'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 31 August 2015

रवींद्रचा गावातील दारू विरुद्ध लढा . . .

गडचिरोली मधील चिंतलपेठ या छोट्याश्या गावात राहणारा रवींद्र चुनारकर (निर्माण ६) गेले काही महिने सातत्याने गावातील दारूबंदीच्या प्रश्नावर काम करत आहे. या उलाढालीत त्याला आलेले अनुभव त्याच्याच शब्दात -
            “हा प्रयोग आहे गावातील कुप्रवृत्तीच्या विरोधात बंड पुकारण्याचा! अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ हे ४०० लोकवस्तीच गाव. गावातील एकूण पुरुषांच्या ८० ते ९० टक्के लोक दारू पिणारे, ३० ते ४० टक्के लोक जुगार खेळणारे. एकंदरीत विकासाच्या आणि विचारांच्या  दृष्टीने खूप मागासलेलं गाव...
            मी पण याच गावचा रहिवासी, शिक्षणासाठी शहरात आलेला. मी जेव्हा गावाबद्दलचा विचार करायचो, तेव्हा गावात चालू असलेल्या कुप्रथा मला सापासारख्या डसायच्या. मग मी सारी शक्ती एकवटून निर्धार करायचो की गावात गेल्यावर या बद्दल काहीतरी करायच. पण जस गावात जातो तशी माझी सारी शक्ती नष्ट व्हायची. एक तर कुणालाच या प्रश्नाबद्दल काही वाटत नव्हते, त्यामुळे लोकांना माझं म्हणण पटवून देण खूप कठीण काम होत. आणि नेमकं म्हणजे लोकांची दारूवर इतकी श्रद्धा असते की त्यांना दारू विरुद्ध काही ऐकायचं नसत... म्हणूनच एक गोष्ट स्पष्ट होती, ती म्हणजे लोकांची दारू पिणे सोडवणे शक्य नव्हत! पण हातभट्टीवरील दारू काढणे आणि विकणे मात्र बंद केल्या जाऊ शकले असते...
            डिसेंबर २०१४ ला मी ही कल्पना गावातील चार मित्रांसमोर मांडली. त्यांचा नकार नव्हता, पण त्यांना विश्वास नव्हता की हे आम्ही करू शकू. कारण गावातील महिलांनी दोनदा दारूबंदीचा प्रयत्न केला होता पण तो व्यर्थ ठरला... त्यामुळे आम्हाला हे काम वेगळ्या पद्धतीने करावे लागणार होते. मी पहिले गावातील दारू पिणारे व जुगार खेळणाऱ्यांची संख्या काढली. प्रत्येक घरातून महिन्याला किती रुपये खर्च होतात त्याचा लेखी डाटा तयार केला. पण त्या महिन्यात आम्ही त्याचे फार काही करू शकलो नाहीत.  
            जानेवारी मध्ये निर्माणचा पहिला कॅम्प झाला. माझ्यासारखे बरेच पागल मला तिथे भेटले. आणि खूप आत्मविश्वास आला. सगळ्यात प्रेरणादायी भेट म्हणजे संतोष गवळे (निर्माण २ चा संतोष आणि त्याची पत्नी जयश्री मन्याळी या त्यांच्या गावात राहून ग्रामसुधारणेचे काम करतात) यांची. त्यांच्याकडून खूप माहिती मीळाली. तेव्हा मला वाटायला लागल की मी हे दारूबंदीच काम करू शकतो आणि गावात गेल्या-गेल्या काम सुरु केल. मी माझ्या त्याच मित्रांना पुन्हा या विषयी बोललो. आम्ही जेमतेम सात मुले होतो. ते म्हणाले की, आपण सात जणच हे काम करण्यापेक्षा गावातील आणखी मुलांना विचारू... माझ्या गावाला पूर्ण फेरफटका मारायला पंधरा मिनटे लागतात, आम्ही असाच फेरफटका मारत मुलांना जमवू लागलो. पंधरा मिनिटांनी आमच्या सोबत ४१ मुले होती. म्हणजे ६०% घरातील कुणी-ना-कुणी होतेच. आम्ही निवेदन पत्र लिहिलं आणि सगळ्या गावाची भव्य मिटिंग घेतली, आणि त्यात आम्ही आमची बाजू मांडली. गावकऱ्यांनी होकार दिला, चार दिवसांची सवलत देऊन दारू पूर्णपणे बंद करण्याच आवाहन केल. आम्ही दहा मुलांची नावं गावच्या ग्रामसुरक्षा दलामध्ये दिली.
            आम्ही खूप खुश होतो कारण आमच्या मनासारखं सगळ झाल होत आणि खूप सहज रीतीने. पण आम्ही नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार केला नव्हता... त्याच कारण नंतर कळाल! आम्ही सगळी मुलं जेमतेम वीस-ते-बावीस वर्षांची. दारू काढणाऱ्या लोकांना असे वाटत होते की आम्ही काहीतरी पोरखेळ करत आहोत, ही मुले काय बंद करणार दारू, थोडे दिवस मागे लागतील आणि सोडून देतील.
            एक महिना जवळ-जवळ ६०ते ७० टक्के दारू बंद होती. पण हळू -हळू परिस्थिती हातातून सुटू लागली कारण दारू काढणारे परत लपून-छपून दारू काढू लागले. आम्ही पुन्हा एकदा पूर्ण गावाची सभा घेतली, पण या वेळी मात्र चित्र बदललेलं होत. लोक आमच्या विरोधात बोलू लागले, तुम्ही  शिक्षणाकडे लक्ष द्या, असे म्हणून आमचे मनोबल खचऊ लागले. आम्हा मुलांमध्ये एक-दोन खूप आक्रमक आहेत त्याना खूप राग आला व ते म्हणाले की आम्हाला ज्यांवर शक आहे त्याच्या घराची झडती घेणार. ते त्या लोकांच्या घराकडे धाऊ लागले. आणि नको होत तेच झाल, मुले त्यांच्या घरात घुसली नाहीत तरीही त्या माणसाने आम्हाला खूप घाण-घाण शिव्या घातल्या, आणि मला तर खूपच खराब शिव्या दिल्या, आणि म्हणू लागला की माझ्या घरातील साठ हजार रुपये चोरीला गेले अशी मी केस करणार. मुले घाबरली नाहीत कारण आम्ही काहीच चुकीच केल नव्हत. पण तो केस करणार मग काय करायचं हा प्रश्न पडला. पण आमच्या सुदैवानी तीन महिन्या अगोदर त्या माणसावर जंगलातील प्राणी मारण्यावरून केस झाली होती आणि तो पैसे देऊन सुटला होता, आम्हाला सगळ माहित होत म्हणून मी त्याच्या मुलाला जाऊन भेटलो व सांगितलं की बाबांना समजावून सांग नाहीतर आम्ही मागील केस रीओपेन करणार. आमच्यावर केस झाली नाही...
            पण एक गोष्ट मात्र कळाली की या प्रकारचे धोरण सुरु करणे सोपे असते पण ते टिकून ठेवणे खूप कठीण असते . ४०० लोकांच्या गावात जर हे काम करायला इतक्या अडचणी येत असतील तर पूर्ण जिल्हा दारूमुक्त ठेवणे, खरच खूप मोठ प्रश्नचिन्ह उभ राहात... आणि पूर्ण महाराष्ट्र दारू मुक्त करण्याचे स्वप्नच बघू नये अस वाटत... पण आव्हानांना घाबरतील ते तरुण कसले!” 

स्रोत: रवींद्र चुनारकर, chunarkarravi@gmail.com

4 comments: