'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 19 November 2012

लिहिते व्हा...


निर्माणमधे विशिष्ठ समस्येवर प्रत्यक्ष काम करणार्‍या तरुणांची संख्या हळूहळू वाढत आहे. या कामादरम्यान किंवा कामाच्या निमित्ताने येणारे विविध अनुभव ते वेगवेगळ्या प्रकारे टिपून ठेवतात. पण ते निर्माण परिवारातील सर्व सदस्यांपर्यंत पोचू शकत नाहीत. अनेकदा ते अनौपचारिक गप्पांच्या स्वरुपात सीमित राहतात. हे सर्व अनुभव सीमोल्लंघनची टीम दर महिन्याला ‘लिहिते व्हा’ या सदराअंतर्गत निर्माणच्या सर्व तरुणांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. आजच्या अंकात निर्माण १ च्या चारुता गोखलेचे तिच्या दीड वर्षातील सर्च या संस्थेसोबत केलेल्या कामाचे अनुभव, तिच्याच शब्दात... 

मलेरियाच्या निमित्ताने
मास्टर्सच्या प्रोजेक्टने मला Submission चा आनंद दिला. तर मलेरियावरच्या कामाने मला  Application चा आनंद दिला. मलेरिया हा विषय त्याची लक्षणं, डासांची उत्पत्तीस्थानं, मच्छरदाणीचा नियमित वापर, गप्पी मासे याच्यापलीकडे अजून बरंच काही आहे. आणि याचा खरा अर्थ पुस्तकात नाही तर कदाचित गडचिरोलीच्या जंगलात किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे.

पुण्यात Health Science मध्ये मास्टर्सच्या शेवटच्या वर्षाला असताना पुढील सहा महिन्यांच्या प्रोजेक्टचा विषय निवडण्यासाठी आम्हाला पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता. रोज सकाळी कम्प्य़ूटरसमोर बसून ज्यावर आत्तापर्यंत विशेष काम झालेले नाही असा विषय आणि त्यातील  Research gap  शोधणे हा आमचा पुढील पंधरा दिवसांचा कार्यक्रमच बनला. नशीब बलवत्तर किंवा कदाचित कम्प्युटरचं बर्‍यापैकी ज्ञान असल्यामुळे प्रत्येकाला एक विषय मिळाला आणि तो पूर्ण करुन आम्ही सहा महिन्यांनी डिग्री घेऊन बाहेर पडलो. सर्वजण खुशीत होते. पण हा प्रोजेक्ट करताना मी मात्र खूप असमाधानी होते. यात माझ्या ज्ञानाची कसोटी लागली. आत्तापर्यंत शिकलेल्या कौशल्य़ांचा मी यात उपयोग करू शकले. पण हे सगळं कशासाठी हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. यामागचं प्रयोजन मी शोधू शकले नाही. हा प्रोजेक्ट करुन निव्वळ माझा होणारा फायदा यापेक्षा वेगळं उत्तर मी शोधत होते. वयाची 17 वर्ष शिकून जर हे ज्ञान मला काल्पनिक समस्येवर काल्पनिक उत्तर शोधण्यास प्रवृत्त करत असेल तर हे शिक्षण मला भविष्यात शहाणं होण्यास मदत करणार नाही हे माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. हे सगळं विचारांचं वादळ शमेपर्यंत मास्टर्सनंतर पुढे काय? हा प्रश्न समोर येऊन उभा ठाकला. लगेच पीएच.डी करायची नाही हे पक्क होतं. मागील काही वर्षांपासून डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुरु केलेल्या ‘निर्माण’ चळवळीशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या ‘सर्च’ या संस्थेशी तोंडओळख झाली होती. अगदी खर्‍याखुर्‍या प्रश्नाशी लढा देण्यासाठी आपली शस्त्र पुरेशी धारदार आहेत का हे आजमावण्यासाठी मी ग़डचिरोलीतील ‘सर्च’ ही संस्था माझी युध्दभूमी म्हणून निवडली. आणि शत्रू होता मलेरिया हा रोग.
सरकारच्या आकडेवारीनुसार 2010 मध्ये मुंबईखालोखाल गडचिरोली जिल्हात मलेरियाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच हा जिल्हा मलेरियाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणारा जिल्हा (Endemic district) म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे सरकारतर्फे या जिल्ह्याला विशेष लक्ष पुरवले जायला हवे. परंतु प्रत्यक्षात येथे उलटाच प्रकार आहे. भाताची शेती, चौफेर घनदाट जंगल यासारख्या नैसर्गिक आव्हानांबरोबरच आरोग्य केंद्रात डॉक्टरची कमतरता, ऐन साथीच्या काळात मलेरियाच्या प्रभावी गोळ्यांचा तुडवडा, मच्छरदाण्यांची अनुपलब्धता अशा काही मानवनिर्मित समस्यांनाही येथील लोकांना सामोरे जावे लागते.  
    
    सर्चतर्फे आजुबाजुच्या 45 आदिवासी खेडयांमध्ये चालवल्या जाणारा मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गेत गेले वर्षभर सरकारतर्फे मच्छरदाण्यांचा आणि औषधांचा पुरवठा होण्यासाठी अनुदानप्रस्ताव लिहिणे, त्यांचे योग्य वाटप आणि वापर यासाठी प्रयत्न करणे, आदिवासी लोकांचे मलेरियाविषयीचे आरोग्यशिक्षण तसेच मलेरियाच्या त्वरित निदानासाठी गावपातळीवरील आरोग्यसेवकांना प्रशिक्षित करणे या कामांमध्ये मी सहभागी आहे. या 45 गावांमध्ये मलेरियाची व्याप्ती नेमकी कशी आहे हे पाहण्याच्या दृष्टीने आजुबाजुच्या आरोग्य केंद्रांमधून मलेरिया नेमका कोणत्या महिन्यात अधिक आहे, पुरुषांमध्ये अधिक की बायकांमध्ये अधिक, कोणत्या वयोगटात अधिक यावरील आकडेवारी गोळा करण्यापासून माझे काम सुरु झाले. हळूहळू समस्येचा आवाका व आणि आव्हानं लक्षात येऊ लागली.

मलेरिया हा आजार खरंतर इथल्या लोकांच्या अंगवळणी पडलेला. मलेरियामुळे औषधांवर होणारा खर्च, दवाखान्यात भरती केल्यामुळे बुडणारी रोजी, उपचाराच्या अभावी होणारा मृत्यू या सर्व बाबी जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे असं मानणार्‍या आदिवासींमध्ये मलेरिया प्रतिबंधाविषयी जागरुकता निर्माण करुन ती कृतीत परिवर्तीत करणं हे माझ्यापुढील मोठं आव्हान होतं. आदिवासी लोक मुळात मितभाषी. त्यात भाषा गोंडी. यामुळे सुरुवातीला त्यांना बोलतं करणं हे एक जिकीरीचं काम असे. पण त्यांचा स्वभाव आणि देहबोली हळूहळू परिचित होऊ लागली.     

माझ्यादृष्टीने आदिवासी लोक मलेरियाविषयी पुरेशी जाणती नसली तरी इतकी वर्ष या भागात राहिल्यामुळे आजारामागची कारणं, लक्षणं, त्याची उपचारपध्दती याविषयी प्रस्थापित समजूती नक्कीच असणार. त्या समजल्याशिवाय पुढे जाता येणं शक्यच नाही. शिकवण्याच्या तयारीत निघालेले मी शिक्षकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्याच्या भूमिकेत गेले. लोकांच्या संस्कृतीशी परिचित होत असताना लोकसहभागाचं (community participation) अनन्यसाधारण महत्व मला पटू लागलं. लहानपणापासून स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देणार्‍या माझ्या मेंदूला निर्णयप्रक्रियेत पदोपदी लोकांची मतं विचारात घेणे सुरुवातीला पटेना. यावेळी John Dewey या मानसशास्त्रज्ञाचे वाचनात आलेलं एक वाक्य आठवलं  

No matter how ignorant a person is, there is one thing he knows better than anybody else and that is where the shoes pinch on his own feet and because it is the individual that knows his own troubles even if he is not literate or sophisticated in other respects. Every individual must be consulted in such a way, actively not passively that he himself becomes  a part of the process of authority, of the process of social control that his needs and wants have a chance to be registered in a way where they count in determining social policy.

जोपर्यंत मलेरियाविरुध्द उपाययोजना शोधणं हा माझा एकटीचा अजेंडा राहतो तोपर्यंत एक देणारा आणि एक घेणारा हा भेद कायम राहणार. आणि यासाठी या लोकांना critically conscious करुन त्यांच्या समस्यांच्या किल्ल्या त्यांच्याच हातात सूपूर्त केल्यास हा भेद कमी करणे शक्य आहे हे मी हळूहळू शिकू लागले. यानिमित्ताने आरोग्यशिक्षणाच्या अनेक शास्त्रीय पध्दती मी शिकले. माणूस नेमका शिकतो कसा आणि शिकलेलं वर्तनात कसा आणतो या पूर्णत: नवख्या विषयाशी यादरम्यान माझी ओळख झाली.   

मध्यंतरी ‘सर्च’मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील एका डॉक्टरबरोबर मलेरियावरील एका संशोधनात सहभागी होण्याची संधी मिळाली. या डॉक्टरने आदिवासी भागातील लोकांच्या मलेरियाविषयीच्या समजूती, त्यांचे वर्तन व त्याचा आर्थिक बोजा यांचा Anthropology (मानववंशशास्त्र) च्या अंगाने अभ्यास केला. हा अभ्यास माझ्यासाठी एक नवीन विषय शिकण्याचा सुंदर अनुभव ठरला. मलेरियाच्या उपचारासाठी गावातील पुजार्‍यांचा लोकांवरील प्रभाव, मच्छरदाणीच्या वापरामधले अडथळे, डॉक्टरांना गावातील मलेरिया हाताळण्यात येणार्‍या अडचणी याविषयीची महत्त्वाची माहिती या अभ्यासादरम्यान मिळाली.    

Medical Anthropology, Adult education, Behavioral Science हे सगळे विषय जर मी स्वतंत्रपणे पोकळीत शिकले असते तर कदाचित ते रुक्ष झाले असते. पण आज मलेरिया या एकाच समस्येसाठी मी हे ज्ञान उपयोगात आणते तेव्हा त्याचं प्रयोजन कळतं. ‘नई तालीम’ पध्दतीने काम करत करत शिकण्यात हाच खरा आनंद आहे.

या सर्व प्रवासात ‘निर्माण’च्या सहकार्‍यांची साथ मला खूप मोलाची वाटते. सुरुवातीला शहरातल्या मित्रमंडळींचे पाच अंकी पगार, त्यांची पदं पाहून आपण या वर्तुळाच्या बाहेर फेकले गेलो आहोत असा विचार यायचा आणि असुरक्षित वाटायचं. पण आज जमाखर्चाचा हिशोब मांडायचाच झाला तर कामादरम्यान मिळालेल्या अनुभवांचं आणि निर्माणच्या मुलांचं निव्वळ ‘असणं’ याने माझं पारडं खूपच जड झालं आहे हे लक्षात येतं.

शाळा कॉलेजचं शिक्षण घेताना आपल्या खूप मर्यादित कौशल्यांचा कस लागतो. अनेक वेळा आपल्या खर्‍या क्षमतांचा आपल्याला परिचयच झालेला नसतो. कारण बहुतांश वेळेला प्रश्नांची इतर कोणीतरी तयार केलेली उत्तर आपण फक्त reproduce करत असतो. ती पडताळून पाहण्याची  एकतर कधी आपल्याला संधीच मिळत नाही किंवा त्यासाठी पुरेसे कष्ट आपण घेत नाही. पण एखादा खराखुरा प्रश्न सोडवताना अरे, मला हेही जमतं असा अचानक प्रत्यय येतो. हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं आणि खूप आत्मविश्वास देऊन जातं.

सर्चमधल्या कामादरम्यान माझ्या व्यक्तिमत्वातल्या अनेक मर्यादा मला ओलांडता आल्या. आदिवासी गावात प्रत्येक घरी जाऊन मच्छरदाण्या विकणं, लोकांना मच्छरदाणी वापराचं महत्त्व पटवून देणं हे मी करू शकेन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण स्वत:ला आव्हानात्मक परिस्थितीत ढकल्याशिवाय आपल्या खर्‍या क्षमतांशी परिचय होत नाही हे मी कामादरम्यान शिकले.

निर्माणच्या काही सत्रांदरम्यान ‘मी कोण’ यापेक्षा ‘मी क़ोणाचा’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे हे ऐकलं होतं. आज काम करायला लागल्यानंतर ‘मी कोण’ या प्रश्नाचं उत्तर ‘मी क़ोणाचा’ यात दडलं आहे हे लक्षात येतं.

सर्चमधल्या या कामाच्या अनुभवाने मला असं काय दिलं जे मास्टर्सच्या प्रोजेक्टने दिलं नाही? मास्टर्सच्या प्रोजेक्टने मला Submission चा आनंद दिला. तर मलेरियावरच्या कामाने मला  Application चा आनंद दिला. माझं ज्ञान कोणासाठी या प्रश्नाचं उत्तर मला या कामाने दिले. विनोबा भावेंचं ‘मधुकर’ या पुस्तकातलं एक सुंदर वाक्य आहे, ‘अश्व’ या शब्दाचा अर्थ कोशात घोडा दिला आहे. पण त्याचा खरा अर्थ तबेल्यात बांधला आहे. कोशातून बाहेर पडून तबेल्यात गेल्याशिवाय घोडा कळणारच नाही. मलेरिया हा विषय त्याची लक्षणं, डासांची उत्पत्तीस्थानं, मच्छरदाणीचा नियमित वापर, गप्पी मासे याच्यापलीकडे अजून बरंच काही आहे. आणि याचा खरा अर्थ पुस्तकात नाही तर कदाचित गडचिरोलीच्या जंगलात किंवा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये आहे.
चारुता गोखले

No comments:

Post a Comment