'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 27 October 2016

मुक्कामपोस्ट मन्नेराजाराम

निर्माण ५ चा डॉक्टर दिग्विजय बंडगर एप्रिल २०१६ पासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. सोलापूर GMC मधून MBBS चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने MOship करायचा निर्णय घेतला आणि गडचिरोली जिल्ह्यात काम करायचे ठरवले. तिथे काम करताना त्याला आलेला अनुभव त्याच्याच शब्दात...

                        मी कुणी लेखक नाही, लेख लिहिण्यासाठी आवश्यक शब्दसंग्रह माझ्याकडे नाही पण अनेक अनुभव असे आले की ते सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे वाटले म्हणून लिहित आहे. या लेखातून बघा मी किती काम करतो!हे सांगायचा माझा उद्देश नाही. परिस्थितीची जाणीव करून देणे हाच मी याचा उद्देश ठेवला आहे.
            गेले सात महिने मी महाराष्ट्राच्या अतिदुर्गम भागात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत आहे. मन्नेराजाराम गावी असलेल्या या PHC मध्ये पवन मिल्खे (निर्माण ३) याने देखील काम केले आहे. त्या गावाला जाणारा १८ किमी चा रस्ता खूपच खराब असल्याने तो पार करून मोठ्या इस्पितळात गंभीर रुग्णाला पाठवायला देखील एक-दीड तास लागतो. या रस्त्यामुळे गेल्या ६ महिन्यात दगावलेल्या रुग्णांची संख्या १० इतकी आहे. त्यात दोन सर्पदंश झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. रस्ता खराब असल्याने व कमाई कमी होत असल्याने तिथे गेली ६ महिने बस सेवा देखील बंद होती. गावकऱ्यांनी प्रयत्न करून गेल्या महिन्यात ती सुरु करून घेतली. (बघू किती दिवस चालते!)
            नैसर्गिक सौंदर्याचं मात्र या भागाला वरदान लाभलं आहे. अनेक नदी नाले, झाडे, खूप जास्त पाऊस आणि खूप जास्त धुकं! पण कनेक्टीव्हिटीचा खूपच त्रास आहे. फोनला रेंज नाही, लाईट कधी कधी असते. सरकारी आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांचं प्रचंड दुर्लक्ष! ६ किमी वर छत्तीसगडचा बस्तरचा भाग! त्या भागातूनही पेशंट इकडे येतात. त्यांना येताना इंद्रावती नावाची नदी लागते. उन्हाळ्यात पाणी नसेल चालत व पाणी असेल तर डोंग्यानं (छोटी नाव) ते  येतात. छत्तीसगडच्या या भागातील एका महिलेची गोष्ट सांगतो.
            एक छत्तीसगडची महिला, नऊ महिने गरोदर, कळा चालू झाल्याने प्रसूतीसाठी आमच्याकडे यायला निघाली. ती १० किमी अंतरावर असलेल्या नदीपलीकडच्या भागातील होती. बैलगाडीने ती नदी पर्यंत पोहोचली पण नदीत रेती असल्याने बैलगाडी पुढे जात नव्हती. तर तिची मैत्रीण तिचा नवरा पायीच नदी पार करू लागले. उन्हाळा असल्याने रेती खूप गरम होती आणि पायदेखील नदीत खचत होते. नदीच्या मध्यावर आल्यावर तिच्या कळा वाढल्या आणि उभ्या उभ्याच तिची प्रसूती झाली. त्या गरम वाळूवर तिचं नवजात अर्भक पडलं. त्याची पाठ पोळली, रेती चिकटली. त्यांनी केस बांधून, साडीच सुत काढून नाळ बांधली व दगडाने ठेचून ती तोडली. नाळ व वार (placenta) पडू न देता तिला घेऊन माझ्याकडे पोहोचले.
रक्तस्त्राव झाल्याने बाळ माझ्याकडे येण्याआधीच मरण पावलं होत आणि वारचा काही भाग आतमध्ये राहिल्याने बाईचा देखील खूप रक्तस्राव झाला होता (PPH). त्या बाईला मग RL (सलाईन) लावून शुद्धीवर आणलं. (जवळपास ६ बॉटल RL लावलं) रक्ताची उपलब्धता नव्हती. लोकबिरादरीतही रक्ताची सोय नव्हती. तिला ३ तास अंतरावर असलेल्या अहेरीच्या रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय झाला. PPH व्यवस्थापन केलं. (oxytocin, methorgin, ballon catheterization etc). आणि मृतबाळ तिथेच दफन करून ते PHC च्या गाडीने अहेरीच्या रुग्णालयात गेले. कनेक्टीव्हिटी नसल्याने तिचा followup नाही घेता आला.
प्रगत महाराष्ट्रात आणि महासत्ता होण्याची स्वप्न बघणाऱ्या भारतात ही अशी दयनीय अवस्था. त्या दिवशी सगळ्यांचाच खूप राग आला. पण काय करणार?
एक दिवशी OPD मध्ये बसलो असताना एक बाई कानाला लेपड लावून, हाताला intercath लावून व हातात अहेरीच्या रुग्णालयाच कार्ड घेऊन आली. ती तीच छत्तीसगडची बाई होती. ती गोळ्या इंजेक्शन घ्यायला आली होती. ती वाचल्याचा मला इतका आनंद झाला, मी OPD मध्ये आनंदाने उडीच मारली. सिस्टर, पेशंट माझ्याकडे बघत राहिले!
त्या दिवशी मी होतो म्हणून किमान त्या बाईचे तरी प्राण वाचू शकले. पण हे असं किती दिवस सुरु राहणार? आरोग्याचा मुलभूत हक्क यांना कधी मिळणार? या लोकांना चांगली आरोग्यसेवा पुरवण्यासोबतच शासनाने यांच्यापर्यंत पोहोचायला हवे यासाठी तालुका व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपुढे ही परिस्थिती मांडत राहणे व त्यांना प्रश्न विचारात राहायला पाहिजे, याची मात्र मला प्रकर्षाने जाणीव झाली.
दिग्विजय बंडगर (निर्माण ५)

No comments:

Post a Comment