'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 31 January 2024

युवा कसे जगत आहेत?

भारतात 18 ते 29 वर्षे या वयोगटात 26 कोटी युवा आहेत. पण ते काय करत आहेत, त्यांचा रोजचा दिवस कसा जगत आहेत, हे युवा स्वयंविकासाच्या इष्टतम स्थितीत आहेत का? अत्यंत कळीचे असे हे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रथम काही उदाहरणे बघुयात.

श्रावणी चंद्रपूरची. स्वत:ची इच्छा नसतांना देखील आई-वडीलांचा आग्रह म्हणून तिने त्यांनी सांगितलेल्या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आता तिला फार पैसे मिळतील अशी नोकरी लगेच सापडत नाही आहे. आई-वडील म्हणताहेत की तू पुण्याला जा आणि स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लाव. तिची ती देखील इच्छा नाही. कुठे शिकाऊ उमेदवारीचे काम करावे यासाठी ती वा पालक दोघेही तयार नाहीत. परिणामत: पदवी संपून दोन वर्षे झालीत तरी श्रावणी घरीच बसून आहे. दिवस कसा जातो तर प्रामुख्याने मोबाईल, इन्स्टाग्राम व युट्यूबवर.

वैभव मुंबईच्या एका प्रतिष्ठित महाविद्यालयात एमबीबीएसच्या तिसर्‍या वर्षाला आहे. हॉस्टेलला मुलांमध्ये दारु व गांजा सर्रास चालतात. दुसर्‍या मजल्यावरच्या त्याच्या रूमकडे चालत जात असतांना दोन्ही बाजूला अनेक बाटल्या पडलेल्या दिसतात. मेसमधले जेवण ना स्वास्थपूर्ण ना चवीष्ट. खूपदा बाहेरून स्विगी, झोमॅटोवरून पदार्थ ऑर्डर केले जातात. त्यांचे अर्धवट अन्न उरलेले अनेक डब्बे व पार्सल्स विविध खोल्यांच्या दरवाज्यांबाहेर पडलेले दिसतात. तिथे अनेक उंदीर फिरत असतात. पुरेसे उन व खेळती हवा नसल्याने अनेक कपड्यांना फंगस लागले आहे. पण पोस्टिंगला जायचे असल्यास तोंडावर पाणी व अंगावर भरपूर स्प्रे मारुन चटकन तयार व्हायची कला वैभव व त्याच्या मित्रांनी अवगत केली आहे. ‘हॉस्टेल लाईफ’ हे असे असणारच असे मानून यात काही गडबड आहे असे देखील आता वैभवला वाटत नाही. रोजचे (प्रामुख्याने रात्रीचे) सुमारे 4 ते 5 तास हे वैभव इन्स्टाग्राम रील्स स्क्रोल करण्यात, मिर्झापूर – मनी हाईस्ट सारख्या वेब सिरिज बघण्यात, पब्जी वा इतर गेम्स खेळण्यात घालवतो. तो सहसा रात्री 3 वाजता झोपतो. पुस्तके वाचण्याची तशी वैभवला फारशी सवय नाहीच पण आता मित्राच्या सांगण्यावरून त्याने अंकूर वारिकू यांचे ‘डू एपिक शिट’ हे पुस्तक चाळायला घेतले आहे. कुठलेच वर्तमानपत्र वाचत नसल्याने भारताच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड आहेत आणि नुकताच इतर न्यायाधीशांना कॉलेजियम पद्धतीने नियुक्ती द्यावी की नाही यावर सरकार आणि कोर्टाचा काही वाद झाला या (व अशा) बाबतीत वैभव पूर्णपणे अनभिज्ञ आहे.

अक्षय बीड जिल्ह्यातल्या एका गावातील हुशार मुलगा. नवोदय विद्यालयात बारावीपर्यन्त शिकून तो आता अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायला औरंगाबादला आला आहे. कॉलेज तर म्हणायला सुरु आहे पण लेक्चर्स व प्रॅक्टिकल्स क्वचितच होतात. आई-वडील वा घरच्या इतर कोणाशीही अक्षयला फारसे नीट बोलता येत नाही, स्वत:च्या भावना नीट व्यक्त करता येत नाहीत. ‘जेवण झाले का, सर्व ठीक सुरू आहे ना’ या भोवतीच बोलणे थांबते. कॉलेजमध्ये दोन-तीन मित्र आहेत पण त्यांच्यासोबतचा संवाद देखील उथळ आहे. आपली घुसमट होते आहे, सतत एकटेपणाची भावना आहे असे अक्षयला वारंवार वाटत असते.

नाशिकच्या अभिनवची एमबीबीसची पदवी पूर्ण होऊन आता तीन वर्षे झाली आहेत. पुढे पीजी करायला हवे, ते देखील रेडियोलॉजी, ओर्थोपेडिक्स वा स्किन याच विषयात असे त्याला वाटते, कारण त्या ब्रांचेसना प्रतिष्ठा आहे, त्यात बक्कळ पैसा आहे असे त्याला सिनियर्सनी सांगितले आहे. दुर्दैवाने यात किंवा इतर कशातही प्रवेश मिळेल एवढे गूण अभिनवला नीट पीजीच्या परीक्षेत मिळत नाही आहेत. तीन वर्षे झालीत तरी तो अद्याप परिक्षाच देत आहे. तोच तोच अभ्यास करून अभिनव कंटाळला आहे. बर्‍याचदा त्याला फ्रस्ट्रेटेड वाटतं. कॉलेजमध्ये फिरतांना लाज वाटते. खोली – लायब्ररी – मेस एवढेच चक्र दिवसभर चालू आहे. 27 वर्षे वय झालं तरी अजूनही त्याचा गुजारा आई-वडील पाठवत असलेल्या पैशांवरच होतो आहे.

जळगावची प्रणाली आता गेली चार वर्षे पुण्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करते आहे. तिला भरपूर पॅकेज आहे याचा तिला झालेला आनंद आता ओसरला आहे पण त्याबाबत तिच्या आई-वडीलांना असलेला अभिमान मात्र अजून कायम आहे. त्याहून किमान दीडपट अधिक कमावणारा मुलगाच प्रणालीकरिता बघायचा असे त्यांनी ठरवले आहे. इकडे प्रणालीला मात्र तिच्या कामात आता कुठलाही उत्साह राहिलेला नाही. रोज पाच कधी वाजतील याची ती वाट बघत असते. ऑफिसमधील सहकारी देखील विकेंडचा प्लॅन काय करायचा याचीच चर्चा करत असतात. दारु पिणे प्रणालीला स्वत:ला फारसे पटत नाही पण सोबतचे मित्र-मैत्रिणी मनसोक्त पितात आणि आपण एकटे पडायला नको म्हणून ती त्यांच्यासोबत पब्सना जात असते. पुण्यातले बहुतांश हॉटेल्स त्यांनी पालथे घालून झाले आहेत. ‘पुण्यात फ्लॅट बूक कर’ असा पालकांचा तगादा सुरू असतो तो तिने कसाबसा आतापर्यंत थोपवून धरला आहे. आपण काही सामाजिक योगदान द्यावे असेही प्रणालीला अधेमध्ये वाटते पण नेमके काय करावे हे काही सुचत नाही.

प्रतीक नांदेडचा. विद्यापीठामध्ये एमएच्या पहिल्या वर्षाला त्याने नाव नोंदवले होते पण मग मध्येच ते सोडले. त्याचा दिवसाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे इतर दोन मित्रांना घेऊन रोज 50-100 रुपयांचे पेट्रोल भरून त्याच्या यामाहा बाईकवर ट्रिपलसीट फिरणे. त्याला टापटीप कपडे घालायला आवडते. फोटोग्राफरला 200 रुपये देऊन रोज मस्त फोटो काढून घेणे आणि त्याची इन्स्टाग्राम स्टोरी करणे हा त्याचा आवडता छंद. कोणाचे फॉलोअर्स किती व ते कसे वाढवायचे हा तीन मित्रांच्या गहन चर्चेचा नेहमीचा विषय. काम व कमाई यापेक्षा दारु, खर्रा व कॅरम हे जवळचे मुद्दे. आपल्या सारख्या युवांना ‘नीट’ (NEET – Not in Education, Employment or Training) म्हणून संबोधले जाते हे त्यांच्या गावीही नाही. आणि सरतेशेवटी, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा, संदीप. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडचा. कृषीमध्ये बीएससीची पदवी घेऊन आता चार वर्षे पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. युपीएससी नाही तर किमान एमपीएससी तरी होऊ या इच्छेवर तगणार्‍या लक्षावधी तरुणांपैकी तो देखील एक आहे.

वरील सातही उदाहरणे (नावे बदलली आहेत) हे अपवाद नाहीत तर सध्याच्या युवांच्या सार्वत्रिक स्थितीचे प्रातिनिधिक निदर्शक आहेत.

निर्माण उपक्रमाद्वारे गेल्या दीड दशकात प्रथम महाराष्ट्रातील आणि नंतर भारताच्या 21 राज्यातील हजारो तरुण-तरुणींना भेटण्याची, संवाद साधण्याची, त्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधी मला आणि निर्माण टीम मधील माझ्या सहकार्‍यांना लाभली. त्यादरम्यान हे सात जण विविध रुपात, तपशीलाच्या काही बदलासह आम्हाला वारंवार भेटलेत. मनापासून वाईट वाटावे अशी ही परिस्थिती आहे.


लहान मुलांच्या शारीरिक कुपोषणाबाबत बर्‍याचदा चर्चा होते, बातम्या होतात, ते योग्यच आहे. पण आपल्या युवांच्या व्यक्तित्व कुपोषणाची काय परिस्थिती आहे याची भनक देखील कोणाला नाही. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे – 5 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाचे (stunting) प्रमाण हे 35% आहे. मात्र निर्माणद्वारे आम्ही केलेल्या युवांच्या अभ्यासात युवांमधील व्यक्तित्व कुपोषणाचे (languishing) प्रमाण हे 43% आढळून आले. भारतासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे लक्षात घेऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा आपण पुढील लेखात करुया.



अमृत बंग

लेखक हे 'निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक आहेत.

वरील लेख हा 'लोकसत्ता' या वृत्तपत्रात संपादित सदरामधील एक लेख आहे.

amrutabang@gmail.com

No comments:

Post a Comment