'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 15 September 2022

क्षमता आणि काम

आपल्या जीवनाचा अतिशय मोठा भाग व्यापणारं आपलं 'काम' नेमकं कोणतं हे कसं ठरवायचं?
'इंटरेस्ट' हे काम निवडण्याचं योग्य निकष आहे का?
मी माझ्या क्षमता कशा ओळखू?

असे अनेक प्रश्न तरुण - तरुणींना पडत असतात. निर्माणच्या शिबिरार्थींसोबत संवाद साधताना डॉ. अभय बंग यांनी या प्रश्नांचा उलगडा केला. खालील लेख हा त्या संवादाचे संक्षिप्त स्वरूप आहे.


मराठी मध्ये एक म्हण आहे - ''दुरून डोंगर साजरा''. एक काम करताना दुसरं काम फार चांगलं वाटतं. दुसऱ्या कामावर गेला रे गेला की अजून तिसरं कोणतं तरी काम चांगलं वाटतं. कारण करत असलेल्या कामाची अडचण वाटते आणि अडचण वाटली की माणसाला inviting वाटायला लागतं. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार विषय निवडावा, कामाचं क्षेत्र निवडावं. आपला इंटरेस्ट मात्र फार फसवा असतो. लोकांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट कशात असतो - तर फेसबुक, व्हॉट्सऍप, सेल्फी. इच्छा व इंटरेस्ट हे घातक मार्गदर्शक असतात. शिवाय माणसाचं मन सहसा शॉर्टकट्स, तात्काळ सुख बघतं. ते म्हणतं की तिथे काही करावं लागणार नाही, प्रयत्न करावे लागणार नाहीत, काही अडचण नसेल, इंटरनेटवर वेळ घालवता येईल. अशा परिस्थितीत इंटरेस्टच्या मागे धावणाऱ्या मनाचं ऐकावं का? अंतरमन वेगळं आहे - ते आतून खोलवरून तुम्हाला मार्गदर्शन करतं. एक सुंदर वाक्य आहे - 'If things are going easy be warned you must be descending down'. आपल्याला खाली घसरतांना, घसरगुंडीहून घसरताना किती छान वाटतं! तेच पायऱ्या चढताना किती धाप लागते! कोणालाही पायऱ्या चढायला आवडत नाही, घसरताना खूप छान वाटतं.


काम ठरवण्याचे निकष
त्यामुळे काम ठरवण्यासाठी इंटरेस्ट ही कसोटी लावू नये. जे जास्त वंचित आहेत त्यांना याची गरज आहे का? - हा झाला बाह्य सामाजिक निकष. मी जे करतो आहे त्या विषयाची, त्या कामाची समाजाला कितपत गरज आहे यालाच विनोबांनी म्हटलंय ''स्वधर्म''. माझ्या समाजाची जी गरज आहे ते तर पूर्ण करणं माझे कर्तव्यच आहे. तर एक निकष लागतो समाजाला याची किती गरज आहे हा. त्याच्यामध्ये गांधींनी आपल्याला अतिशय चांगली कसोटी सांगितलेली आहे. गांधीजी म्हणाले होते - ''तुमच्या मनात जेव्हा काय करावे अशी शंका येईल, तेव्हा तुम्ही पाहिलेली सर्वांत गरीब, हतबल व्यक्ती आठवून विचार करा की तुमच्या निर्णयाने त्या व्यक्तीला लाभ होऊ शकतो का! तेव्हा तुमच्या शंकांचं निरसन होईल.”

ही कसोटी फार सुंदर आहे. ही कसोटी abstract नाही. ती नेमकी तुमच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीच्या रूपात बोलते. तर ही कसोटी लावून विचार करा की जे काम तुम्ही करत आहात, त्यामुळे या माणसाला काही फायदा होतो आहे का? दुसरं म्हणजे असं की त्या क्षेत्रातील टॅलेंट किंवा क्षमता असणं. तर एक - समाजाची गरज कशामध्ये आहे? त्यासाठी ही गांधीजींची कसोटी आणि दुसरं म्हणजे माझ्यामध्ये त्याची क्षमता असणं. जर हे कळत नसेल की माझी क्षमता कशात आहे तर ३-४ प्रकारच्या गोष्टी करून बघाव्यात. त्यातून जीवन हळूहळू आपल्याला दाखवतं की आपल्याला काय चांगलं जमतं. समाजाची गरज आणि माझी क्षमता यांचं चांगलं कॉम्बिनेशन कुठे आहे तिथे आपला कर्तव्यबोध असतो.


आपल्या क्षमता कशा ओळखाव्यात?
दोन उदाहरणे पाहू. एक वेट-लिफ्टर असतो. वेट-लिफ्टिंग करतो. त्याला जर असा प्रश्न पडला की माझी क्षमता किती वजन उचलायची आहे तर त्याला ती कशी कळेल? अर्थात, वजन उचलून. तसंच आपली क्षमता किती आहे हे कळण्यासाठी एकच मार्ग आहे - त्या प्रश्नाला भिडून पाहणे – ‘Go where the problems are’. आता तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुमचं पाहिलं प्राधान्य काय? IIT मध्ये मिळालेली ऍडमिशन पूर्ण करणे हे तुमचं पाहिलं प्राधान्य आहे का? की आपल्याला क्षमता आहेत की नाही हे तपासून घेणं तुमचं पाहिलं प्राधान्य आहे हे ठरवलं पाहिजे.

आता दुसरं उदाहरण पाहू. तुम्ही एका रेल्वे स्टेशनवर गेलात. अनेक गाड्या तयार आहेत. आता लवकरच सुटणार आहेत. एका गाडीमध्ये छान जागा रिकामी आहे, डब्बा रिकामा आहे, सुंदर आहे, नरम आहे, स्वच्छ आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये थोडी गर्दी आहे. तुम्ही कोणत्या गाडीत बसायचे ठरवाल? ती गाडी कुठे जाणार आहे व तुम्हाला कुठे जायचं आहे यावर ते अवलंबून आहे. सीट रिकामी आहे IIT, MTECH, PG साठी. ती तुम्ही नाही घेतलीत तर त्या सीटचं काय होईल ते IIT वाले बघून घेतील. त्यांना दुसरा कोणीतरी सापडेलच. पण तुम्हला तिथे जायचं नसेल आणि चुकून त्या सीटवर बसलात तर काय होईल? दुसरीकडे पोहोचाल. तुम्हाला जायचं आहे दिल्लीला आणि सिट रिकामी आहे मद्रासला जाण्यासाठी तर बसाल का? नाही.

तुम्हाला पोहोचायचं कुठे ते पहिलं ठरवलं पाहिजे. कोणत्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते हे त्या डब्यासारखं आहे. सीट मिळते आहे पण मला तिथे जायचं आहे का? जायचं असेल तर संधी घ्यावी. पण मी म्हणेन की त्याची स्पष्टता मिळवावी. अन्यथा आयुष्यातील २ वर्षे वाया जातील. ‘Every year of education conditions you.’ एकदा समजा तुम्ही मिळत असलेल्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन मग पुढे क्षमतांचा विचार करायचा ठरवलात तर खूप उशीर झाला असेल. कारण ते २ वर्ष तुम्हाला Condition करतात. २ वर्षांनी निर्णय घेणं तुम्हाला जास्त कठीण होईल. तेव्हा तुम्ही विचार कराल - ‘MSc. / M.Tech. झालं - आता काही न करणे म्हणजे किती वाईट’! तेव्हा तुमचं ऍडमिशन तुमचं भवितव्य ठरवेल. पण तुमचं भवितव्य Accident of Admission नका बनू देऊ. तुम्हाला कशामध्ये क्षमता आहे आणि समाजामध्ये कशाची गरज आहे याच्यावर भवितव्य ठरवा. आणि मग त्यानुसार ऍडमिशन निवडा. हा प्रश्न आहे आणि त्यासाठी मला काय क्षमता मिळवायच्या आहेत, कोणती कौशल्ये मिळवायची आहेत ते ठरवा.

तर मी म्हणेन की आधी जो प्रश्न सोडवायचा आहे तो थोडा समजून घ्यावा. आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि मग जर गरज पडली काही विविध गोष्टी शिकायची तर जरूर मग IIT असोत किंवा दुसरं काही असो, जिथे जाण्याची गरज आहे तिथे गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे. क्षमता पूर्ण प्राप्त केल्या पाहिजेत. पण पहिलं या प्रश्नचं उत्तर शोधून घेतलं पाहिजे की ‘Is it where I want to go?’ ती गाडी नाही तर मला भलतीकडेच पोहोचवायची. शेवटी रेल्वे स्टेशनवर गेलेला एक अनाडी प्रवासीदेखील योग्य गाडी निवडण्याचा शहाणपणा दाखवतो. पण शिक्षणाचा मार्ग निवडताना आपण सगळेच तो शहाणपणा का दाखवत नाही?



No comments:

Post a Comment