'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 20 December 2023

समलिंगी विवाहांबद्दल तरुणांचे मत काय आहे?


भारतीय तरुणांच्या सर्वांगीण विकासाला मदत व्हावी, आणि त्यांच्यात सामाजिक बदल घडवून आणण्याची संवेदनशीलता, प्रेरणा व कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने गेली १७ वर्षे आम्ही निर्माण हा युवा उपक्रम चालवतो आहोत. सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय व डॉ. राणी बंग आणि एम. के. सी. एल.चे श्री. विवेक सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निर्माणने भारताच्या २१ राज्यातील हजारो तरुणांसोबत काम केलेले आहे. आम्ही चालवत असलेल्या विविध उपक्रमांपैकी गडचिरोलीला होणारी युवांची शैक्षणिक शिबिरे आणि त्यानंतरचा सातत्याने होणारा पाठपुरावा हा एक अतिशय सघन उपक्रम आहे. आमच्या वेळेच्या आणि संसाधनांच्या मर्यादा लक्षात घेऊन आम्ही दरवर्षी एक निवडप्रक्रिया करतो आणि भारतभरातून साधारण दीडशे युवांना निवडतो.

जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत होणारी ही निवडप्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये असते – ‘अप्लिकेशन फॉर्म, इंटरव्ह्यू आणि असाइनमेंट्स’. आमच्या वेबसाईट वर एक अतिशय सुंदर आणि आत्मनिरीक्षणात्मक असा अर्ज आहे. यातील प्रश्न हे युवांना स्वत:च्या जीवनाबद्दल अंतर्मुख व्हायला तसेच बाह्य सामाजिक परिस्थितीविषयी विचार करायला भाग पाडणारे असे दोन्ही प्रकारचे असतात. आणि हे प्रश्न दरवर्षी काही प्रमाणात बदलत असतात त्यामुळे त्यातली उत्सुकता व नावीन्य टिकून राहते.

या वर्षी त्यात विचारलेला एक प्रश्न असा होता: 
"भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता असावी का? तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा."

भारतातील युवा व इतरही अनेकांसाठी अतिशय कळीच्या अशा या प्रश्नाविषयी विचार करायला व आपले म्हणणे सुसूत्रपणे मांडायला युवांना संधी मिळावी हा शैक्षणिक उद्देश्य तर आमच्या मनात होताच, पण सोबतच याबाबतीत युवा नेमका काय विचार करतात याचादेखील काही अंदाज यावा हा भाग होता. भारतातल्या अनेकविध नामांकित कॉलेजेसमधून येणारी आणि शैक्षणिक आणि भौगोलिक विविधता असलेली ही युवा मंडळी काय मत प्रकट करतात हा आपल्या सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा विषय असेल म्हणून आम्हाला जे सापडले ते इथे शेअर करत आहोत:

१८ ते २९ वयोगटातील एकूण ५२८ युवांनी या प्रश्नाला उत्तर दिले. त्यात ४४% पुरुष, ५५% स्त्रिया होत्या आणि एक जण ‘इतर’ या वर्गात मोडत होता. शैक्षणिकदृष्ट्या बघितले असता ४८% जण हे वैद्यकीय पार्श्वभूमीचे तर ५२% हे अ-वैद्यकीय पार्श्वभूमीचे (उदा. कला, वाणिज्य, विज्ञान, इंजिनियरिंग, इ.) होते.

यांच्या उत्तरांचे विश्लेषण केले असता आम्हाला असे आढळले की ७५.७% युवांनी भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता असावी याला “हो” असे उत्तर दिले होते. केवळ ७.४% युवांनी “नाही” असे उत्तर दिले होते तर १६.९% युवांनी त्यांच्या उत्तरांत नेमकी कुठलीही एक भूमिका स्पष्ट केली नव्हती.

एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा समलैंगिक विवाहांबद्दल खुलेपणे विचार करतात हा आमच्यासाठी सुखद आश्चर्याचा अनुभव होता. जेव्हा आम्ही या प्रतिसादांचे खोलवर गुणात्मक विश्लेषण केले तेव्हा समलिंगी विवाहांच्या समर्थनार्थ खालील प्रमुख कारणे मांडलेली दिसली:

१. नातेसंबंध आणि लग्नामध्ये निवडीचे स्वातंत्र्य 
२. विवाहाचा अधिकार 
३. जोडप्यांना आणि अनाथ वा सोडलेल्या मुलांसाठी कुटुंब
४. मालमत्तेच्या वारसाहक्कामध्ये सुलभता 
५. संधीची आणि मानवी हक्कांची समानता 
६. ही एक वैज्ञानिक स्पष्टीकरणासह समजता येणारी नैसर्गिक घटना आहे 
७. समलिंगी जोडप्यांचे भावनिक आरोग्य जपता येणे 
८. सामाजिक स्वीकृती आणि संरक्षण, स्टिग्मा आणि भेदभाव कमी करणे 
९. तो/ती स्वत: LGBTQ समुदायाशी संबंधित आहे किंवा त्याचा/तिचा LGBTQ समुदायातील कोणी मित्र आहे 
१०. इतर देशांनी हे मान्य केले आहे, त्यामुळे भारतानेही त्याचे पालन केले पाहिजे.


विशेष म्हणजे, प्यू रिसर्च सेंटरने, ऑक्टोबर २०२२ मध्ये अमेरिकेतील प्रौढांसाठी केलेल्या सर्वेक्षणात देखील असे आढळून आले होते की १८-२९ वर्षे वयोगटातील ७५% अमेरिकन नागरिकांना समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी असे वाटते. म्हणजे या विषयाबाबतीत भारतीय आणि अमेरिकन तरुणांमध्ये एकसमान वेव्हलेंग्थ आहे तर! ग्लोबल जगामध्ये अजून काय अपेक्षित असेल?

१८ ते २९ वयोगटातील तरुण हे भारतीय लोकसंख्येच्या २२% आहेत. निर्माणने केलेला हा अभ्यास सर्वव्यापी प्रातिनिधिक जरी नसला तरी भारतातील सुशिक्षित व विचारी तरुणांच्या एका गटाच्या मनात समलिंगी विवाहांबाबत काय समज आहे याची झलक तो नक्कीच दाखवतो.

प्रतिसाद देणाऱ्या ७५.७% तरुणांनी समलिंगी विवाहांना समर्थन दिले आणि ते कायदेशीर होण्याच्या बाजूने होते. बदलत्या भारताचा हा युवा आवाज राजकारणी ऐकत आहेत का? समलिंगी विवाहांबाबत कायदा बनवताना ते तो विचारात घेतील का?


- अमृत बंग (लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत)
- आदिती पिदुरकर व साईराम गजेले (निर्माण, सर्च, गडचिरोली)

No comments:

Post a Comment