पर्यावरणाच्या, परिसंस्थेच्या मूलभूत संकल्पना शाळेच्या मुलांना कृतीतून
कशा समजतील? या प्रश्नातून अमृता प्रधान (निर्माण २) च्या मनात Earth Connect ही कल्पना सकारात होती. जानेवारी, २०१६ मध्ये या विषयाची पहिली कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या
नियोजनात सक्रीय हातभार लावलेल्या ईशा घुगरी (निर्माण ६)
च्या शब्दात या कार्यशाळेविषयी थोडेसे...
“अमृताशी भेट झाल्यावर तिने Earth Connect ची कल्पना मला सांगितली. मी मुलांबरोबर खूप कमी वेळा काम केले आहे. त्यामुळे मला
ती कल्पना खूप interesting, पण त्याच बरोबर आव्हानात्मक देखील
वाटली. डिसेंबर मध्ये आमचे बोलणे झाल्यावर आम्ही लगेचच कामाला
लागलो. दोघींमध्ये विषयांची विभागणी केली आणि आपापल्या कामाला
सुरुवात केली.
१२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी आखलेल्या या उपक्रमात पर्यावरणाच्या,
परिसंस्थेच्या मूलभूत संकल्पना मुलांना कृतीतून कशा समजतील ह्यावर आमचा
भर होता. त्यासाठी आम्ही अनेक खेळ, अनेक
कृती तयार केल्या. Terrarium- एक बाटलीबंद पृथ्वी ही संकल्पना
मुलांना कृतीतून दाखवावी आणि मुलांनी ती स्वत: करून त्यातून शिकावे
असे आम्हाला वाटत होते. बायोगॅस हा प्रकल्प फक्त ग्रामीण भागात
नाही तर शहरी भागातही करता येतो, कचऱ्याची विल्हेवाट कशी लाववी
हे सर्व मुलांना समजणे महत्वाचे आहे असं वाटलं. तसेच कचरा वेचताना
कचरा वेचकांना किती त्रास होतो ह्याचाही अनुभव मुलांना मिळायला हवा, असं वाटलं.
३ जानेवारीला सहा मुले आली आणि सत्रे सुरू झाली. पर्यावरण
म्हणजे काय, त्याचे घटक कोणते, माणूस हा
पर्यावरणाचा कसा भाग आहे, अशा विविध प्रश्नांची उत्तरे मुलांना
खेळातूनच मिळू लागली. धनंजय मुळीने खूप सुंदर असे David
Attenborough ह्यांचे लघुपट दाखवले. ते बघताना
मुले हरखून गेली होती. निसर्गातील गोष्टी कशा घडत गेल्या ह्यावर
चर्चाही झाली. श्रीमती वृशाली गंभीर ह्यांनी Terrarium
खूपच सुंदर पध्दतीने घेतले. मुलांनी ते तयार करताना
वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणाची माहिती घेतली. आपल्या जवळ एक
बाटलीबंद पृथ्वी आहे ह्या आनंदात मुले घरी परतली.
कचरा ही अतिशय गंभीर समस्या आहे हे मुलांनी डोळ्यांनी पहावे ह्या उद्देशाने
१० जानेवारी रोजी आम्ही त्यांना पुणे-सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट
येथे घेऊन गेलो. तिथे जाऊन स्थलांतरीत पक्षी म्हणजे काय,
त्यांच्या शरीरात कोणते बदल झालेले असतात, कचरा
म्हणजे काय, त्याचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो अशा सर्व गोष्टींची
माहिती मुलांना पक्षी दाखवून तसेच त्यांच्याबरोबर चर्चा करुन दिली गेली. तेथील थोडा कचरा गोळा करुन कवडीपाटची भेट संपली. त्यानंतर
टेरेस गार्डनिंग, बायोगॅस, गांडूळखत प्रकल्प,
the story of stuff, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आणि १० जानेवारीचा
दिवस संपला.
मुलांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून असे समजले की कवडीपाटवरील कृती आणि Terrarium
ह्या दोन गोष्टी त्यांना सर्वात जास्त आवडल्या. ह्या संपूर्ण उपक्रमातून मॅनेजमेंट कशी असावी, एखाद्या
विषयाची माहिती देताना किंवा एखादे सत्र घेताना ते अजून प्रभावीपणे कसे घेता येईल हे
मी शिकले. यात कामात प्रियदर्शन, भक्ती,
धनंजय, अमृता, वेदवती,
गीता, सायली, सनत,
श्वेता आणि गजानन ह्यांची खूप मदत झाली!
सध्या आम्ही पुढचे Earth Connect घेण्याची तयारी करीत
आहोत...”
No comments:
Post a Comment