'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 31 December 2015

वेताळाच्या आरोग्यकथा

लेखक - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

डॉक्टर होताना वैद्यकीय अभ्यासक्रमातील पाच वर्षात शिकलेल्या औषधशास्त्राचे वास्तविक जीवनातलं स्वरूप ‘वेताळाच्या आरोग्यकथा’ हे पुस्तक वाचताना उलगडत गेलं. वाचून सज्ञान झाल्यासारखं वाटलं.
नायनांची (डॉ. अभय बंग) प्रस्तावना लाभलेल्या या पुस्तकातला मसुदा विक्रम-वेताळ संवाद रूपाने मांडला आहे; ज्यात वेताळ विक्रमादित्याला त्याच्या राज्यात चालणाऱ्या घडामोडींविषयी डिवचत राहतो आणि संवादातील विषयांवरून राजाचे भान हरपाल्यावर पुह्ना झाडावर जाऊन लटकतो आणि राजाचा प्रवास सुरु होतो पुन्हा पूर्वीपासून. त्यामुळे वाचताना असे वाटते, जणू हा पुस्तकरुपी वेताळ आपल्यातील विक्रमादित्याच्या पाठीवर बसला आहे आणि विचारतोय ‘राजा, काय चाललंय तुझ्या राज्यात?’ वेताळाची प्रश्न विचारातानाची गम्मत आणि त्यातून उलगडलेलं गंभीर वास्तव वाचाणाराची रुची टिकवून ठेवते. लेखकाने पुस्तक लिहिताना वाचकांच्या मानसशास्त्रीय बाजूचा विचार केल्याचे जाणवते. पुस्तकाची मांडणी करताना त्यांनी आपल्या आजूबाजूच्या समाजात सुरु असणाऱ्या वाईट वृत्ती, प्रवृत्ती व घटनांवर बोट ठेवले आहेच पण ते करत असताना सध्या चालू असलेल्या, नव्याने करता येऊ शकणाऱ्या सकारात्मक गोष्टींही मांडल्या आहेत.
उदाहरण घेणे झाल्यास, सर्दी पडसे हा जगातील सर्वात जास्त होणारा पण साधारणतः निरुपद्रवी आजार! ज्या अनेक व्हायरसमुळे तो होतो त्या व्हायरसवर उपाय नाही. उपचार केला तर सात दिवसात आणि न केला तर आठवड्याभरात दुरुस्त होणारा असा हा रोग आहे. पण त्या काळात रुग्णाला बरेच अस्वस्थ वाटत असल्याने काहीतरी आराम हवासा वाटतो. या गरजेला आधार करून सर्दी पडशावर हमखास उपाय म्हणून हजारो औषधे बाजारात विकली जातात. वस्तुतः त्यापैकी एकानेही सर्दीचा जन्तुदोष कमी होत नाही. फक्त काही लक्षणं तात्पुरती कमी होतात. पण (ही) लक्षणे कमी करणारे असे प्रत्येक औषध कोणत्या न कोणत्या दुष्परिणामांना कारणीभूत ठरत असते. सर्दी पडशावरील औषधांमागील हे वैज्ञानिक सत्य वेताळ राजाला (वाचकाला) विस्तृतपणे सांगतो.
अजून सांगायचे झाल्यास, दोन लाख मुलांवरील प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळले की, बाळाला उपचारासाठी देण्यात येणाऱ्या Paracetamol (Crocin, Metacin, Calpol, etc.) या औषधांमुळे भविष्यात दमा होण्याचा धोका ४६ टक्क्यांनी वाढतो. हगवणीचा त्रास हा दुसरा सामान्य आजार. त्यावर बाजारात विकले जाणारे लोमोटील हे औषध पोटातली हगवण कमी करत नाही तर ती पोटात साठवते. त्यामुळे उलटपक्षी जन्तुदोष होण्याचा धोका वाढतो. म्हणून हगवणीसाठी लोमोटील सारखी औषधे वापरू नयेत असा सल्ला जागतिक आरोग्य संघटना देत असतानाही औषध कंपन्या ते उत्पादित करतात, डॉक्टर मंडळी प्रिस्क्राईब करतात व फार्मासिस्ट मंडळी विकतात.
लेखकाने वैज्ञानिक माहिती व बाजारू फसवणूक या दोन्हींवर प्रकाश पडल्याने रुग्ण स्वस्थ व सुद्न्य होऊ शकतील. याचा अर्थ स्वतःचा औषधोपचार त्यांनी स्वतः करावा असे नाही पण त्यासोबत काय घडते आहे व काय घडू शकते हे समजावून घेणे आवश्यक आहे. पुस्तकात अशा रोजच्या जीवनातील विविध आजारांची व औषधांची उदाहरणे घेऊन त्यांच्या मागचं रोगविज्ञान, औषधशास्त्र व फसवणूक हे तीनही उलगडून सांगितले आहेत. त्यात कान साफ करायच्या कानकाळ्या (ज्यांच्या डब्याखाली सूक्ष्म अक्षरात लिहून असते की ‘सावधान, या कानात घातल्याने इजा होऊ शकते.’), त्वचेचा रंग गोरा करण्याचे वेड पसरवणाऱ्या ब्लिचिंग क्रीम्स (फेअर अँड लव्हली), टॉनिक्स, हर्बल नावाने विकली जाणारी औषधे, इंजेक्शन बाबत अंधश्रद्धा व मागणी अशा अनेक गोष्टींचे विश्लेषण केले आहे. अज्ञान्यांची फसवणूक अशा किती तरी प्रकारे केली जाते...
त्याचबरोबर रुग्णांच्या न्याय्य हक्कासाठी लढाई देणारे पी. सी. सिंधी, बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या एकाधिकार शाहीला आव्हान देऊन बांगलादेशमध्ये स्वदेशी गण फार्मसी सुरु करणारे व नंतर राष्ट्रीय वैद्यकीय नीतीत बदल घडवणारे डॉ. झफरुल्ला चौधरी, औषधाच्या ब्रांडच्या  नावाखाली दुप्पट तिप्पट किमती द्याव्या लागू नयेत म्हणून गुजराथ मध्ये चालवलेला ‘लो कॉस्ट’ नावाचा स्वयंसेवी प्रयोग, रिव्हर्स फार्माकोलोजी पद्धतीने आयुर्वेदिक औषधांमधील गुणकारी सत्याचा शोध घेणारे डॉ. अशोक वैद्य, व श्री. वैद्य अंतरकर अशी सकारात्मक कृती-शिलतेची काही उत्तम उदाहरणेही या पुस्तकात आहेत. 
अज्ञान हा बचाव होऊ शकत नाही. म्हणून आपण खात असलेल्या औषधांमागील विज्ञान, राजकारण, फसवणूक व त्यावरील उपाय या सर्वांचा शोध घेण्यास मदत करणारे हे पुस्तक रुग्णांनी, त्यांची काळजी घेणार्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि डॉक्टरांनी देखील वाचाव अस आहे.

स्रोत: सुरज म्हस्के, surajrmhaske@gmail.com

No comments:

Post a Comment