषयावर नुसतीच चर्चा करण्याऐवजी एक कृतीशील पाऊल उचलावं म्हणून सुरु झालेला आमचा "स्त्री जागरण मंच"  गेल्या सहा सात वर्षांपासून किशोरवयीन मुलामुलींसाठी काम करत आहे. वस्तीवरील मुलं, तसेच पालिकेच्या शाळांपासून उच्चभ्रू विद्यालयापर्यंत समाजाच्या विविध स्तरातील मुलामुलींसाठी कार्यशाळा घेऊन या वयोगटाच्या मनापर्यंत पोचण्याचा, आणि त्यांच्या मनातली काजळी थोडीतरी पुसून त्यांनी स्वच्छ नजरेने पुढील आयुष्याचं आशादायक चित्र रेखाटाव यासाठी प्रयत्न करत आहे.
त्यातूनच  महाविद्यालयीन वयोगटासाठी कार्यशाळा घेण्याची कल्पना पुढे आली. आणि त्यासाठी एकच नाव डोळ्यापुढे आले ते म्हणजे "डॉ. राणी बंग ". त्यांचे या विषयातले ज्ञान आणि अनुभव बघता त्यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची कल्पना सर्वानुमते संमत झाली. आणि मग प्रत्यक्ष कार्यशाळा आणि त्याचबरोबर live  training असा हा शुभयोग धडवून आणण्याचा आम्ही निर्धार केला. सलग तीन दिवसांच्या कार्यशाळेसाठी कॉलेजच्या मुलांना गोळा करणे हे एक आव्हान होते. यासाठी आमच्या मदतीला उभा राहिला त्रिशूल कुलकर्णी. एम आय टी या इंजिनीअरिंग कॉलेजचा प्राध्यापक आणि निर्माणचा सदस्य. यासाठी त्याचे कॉलेज  सहप्रायोजक झाले आणि विद्यार्थ्यांची टीम स्वयंसेवक !


दि. २३,२४ व २५ ऑक्टोबर २०१३ या काळात ही कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे पार पडली. ३६४ जणांची उपस्थिती होती. आपल्या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयावर इतक्या संवेदनशीलतेने आणि कमालीच्या सहजतेने संवाद साधता येतो ही गोष्ट मुलांना अद्भुत वाटत होती. त्यामुळे त्यांचा उत्साही प्रतिसाद कॉलेजच्या प्रिन्सिपल आणि अन्य प्राध्यापकानाही आश्चर्यचकित करून गेला.
तरुणाईला विचारांची एक नवी दिशा देणाऱ्या "तारुण्यभान" या कार्यशाळेचे संयोजक होण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याने उमलत्या वयाशी मैत्री करण्याच्या आमच्या प्रयत्नात एक मोठी चढण पार केल्यासारखे वाटत आहे. तरुणाईला  सहजपणे आपलसं  करण्याची कला, अवघड विषय हळुवारपणे समजावण्याची हातोटी, आणि तब्येतीच्या त्रासावर मात करून passion ने काम करण्याची वृत्ती या सर्व गोष्टी राणीताईच्या सहवासात आम्ही अनुभवल्या. त्यांच्या बरोबर आलेल्या सुनंदाताई, राजेंद्रभाऊ आणि ज्ञानेश्वरभाऊ यांनीही प्रचंड energy ने साथ दिली. आणि एकूणच आमच्या औ'बाद शहरातील मुलांसाठी एक अतिशय उपयुक्त असा उपक्रम घेतल्याचे समाधान ह्या कार्यशाळेने स्त्री जागरण मंचाला दिले.

स्त्रोत : डॉ. सुनिता डोइबळे, drsunitadoibale@gmail.com

No comments:

Post a Comment