'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Sunday, 28 February 2016

ये रे ये रे पावसा...

"सातपुड्याच्या खोऱ्यात एक बायगन बुआ नावाचं ठिकाण आहे. तेथे महादेवाचं मंदिर आहे. श्रावण सोमवाराला तिथे लोकांची गर्दी असते.
            २४ ऑगस्ट २०१५ ला श्रावण सोमवार होता. मी जळगावच्या काही मंडळी बरोबर तिथे फिरायला गेलो होतो. पहाडातून वाहत येणाऱ्या नाल्याच्या बाजूला आम्ही सर्व बसलो होतो. तेवढ्यात एक आदिवासी मुलगा स्वतःची गुरं व बकऱ्या घेऊन आला. गुरं व बकऱ्यांनी नाल्यातील पाणी प्यायला सुरुवात केली. आमच्या सर्पमित्र शरद दादांनी त्या मुलाला विचारले, “तू कोणत्या गावचा आहेस?”
            “याच गावचा आहे दादा.” त्या मुलाने उत्तर दिले.
            “बकऱ्यांना नेहमी इथेच पाणी पाजतो का?”
            “जानेवरी लोग अठीच पाणी असते दादा. त्याबाद हा नाला सुकते. अन मंग चार किलोमीटर दूर जा लागते ढोरं घेऊन पाण्यासाठी.”
            शरद दादा आमच्याकडे पाहून म्हणाले, “इथे बंधारा बांधायचा, तीन फूटाचा.”
            ही कल्पना घेऊन आम्ही पुढच्या श्रावण सोमवारी तयारीने तिथे पोहोचलो. नाल्याच्या टर्निंग पोइंटची जागा निवडली जेणे करून पाणी डायरेक्ट बंधाऱ्याला आदळनार नाही. श्रमदानाचे पोस्टर लावून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मदतीस प्रवृत्त केलं. पाच तासात तीन फूटाचा बंधारा तयार झाला. पुढच्या सोमवारी येऊन याला आणखी मजबूत करायचं असं सर्वांनी ठरवलं.
            ७ सप्तेंबरला आम्ही पोरं परत तिथे पोहचलो. बंधाऱ्याला खुपसारी दगड लावलीत. लिकेज थांबवण्यासाठी कितीतरी टोपले माती आतल्या बाजूने टाकली.
आता हे पाणी एप्रिल महिन्यालोग राहीन असा अनुमान आय.” एक आदिवासी म्हातारा माणूस बोलला.
            नंतर फेब्रुवारी मध्ये आम्ही बंधारा बघायला गेलो. तिथे काहीच पाणी नव्हतं. जमिनीत ओलावा होता. आदिवासी मुलासोबत बोलल्यानंतर असा माहित पडले की बंधारा बांधल्यानंतर पाऊस पडलाच नाही. दर वर्षी जानेवारी पर्यंत नाला वाहायचा पण या वर्षी ऑक्टोबर मधेच नल्याचं वाहणं थांबलं. सूर्याच्या प्रकोपाने बंधाऱ्यात साठवलेलं पाणी संपलं. यावर्षीसुद्धा आदिवासींची जनावरं जानेवरीपर्यंतच पाणी पेऊ शकले.
            नंतर मी माझ्या गावातली टयूब वेल्सची स्थिती बघितली. २००५ साली ५० फूटावर लागणारं पाणी आता ८० फूटावर लागते. मागच्या १० वर्षात शेतकऱ्यांनी कितीतरी बोर वेल्स बनवल्या. या दराने जर शेतकऱ्याने पाणी उपसलं आणि पावसाने पाठ फिरवली तर...?
            मी सुभाष पाळेकर यांच्या विकसित नैसर्गिक पद्धतीने शेती करायचं ठरवलं आहे. पण बिना पाण्याची शेती कशी करायची? मराठवाड्यासारखी भीषण परिस्थिती माझ्या गावात उद्भवणार का? आणि असा झाल्यास मी काय करू शकतो? हे तीन प्रश्नांनी माझ्या डोक्यात घर करून बसलेत.”

स्रोत: प्रतीक उंबरकर (निर्माण ६),  pratik.umbarkar8@gmail.com

No comments:

Post a Comment