सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी सातत्याने व वेळोवेळी आत्मपरीक्षण
करणे अनेक कारणांसाठी आवश्यक ठरते. ‘मी’पणाच्या गुंत्यात मी अडकलो आहे का? – हे
तपासून पाहणे हे त्यातील एक महत्त्वाचे कारण. पण नक्की काय व कसा असतो हा ‘मी’पणाचा
गुंता?
निर्माणच्या एका शिबिरात डॉ. अभय बंग यांनी उलगडला 'मी' नावाचा गुंता! खालील लेख हा डॉ. अभय बंग यांनी शिबिरार्थींसोबत
साधलेल्या संवादाचे संक्षिप्त स्वरूप आहे.
माझा रस कशात आहे?
जरी आपण एखादा प्रश्न सोडवतोय असं आपल्याला
वाटत असलं तरी अखेरीस आपण वेगळ्या समस्येशी लढत
असतो. ती समस्या आहे आपण स्वतः - ‘I’ is the problem. आपण कितीही म्हटलं की समाजाचे प्रश्न सोडवतोय तरीही आपल्याला
त्या प्रश्नात रस नसतो. आपल्याला रस असतो स्वतःमध्ये. आणि आपला - ‘स्व’चा गुंता
सोडवण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्या बाह्य समस्येवर फार उर्जा लावत नाही. आपलं
सतत सुरू असतं – ‘मी इथे असायला पाहिजे होतं की अजून कुठे असायला पाहिजे
होतं?’ असं सारखं ‘मी.. मी.. मी..’ सुरू असतं.
प्राधान्य कशाला – सामाजिक प्रश्न की
स्वतःचा प्रश्न?
पाण्यातल्या शक्तिशाली भवऱ्यांचे इतके सामर्थ्य असते की ते अख्ख्या जहाजाला गिळून घेतात. परंतु, ह्या प्रचंड फिरणाऱ्या भवऱ्यांच्या मध्यभागी काही नसतं. भवऱ्याच्या गतीमुळे पाणी फिरतं आणि मध्यभागी एक ‘Illusion’ निर्माण होतं. मनुष्याचं मन हे भवऱ्यासारखं असतं. ते एका ‘मी’ च्या भ्रमाभोवती फिरत असतं. आपण बहुतेकजण जेव्हा समाजातील किंवा वास्तवातील कामाला भिडतो, तेव्हा आपण त्या समस्येला भिडत नसतो. आपण मानसिकदृष्ट्या पुढचं शिक्षण कुठे घ्यायचं हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो हा की बहुतांश लोकांच्या बाबतीत काम सुरू करण्यापूर्वीच पुढचे निर्णय झालेले असतात. ‘इथे एक वर्ष करुन मग मास्टर्सला प्रयत्न करेन. मग ते मास्टर्स कशात करायचं?’ असे प्रश्न आधीपासून पडतात. त्यामुळे आपण त्या समस्येला गांभीर्याने भिडतही नाही. म्हणून फार काही त्यातून घडत नाही. सामाजिक काम करायला नाही, तर आपण स्वतःचा प्रश्न सोडवायला जात असतो. आपल्याला कशात रस आहे ते पाहत असतो. पण त्याला काही आपला दोष नाही. शिक्षण व्यवस्था, करिअर, कुटुंब, आई-वडील, सगळे असंच घडवतात आपल्याला. म्हणून आपण त्या सापळ्यात पडलेलो असतो. पदव्युत्तर शिक्षण कुठून घ्यायचं हे शोधण्यात उर्जा खर्ची पडत जाते आणि म्हणून मूळ समस्येबाबत तसं ठोस काही घडत नाही. त्यतून असा प्रश्नही निर्माण होतो - समस्या सोडवयला जे शिक्षण पाहिजे ते त्या समस्येवर काम करतानाच नाही घेऊ शकत का? पण सहसा ते करायचं धाडस कोणी करत नाही. बहुतेकांना MTech, MD, PHD हेच आकर्षित करतात.
दिशाहीन क्षमता विकास काय कामाचा?
एके वर्षी मी २ ऑक्टोबरला हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यानासाठी उपस्थतीत होतो. तिथे श्रोत्यांमध्ये जवळपास १०० भारतीय विद्यार्थी होते. त्यातही बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी. त्यांना भेटून 'तुम्ही काय करणार?' असे विचारले असता प्रत्येकाचे उत्तर – ‘माहित नाही, कोणीतरी जॉब देईल, कोणीतरी डेटा ऍनॅलिसिस करायचे काम देईल, कोणीतरी संशोधनात समाविष्ट करेल, आमचे शिक्षक काहीतरी प्रोजेक्ट देतील’ - असेच काहीसे होते. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या, जगातील उत्कृष्ट व मानांकित विद्यापीठांमधील हुशार विद्यार्थ्यांची ही उत्तरे होती. दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था एखाद्या समस्येला तोंड देण्यासाठी लागणारे – Confidence आणि Competence – दोन्ही देत नाही. शैक्षणिक व्यवस्थाच विद्यार्थ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. मग ती असुरक्षितता पदवी प्राप्त करूनदेखील पुरेसं ज्ञान नसण्याची असो किंवा थेट एखाद्या प्रश्नाला भिडून काम करत ज्ञान प्राप्त करणे मारक ठरण्याची भीती असो. म्हणून मग क्षमता वाढवण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाचा पर्याय स्वीकारला जातो. मुळात उच्च शिक्षण घेणे व क्षमता वाढवणे गैर नाही. पण क्षमता वाढवून कोणत्या समस्येवर काम करणार ते ठरवणे गरजेचे असते. अनेकांना कुठे जायचं हे ठाऊक नसतानाच गाडीत बसायची घाई झालेली असते. जर आयुष्यातील अनेक वर्षे चुकीच्या निर्णयामुळे वाया घालवायची नसतील तर मी म्हणेन की जीवनातील समस्यांना सामोरे जा. आणि तेही पुढील शिक्षणाचा विचार न करता. ती समस्या सोडवायचा प्रयत्न करा.
चुकाल तेव्हा शिकाल
समस्या सोडवण्याचा प्रयत्न करताना अडचणी येतील. कारण सुरवातीला Competence कमी पडू शकतो. पण ती तर सुरुवातच असते.
आज माझं वय ६७ आहे. माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी एकही काम असं केलं नाही ज्यात मी चुकलो
नाही. ५० वर्षांच्या अनुभवानंतरही जेव्हा मी एखादं काम करतो तेव्हा पहिले मी
चुकतोच. चुकतो आणि मग त्यातून मी शिकतो.
गांधीजींनी लिहिलेल्या एका पुस्तकातील प्रसंग सांगतो. वर्ष होतं १९४६. भारत स्वातंत्र्याच्या
उंबरठ्यावर असताना गांधीजींच्या मनात प्रश्न निर्माण झाले - देशाच्या आरोग्याचं काय? खेड्यापाढ्यामध्ये
आरोग्याचं काय होईल? गांधीजी त्या प्रश्नाच्या मागे लागले. पुण्याला मेहेता नावाचे
एक डॉक्टर होते. Naturopathy करायचे. गांधीजी स्वतःचा उपचार
इथे करायचे. तिथेच एक संस्था स्थापन करून गांधीजींनी ठरवलं की खेड्यांमधील
आरोग्यव्यवस्थेच्या प्रश्नावर काम करायचं. प्रश्नाची व्याप्ती समजून ते स्वतः
कामाला लागले. पण १५ दिवस काम केल्यावर त्यांनी एक वाक्य लिहिलं - ''I was
a fool''. त्यांचं म्हणणं होतं की इतके दिवस काम केल्यावरदेखील
त्यांना समजलं नाही की खेड्यांमधील आरोग्यव्यवस्थेवर काम करण्यासाठी पुण्यात न
राहता खेड्यात जाणे आवश्यक आहे. त्यांनी हे सर्वांसमक्ष मान्य
केलं. गांधीजी ही चूक करू शकतात, मग आपण
तर फार छोटे आहोत. म्हणून अपयशी होणं, गोंधळून जाणं यामुळे वाईट वाटून घेण्याची गरज नसते. सामाजिक समस्या सोडवणं
खूप सोपं असतं तर आपली गरजच पडली नसती.
कामातूनच होते ‘स्व’ ची ओळख
एक जन्म तुमचा आईच्या पोटात झाला. दुसरा जन्म तुमचा तुम्ही स्वतः करणार आहात. जेव्हा तुम्ही समस्येला
भिडाल, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. तेव्हा तुम्हाला स्वतःचा साक्षात्कार होईल
– Who am I, What am I & Whose am
I? या तीनही प्रश्नांची उत्तरे जेव्हा मिळतील, तेव्हा तुमचा दुसरा जन्म होईल. मग
या दुसऱ्या जन्माचं बाळंतपण स्वतः करावं लागेल. स्वतःच स्वतःला जन्म द्यावा लागेल.
No comments:
Post a Comment