'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 4 April 2018

Freedom for Sale by John Kampfner

फ्रीडम फॉर सेल हे पुस्तक लिहिलंय जॉन कॅम्फनर या लेखकाने. तो एक राजकीय पत्रकार आहे जो आता मानवी हक्कांचा (Human Rights) प्रचारक बनलाय. त्याने या पुस्तकात देशांतील राजकीय परिस्थिती, तिथले सरकार, लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य, तिथल्या मीडियाच्या स्वातंत्र्यवरची गळचेपी यांचे विस्तृत चित्रण प्रस्तुत पुस्तकात केले आहे. त्याने अनेक देशांमध्ये राहून तिथली राजकीय परिस्थिती जवळून पाहिली आहे, तिथल्या लोकांचा आणि राजकीय नेत्यांचा त्याचा जवळून संबंध आलेला आहे.
 मला जर तुम्ही विचाराल की लोकशाही काय आहे मी म्हणेल ही सरकार चालवण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. पण जॉन कॅम्फनर म्हणेल की, ही सरकार चालवण्याची सर्वात कमी वाईट पद्धतआहे. विकास/ सुबत्तेच्या नावाखाली तर कधी राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली लोकांचं स्वातंत्र्य कसं ओढून घेतलं जातं हे जॉन कॅम्फनरने या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. सध्या आर्थिक सुबत्ता आणि यश हे मापदंड इतके मोठे बनले आहेत की त्याच्यापुढे राजकीय स्वातंत्र्य महत्वाचे मानले जात नाही. पुस्तकात सिंगापूर, चीन, रशिया, UAE, भारत, इटली, ब्रिटन आणि अमेरिका या आठ देशातील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करून तो परिस्थितीचे गांभीर्य आपल्याला जाणवून देतो.
 सिंगापूर या देशाने एक नवीन करार जन्माला घातला आहे. या करारानुसार सिंगापूरचे नागरिकत्व मिळाले की तुम्हाला भरपूर संपत्ती कमवता येते, तुम्हाला खायला उत्तम मिळतं, राहायला घर आणि फिरायला आलिशान गाड्या मिळतात. ह्या सर्व सुविधा बऱ्याचदा सरकार प्रायोजित असतात. तिथे तुम्हाला भासवलं जातं की प्रत्येकजण आनंदी आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला विलासी आयुष्य मिळेल, पण तुमच्या स्वातंत्र्याच्या बदल्यात! हा करार या आधारावर बनवला गेला आहे की तुम्हाला पर्याय आहे की तुम्हाला कोणताच पर्याय नाही. Liberty is the most precious thing, hence most of the people can’t afford it. So they trade it.”
 UAE बद्दल बोलताना लेखक म्हणतो तुम्ही या देशाला एक ब्रँड म्हणू शकता. प्रचंड पैशांचा भला मोठा ब्रँड. एका खाडीचे सिमेंटच्या जंगलात झालेले रुपांतर म्हणजे दुबई शहर! पण इथे कोणाचाच आवाज ऐकला जात नाही. आणि ऐकला तरी का जावा? इथे पैसे कमवण्यातच लोक इतके खुश आहेत तर त्यांचा आवाज ऐकला जाण्याची पर्वा कोण करणार?
भारताबद्दल बोलताना लेखक म्हणतो की भारतीय समाज सहिष्णू असला तरी अत्यंत क्रूर आहे. भारतामध्ये बहुपक्षीय लोकशाही, सत्ता विकेंद्रीकरण, स्वायत्त न्यायव्यवस्था आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे घटक असून देखील पाच वर्षातून येणाऱ्या मतदानाशिवाय नक्की कोणतं स्वातंत्र्य या देशाने प्रस्थापित केलंय? नरेंद्र मोदी सारखा नेता, ज्याचा २००२ साली गुजरात धार्मिक दंगली भडकवण्यात प्रत्यक्षरित्या सहभागी होता, कोणतीही चिकित्सा न करता मिडीयाने गुजरात मॉडेल पैसे घेऊन देशभर पसरवलं, अशा माणसाला जर लोकशाही रोखू शकत नसेल तर त्या लोकशाहीचा काय उपयोग?
या पुस्तकात काही देशांची अवास्तव आणि गरजेपेक्षा जास्त राजकीय वर्णने रंगवली आहेत, जी निरर्थक वाटतात. जगातल्या वेगवेगळ्या देशातील राजकीय परिस्थिती, नागरिकांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली कशी केली जाते, भांडवलशाही व्यवस्थेचे समर्थक सार्वजनिक मत कसे तयार करतात, मिडीयाला कुत्र्याचा पट्टा बांधून त्याचा वापर कसा करतात ह्याचे सुंदर वर्णन ह्या पुस्तकात दिले आहे.
 हे पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मनात असंख्य प्रश्न तयार होतील, नक्की किती लोकांना स्वातंत्र्य हवं असतं आणि किती लोकांना स्वातंत्र्य विकून जगायचं असतं? की आपल्या प्राथमिक गरजा भागल्या म्हणून आपण अमुक स्वातंत्र्य, तमुक स्वातंत्र्याचा विचार करतोय? जगात अब्जावधी लोक आहेत ज्यांना दोन वेळेचं खायलाच मिळत नाही, ते त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करत असतील का? किती लोक ट्रबलमेकर या वर्गात मोडतात? शोध पत्रकार, विरोधी पक्षाचे नेते, आरटीआय कार्यकर्ते, वकील सोडून जो तो आपल्या जीवनाचा गाडा ओढण्याच्या मागे लागलाय. त्यांच्या जीवनाचा हेतू काय हा मूलभूत प्रश्न मागे उरतोच.
 आपल्यावर नकळतपणे प्रभाव टाकणारे हे राजकीय घटक समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक नक्की वाचा!

                                                                                                                        वैभव बागल, निर्माण ७
                                                                                                            vbagal20@gmail.com

No comments:

Post a Comment