'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 4 April 2018

विक्रेता, वितरक ते प्रकाशक - शरद अष्टेकर

विदर्भातील मागासलेल्या जिल्हामध्ये तरुणाईच्या खिशाला परवडतील आणि मनाला भावतील अशी पुस्तक आपल्या ‘मायमराठी’ या उपक्रमामार्फत उपलब्ध करून द्यायचा चंग बांधणारा आपला मित्र शरद अष्टेकर (निर्माण ४), याने पुस्तक विक्रीसोबत स्वतःची  प्रकाशन संस्था – मधुश्री पब्लिकेशन - पण सुरु केली आहे. मधुश्री प्रकाशनाचा थोडक्यात प्रवास जाणून घेऊया शरदच्या शब्दांत...

“गेले सात वर्ष ग्रामीण भागात मराठी पुस्तके पोहचवीत असताना आम्ही बरेच प्रयोग केलेत आणि त्यांना उत्तम  प्रतिसाद पण मिळाला. मायमराठी बुक वितरणाचे काम अगदी जोरात चालू असताना २०१५ साली मी युवल नोआह हरारी याचं ‘Sapiens’ हे पुस्तक वाचलं आणि फारंच प्रभावित झालो. त्यानंतर  बराच काळ ते पुस्तक माझ्या सोबतच होतं आणि मी सतत याच पुस्तकाचा विचार करत असायचो. वर्षभराने मला जाणवायला लागलं की ‘Sapiensसारखीच अनेक दर्जेदार पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत आणि फक्त भाषेच्या बंधनामुळे मोठा मराठी वाचकवर्ग हा अशा अनेक दर्जेदार पुस्तकांना मुकतोय. त्यामुळे अशी चांगली पुस्तके मराठी भाषेत यायला हवीत असं मला प्रकर्षाने वाटायला लागलं. त्यासाठी मला स्वतः प्रयत्न करायला हवेत, आणि वेळ पडलीच तर स्वतःची प्रकाशन संस्था पण सुरु करू अशी मी मनाशी तयारी केली. प्रथम मला आवडलेल्या ‘Sapiens’ पुस्तकाचा मराठीत अनुवाद करावा असा विचार करून ‘Sapiens’ पुस्तकाचे हक्क मिळवण्यासाठी मी जोरदार तयारीला लागलो. पण दुर्दैवाने एका दुसऱ्या प्रकाशनाने ‘Sapiens’ चे हक्क माझ्याआधी मिळवले होते. त्यानंतर मी प्रकाशनाचा विचारच सोडून दिला होता. सोबतच माझी प्रकाशक होण्याची इच्छा पण मेली.
युवल नोआह हरारी यांच्या सोबत शरद
त्यानंतर मी माझ्या नियमित कामात गुंतण्याचा प्रयत्न करत असतानाच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवरती व्यवसायाने पत्रकार असणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांचं ‘आय अॅम अ ट्रोल’ हे पुस्तक गाजत होतं आणि मुग्धा कर्णिक ह्यांनी त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करायला सुरुवात केली होती. पण कोणताही मराठी प्रकाशक ते पुस्तक प्रकाशित करायला तयार नव्हता, कारण सरकार विरोधी पुस्तक छापण्याची हिंमत कोणी करणार नव्हतं. हे बघून माझ्या डोक्यात पुन्हा प्रकाशनाचा किडा घुसला. ‘आय अॅम अ ट्रोल’ हे पुस्तक कोणीही प्रकाशित करायला तयार नसल्याने मला पण चांगली संधी होतीच. त्यांनतर ताबडतोब या पुस्तकाचे हक्क मिळवले आणि माझ्या मुलीच्या नावाने – मधुश्री - प्रकाशन संस्था रजिस्टर करून घेतली. हे मधुश्री प्रकाशनाचे पहिले वहिले पुस्तक!
युवल नोआह हरारी यांनी शरद ला भेट दिलेल्या
पुस्तकावरती त्यांनी शरदसाठी लिहिलेला संदेश
 
हे पुस्तक इतकं गाजलं की आम्हाला लवकरच ह्याची चौथी आवृत्ती पण काढावी लागली. त्यानंतर भारतातील आठ हिंदूत्ववादी संघटना आणि त्यांचं राजकारण ह्या विषयावरच धिरेंद्र झा यांचंशॅडो आर्मीज’ हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. चौथ्याच दिवशी याही पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली! ‘आय अॅम अ ट्रोल’ आणि ‘शॅडो आर्मीज’ या पुस्तकांचा जोरात खप होत असतानाच मी जगभर गाजलेल्या पुस्तकांचे हक्क मिळवायला सुरुवात केली. सर्वात पहिले युवल नोआह हरारी यांच्या ‘Sapiens’ या पुस्तकाचा पुढचा भाग असलेल्या ‘Homo Deus’ या पुस्तकाचे हक्क मिळवले. त्यानंतर ‘Zero To One’,The God Delusion’,Alibaba Genome’, ‘Guns Germs and Steel’,Short History of Nearly Everything’, Surely You’Re Joking Mr. Feynman’ यासारखेच इतर बरेच पुस्तक आता मधुश्री प्रकाशन मराठीत आणत आहे. सोबतच रविश कुमारांचं ‘The Free Voice’ हे पुस्तक पण मधुश्री प्रकाशन मराठीत प्रकाशित करत आहे. मायमराठी बुक वितरण आणि मधुश्री प्रकाशन यासंबंधी भविष्यात बऱ्याच योजना आहेत. वेळ येईल तसं सांगेलच सविस्तर. सध्या पुरत एवढंच.”
दर्जेदार पुस्तके मराठी भाषेत आणण्याच्या शरदच्या या ध्यासाला खूप साऱ्या शुभेच्छा!
                                                                                        
                                                                                                                शरद अष्टेकर, निर्माण ४
                                                                                                                                                   

5 comments: