'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

लोकसहभागातून ग्रामविकास: ‘लोकसंघर्ष मोर्चा’ने आयोजित केलेल्या अभ्यासवर्गात खानदेश गटाचा सहभाग


७
 
‘लोकसंघर्ष मोर्चा’च्या वतीने दि. १९ व २०मार्च रोजी जळगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी गावांचा मेंढा(लेखा) च्या धर्तीवर विकास व्हावा, तेथील वन्यजीव विविधतेचे संरक्षण व्हावे व सहजीवनाची संकल्पना अधिक वृध्दींगत व्हावी यासाठी दोन दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत ‘कल्पवृक्ष’, पुणे या संस्थेच्या कार्यकर्त्या नीमा पाठक व त्याच्या सहकारी मीनल तत्पती यांनी मार्गदर्शन करताना गौणवनाचे संरक्षण, उपभोग्य संसाधनांचा शास्त्रोक्त पध्दतीने वापर व  संवर्धन ह्याकरीता लोकांचा सहभाग हा महत्त्वपूर्ण घटक असल्याचे, तसेच स्थानिक लोकांसोबत चर्चाविनिमय करून आपल्या जमिनीसोबतच आपण जंगल व तेथील जैवविविधताही अबाधित ठेवणे शक्य असल्याचे सांगितले. त्यासोबत मेंढ्यात होणाऱ्या विकासामध्ये मोलाचा सहभाग असणारे प्रा. विजय एदलाबादकर यांनी जैवविविधता नोंदणीपत्रक (People’s Biodiversity Register: PBR) याविषयी माहिती दिली व प्रत्यक्ष अमंलबजावणीविषयी मार्गदर्शन केले.
अभ्यासवर्गात यावल, रावेर व चोपडा तालुक्यातील प्रत्येकी एक गावासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृतीकार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. अभ्यासवर्ग यशस्वी होण्यासाठी शाम पाटील, हर्षद काकडे, आनंद, भुषण, योगेश, विजय व स्वप्नील यांनी सहकार्य केले.

नागपूर गट विविध उपक्रमांद्वारे कृतीशील


विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या ७० युवांचा स्थानिक निर्माण गट नागपूरात हळूहळू सक्रीय होत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांना भिडण्याची सुरुवात म्हणून त्या समस्या समजून घेण्याच्या दृष्टीने नुकतेच या गटाने शोधग्राम- ला भेट दिली. २ दिवसांच्या या भेटीमध्ये सर्चचे व तेथे काम करणाऱ्या निर्माणींचे काम समजून घेणे हा मुख्य उद्देश होता. त्याकरिता सर्चचे तुषार खोरगडे, डॉ. आनंद बंग, निर्माण ४ चा निखिल जोशी व निर्माण २ चा डॉ. वैभव आगावणे यांनी गटासोबत संवाद साधला. अमृत बंग याने निर्माणची सुरुवात व आजवरचा  प्रवास शेअर केला. नंदा खरे (नंदा काका), डॉ. अभय बंग (नायना) व डॉ. राणी बंग (अम्मा) यांनीही सर्वांसोबत संवाद साधला. तत्पूर्वी या गटाने सर्चमध्ये येत असताना वाटेवरच्या आरमोरीतील उपजिल्हा रुग्णालयाला व तेथील निर्माणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती देशमुख व डॉ. युगंधरा काटे यांना भेट दिली.
होळीमध्ये होणा-या पाण्याचा अतिवापर व सध्याची दुष्काळाची स्थिती यावर जनजागृती करण्यासाठी या गटाने नुकतेच नागपूरच्या प्रसिद्ध ट्रॅफिक पार्क येथे पथनाट्य सादर केले. यावेळी सुमारे २००-२५० प्रेक्षक हजर होते.
याशिवाय निर्माण ५ च्या पल्लवी बापटने आपल्या इंटर्नशिपच्या काळामध्ये सर्व निर्माणींसाठी रक्तदान मोहीमेचे आयोजन केले होते. या मोहीमेलाही सर्व निर्माणींनी चांगला प्रतिसाद दिला.
नागपूर गटाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

महामार्ग ग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ प्रांत कार्यालयावर



चौपदरीकरणात भूसंपादन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या जागेवरील भोगवटाधारक, इमला मालक अतिक्रमण धारक आणि पुनर्वसन धारकांच्या नुकसान भरपाईबाबत हरकतीसह इतर मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दि. ११ रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
महसूल विभाग भुसावळच्या हद्दीतील प्रास्तावित राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जाणाऱ्या सामूहिक आणि गावठाण तसेच सार्वजनिक वापरात असणाऱ्या जमिनी व शेती मोठय़ा प्रमाणात भूसंपादन झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत:
१.  भूसंपादन करताना शेतकरी, जमीन मालक, पक्षकार यांना संसदेत मंजूर होणाऱ्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार जास्तीत जास्त अधिग्रहण करताना भूमी अधिकार मिळावे आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई दलाल, एजंट व मध्यस्थाशिवाय मिळण्याचा मार्ग सुकर करावा
२.    उपविभागातील भुसावळसह इतर गावांना टोल मधून सूट मिळावी
३.    महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग संघ, एस.टी. महामंडळ इ. स्वरुपाच्या सर्वाजिनक वापराच्या जागा संपादन करताना त्यांचा वापर तेथे करुन त्या परिसरांचा विकास करुन प्रकल्पग्रस्तांना मदत करावी
४.  उपविभागातील ज्या गावातील गावठाण भूसंपादन करताना त्यांची सर्व भरपाई स्थानिक ग्रामपंचायतीला विकासासाठी मिळावी