'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday 31 December 2015

प्रत्यक्ष प्रश्नासोबत!

निर्माण ४ चा रंजन पांढरे सहा महिन्यांपूर्वी सर्च च्या व्यसनमुक्ती विभागासोबत ‘प्रोजेक्ट असोसिएट - तंबाखू व दारू नियंत्रण कार्यक्रम’ या कामासाठी रुजू झाला. शिक्षणाने सिव्हील इंजिनियर असलेल्या रंजनने त्याचे पोस्ट ग्रजुएशन ‘आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण व्यवस्थापन’ या विषयात केले. त्यानंतर पुढील करियर कसे निवडावे, काय काम करावे हा त्याचा प्रवास कसा झाला, या कामादरम्यान त्याला काय अनुभव आले याबद्दल रंजनच्याच शब्दात -

“सिव्हिल इंजीनियरींगचं शिक्षण झाल्यावर पुढे काय करायचं? पोस्ट ग्रजुएशन! आणि ते संपल्यानंतर देखील प्रश्न तोच आता पुढे काय? निर्माण मध्ये सतत आपण आपल्या जीवनाच्या अर्थावर भरभरून ऐकतो, बोलतो पण कृती मधे प्रत्यक्षात तो अर्थ शोधणे हे नक्कीच खूप कठीण असतं. पण यामधे मदतीला येणारा एक प्रश्न म्हणजे आपली गरज नेमकी कुठे आणि कोणाला आहे? आणि दुसरा प्रश्न, मला काय नाही करायचं? हे दोन प्रश्न नक्कीच मला माझा अर्थ शोधण्यात मदत करतात आणि याच शोधात येऊन पोहोचलो एका प्रश्नाच्या आणि त्याच्या उत्तराच्या गडचिरोलीला...
गेली सहा महिने मी सर्च, गडचिरोली येथे तंबाखू आणि दारू नियंत्रण कार्यक्रमात काम करतो आहे. गडचिरोली मधे तंबाखू आणि दारूची प्रचंड मोठी समस्या आहे, आणि या समस्येच मूळ आहे एका शब्दात तो म्हणजे ‘व्यसन’! गडचिरोली जिल्ह्यात वर्षाला सुमारे ३६० कोटींची दारू आणि तंबाखू विकली जाते असे सर्चने केलेल्या अभ्यासातून समोर आले. तंबाखू आणि दारूच्या प्रश्नावर काम करणे मोठे आवाहन आहे हे या आकडेवारीतून स्पष्ट होते. गडचिरोली जिह्यात १९९३ साली दारूबंदी झाली, मात्र स्थानिक ठिकाणी मोहापासून सहज दारू तयार होते आणि उपलब्ध असते तसच बंदीची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्यामुळे दारू मुबलक उपलब्ध असते. त्यातूनच व्यसनाधीनातेकडे पाउल आपोआप उचलले जाते.
दुसरे मोठे व्यसन म्हणजे तंबाखू. ती खर्र्याच्या स्वरूपात सर्वाधिक प्रमाणात पहावयास मिळते. सुगंधीत तंबाखू सुपारी एकत्र घोटून तयार केलेला पदार्थ म्हणजे खर्रा! इथे खर्रा हे स्वागताचे माध्यम आहे. प्रत्येकाने भेटून एकमेकांना खर्रा देणे ही मोठी परंपरा आहे. ही समस्या जवळून बघताना काही अनुभव शेअर करावेसे वाटले.
अगदी वयाच्या दुसऱ्या वर्षापासून लहान मुलांमध्ये तंबाखू किवा खर्रा खाण्याची सुरुवात होते. सकाळी दात घासताना नस, गुडाखुचा सहज वापर होताना लहान मूल आपल्या आईला बघत असतं, हेच काही खर्र्याच्या बाबतीत होतं, आणि हट्ट सुरु होतो. तू खातेस तर मला का नाही? किमान तीन वेळा निकोटीनचं सेवन केलं तर मेंदू आपल्याला निकोटीनची आठवण करून देतो असं शास्त्र म्हणत, त्यामुळे खर्रा लवकरच गरज बनते आणि तो खाल्ला की छान वाटत. आजूबाजूला आई, वडील, शिक्षक, सगळेच तंबाखू वापरत असतात, त्यामुळे ती सहज उपलब्धही असते. सध्या आम्ही शाळांमध्ये खर्रा-तंबाखू च्या वापरा विरोधी कार्यक्रम करतो आहे. एक राकेश नावाचा जि. प. शाळेचा ७वी चा विद्यार्थी; त्याच्याशी माझा झालेला संवाद मला या व्यासानाविषयी खूप काही शिकवून गेला.
मी : का खातोस रे खर्रा, तूला डॉक्टरने कॅन्सरची पूर्व लक्षणे असल्याचे सांगितलंय, तुझ तोंड त्यामुळे उघडत नाही...
राकेश : छान वाटते, मला नाही होत काही त्रास कॅन्सरचा  
मी : नको न खाऊ तू खर्रा, तुला कॅन्सर झाला नाही पाहिजे असं वाटते आम्हाला 
राकेश : माझी आई गेली १० वर्ष खाते आहे, नाही झाला तिला अजून
मी : अरे दिवसाला तू ५ वेळा खर्रा खातोस, मी काय करू म्हणजे तू खर्रा सोडशील
राकेश : कशाला भाऊ ? तुम्ही काही केलं तरी मी खर्रा सोडणार नाही आणि नाही केलं तरी मी सोडणार नाही!
या छोटाशा उदाहरणातून या व्यसनाची गंभीरता मला पहिल्यांदा जाणवली आणि नंतर ती मी आता रोजच बघत आहे. रोज एक नवीन कहाणी समोर असते. तंबाखू सेवनामुळे होणारा ‘ओरल सब्म्युकस फायब्रोसीस’ हा मुख्य आजार इथल्या शालेय मुलांमध्ये आढळतो. यामध्ये व्यक्तीचे तोंड हळूहळू उघडण बंद होते.    
इथल्या आश्रमशाळांमध्ये काम करताना शिक्षण संस्थांना आलेल्या निधीचा किती वापर प्रत्यक्ष कामात होत असेल या बद्दल खूप मोठे प्रश्न चिन्ह आहे. आरोग्य, आहार आणि शिक्षण तीनही बाबी सर्रास धुडकावल्या जातात. काही दिवसापूर्वी असाच एका १०वी च्या विद्यार्थिनीचा मलेरियाने मृत्यू झाला. त्यांना घालायला कपडे नाहीत, अन्न म्हणजे केवळ पाण्यातली भाजी आणि भात. मलेरिया, खरूज, डायरिया सारखे आजार मोठ्या प्रमाणावर आहेत. हे सगळ उघड्या डोळ्याने बघितल्यावर मन विषण्ण होतं. आपल्याकडे सगळ काही असत तरी आपल्याला प्रॉब्लेम असतात, इथे काहीच नाही, ही जाणीव माझ्यासाठी खूप शिकवण देणारी ठरते आणि पाय जमिनीवर ठेवणारी...
थोडं दारू विषयी -                
ग्रामीण भागांमध्ये दारू पिण्याचे खूप मोठे प्रमाण आहे. मोहाची किवा खोपडीची दारू स्थानिक ठिकाणी तयार होते आणि सहज उपलब्ध असते. युवांमध्ये याचे मोठे प्रमाण आढळते. गावामधले अनुभव वेगवेगळे असतात. म्हणजे गावात दारू बंदी करण्याच्या सभेत दारुडे येउन गोंधळ करणे असो, गावातील सरपंच किंवा इतर पदाधिकाऱ्यांचा (स्वतःची) दारूची भट्टी असल्यामुळे बंदीला होणारा विरोध असो. हा कायमच एक संघर्षाचा क्षण असतो. पण अशा वेळेस महिला पाठींबा देण्यास तयार होतात. कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीचा सर्वात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तो घरातील, गावातील महिलांना. त्यामुळे त्यांचा या विषयाला सकारात्मक पाठींबा असतो. दारूमुळे होणारे आजार असो, की दारुड्या नवऱ्याने पत्नीला केलेली अमानुष मारहाण असो, की प्रचंड आर्थिक नुकसान! यातील कुठलेही घटक कधीच स्वीकार केले जाऊ शकत नाहीत. महिला या समस्येने प्रचंड त्रस्त आहेत. दारू विकणे हे अनेकांचे उत्पन्नाचे साधन असते. मग अशा वेळेस त्यांना दारूमुक्तीसाठी हे बंद करा म्हणताना, रोजगाराचं काय? असा प्रश्न नक्कीच ते विचारतात आणि तेव्हा निरुत्तर व्हायला होत.

सहा महिन्यांमधे माझ्यासाठी महत्वाची शिकवण म्हणजे संवाद, टीमचे व्यवस्थापन, कार्यक्रम व्यवस्थापन, कार्यक्रमाची रचना, धोरणं आणि केलेल्या कामाचे परिणाम आणि मोजमाप. सार्वजनिक आरोग्य आणि संशोधन क्षेत्रात सर्वात गरजेच्या अशा या गोष्टी. कामासोबत गडचिरोली आणि इथले निसर्ग सौंदर्य, डोंगर, नद्या, आणि त्यांच्यासोबत आमचा प्रवास हा खूप सुखावणारा आणि कधीही न थकवणारा असतो. दिल्ली अभी दूर है असे म्हणायला काही हरकत नाही, पण आनंद आहे की माझी सुरवात झाली आहे या प्रवासाला, शोधाला!”

स्रोत: रंजन पांढरे, pandhare.ranjan33@gmail.com

No comments:

Post a Comment