'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Showing posts with label चॉकलेट पार्सल. Show all posts
Showing posts with label चॉकलेट पार्सल. Show all posts

Wednesday, 23 April 2014

चॉकलेटचे पार्सल - ९ (एप्रिल २०१४)

प्रिय युवा मित्रांनो,

देशात सध्या सर्वात जास्त चर्चिलेले विषय निवडणूक व मोदी-राहुल-केजरीवाल हे आहेत. तुम्ही सर्वच त्याबाबत आपली मते सजगपणे व विचारपूर्वक बनवून खचितच मतदान कराल.

दुर्दैवाने तीन व्यक्तींवर केंद्रित झालेल्या या उधाणात या तिघांची खरी परीक्षा त्यांचे विचार, देशासाठी नीती व कार्यक्रम या वरून व्हायला पाहिजे याकडे दुर्लक्ष होत आहे.

देशासमोरील काही महत्वाचे प्रश्न व त्यावर काही वाचनीय असे या पार्सलमध्ये पाठवतो आहे.
१.      विकास कोणत्या मार्गाने? यावर अमर्त्य सेन व जगदीश भगवती या दोन विश्वविख्यात अर्थशास्त्रज्ञांमध्ये घमासान वैचारिक वादंग सुरु आहे. त्याचा सोपा परिचय.
२.      भारतातील स्त्रीची सुरक्षा व बलात्काराची आकडेवारी – लॅन्सेट मधील पत्र.
३.      सचिन तेंडूलकर निवृत्त होवून सहा महिने झालेत. भावनिक उधाण शांत झाले. भारताला सचिन का एवढा महत्वाचा झाला? यावर ‘इकॉनॉमिस्ट’ चे भाष्य
४.      ‘लोकशाही’ ही राज्यपद्धती जागतिक उतरणीवर आहे का? लोकशाहीच्या मर्यादा काय? ‘इकॉनॉमिस्ट’ मधील वैश्विक आढावा.
५.      शहरांचे कचरा व्यवस्थापन : शहरांची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३१ टक्के आहे. पुढील २५ वर्षात ती जवळपास ५० टक्के होणार आहे. शहरे ही जणु कचरा निर्मितीचे प्रचंड कारखाने झाले आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी? Down to Earth मधील दोन शहरांची गोष्ट.
६.      माणुसकीचा ऱ्हास? कोनार्ड लोरेंझ या जगप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञाच्या पुस्तकाचा नंदाकाकानी तुम्हाला करून दिलेला अतिसंक्षिप्त परिचय. हे निव्वळ एपेटायझर !

तुमचा,
नायना

प्रश्न: तुम्ही यातील काय काय वाचले? कसे वाटले? त्यावर तुमचे विचार व अजून वाचन काय? पाठवा (simollanghan@gmail.com )
पुढील अंकापासून ते सदर प्रकाशित करू. – चॉकलेट कट्टा !

Saturday, 8 March 2014

चॉकलेटचे पार्सल – ८ (मार्च २०१४)

या चॉकलेट पार्सल मध्ये:
नुकत्याच झालेल्या निर्माण ५.३ब शिबिरात अनेक तरुण डॉक्टरांनी खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचे ठरवले. पण खेड्यात का जायचे? तिथे सुरुवात कशी करायची? लोकांच्यात मिसळायचे कसे? कोणती पथ्ये पाळायची? स्वतःच्या अनुभवांतून विनोबांनी लिहिलेले हे विचार...
सध्या देशात निवडणुकीचे वारं वाहत आहे. डॉ. अभय बंग यांनी आजच्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करणारी मुलाखत निखिल वागळे यांना दिली होती. ही मुलाखत ‘अनुभव’ मासिकाच्या फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाली होती.
बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तूंमध्ये औषध ही बहुधा सर्वांत जास्त जीवनावश्यक बाब आहे. कारण जीवन व मरण यांतील अंतर फक्त एक गोळी किंवा इंजेक्शनएवढे असू शकते. औषध ही अशी एकमेव क्रयवस्तू आहे जिच्याविषयीचा निर्णय ग्राहक स्वतः घेत नाही; या निर्णयाचा अधिकार आपण स्वतःहून तज्ञांच्या, डॉक्टरांच्या हाती सोपवला आहे. डॉक्टरांना रुग्णाची काळजी असली तरी औषधांचे पैसे डॉक्टरांच्या खिशातून जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. औषधांसाठी आपण खर्चिलेल्या प्रत्येक रुपयात औषध-निर्मिती कंपनी, तिचे वैद्यकीय प्रतिनिधी, औषध वितरक, किरकोळ विक्रेते व सरकार या सर्वांचा वाटा असतो. डॉक्टरांचा त्यात प्रत्यक्ष वाटा नसला, तरी आपली औषधे खपवण्यासाठी औषध कंपन्या डॉक्टरांना त्यांच्या विद्यार्थीदशेपासून खूष ठेवतात, हे सर्वविदित आहे.
भारतात ख्रिस्ती मिशनरी म्हणून आलेले वेरीअर एल्विन यांनी महात्मा गांधींसोबत काम करण्यासाठी मिशनरीचे काम सोडून दिले. मध्य भारतातील बैगास आणि गोंड आदिवासींसोबत त्यांनी काम केले. एका आदिवासी मुलीसोबत त्यांनी लग्नही केले. आदिवासी जीवनशैली आणि संस्कृती यावर अधिकारवाणीने बोलू शकेल अशा खूप कमी व्यक्तींपैकी ते एक होते. आदिवासी भागांत काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल त्यांनी अतिशय मार्मिक शैलीत पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांच्या ‘Leaves from the jungle: Life in a Gond village’ या पुस्तकाचा वैभव आगवणे याने परिचय देखील करून दिला होता. आपल्या जीवनावर एल्विन यांचा खूप प्रभाव असणाऱ्या रामचंद्र गुहांनी एल्विन यांच्याबद्दल लिहिलेला लेख...

पाश्चात्त्य भांडवलशाही ध्यान, योगासने इ. पौर्वात्य आध्यात्मिक संकल्पनांचा आधार घेताना मोठ्या प्रमाणात दिसत आहे, मग तो google च्या कर्मचाऱ्यांसाठी असणारा ‘search inside yourself’ हा कोर्स असो किंवा EBay, Twitter, Facebook या कंपन्यांचे इतर उपक्रम असो. याचा त्यांना काही फायदा होतो का? सतत ताणतणाव आणि प्रलोभनांचा सामना करता करता थोडा वेळ शांतपणे विश्रांती घेतली तर फायदा होईल असे मानणे अवाजवी नक्कीच ठरणार नाही. मात्र ज्या आजारांचा सामना करायचा, त्याच आजाराचा हे उपाय भाग होत आहेत. ‘स्पर्धेत टिकण्यासाठी, rat race मध्ये पुढे जाण्यासाठी ध्यान करणे’ असे या उपायांचे स्वरूप दिसत आहे. पौर्वात्य आध्यात्मिकतेचा पाश्चिमात्य भांडवलशाहीवर प्रभाव पडण्याऐवजी उलटे होताना दिसत आहे. Economist मधील हा लेख

Tuesday, 10 December 2013

चॉकलेट पार्सल - ५

१० डिसेंबर, २०१३
प्रिय मित्रांनो,

१.      नुकतेच नेल्सन मंडेलांचे निधन झाले. तुरुंगवासाच्या २७ पैकी १८ वर्षे रॉबेन आयलंडवरील ज्या जेलमध्ये त्यांना ठेवले होते तो जेल व ती कोठडी मला दाखवणारा गाईड हा स्वतः मंडेलांसोबत राहिलेला काळा कैदी होता. मंडेलांविषयी तो जे म्हणाला त्यात त्यांचं सर्वात मोठं कार्य नेमकं पकडलं गेलं. तो म्हणाला, “मंडेलांनी मला गोऱ्या लोकांप्रती माझ्या मनात असलेल्या द्वेषापासून मुक्त केले.” २७ वर्षे आपल्याला तुरुंगात ठेवणाऱ्या गोऱ्या लोकांचा द्वेष करण्यापासून मंडेला कसे मुक्त राहिले असतील? आपल्या मनाशी तुलना केली की मंडेलांची उंची कळते.
त्यांच्यावर वर्तमानपत्रात, टीव्हीवर भरपूर येते आहे. पण या ‘चॉकलेट पार्सल’ मध्ये प्रत्यक्ष मंडेलांनी लिहिलेला लेख...

२.      निर्माणमधील अनेक जण शिक्षणाशी संबंधित आहेत. शिक्षणाविषयी विनोबांचा एक अतिशय मार्मिक लेख- जीवन आणि शिक्षण...

३.      देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत ‘मिंट’मधील दोन लेख व राजकीय वादावर ‘साधना’मधील मुलाखत यात तुम्हाला नवे विश्लेषण किंवा दृष्टीकोन आढळेल. त्यातील मते स्वीकारण्याची गरज नाही. विवेकपूर्ण विचार करण्याची पद्धत ग्रहण करण्याची गरज आहे.

Monday, 4 November 2013

चॉकलेटचे पार्सल - ४

३ नोव्हेंबर, १३
प्रिय युवा मित्रांनो,

आज दिवाळी !
२०१३ ची दिवाळी सर्वांना आनंदाची व अंतर्बाह्य प्रकाशाची जाओ.

या महिन्यात ‘चॉकलेट पार्सल’मध्ये :

म. गांधींनी लिहिलेली प्रार्थना स्व. मन्ना डे यांच्या आवाजात संगीतबद्ध केली आहे निर्माणमधील जयप्रदचे आजोबा स्व. वसंत देसाई यांनी. या प्रार्थनेतील पहिल्याच ओळीत ईश्वराचे केलेले वर्णन ‘नाम्रातके सम्राट’ हे विलक्षण काव्यमय आहे. त्याचा अर्थ काय?

निवडणुकींचे पडघम वाजायला लागले आहेत. कोंग्रेस, भाजप, व तिसरी आघाडी तिन्ही आपापले ढोल वाजवत आहेत. लोकशाही व्यवस्थेविषयी विनोबांचे मुलभूत विचार

Social Media सर्व वापरतात. नशा यावा इतका. त्या विषयावरील एका नव्या कादंबरीची माहिती.

भूतानमध्ये आर्थिक विकास ऐवजी ‘समाधान विकास’ चा शोध कसा सुरु आहे? या विषयी काही.


नायना

Wednesday, 2 October 2013

चॉकलेटचे पार्सल- ३

२ ऑक्टोबर, २०१३
प्रिय युवा मित्रांनो,
ऑक्टोबर महिन्याचे ‘चॉकलेटचे पार्सल’ पाठवतो आहे.
            नुकतेच उत्तर प्रदेश मध्ये हिंदु-मुस्लीम दंगे झालेत. हिंदु-मुस्लीम प्रश्नावर आपले स्वतःचे विचार काय आहेत? मुस्लीम धर्माविषयी आपल्याला किमान माहिती तरी आहे का? कोणते आक्षेप आपल्या मनात आहेत? इथूनच सुरुवात व्हावी. या विषयावर विनोबांचे एक विस्तृत भाषण आज पाठवतो आहे. वरून विशेषता ही की हे भाषण किंवा संवाद स्वतः साने गुरुजींच्या हस्ताक्षरात लिहून काढलेली एक प्रत नुकतीच सापडली. तिच्यावरून बनवलेली ही प्रत आहे.
            समडोळीला झालेला दोन निर्माणींचा अधःपात आपण पाहिला आहे. आर्थिक लोभापायी भल्याभल्यांची काय अवस्था होते? सामाजिक कार्यात आर्थिक नीतीपूर्ण व्यवहार कसा महत्त्वाचा? मॅकेन्सी कंपनीचे प्रमुख राहिलेल्या रजत गुप्तांच्या गुन्ह्यावरून आपल्याला काय कळते? ‘इकॉनॉमिस्ट’ मधील एक लेख त्यादृष्टीने...
            डॉ. अतुल गावंडे हे अमेरिकेतील डॉक्टर उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांचा ‘न्यूयॉर्कर’ मधला लेख प्रत्येकाला विचार करायला मदत करेल.

            आज गांधी जयंती. या २३ सप्टेंबरला माझ्या जन्मदिनापासून मी दर महिन्याला ३ दिवस सेवाग्राम आश्रमात राहायला सुरुवात केली. बापुकुटीच्या शेजारीच महादेव कुटीमध्ये माझी राहण्याची व्यवस्था आहे. या कुटीतच पिताजी दहा वर्षे राहिलेत. सेवाग्राम आश्रम व पिताजी या दोघांचे ऋण अंशतः उतराई होण्यासाठी हे तीन दिवस. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे गांधीजी व सेवाग्रामचा सहवास तीन दिवस मिळेल.
            दारू व तंबाखूचे प्रश्न निर्माणसाठी महत्त्वाचे. २ व ३ ऑक्टोबरला महाराष्ट्र शासनातर्फे २रे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन नागपूरला भरते आहे. राणी त्या संमेलनाची अध्यक्ष आहे. अनिल (अवचट) व मीदेखील भाग घेतो आहोत.
            ऑक्टोबरचे चॉकलेट पार्सल वाचा. काय आवडले/नाही, पटले/नाही ते जरूर लिहा. चर्चा करा. तुमची प्रतिक्रिया निखिल जोशीस पाठवा. ती सर्वांसोबत वाटली जाईल.
           
शुभेच्छा,
            नायना
या पार्सलमध्ये:
हिंदु-मुसलमान : विनोबा (शब्दांकन: साने गुरुजी)
Ship of knaves, Rajat Gupta had everything. Why did he blow it?
SLOWIDEAS Some innovations spread fast. How do you speed the ones that don’t? : Atul Gawande

महात्म्याशी भेट: डॉ. अभय बंग

Monday, 2 September 2013

चॉकलेटचे पार्सल, सप्टेंबर २०१३


प्रिय युवा मित्रांनो,
सात दिवसांपूर्वी अनिल अवचट व विवेक सावंत यांच्यासोबत मी साताऱ्याला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या कुटुंबियांना भेटून आलो. नरेंद्र आम्हा तिघांचा मित्रही होता व अनेक सामाजिक उपक्रमांत अतिशय भरवशाचा खंबीर सहकारीही होता. त्याच्या मृत्यूपेक्षाही ज्या तऱ्हेने त्याचा मृत्यू झाला, त्यामुळे आम्ही तिघेही व्यथित होतो. तुम्ही सर्वही असाल.
            श्री. हेरंब कुलकर्णी यांनी व्यथित मनाने लिहिलेली कविता आज पाठवतो आहे. सोबतच नरेंद्रचा कमी माहित असलेला एक सुंदर लेख या पार्सलमध्ये आहे.

            निर्माणमधील अनेकांना शिक्षण या विषयात रस आहे. तंत्रज्ञानामुळे शिक्षणपद्धतीत काय क्रांती होऊ घातली आहे? ‘The Economist’ मध्ये नुकतेच आलेले एक संपादकीय अतिशय रसपूर्ण व उत्साहवर्धक आहे.

            भारताचा विकास कसा होणार? आर्थिक विकासाच्या (growth) मार्गाने की ‘न्याय्य वितरण’ या मार्गाने? प्रा. अमर्त्य सेन विकासाचा तिसराच मार्ग, आशिया खंडाचा मार्ग सांगत आहेत.

            गेल्या महिन्याच्या ‘चॉकलेटचे पार्सल’ नंतर तुमच्या ज्या अनेक प्रतिक्रिया आल्यात, त्यापैकी एक, भूषण देवची ‘गृत्समद’ या लेखावर आलेली इमेल अशी:

“प्रिय नायना,
            लेख फार छान आहे, यात वैज्ञानिक व अध्यात्मिक ऋषी यांचा परिचय झाला. मी मागील सप्ताहात वर्धा निर्माणी ग्रुपसोबत गोपुरी येथे गेलो होतो. तेथे करुणा फुटाणे ताईंनी गृत्समद ऋषींबद्दल माहिती दिली होती व तुमच्याबद्दलच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या होत्या. हा लेख वाचल्यानंतर मला आठवलं की निर्माण शिबिरात एका संध्याकाळी पिंपळमध्ये प्रार्थना आटोपल्यावर सर्च मध्ये काम करीत असलेल्या एका निर्माणीच्या (नाव आठवत नाही) पालकांशी तुम्ही बोलत होतात. त्यांनी तुम्हला म्हटलं होतं की तुमचे वैज्ञानिक (scientist) आणि आध्यात्मिक अशी दोन्ही रूपे मला पाहायला मिळाली. तेव्हा तुम्ही सांगितलेले गांधीजींनी म्हटलेले "वैज्ञानिक ऋषी हवेत" या संदर्भातील वाक्य आठवले.
आपला निर्माणी
भूषण देव”

            गांधीजींचा शब्द ‘सत्याग्रही सायंटिस्ट’ असा आहे. गांधीजींच्या मनातली ‘परिवर्तनाचा कार्यकर्ता कसा असावा?’ याबद्दल व विज्ञानाबद्दल असलेली भूमिका काही वर्षांपूर्वी डॉ. शंभू प्रसाद यांनी लिहिलेल्या लेखात उत्कृष्ट मांडली आहे. निर्माणमधील सर्व युवांना स्वतःला पडताळण्यासाठी हा महत्त्वाचा लेख आहे.

            कल्याणने विनोबांच्या ‘गृत्समद’वर प्रश्न विचारला आहे:

“ पाढे, कापसाची शेती आणि चंद्र्प्रकाशाचा गर्भावर होणारा परिणाम अशा तीन गोष्टींचा विचार करणारी व्यक्ती एक असू शकते. पण का सुचावं एखाद्या मनाला हे सारं? केवळ व्यावहारिक गरजांपोटी किंवा कुतूहलापोटी हे घडू शकतं?

...
हा श्लोक ह्यानेच "पाहिलेला", असं लिहिलंय विनोबांनी. वाचलेला, सांगितलेला किंवा लिहिलेला असं नाही. असं का? श्लोक पाहणं म्हणजे काय? 
कल्याण ”

            गृत्समदला हे जमलं कारण तो प्रत्यक्ष जीवन जगत होता व जीवनातील समस्या सोडवता सोडवता संशोधन करत होता. Action-research करणाऱ्यांचा तो आद्यगुरू ! म्हणून शोधग्राममध्ये एका इमारतीला त्याचं नाव दिलं आहे.
            “श्लोक पाहिला” असं का लिहिलं असावं? त्याने पुस्तकातून/गुगलवरून ती माहिती मिळवली नाही. त्या श्लोकातील अर्थ त्याच्या कविमनाला, मनःचक्षूंना प्रत्यक्ष दिसला असावा. ‘ऋषी’ या शब्दाचा अर्थदेखील ‘अंधारात किंवा दूरचे बघू शकणारा’ असा आहे असे अन्यत्र विनोबांनी म्हटले आहे. म्हणून त्याने तो श्लोक रचला किंवा रटला नाही, पाहिला.
  
          ख्वाब देखना पडता है !

नायना