'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 9 July 2018

नमस्कार मित्रमैत्रिणींनो,

कसे आहात? पाऊस सुरु आहे ना?
शोधग्राममध्ये नुकताच पाऊस सुरु झालाय. उन्हाळ्यात भकास झालेली जमीन आता अंकुर धरू लागली आहे. सर्वत्र हिरवा रंग पसरायला सुरुवात झाली आहे. तर कुठे वृद्ध अजस्त्र वृक्ष मातीच्या ओलाव्यातून मुळे निसटून कोसळत आहे. जणू काही त्यांची उंची मुळांना झेपलीच नाही.
काही दिवसांपूर्वी असाच एक अजस्त्र वृक्ष कोसळला – दादाजी खोब्रागडे. त्यांची उंची कदाचित आपल्या समाजाला कधीच झेपली नाही. दादाजींचं शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंतच, कदाचित समाज त्यांना शास्त्रज्ञ म्हणून ओळखलतही नसेल, पण दादाजींनी संशोधन केलेले तांदळाचे वाण आज घरोघरी वापरल्या जात आहे. दादाजींना काही दिवसांपूर्वी लकाव्याचे झटके आले होते, उपचारार्थ त्यांना नागपूरला हलवण्यात आले. पण शरीर उपचाराला साथ देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. दादाजींचा मृत्यू सुकर आणि सन्मानाने व्हावा म्हणून म्हणून शेवटचे दोन दिवस त्यांना शोधग्राममध्ये आणण्यात आले होते. हॉस्पिटलच्या चमूने त्यांची मनापासून सेवा केली. अखेर मां दंतेश्वरी दवाखान्यात ३ जूनला दादाजी काळाच्या पडद्याआड गेले.
निर्माण परिवाराकडून दादाजींना भावपूर्ण श्रद्धांजली.

समाजसेवकांचं अंतिम पर्व सन्मानाचं व्हावं...
सोमवारी, ४ जून रोजी दुपारी २ वाजता दादाजी खोब्रागडे यांच्या देहाला शोधग्राममधील कार्यकर्त्यांनी अंतिम निरोप दिला. प्रार्थना म्हणण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं शव त्यांच्या मूळ गावी नागभिड तालुक्यातील नांदेडला पाठवण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी नागपूरवरून त्यांना शोधग्राममधील दवाखान्यात बेशुद्धावस्थेत आणण्यात आलं होतं. त्यांचा मुलगा आणि नातू हेदेखील त्यांच्यासोबत होते. महिनाभरात त्यांना लकव्याचे तीन झटके येऊन गेले होते. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधील बातमीनंतर त्यांना नागपूरला चांगल्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण पुढे उपचार शक्य नाही हे कळून चुकल्यावर त्यांचा अंतिम काळ काढण्यासाठी त्यांच्या घरचे दादाजींना शोधग्राममध्ये घेऊन आले. इथं त्यांना दखल करून घेतलं. याचं कारण होतं, अंतिम मानवाधिकार. ‘डेथ विथ डिग्निटी’. सन्मानानं माणसाला मरता आलं पाहिजे. मृत्यूच्या वेळी तरी शरीराची विटंबना होऊ नये. त्यामुळे जोपर्यंत शक्य आहे, तोपर्यंत त्याची सेवा करायची आणि त्याला सन्मानानं अखेरच्या श्वासापर्यंत जगू द्यायचं. शोधग्राममध्ये त्यांना दाखल केल्यावर येथील डॉक्टरांच्या संपूर्ण टीमनं शेवटचा क्षण येईपर्यंत अतिशय मनोभावे त्यांची सेवा केली.

दादाजींनी धानाच्या संशोधनात भरपूर काम केलं आहे आणि सर्वांना आता ते माहीत आहे. पण आमचं आणि दादाजींचं एक नातं होतं. हे म्हणजे संशोधकाचं. ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नावर गेली तीस वर्षं आम्ही गडचिरोलीमध्ये संशोधन करत आहोत. ग्रामीण जनतेचं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. दादाजींनी स्वतःच्या प्रतिभेनं आणि निरीक्षणानं धानाचे नवनवे वाण शोधून काढले. हे एक अद्वितीय संशोधन होतं. आज लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. आपण आज जो उच्च प्रतीचा तांदूळ खातो, यात दादाजींचं खूप मोठं योगदान आहे. पण संशोधनाच्या बाबतीत ते आमचेही गुरू होते. वयानं १२ वर्ष ज्येष्ठ होते. आमच्या संशोधनाला विज्ञानाच्या उच्च शिक्षणाचं, तंत्रज्ञानाचं पाठबळ आहे. पण दादाजींना असं कुठलंच पाठबळ नव्हतं. ते हाडाचे शेतकरी होते. शिक्षण केवळ तिसरीपर्यंत. पण केवळ आपली निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या जोरावर दादाजींनी तांदळाचे नऊ वेगवेगळे वाण (एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके टू) विकसित केले. त्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला आम्ही सलाम करतो.
एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करावासा वाटतो. प्रकाशझोतात आणि प्रतिष्ठेचं वलय असलेल्या समाजसेवकांना ही अडचण येणार नाही, पण जे निर्धन आहेत, साधनहीन आहेत, खेड्यात राहून निरपेक्ष सेवा करतात, अशा समाजसेवकांची मोठी पिढी आता वृद्ध झाली आहे. ज्या काळात त्यांनी समाजसेवा सुरू केली, तेव्हा या क्षेत्रात ‘प्रतिष्ठा’ असा शब्द प्रचलित नव्हता. त्यांनी कधीही धन गोळा केलं नाही. कधी समाजसेवेचा प्रचारही केला नाही. दादाजी खोब्रागडे यांनी तर धानाच्या वाणाचं कधी पेटंटदेखील घेतलं नाही.
असे अनेक समाजसेवक आज वृद्ध झाले आहेत. त्यांच्या अंतिम पर्वाची सोय आपला समाज कशी करणार आहे? त्यांच्या अन्नपाण्याची सोय हा प्रश्न तर आहेच, पण आजारपणाची सोय हा कळीचा मुद्दा ठरतो. कधीतरी वर्तमानपत्राद्वारे एखाद्याची शोकांतिका प्रगट होते आणि समाजाचं लक्ष अचानक वेधलं जातं. पण अशी शोकांतिका प्रगट होणं किंवा एखाद्या समाजसेवकाला तशी मागणी करावी लागणं, हे आपल्या समाजाला शोभत नाही. त्यामुळे एक प्रगत राज्य आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्रानं, अशा प्रकारच्या साधनहीन समाजसेवकांचं अंतिम पर्व समाधानानं जावं, त्यांना योग्य ती सेवा मिळावी यासाठी एक व्यापक व्यवस्था उभी केली पाहिजे. समाज आणि शासन दोघांची ही जबाबदारी आहे. दादाजी खोब्रागडे यांच्या अंतिम पर्वाच्या निमित्तानं हा प्रश्न आपल्या दारी आज दत्त म्हणून उभा आहे. जो सोडवणं आपली जबाबदारी आहे.
- डॉ. अभय बंग

आमचं संशोधकाचं नातं होतं – डॉ. अभय बंग - https://www.youtube.com/watch?v=7gLqk2e2as8


निर्माण ८.२ अ शिबीर
निर्माण ८ च्या शिबीर मालिकेतील बिगर-वैद्यकीय चमूचे दुसरे शिबीर २३ जून ते १ जुलै शोधग्राम येथे नुकतेच पार पडले. शेती, अभियांत्रिकी, विज्ञान, कला, पत्रकारिता, वाणिज्य अशा विविध ज्ञानशाखांतून आलेल्या ४१ शिबिर्थ्यांनी आपआपल्या जीवनात कशाप्रकारे सामाजिक बदलाला हातभार लावतील, यावर विचारमंथन केले.
·       सामाजिक काम करण्याच्या इच्छेचे निर्णयात रुपांतर करणे.
·       सामाजिक कृती करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास निर्माण करणे.
·       सामाजिक प्रश्न सोडवण्याचे विविध अप्रोच आणि पद्धती समजून घेणे.
·        सामाजिक बदलाच्या विविध केस स्टडीजचा अभ्यास करणे.
·       सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या रोल मोडल्सशी संवाद साधणे.
·        आपल्या भवतालाबाहेरच्या सामाजिक-राजकीय-आर्थिक स्वरूपाचे प्रश्न समजणे.
ही शिबिराची मुख्य उद्दिष्टे होती.
            नेहमीप्रमाणे मागील ६ महिन्यांचा शिबिरार्थ्यांचा अनुभव कसा राहिला, काय कृती केली, काय वाचलं, काही नवीन सापडलं, काय अडचणी आल्या, काही नवे प्रश्न पडले याबद्दल सर्वजण बोलत होते. शिबिरात अम्मांनी स्त्री प्रजनन अंग आणि मासिक पाळी याबद्दल मांडणी केली. माणसाच्या मुलभूत प्रेरणा कुठल्या, माहितीचा अधिकार वापरून काय बदल घडवून आणता येऊ शकतो आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचे वेगवेगळे पर्याय याबद्दल अमृतने मांडणी केली. सामाजिक प्रश्न मोजायचा कसा आणि सामाजिक कामात डेटाची उपयुक्तता योगेश दादाने अधोरेखित केली. २००८ साली आलेल्या जागतिक मंदीने माणसासमोर मोठे प्रश्न उपस्थित केले, म्हणून जागतिक अर्थव्यवस्था कशी चालते याबद्दल सुनील काकांनी मार्गदर्शन केले. प्रतिक उंबरकर (निर्माण ६) याने स्थलांतराचा प्रश्न आणि तो करत असलेले काम याबद्दल शिबिरार्थ्यांशी बोलला. नायनांनीही प्रश्नोत्तरीच्या स्वरुपात शिबिरार्थ्यांशी गप्पा मारल्या.

शिबिरात अर्थातच काही उत्कृष्ट पुस्तके सादर झाली. ‘मुंबई-दिल्लीत आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ असं ठणकावून सांगणाऱ्या मेंढा (लेखा) या गावात जाऊन देवाजी तोफा या आदिवासी नेत्याशी गप्पा मारल्या. सामुहिक वनहक्क मिळवण्याचा लढा ते ग्रामस्वराज्य हे चर्चेचे विषय होते. बालमृत्यू रोखण्यासाठी गडचिरोलीत झालेला क्रांतिकारी प्रयोग – एचबीएनसी – आनंद दादाने समजावून सांगितला. क्वेस्ट, पालघर या संस्थेचे प्रमुख निलेश निमकर यांनी भारताच्या शिक्षणाची दशा आणि दिशा याबद्दल थोडक्यात मांडणी केली. एकेदिवशी शिबिरात विवेक सावंतांनी शिबिरार्थ्याशी प्रश्नोत्तरी केली. अशा विविध वैचारिक व्यंजनांची मेजवानी असलेले निर्माण ८.२ अ चे शिबीर पार पडले.
            अर्थपूर्णतेच्या शोधात निघालेल्या सर्व शिबिरार्थ्यांना शुभेच्छा!

कुमार निर्माणची कार्यशाळा संपन्न
शालेय वयीन मुला-मुलींनी समाजातील विविध घटकांशी संवाद साधावा, परिसरातील प्रश्न बघावे, त्या प्रश्नांवर कृतीच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करावा आणि हे सगळं करत असताना समाजाच्या प्रयोगशाळेत मानवतेची मूल्य त्यांच्यात खोलवर रुजावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कुमार निर्माणच्या निमंत्रकांचं दुसरं शिबीर मे महिन्यात जळगाव आणि पुणे येथे पार पडलं. दोन्ही ठिकाणी मिळून ८० निमंत्रक या दोन दिवसीय शिबिरास  उपस्थित होते.कुमार निर्माणचं पाचवं सत्र जानेवारी २०१८ पासून सुरु झालं आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या अडचणी सोडवणे आणि मुलांसोबत काम करताना जरुरी अशी कौशल्ये व माहिती प्रदान करणे हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते. मे महिन्यातील रखरखत्या उन्हात शिबीर असून देखील निमंत्रकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
शिबिरात ‘वयात येतानाचे अवघड प्रश्न’ याविषयी श्रीमती शुभदा जोशी यांनी सत्र घेतले. कुमार निर्माण आणि शालेय पाठ्यपुस्तके यांची सांगड कशी घालता येईल याविषयी सायली तामणे हिने मांडणी केली. पाठ्यपुस्तक निर्मितीच्या कामात सहभागी असल्याने सायलीने पाठ्यपुस्तक निर्मितीची प्रक्रिया देखील थोडक्यात सांगितली. याशिवाय ‘कुमार निर्माण’, ‘कल्पक बनूया’, ‘Fact-Fiction-Fantasy’ ही सत्रे प्रणाली व शैलेश यांनी घेतली.
            शिबिराच्या आयोजनात शाम, आकाश, प्रफुल्ल यांनी विशेष सहकार्य केलं. बाहेरच्या तप्त वातावरणात मनाला गारवा आणि प्रेरणा देणाऱ्या ‘आदमी हो तुम की उठो आदमी को प्यार दो..’ या गाण्याने शिबिराची सांगता झाली.

No comments:

Post a comment